अस्वस्थ करणारे ऐतिहासिक सत्य

विवेक मराठी    19-Mar-2022
Total Views |
@जान्हवी देशपांडे
 
 ‘बत्तीस वर्षांपूर्वी घडलेल्या नरसंहाराचे वर्णन पाहणे हा थरकाप उडवणारा एक अनुभव आहे....’ ‘द काश्मीर फाइल्स’ पाहताना आजच्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थता व्यक्त करणारी ही भावना प्रातिनिधिक आहे.

the
काश्मीर म्हणजे भारताचे नंदनवन. फिरायला जाण्यासाठी काश्मीर हा सगळ्यांचा आवडता पर्याय असतो. मी स्वत: लहान असताना काश्मीरला ट्रीपसाठी गेले होते. बर्फाच्या सुंदर रांगा, तरंगणार्‍या हाउसबोट्स, होडीत बसून शॉपिंग, तिथले रंगीत कपडे आणि पनीरची अतिशय चवदार भाजी इतकेच मला आठवते. हळूहळू मोठी होत गेले, वाचायला लागले आणि काश्मीरचा इतिहास वाचताना 1990च्या घटनेविषयी वाचनात आले. प्रथेप्रमाणे घरात या विषयावर चर्चा झाली. जे घडले ते वाईट होते, मदत पोहोचायला मुळात असे काही घडले आहे हे कळायलाच खूप उशीर लागला होता.. या प्रकारचे बोलणे झाले.
 
 
नुकताच प्रकाशित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ बघून आले आणि सुन्न मनाने विचार करताना वाटले - आपण टीव्हीवरच्या बातम्या आणि वृत्तपत्रांचे मथळे - खून, बलात्कार, जाळपोळ इत्यादी शब्दात ऐकून-वाचून आपली मने या शब्दांना इतकी सरावली आहेत की त्यांनी या शब्दांची तीव्रताच लक्षात येणे बंद केले आहे की काय! कारण, चार-दोन ओळींची माहिती असलेला हा विषय किती खोल आहे, याची जाणीव या चित्रपटाने करून दिली.
 
 
या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि विषय आता बर्‍यापैकी सगळ्यांना माहीत झालेला आहे.
 
 
‘राष्ट्र’ असा शब्द आपण उच्चारतो, तेव्हा डोळ्यांसमोर येते ते आपले घर आणि या घराचा कोणताही भाग अडचणीत असेल तर घरातल्या प्रत्येकाचे कर्तव्य म्हणजे त्याने ती अडचण दूर करण्यासाठी धावून जाणे. अशा वेळी ही अडचण इतरांपर्यंत पोहोचलीच नाही, तर मदत मिळणार तरी कुठून? अशा प्रकारे एकाकी पडलेल्या अवस्थेत भयंकर मरण ‘मरणारे’ आणि त्याहून वाईट अवस्थेत ‘जगणारे’ जीव, यांची ही कहाणी. आपले घरदार आहे असे सोडून नेसत्या वस्त्रानिशी जीव मुठीत घेऊन बाहेर पडणार्‍या, किंबहुना बळजबरी बाहेर काढले गेलेल्या लोकांची ही कहाणी. चित्रपट बघताना ही कहाणी नसून ‘सत्य’ आहे, याचा खेद होतो.
 
 
बत्तीस वर्षांपूर्वी घडलेल्या नरसंहाराचे वर्णन पाहणे हा थरकाप उडवणारा एक अनुभव आहे.
 
 
चित्रपट बघून बाहेर पडल्या पडल्या माझ्या मनात आलेला पहिला विचार म्हणजे - आपण आता घरी जाणार, झोपणार, उठून कॉलेजला जाणार आणि या सगळ्या काळात आपल्याला कुणीही येऊन मारून टाकणार नाही, म्हणजे आपण ‘कोणत्याही क्षणी मरू’ ही भीती नाही, हे किती प्रिव्हिलेज आहे!
 
 
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार्‍या अनुपम खेर यांनी आपल्या मुलाखतीत बोलताना जे म्हटले, मला वाटते मला तसेच काहीसे म्हणायचे होते. ते म्हणाले, “शूटिंगदरम्यान प्रत्येक सीननंतर मला वाटायचे की मी हा सीन झाल्यावर जेवू शकणार आहे किंवा मला न्यायला गाडी येणार आहे किंवा खूप दमल्यामुळे मला काही वेळ शांत झोपता येणार आहे. प्रत्यक्षात हे भोगणार्‍या जिवांना यातले काहीही नव्हते. मी फक्त अभिनय करत होतो, ते मात्र हे सारे प्रत्यक्ष जगले होते.”
 
 
सोशल मीडियावर याविषयी मतमतांतरे वाचायला मिळाली. तत्कालीन सरकारने घेतलेल्या किंवा न घेतलेल्या अ‍ॅक्शनविषयी बरीच चर्चा वाचली. वैयक्तिक मला यात कोणाची किती चूक यापेक्षा त्या निरपराध जिवांना भोगावा लागलेला त्रास मनाला अधिक दु:ख देऊन गेला. अशा परिस्थिती एका रात्रीतून निर्माण होत नसतात. त्यांना खतपाणी घालून त्या पोसल्या जातात आणि मग एक दिवस होतो तो ‘उद्रेक’ असतो, जो निरपराधांचे बळी घेऊन जातो.
 
