@डॉ. श्रीकांत कार्लेकर 9764769791
पृथ्वीच्या तापमानातील ही वाढ येत्या काही वर्षांत दोन अंश सेल्सिअस असेल, मात्र त्यानंतर ती त्याहीपेक्षा जास्त असेल. त्यामुळे मानवाच्या अस्तित्वालाच मोठा धोका असेल, असे सांगणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाने हा अहवाल तयार केला आहे. पुढील पिढीला या शतकातील संकटांपेक्षा चार पटींनी जास्त दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यावरणीय बदलांमुळे सगळ्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या, हवामान बदलावरील आंतरशासकीय तज्ज्ञ गटाच्या (Intergovernmental panel on climate change) अहवालात नुकतेच मांडण्यात आले आहे. दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. येत्या दोन दशकांत जग आजारी, भुकेले, गरीब आणि निराश होईल असा अंदाज त्यात वर्तविण्यात आला आहे. हवामान बदलाच्या संकटात जग कसे गुरफटले जात आहे व भविष्यात त्याची अवस्था कशी होईल, याचा अहवालात संपूर्ण परामर्श घेण्यात आला आहे.
यापूर्वीचा त्यांचा सहावा अहवाल 9 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झाला होता व त्यात भविष्यात होऊ घातलेल्या तापमान वाढीचा आणि त्यामुळे होणार्या अनेकविध परिणामांचा सगळ्या मानवजातीला परखड भाषेत इशारा दिला गेला होता! प्रामुख्याने प्राकृतिक किंवा भौतिक विज्ञानाच्या आधारावर केलेले ते हवामान बदलाचे विश्लेषण होते (AR6 Climate change 2021, The physical science basis) आणि म्हणूनच तो दखल घेण्यासारखा आणि वैशिष्ट्यपूर्णही होता. यानंतर सप्टेंबर 2022मध्ये पुढचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येईल.
जागतिक हवामानासंबंधीच्या सर्व वैज्ञानिक घटकांचे मूल्यमापन करणे हा या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समितीचा मुख्य उद्देश असतो. सध्याच्या जागतिक हवामानाचा आणि हवामान बदलांचा अभ्यास करून भविष्यातील या आपत्तीच्या धोक्याची व तीव्रतेची कल्पना देणे व परिणामांची तीव्रता कमी करण्याचे मार्ग सुचविणे हे या समितीचे प्रमुख काम असते.
जागतिक पातळीवर सर्व देशांनी दिलेली हवामान बदलांची सांख्यिकी (Data) व बदलांचा सामना करण्यासाठी सुचविलेल्या योजना यांत कितपत एकवाक्यता आहे आणि कोणत्या घटकांविषयी अधिक संशोधनाची गरज आहे, याचाही आढावा या समितीच्या अहवालातर्फे घेतला जातो. आय.पी.सी.सी. समिती स्वत: संशोधन करीत नाही. सर्व देशांकडून आलेल्या अहवालांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर मूल्यमापन केले जाते. त्यामुळेच या समितीकडून शेवटी तयार करण्यात आलेल्या अहवालाची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि नेमकेपणा वाढतो. हे अहवाल तटस्थ व नीतिसंगत (Policy relevant) असतात. सुमारे 200 वैज्ञानिकांची समिती ठरावीक काळानंतर अशा प्रकारचा अहवाल संयुक्त राष्ट्रांकडे सादर करते.
याआधीच्या अहवालानंतर विविध तज्ज्ञांकडून गेल्या वर्षभरात आलेल्या माहितीनुसार, वातावरणात होत असलेल्या बदलांचे अनेक दुष्परिणाम नजीकच्या भविष्यात अधिक तीव्र स्वरूप धारण करतील. पृथ्वीचे तापमान येत्या काही वर्षांत आणखी वाढेल आणि जंगलातील आगी, पूर, दुष्काळ, समुद्रपातळीतील वाढ अशी न टाळता येणारी संकटे पृथ्वीच्या मोठ्या भागांत निश्चितच जाणवणार आहेत.
पृथ्वीच्या तापमानातील ही वाढ येत्या काही वर्षांत दोन अंश सेल्सिअस असेल, मात्र त्यानंतर ती त्याहीपेक्षा जास्त असेल. त्यामुळे मानवाच्या अस्तित्वालाच मोठा धोका असेल, असे हा अहवाल सांगतो. पुढील पिढीला या शतकातील संकटांपेक्षा चार पटींनी जास्त दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे.
