मुळापासून हादरवणारा ‘द कश्मीर फाइल्स’

विवेक मराठी    19-Mar-2022
Total Views |
@चेतन दीक्षित
 द कश्मीर फाइल्सने ह्या मनोरंजन विश्वाला एक असा ऐतिहासिक धक्का दिला की ज्याने ह्या विश्वात खोलवर रुतलेल्या डाव्या विचारधारेचे मूळ मजबूत हादरले. डाव्यांच्या इकोसिस्टिमला दिलेले एक जोरदार उत्तर म्हणून हा चित्रपट इतिहासात नेहमीच उल्लेखला जाईल. ह्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावरून इतिहासात हेतुपुरस्सर दाबलेल्या गोष्टी बाहेर येतील असे वातावरण नक्कीच निर्माण झाले आहे.

the
 
भारतीय मनोरंजन क्षेत्र एका नवीन अशा बदलाला सामोरे जात आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा समकालीन समस्या मांडणारा होता. स्वातंत्र्योत्तर काळात देशभक्तीच्या चित्रपटांनी खूप मोठा वर्ग चित्रपटगृहांशी जोडला. मिश्र अर्थव्यवस्थेने सामान्य माणसाला काय दिले ह्याचे चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून झाले. राज कपूरचे चित्रपट ह्याच धाटणीचे असत. नंतरचा काळ हा रोमँटिसिझमचा, चॉकलेटी हिरोंचा. नंतर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनने चित्रपटाचे रूप बदलले. नंतर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचे पेव फुटले, जे आजपर्यंत चालू आहे. सोबत मसाला, कौटुंबिक धाटणीच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनात घर केले. सध्याचा काळ हा ओटीटीचा आहे, हे चित्रपटाचे आणखी एक आव्हानात्मक व्हर्जन.
 
ह्या सगळ्या काळात एक समान धागा जाणवतो की दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य, लेखकाचे स्वातंत्र्य, निर्मात्याचे स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावाखाली ह्या वाट्टेल ते दाखवायचा ह्या काळात प्रयत्न झाला. अर्थात अजून होतो. मला आठवते, एम.एफ. हुसेन ह्यांनी भारतमातेचे अतिशय आक्षेपार्ह चित्र काढले होते, ज्याला भयंकर विरोध झाला. नक्की माहीत नाही, पण कदाचित एम.एफ. हुसेनांना ह्याच कारणाने देश सोडूनसुद्धा जावे लागले होते. जेव्हा ह्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला ह्यात आक्षेपार्ह वाटले नाही आणि एम.एफ. हुसेनांना दिलासा मिळाला. सत्यम शिवम सुंदरमचे आणखी एक उदाहरण. अशी बरीच उदाहरणे देता येतील. पण जेव्हा अशा घटना घडल्या, तेव्हा ‘आर्टिस्टिक लिबर्टी’च्या नावाखाली त्यांना संरक्षण दिले गेले आणि त्या नावाखाली एक विशिष्ट आणि डाव्या विचारांचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला, अजूनही होतोय. चंद्रप्रकाश द्विवेदींना चाणक्य मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करताना काय काय आणि कशा कशा अडचणी आल्या, ते त्यांनी स्वत: सांगितले आहे. त्यांची मुलाखत यूट्यूबवर उपलब्ध आहे.
मोदींचा राष्ट्रीय पातळीवरचा उदय आणि समाजमाध्यमांनी मोडलेली मुख्य प्रसारमाध्यमांची मक्तेदारी ही ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ने ह्या मनोरंजन विश्वाला एक असा ऐतिहासिक धक्का दिला, ज्याने ह्या विश्वात खोलवर रुतलेल्या डाव्या विचारधारेचे मूळ मजबूत हादरले. कारण जो काही अजेंडा इतकी वर्षे ह्या डाव्या विचारधारेने जोपासला होता, खतपाणी घालून वाढवला होता, त्याच्या अस्तित्वावरच शंका यावी अशा आशयाचे विचार डावे विचारवंत व्यक्त करताना दिसत आहेत.
 
