एक पल पहले..

विवेक मराठी    15-Mar-2022
Total Views |
@आनंद देवधर 9820473272
 शेअर बाजारासारखा आकडेबंबाळ, रुक्ष विषय, त्यात भर म्हणून सॉफ्टवेअरसारखी टेक्निकल गोष्ट आणि कळसाध्याय म्हणून हिमालयातील अदृश्य गूढ योगी असे अफलातून कथानक असणारी ही सत्यघटना. सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचे आहे हे सर्व. ‘एक पल पहले’ मिळालेल्या माहितीच्या आधारे लाखो-कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मती गुंग करून टाकतो.

BSE
 
शेअर बाजार हे दोन शब्द कोणी उच्चारले की सर्वसामान्य मराठी माणूस बिचकतो. नको ती भानगड अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते. हल्ली परिस्थिती बदलली आहे, पण अजूनही प्रमाण कमीच आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे पैसे बुडतात हा समज. अर्थात तशा घटनाही वरचेवर कानी पडत असतात. हर्षद मेहता प्रकरण 1992, केतन पारेख घोटाळा 2000, सब प्राइम भानगड 2008 अशा तीन पडझडी सर्वज्ञात आहेत. या प्रत्येक वेळी सामान्य माणसाच्या खिशाला मोठी चाट बसली होती. काही जण तर आयुष्यातून उठले होते.
 
 
मुंबईत आधी फक्त बाँबे स्टॉक एक्स्चेंज (BSE) अस्तित्वात होते. तिथे ‘रिंग’ म्हणून ओळखला जाणारा एक मजला होता. सर्व दलाल एकत्र येऊन हाताच्या बोटावर आधारित सौदे करत. शेअर्स प्रत्यक्षात कागदाच्या स्वरूपात हस्तांतरित होत. दोन आठवड्यांत पैशांची सेटलमेंट होत असे.सिस्टिममध्ये खूप लूपहोल्स होती, म्हणून धोके होते. डॉ. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली होती. देशात जागतिक दर्जाचे तांत्रिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित असे शेअर मार्केट असावे, असा विचार होत होता. त्यातून राष्ट्रीय शेअर बाजाराचा जन्म झाला, ज्याला आपण NSE म्हणून ओळखतो. नोव्हेंबर 1994पासून NSEवर शेअर्सचे सौदे सुरू झाले. सुरुवातीला एका सेकंदाला फक्त 2 सौदे शक्य होते. ती संख्या 2001मध्ये 60 झाली, तर आजच्या घडीला सेकंदाला 160000 सौदे होतात. देशातील 2000पेक्षा जास्त शहरांमध्ये कार्यरत असलेल्या छडएकडे 2500 व्हीसॅट्स आणि 3000 लीज्ड लाइन्स आहेत.
 
 
वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पादर्शकता, सक्षम तांत्रिक बाबी, अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि वेग. या सर्व प्रकारच्या सकारात्मक बाबींना जबरदस्त धक्का देणारा एक घोटाळा उघडकीस आला आहे. त्याची व्याप्ती खोलवर गेली आहे आणि त्याची रक्कम लाखो कोटी रुपये इतकी आहे. गेली काही वर्षे याबाबत दबक्या आवाजात कुजबुज होत होती. NSEमधील उच्चपदस्थ लोकांनी हा घोटाळा केला आहे. टेक्नॉलॉजीचा गैरवापर हे त्याचे माध्यम आहे. समजण्यासाठी क्लिष्ट आहे. यात ठरावीक ग्रूपला लाखो-कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मग नुकसान कोणाचे झाले? ते थेट कळणार नाही, कारण ही रूढार्थाने म्हणतात तशी एकाने दुसर्‍याची केलेली फसवणूक नाही - म्हणजे खोट्या सह्या, बँकेची लुबाडणूक, बोगस कागदपत्रे, खोटी माहिती, पैशांची अफरातफर असे काही नाही. मग नक्की काय आहे?
 
 
एक क्लिष्ट विषय शक्य तितका सोपा करून सांगितला आहे. घोटाळ्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत आणि एका लेखात बंदिस्त करणे हे खरेच कठीण काम आहे. तरीही प्रयत्न केला आहे.
 
 
सुचेता दलाल यांनी 2015 साली ‘मनीलाइफ’ या त्यांच्या वेबसाइटवर एक लेख लिहून या प्रकरणाला वाचा फोडली होती. तो लेख वाचल्याचे स्मरते. त्याची व्याप्ती इतकी भयानक असेल असे वाटले नव्हते. NSEने बदनामीचा खटला भरला. पण कोर्टात हार पत्करावी लागली आणि मनीलाइफला नुकसानभरपाई द्यावी लागली.
 