इतरही काही महत्त्वाची निरीक्षणे या अहवालात आहेत. उष्णतेच्या अतिदाहक झळा, वाढलेले आणि प्रमाणाबाहेर गेलेले प्रदूषण व जगभर वाढलेली उपासमार यामुळे मानवजातीचा मोठा संहार होण्याची शक्यता सुचविण्यात आली आहे. यापुढे जागतिक तापमानात केवळ 0.9 सेल्सिअसने जरी वाढ झाली, तरी वणवे लागून हानी होणार्या जमिनींच्या संख्येत 35 टक्क्यांनी वाढ होईल. समुद्रकिनारी राहणार्या लाखो लोकांना वर्ष 2050पर्यंत स्थलांतर करावेच लागेल.
पर्यावरणदृष्ट्या घातक असलेल्या प्रदेशांत सध्या साडेतीन अब्ज लोक राहत असून पराकोटीच्या (Extreme) हवामान बदलांमुळे भविष्यात यातील अनेक लोक मृत्युमुखी पडतील. ह्या बदलाचा सर्वाधिक फटका जगातील गरिबांना बसणार आहे. वनस्पती आणि प्राणी परिसंस्थाही (Ecosystems) धोक्यात येतील. विविध प्राण्यांच्या प्रजातींची संख्या कमी होईल, लाखो लोक विस्थापित होतील, प्रवाळ (Corals) मोठ्या संख्येने नष्ट होतील, बरेचसे हिम वितळून जाईल आणि सगळ्या समुद्रांतील पाण्याची पातळी वाढेल व किनारी भागातील वस्त्या पाण्याखाली जातील. जगभर आजही चालू असलेला कार्बन, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांचा अतिवापर भविष्यातील या भयावह संहारासाठी कारणीभूत असेल.
हवामान बदल रोखण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न चालू असले, तरी त्या प्रयत्नांना निश्चित दिशा देणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच हा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी सगळ्या देशांकडून होणारा विलंब, सदैव बदलत असलेले पर्जन्यमान, जंगलांना लागणार्या आगी याविषयी या अहवालात जास्त चिंता व्यक्त केलेली दिसून येते.
भविष्यात होणारी जीवितहानी, जीववैविध्याचा र्हास आणि पायाभूत सुविधा (Infrastructure) लक्षात घेऊन प्राधान्याने महत्त्वाकांक्षी उपाययोजना लगेचच राबविण्याचे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे. यामध्ये माणसांची व प्राणि-वनस्पतींची भेद्यता (Vulnarability), कुवत आणि पात्रता यांची हवामान बदलाला सामोरे जाण्याची मर्यादाही लक्षात घेतली गेली आहे.
जगभरातील वैज्ञानिकांनी दिलेल्या ज्या निरीक्षणांवर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे, ती जागतिक निरीक्षणे बघितली तर या समस्येच्या तीव्रतेची नेमकी कल्पना आपल्याला येऊ शकते.
सध्याच्या हवामान बदलांमुळे जगातील सागरी तसेच गोड्या पाण्याच्या व जमिनीवरील अनेक परिसंस्था केवळ बाधित झाल्या नसून त्यांच्या संरचनाही बदलल्या आहेत. हा अनुभव याआधीही आला असला, तरी आता त्याचे परिणाम क्षेत्र व परिणामांची तीव्रता अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी वाढणार आहे.
शरीररचना, वाढ, विपुलता (Abundance), भौगोलिक स्थानयोजन (Placement) आणि ऋतूनुसार होणारे बदल या बाबतीत सजीवांना मिळणारा जीवशास्त्रीय प्रतिसाद येणार्या हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी भविष्यात पुरेसा नसेल.
माणसाच्या परिसंस्थेत होणार्या हस्तक्षेपामुळे अनेक प्रजातींनी आत्ताच त्यांच्या परिसंस्थेत स्थानबदल केले असून वाढत्या तापमानामुळे हे स्थानबदल उच्च अक्षांशांच्या दिशेने - म्हणजे थंड प्रदेशाकडे केले आहेत. ज्या प्रजाती हे करू शकल्या नाहीत, त्यांचे अधिवास आक्रसले आहेत.