 
2014 साली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेणे हे देशाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा इतके महत्त्वाचे आहे की आतापर्यंत जे काही नाकारले जात होते, बहुसंख्य असूनसुद्धा ज्या आवाजाला वाव नव्हता, त्याला एक आत्मविश्वास आला, जाणीव झाली की त्यांनासुद्धा आवाज आहे आणि ते तो आवाज उठवू शकतात.. द कश्मीर फाइल्स हे त्याचे ज्वलंत उदाहरण.


the
 
तुम्ही आतापर्यंत बोलला नाहीत, तर मग आता का बोलताय? असाच काहीसा डाव्या विचारधारेचा सूर असतो. पण मोदींचा राष्ट्रीय पातळीवरचा उदय आणि समाजमाध्यमांनी मोडलेली मुख्य प्रसारमाध्यमांची मक्तेदारी ही द कश्मीर फाइल्सच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
 
काश्मिरी पंडितांबद्दल कल्पना सर्वांना होती आणि काश्मिरी पंडितांवरच्या अत्याचाराची दखल अजिबात घेतली नाही, ह्याचीसुद्धा कल्पना सर्वांना होती. ह्या चित्रपटाने ती कल्पना जाणिवेत बदलली. नुसती बदललीच नाही, तर ती जाणीव ठळक करून दिली. आणि हे जनतेला नवे होते. जुनी भळभळती आणि दुर्लक्षित जखम ह्या चित्रपटाने उघडी केली आणि तीच गोष्ट सामान्य माणसाला इतकी भावली की संबंधित ठेकेदारांनी चित्रपटाची पराकोटीची नाकेबंदी करायचा प्रयत्न केला असला, तरी तो सामान्य माणसाने हाणून पाडला. माझ्या तरी पाहण्यात कोणत्या चित्रपटाची इतकी अडचण कोणी केली नसेल, की चित्रपटगृह रिकामे ठेवून बाहेर हाउसफुलचा बोर्ड लावला जावा!
 
 
ह्या चित्रपटाने साध्य काय होणार? हा प्रश्न स्वयंघोषित पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारवंतांनी विचारायला सुरुवात केलीय.
काश्मिरी पंडित हेच काही ह्या अन्यायाचे बळी नव्हते. इतर बौद्ध, वंचित, काही खरेखुरे पुरोगामी मुस्लीम, शीखसुद्धा होते, तर ह्या सर्वांना काश्मिरी पंडित म्हटले जाते का? बहुतांश बळी हे काश्मिरी पंडित होते, म्हणून बर्‍याचदा सरसकट काश्मिरी पंडितांचा उल्लेख होतो आणि ह्याचासुद्धा उल्लेख ह्या चित्रपटात आहे.
 
 
डाव्या विचारधारेच्या लोकांच्या एका श्रद्धास्थानाने - म्हणजे साने गुरुजींनीच बहुतेक देशाला एका शरीराची उपमा दिली होती. एका अवयवाला त्रास झाला म्हणून दुसरा अवयव त्याकडे दुर्लक्ष करत नाही. त्यालासुद्धा त्रास होतो. आणि जखम बरी व्हावी म्हणून त्या दुसर्‍या अवयवाला जखमी अवयवाची काळजी घे असे सांगावे लागत नाही. ते आपसूक होते. तसे देशाचे असावे, अशी त्यांची अपेक्षा होती. काश्मीरसुद्धा देशाचा अविभाज्य भाग होता. त्यालासुद्धा भयंकर जखमा झाल्या होत्या. तिथे वंचितांवर अत्याचार होत होते, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होता. भारतीय कायदे तिथे लागू नव्हते. दोन वेगळे झेंडे फडकवले जात. ह्या सर्वावर इतकी दशके ह्या डाव्या विचारवंतांनी तोंड उघडण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि दुसर्‍या कोणाला उघडू दिले नाही. ह्याचा अर्थ भविष्यावरसुद्धा ह्याच विचारधारेच्या साहित्याची आणि कलेची छाप राहील असे नाही, हे द काश्मीर फाइल्सने ठणकावून सांगितले आणि रसिकसुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहेत. त्यांच्या ह्या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत.
 