 
को-लोकेशन घोटाळा
 
NSEने ऑगस्ट 2009पासून एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली. थर्ड पार्टीला पायाभूत गोष्टी भाडेतत्त्वावर दिल्या, ज्यामध्ये पॉवर सप्लाय, बँडविड्थ, जलदगतीने चालणारे इंटरनेट इत्यादी गोष्टी होत्या. या सुविधा NSE सर्व्हरशी जोडल्या होत्या. काही दलालांनी छडएच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी संगनमत करून ही व्यवस्था अशा पद्धतीने वापरली की त्यांना लाखो-कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला.


BSE
 
जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाइलवर सौदा करता, तेव्हा तुम्हाला शेअरचे खरेदी-विक्रीचे प्रत्येकी पाच भाव दिसतात. प्रत्येक भावासमोर किती खरेदीदार आणि विक्रेते आहेत ती संख्या दिसते. NSEतील भ्रष्ट अधिकार्‍यांनी को-लोकेशनची सुविधा वापरणार्‍या त्यांच्या गटातील दलालांना ही माहिती काही सेकंद आधी पुरवली. म्हणजे एखादा शेअर चढणार आहे की पडणार आहे, हे इतरांपेक्षा काही सेकंद आधी यांना कळत असे. निर्णय घ्यायला तेवढे सेकंद पुरेसे असतात. काय होणार हे माहीत असल्यावर, बी.कॉम. झालेला कोणीही योग्य निर्णय घेऊ शकतो. हे लोक तर शेअर बाजारात मुरलेले होते. त्यांनी अक्षरश: पैसे छापले. एका प्रकारे हे ‘इनसाइडर ट्रेडिंग’ म्हणता येईल.
 
संशय आणि खात्री
 
साल 2010-2014 दरम्यान ओपीजी सिक्युरिटीज या फर्मला अनेक आयपी अ‍ॅड्रेसवर लॉग इन करायची परवानगी दिली. या फर्मला सुमारे 25 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. ओम्निसिस टेक्नॉलॉजी या कंपनीने सॉफ्टवेअर तयार केले आहे. घोटाळ्यात या कंपनीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. कारण या कंपनीला नक्की माहीत होते की जो आधी लॉग इन करेल, त्याला आधी माहिती मिळेल.
 
 
सिंगापूर येथील एका हेज फंडाच्या अधिकार्‍याने सेबीच्या वरिष्ठ अधिकार्‍याला पत्र लिहून याबाबत माहिती दिली. घोटाळा होत असल्याचा आरोप केला. सेबीने यावर कारवाई सुरू केली ती 2015 साली. बिग फोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या फर्म्सपैकी डिलॉइट आणि इ वाय या दोघांची नेमणूक करण्यात आली. फोरेन्सिक ऑडिट करण्यात आले. त्या रिपोर्टमध्ये या सिस्टिमचा गैरफायदा घेता येऊ शकतो, असा निष्कर्ष काढला होता. सरकारने त्याची दखल घेतली. अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी संसदेत निवेदन केले. 3 डिसेंबर 2016पासून ही सिस्टिम बंद करण्यात आली.
 
 
सेबीने छडएला 625 कोटी रुपये दंड ठोठावला. मार्केटमधून पैसे उभारण्यासाठी सहा महिने बंदी घातली. रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांच्या पगारात 25% कपात केली. घोटाळ्याच्या तुलनेत फारच स्वस्तात सुटका झाली. याशिवाय दोषी आढळलेल्या दलालांना दंड केला गेला.
 
सीबीआयची एंट्री
 
 
मे 2018मध्ये जेम जोन्स नावाच्या व्यक्तीने सेबीच्या अध्यक्षांना एक पत्र लिहिले. त्यात अत्यंत गंभीर स्वरूपाचे काही आरोप करण्यात आले होते. ती केस सीबीआयकडे सोपविण्यात आली. पहिला एफआयआर फाइल झाला. गुन्हेगारी कट, पदाचा गैरवापर, लाचखोरी, पुरावे नष्ट करणे, सर्व्हरशी कनेक्ट करताना केलेला सिस्टिमचा गैरवापर असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर सीबीआयने अनेक ठिकाणी - मुख्यत्वे मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे छापे मारले, कागदपत्रे जप्त केली, जबाब नोंदवले.
 
 
NSEचे माजी ग्रूप चेअरमन आनंद सुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. पण या घोटाळ्याची मास्टर माइंड समजल्या जातात त्या चित्रा रामकृष्ण. त्यांना 6 मार्च रोजी चौकशीअंती अटक करण्यात आली आहे.
 