अतिशय सविस्तर असलेल्या या अहवालात प्रामुख्याने नैसर्गिक पर्यावरणात होत असलेले बदल, त्याचे परिणाम आणि माणसांमुळे याला लागत असलेला हातभार व वाढणारी तीव्रता याची चर्चा केली गेली आहे. जगभर जाणवणारी पाण्याची कमतरता व दुर्भिक्ष, स्थानिक पातळीवर होणारे हवामान बदल व त्यामुळे एकाएकी येणारी ढगफुटी, गारपीट यासारखी संकटे, मोसमी पावसाच्या आकृतिबंधात (Patternध्ये) होत असलेले बदल, हिमनद्यांचे विलयन, समुद्राच्या पातळीत वाढ, वादळांचे वाढते प्रमाण, बिघडलेले जलचक्र (Hydrological cycle), वन्यजीवनाचा र्हास, भूजल कमतरता ह्या सार्वत्रिक निरीक्षणांचा विचार यात केलेला आहे. याचबरोबर लोकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात होत असलेला बिघाड, विविध आजारांच्या संख्येतील वाढ, कुपोषणाचे वाढते प्रमाण, अन्नाचा आणि राहणीमानाचा खालावत असलेला दर्जा, नागरी लोकसंख्येत 2015 ते 2020 या दोन वर्षांत 38 कोटींनी झालेली वाढ आणि तापमान वाढीशी निगडित वाढलेली स्थलांतरे अशा अनेक निरीक्षणांचा विचार करून भविष्यातील पृथ्वीच्या व पृथ्वीवरील पर्यावरणाच्या ढासळणार्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
जगभरातून मिळालेल्या माहितीनुसार अनेक स्थानिक प्रजाती या हवामान बदलामुळे याआधीच नाहीशा झाल्या आहेत. प्राण्यामध्ये व वनस्पतींमध्ये सामूहिक मृत्युघटनांत वाढ होऊ लागली आहे. हवामानामुळे झालेल्या सामूहिक निर्वंशाची ही सुरुवात म्हणता येईल. याचा दूरगामी परिणाम वेगवेगळ्या परिसंस्थांच्या जीवनचक्रावर होऊ लागला आहे. बदलत जाणार्या सांस्कृतिक पद्धतीत व आर्थिक व्यवहारातही याचा एक परिणाम डोकावू लागला आहे!
भविष्यात निरनिराळ्या प्रकारे अशा 127 मार्गांनी पृथ्वीच्या पर्यावरणाचा र्हास होण्याची शक्यता आहे. यामुळे येणारी अनेक नैसर्गिक संकटे अपरिवर्तनीय असतील, असे सुचविणारे देण्यात आलेले अनेक वैज्ञानिक पुरावे नेमके आणि नि:संदिग्ध आहेत.
या वेळच्या या नवीन अहवालात प्रमुख खंडातील (Continentsमधील) हवामान बदलावर जास्त भर देण्यात आला आहे. या खंडात दिसून आलेल्या हवामान बदलात मनुष्याच्या हस्तक्षेपामुळे पराकोटीच्या (Extreme) हवा व हवामान घटना कशा निर्माण झाल्या, याचा वैज्ञानिक लेखाजोखा घेण्यात आला आहे. याचबरोबर या बदलांना पृथ्वी कसा प्रतिसाद देत आहे याचाही समावेश आहेच. खंडानुसार काही महत्त्वाची निरीक्षणे अशी आहेत -
आशिया - हिमालयातील हिम वितळून तिथल्या डोंगररांगांत मोठ्या संख्येने हिमानी सरोवरे तयार होतील. ती फुटली की त्यांच्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे खालच्या भागातील वस्त्या भूस्खलनप्रवण आणि पूरप्रवण बनतील. आशियाच्या समशीतोष्ण भागांत उबदार हवा आणि भरपूर पाऊस यामुळे डास होऊन डेंग्यू ताप, मलेरिया रोगांचा प्रसार वाढेल. गेल्या दोन वर्षांत वाढलेली वादळांची आणि पुरांची संख्या याहीपेक्षा जास्त होईल आणि लोकांना लहान-मोठी सर्व प्रकारची स्थलांतरे करावीच लागतील.
आफ्रिका - इथले लोक मुळातच अतिउष्ण प्रदेशात राहत असल्यामुळे यापुढे त्यांना तापमानवाढीचा पराकोटीचा त्रास सहन करावा लागेल.
आफ्रिकेतील लोकसंख्येत वाढ होईल आणि बरीच लोकसंख्या किनारी शहरांत राहू लागेल. वर्ष 2060पर्यंत 20 कोटींपेक्षा जास्त लोकांना वाढत्या समुद्रपातळीशी सामना करावा लागेल.