ज्या मुक्त विचारांचे आम्ही पाईक आहोत, त्या युरोपात ह्या अशा चित्रपटांसाठी विशेष संरक्षण आहे. डिनायल ऑफ होलोकास्ट - म्हणजे जर कोणते हत्याकांड झाले, तर ते नाकारले जाणे - हा युरोपात गंभीर गुन्हा आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल सतरा देशांमध्ये ह्यासंबंधी तरतुदी आहेत. जर्मनीमध्ये ज्यूंचे जे काही हत्याकांड झाले, त्या हत्याकांडावर कोणी प्रश्न उठवले नाहीत. ज्यू जनता हिटलरला घाबरून पळून गेली असे कोणी म्हणाले नाही. ज्यूंवर अत्याचार झाला हे कोणी नाकारले नाही. ज्यू स्वत: दुर्बळ होते असे कोणी म्हणत नाही. तर ह्या हत्याकांडावर आधारित चित्रपटाला शिंडलर्स लिस्टला ऑस्कर मिळतो आणि तो ऑस्कर स्वीकारताना ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग म्हणतो की “ह्या चुका माफ केल्या जातील, पण विसरून चालणार नाही.” इतिहासाला शाप असतो पुरुज्जीवनाचा. इतिहासात चुकलेल्या गोष्टींमध्ये भविष्यातल्या मार्गांचा अंदाज येतो. त्यामुळे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी... जाळुनी किंवा पुरुनी टाका’ हे सरसकट लागू करता येणार नाही.
 
 
द कश्मीर फाइल्स हा स्वतंत्र भारतातला पहिला असा चित्रपट, ज्याने काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर जळजळीत भाष्य करण्याचे धाडस दाखवले, म्हणून समस्त बॉलीवूडवाल्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या मागे खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित होते. ‘बोल के लब आझाद है तेरे’ हे सर्वांना लागू असते ना? ह्या डाव्या विचारधारेला पुन्हा एकदा ह्या चित्रपटाने उघडे पाडलेय.. कारण ह्या विचारधारेच्या एकाही कट्टर विचारवंताने ह्या चित्रपटाच्या बाजूने मत व्यक्त केले नाही. उलट हिंदू-मुस्लीम ह्यांच्यामध्ये भेद करणारा तणाव निर्माण करणारा चित्रपट म्हणून ह्यावर टीका सुरू केली. ज्यू आणि जर्मन ह्यांमध्ये दरी निर्माण करणारा चित्रपट म्हणून जर शिंडलर्स लिस्ट कधीच बघितला जात नाही, उलट तो आवर्जून पहिला जातो, त्याचा आग्रह धरून ठेवला जातो.. आणि द कश्मीर फाइल्सला स्क्रीन्स मिळत नाहीत.
व्यवस्थित सांभाळलेल्या आणि वाढवलेल्या डाव्यांच्या इकोसिस्टिमला दिलेले एक जोरदार उत्तर म्हणून हा चित्रपट इतिहासात नेहमीच उल्लेखला जाईल. ह्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावरून इतिहासात हेतुपुरस्सर दाबलेल्या गोष्टी बाहेर येतील असे वातावरण नक्कीच निर्माण झाले आहे. इतिहासाची एक बाजू आपल्यासमोर होती, आता दुसरी बाजू समोर येत आहे. तीसुद्धा बाजू समोर आलीच पाहिजे. कारण इतिहासावर कोण्या एका विचारधारेचा हक्क कधीच नसतो. त्यामुळे घटनातत्त्वाच्या गप्पा झोडणार्‍या विचारवंतांनी तरी आडकाठ्या निर्माण करू नयेत. इतिहास हा इतिहास म्हणून पाहावा आणि त्यातून चांगलेच स्वीकारून समाजविघातक गोष्टींना फाटा देणे हेच अपेक्षित असते. आणि चित्रपटातून इतिहासाचा एक कोन लोकांसमोर येतो, त्यावर अभ्यास, मनन, चिंतन करून विरोधकांनी सप्रमाण त्यांचे मुद्दे मांडावेत आणि अशातूनच सत्याच्या शोध घेतला जातो.. हे असेच होणे सुदृढ समाजाचे आणि खर्‍या विचारवंताचे लक्षण असते.
बाकी एखादा चित्रपट चालवायचा की नाही, हे कोणतीही इकोसिस्टिम फार काळ ठरवू शकत नाही. तो अधिकार रसिकांचा असतो. आणि तो अबाधितच राहावा. जर त्यात काड्या केल्या, तर सर्व भेद बाजूला टाकून रसिक अशा कलाकृतीच्या मागे भक्कमरित्या उभे राहतात एवढा धडा जरी डाव्यांनी किंवा संबंधित लोकांनी, विचारवंतांनी घेतला, तर ते द कश्मीर फाइल्सच्या यशाचे आणखी एक परिमाण ठरेल.