चित्रा रामकृष्ण आणि हिमालयातील योगी
 
चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या चित्रा आधी SEBIच्या आणि नंतर NSEच्या जडणघडणीत सहभागी होत्या. फारसा अनुभव नसताना, त्यांना NSEच्या एमडी म्हणून गलेलठ्ठ पगारावर नेमण्यात आले. त्यांनी 1 एप्रिल 2013 रोजी पदभार सांभाळला. त्यांनी आनंद सुब्रह्मण्यम यांची आपल्या हाताखाली ताबडतोब नेमणूक केली. त्याच वर्षी त्यांना फोर्ब्सचा ‘विमेन लीडर ऑफ द इयर’ हा सन्मान प्राप्त झाला होता. चित्रा रामकृष्ण यांनी काही धक्कादायक अविश्वसनीय खुलासे केले आहेत.
 
 
त्यांनी असे कबूल केले आहे की हिमालयातील एक योगी त्यांच्याकडून हे सर्व करवून घेतो. वीस वर्षांपासून तो योगी त्यांच्या संपर्कात असून त्याला त्या आध्यात्मिक गुरू मानतात. हा गुरू कोण याबाबत अजून खुलासा झाला नाही. पण या गुरूकडे ईमेल आयडी आहे, बरे का!
 
rigyajursamaoutlook.com हा त्यांचा आयडी नीट वाचला तर लक्षात येते की ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यातील सुरुवातीची अक्षरे घेऊन तो तयार करण्यात आला आहे. हिमालयाच्या कुशीत कॉम्प्युटर, वीजपुरवठा, इंटरनेट सर्व काही उपलब्ध आहे. योगी आणि चित्रा यांच्यात असंख्य ईमेल्सची देवाणघेवाण झाली असून हे सर्व प्रकरण जितके सुरस आहे, तितकेच गंभीर आहे.
 
 
ईमेल्सच्या मजकुरावरून असे दिसून येते की हे महाराज अत्यंत लहान लहान गोष्टींबाबत चित्रा यांना मार्गदर्शन करत होते. आनंद सुब्रह्मण्यम यांचा पगार, त्यांना मिळणारे पर्क्स वगैरे हे योगी ठरवत होते. याशिवाय या योगी महाराजांना NSE ची खडा न खडा माहिती होती. कोणाची बदली कुठे करायची, कधी करायची इत्यादी गोष्टी यात आहेत. छडएबोर्डावर कोणाला घ्यायचे, हेसुद्धा चित्रा यांनी योगींना विचारले आहे.
 
 
कोणताही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप सापडला नाही किंवा ऑफ साइट डेटा उपलब्ध नाही. फोरेन्सिक ऑडिट झाले तेव्हा होता म्हणून कमीत कमी ईमेल्स तरी सापडल्या.
 
 
सुचेता दलाल यांच्या लेखामुळे असा काही घोटाळा असेल याची कुणकुण होती. नंतर काही त्यात फारसे ऐकू येत नव्हते. तसेही आर्थिक बाबतीत घडणार्‍या घटनांबाबत लोक उदासीन असतात. त्यात हा घोटाळा अत्यंत टेक्निकल. सामान्य माणसाला समजावून सांगणे कठीण. जरी त्याची व्याप्ती लाखो-कोटी रुपयांची असली, तरी नुकसान झाले ते अदृश्य आहे. नुकसान झालेली माणसे कशी शोधणार? सिस्टिम हवी तशी वाकवून मारलेला डल्ला आहे. पैसे कुठे गेले, कोणी नेले, नक्की किती जण यात सहभागी आहेत, हिमालयाच्या कुशीतील योगी कोण, यातील राजकीय नेत्यांचा सहभाग किती, असेल तर कोणाचा, याचे पुढे काय होणार, पैसे परत येणार की नाही.. हे सर्व प्रश्न आजच्या घडीला अनुत्तरित आहेत.
 
 
माझ्या मते को लोकेशन या कन्सेप्टमध्ये याची सुरुवात आहे. इतरांच्या आधी कनेक्टिव्हिटी मिळवून दिली, तर शेअरचे भाव आधी कळतील हे माहीत असणारे कोण कोण आहेत? त्यामुळे पैसे छापता येतील हे कळणारे मार्केटचे मुरलेले खिलाडी कोण कोण आहेत? चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रह्मण्यम इथेच गाडी थांबते? योगीचा नक्की रोल काय? शेवटी यामागे राजकीय वरदहस्त कोणाचा? येणारा काळ ठरवेल.
 
 
शेअर बाजारासारखा आकडेबंबाळ, रुक्ष विषय, त्यात भर म्हणून सॉफ्टवेअरसारखी टेक्निकल गोष्ट आणि कळसाध्याय म्हणून हिमलयातील अदृश्य गूढ योगी असे अफलातून कथानक असणारी ही सत्यघटना. सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचे आहे हे सर्व.
 
 
‘एक पल पहले’ मिळालेल्या माहितीच्या आधारे लाखो-कोट्यवधी रुपयांचा घोटाळा मती गुंग करून टाकतो.