नायजेरियाची किनार्यावरची राजधानी लागोस हे वर्ष 2100पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनेल. नागरी हवामानातील (Urban climate) विशेषज्ञांच्या मते आफ्रिकेला मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण आणि अतिउष्णतेच्या लाटा अशा धोकादायक परिस्थितीशी दोन हात करावे लागतील.
मध्य आणि दक्षिण अमेरिका - अॅमेझॉनचे वर्षावन (Rainforest) आणि त्यांत वास्तव्य करून राहिलेले लक्षावधी प्राणी आणि वनस्पती, दुष्काळ व वणवे यांच्या बाबतीत फार संवेदनशील आहेत. वाढत्या तापमानात चरितार्थ चालविण्यासाठी शेतकर्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावीच लागेल, ज्यामुळे हे वर्षावन हळूहळू बाधित होईल.
मध्य अमेरिकेतील व ईशान्य ब्राझिलमधील अँडीज पर्वतशृंखलेचे पर्यावरण, दुष्काळ, वादळे आणि पूर यामुळे हलाखीचे दिवस अनुभवेल. याचा परिणाम म्हणून आणि भूराजकीय (Geopolitical) व आर्थिक अस्थिरतेमुळे या भागांतूनही मोठ्या संख्येने स्थलांतरे होतील. मध्य व दक्षिण अमेरिकेत डासांचा प्रादुर्भाव वाढेल आणि त्यामुळेही अनेक रोग पसरतील.
युरोप - तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तर काय होते, हे वर्ष 2019मध्ये युरोपात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेने यापूर्वीच दाखवून दिले आहे. असे भविष्यात पुन्हा होऊ शकते आणि तसे झाले, तर तापमानाशी निगडित ताणतणाव आणि मृत्यूंचे प्रमाण खूपच वाढेल. कारण इतक्या उच्च तापमानाला माणसाची शरीररचना व आरोग्य जुळवून घेऊच शकणार नाही. या शतकाच्या अखेरपर्यंत किनारी प्रदेशांचे समुद्रपातळी वाढल्यामुळे होणारे पूरसदृश्य नुकसान आजच्यापेक्षा दसपटीने जास्त असेल.
भरपूर वित्तसंपत्ती असूनही हवामान बदलांशी जुळवून घेता न आल्यामुळे उष्माघाताचे बळी वाढतील, शेती नष्ट होईल आणि पाण्याचे दुर्भिक्ष इतके वाढेल की विशेषत: दक्षिण युरोपमध्ये त्याचे वाटप (Rationing) करावे लागेल, जे जिकिरीचे असेल.
उत्तर अमेरिका - पश्चिम संयुक्त संस्थाने आणि कॅनडा येथे वणवे वाढतील. यामुळे बरीच जंगले जळून जातील आणि निसर्गाची आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच मोठी हानी संभवते. हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाणही वाढेल.
तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्यात यश आले, तरीही संयुक्त संस्थानांच्या मोठ्या भागांत हरिकेन वादळे आणि समुद्रपातळीतील वाढ ही संकटे निर्माण होतीलच. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होईल.
आर्क्टिक महासागर क्षेत्रात, वितळणारे सागरी बर्फ, वाढणारे तापमान आणि कायम गोठलेल्या प्रदेशांचे (Permafrost) विलयन यामुळे सागरी जीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचतील.
ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियात प्रामुख्याने ग्रेट बॅरिअर रीफ या प्रवाळ संरचनेवर आणि केल्प जंगलांवर हवामान बदलाचा मोठा परिणाम होईल. यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक घटक, अनुकूलन किंवा जुळवून घेण्याच्या मर्यादेपर्यंत ताणले जातील आणि त्यांत अपरिवर्तनीय (Irreversible) बदल होतील. दक्षिण व पूर्व ऑस्ट्रेलियात आणि न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी जंगले वणवाग्रस्त होतील आणि त्यानंतर निर्माण झालेल्या व उडत आलेल्या राखेचे जाड थर पर्यावरणाची मोठी हानी करतील.
अतिशय बारकाईने केलेला हा अहवाल म्हणजे हवामान बदलांमुळे पृथ्वीवर आणि पर्यायाने मानवजातीवर येणार्या भविष्यातील संकटांचा एक प्रकारे सुस्पष्ट असा नकाशाच आहे. तो सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या विश्लेषणातून हवामान बदलाच्या संदर्भातील जागतिक नेतृत्वाचे अपयश कसे उघडे पडले आहे, तेही पुरेसे स्पष्ट झाले आहे हे नक्कीच!