 
कोणताही चित्रपट वास्तवावर आधारित असला, तरी जसाच्या तसा दाखवला जात नाही. मात्र याला हा चित्रपट बर्‍याच अंशी अपवाद ठरतो.
 
 
प्रातिनिधिक स्वरूपात दाखवलेले पुष्करनाथ यांचे कुटुंब आणि त्यांच्यावर झालेला अन्याय-अत्याचार अक्षरश: बघवत नाही. सरकारची धोरणे, नियम-कायदे यांच्या पलीकडे जाणार्‍या कलम 370च्या तरतुदी आणि त्यामुळे होणारी काश्मीरवासियांची धूळधाण बघवत नाही. चित्रपट बघताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे केवळ सरकारी नोकरीत आहेत किंवा हातात मीडिया आहे म्हणून ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात, असे अजिबात नाही. बरेचदा, केवळ गिल्ट घेण्यापलीकडे यांची धाव जात नाही.
 

the
 
कोणत्याही अन्यायाविरुद्ध उभे राहायचे, तर मन कणखर हवे. आपली, आपल्या घराची, आपल्या माणसांची आणि आपल्या मातीची, आपल्या राष्ट्राची सुरक्षा हा विचार ठसायला हवा.
 
 
धर्म हा या सगळ्या नरसंहाराचा पाया आहे, हे अमान्य करून चालणार नाही. आपल्या धर्माचा आदर करताना त्याचा विखार होणार नाही याची काळजी घेतली गेली, तरी जगात शांतता नांदायला सुरुवात होईल.
 
 
या चित्रपटातले ‘कृष्णा पंडित’ हे पात्र आमच्या पिढीचे द्योतक आहे. ‘कृष्णाच्या घरच्यांनी भोगलेला त्रास आणि त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला इतिहास’ विरुद्ध ‘शैक्षणिक पद्धतीने समोर मांडलेला इतिहास’ यांच्यात असणारे जमीन-अस्मानाचे अंतर आम्हा मुलांना निश्चितच गोंधळून टाकणारे आहे.
 
 
मुळात ‘पुष्करनाथ कृष्णाला सांगून का टाकत नाहीत ते सगळे?’ असा एक रँडम विचार चित्रपट पाहताना माझ्या मनात आला होता. परंतु, चित्रपट पुढे सरकताना जी भयंकर दृश्ये मी पाहिली, जी केवळ प्रातिनिधिक होती, त्यानंतर मला त्या आजोबांविषयी प्रचंड आदर वाटला. एक तर मनात असणारी भीती, नातवाची काळजी आणि आपली पुढची पिढी द्वेषाच्या आहारी जाऊ नये हा सम्यक विचार मला अधिक पटला.
 
 
आपल्या पुढच्या पिढीने शिक्षण घ्यावे म्हणून पोटाला चिमटा काढून जगणारे आजोबा, अगदी आपली दृष्टी गेली तरी चालेल पण नातवाला ज्ञानाची दृष्टी मिळावी म्हणून धडपडणारे आजोबा.
 
 
विस्थापित काश्मिरींना ‘काय हवेय’ असे विचारल्यावर ‘आमच्या मुलांना शैक्षणिक जागा द्या’ म्हणणारे काश्मिरी पंडित, काश्मिरी हिंदू हे खरे ज्ञानोपासक.
 
 
आमची ही चित्रपटातील ‘कृष्णाची’ पिढी. आम्ही ‘पुष्करनाथ’ आजोबांचा आदर्श घ्यायला हवा. आपल्या ध्येयासाठी रक्ताचे पाणी करणारा माणूस, आपल्या डोळ्यांदेखत मुलगा मारला गेला तरी वास्तवाचे भान बाळगून सुनेला आणि नातवंडांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणारा माणूस, वयाची तमा न बाळगता आपल्या जबाबदारीचा भार न कुरकुरता पेलणारा माणूस, ‘रलीव, सलिव्ह, गलिव्ह’ची भीती वाटते असे सांगणार्‍या नातवाला ‘आपल्या मनातील भीतीला तू हे सांग’ असे म्हणून त्याचे मनोबल वाढवणारा माणूस, कलम 370 हटावे म्हणून अखंड पाठपुरावा करणारा माणूस (मला कल्पना आहे, ही चित्रपटाची लिबर्टी असेल कदाचित, तरीही) आणि महत्त्वाचे म्हणजे कधीही हार न पत्करणार माणूस - आजोबा पुष्करनाथ. एक खरा ‘शिक्षक’ पुष्करनाथ.
 
 
चित्रपट सुरू होतो आणि संपतो, तोपर्यंत तो कुठेही रटाळ किंवा अनावश्यक वाटत नाही. मुळात, ही काही कथा नव्हे, सत्य घटनेला कथानकात मांडताना अत्यावश्यकच लिबर्टी घेतली गेल्याचे दिसते.
 
 
निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांचे आणि एकूणच रिसर्च टीमचे यामागे प्रचंड कष्ट दिसून येतात. कलाकारांनी आपल्या अभिनयातून सत्य जिवंत केले आहे. शेवटी येणारे कृष्णाचे भाषण आणि त्याने दाखवलेला मनातला गोंधळ आणि हळूहळू सॉर्ट होत जाणे, याचबरोबर ‘बिट्टाचा’ अभिनय मला विशेष आवडला.
 
 
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा - सोशल मीडिया या चित्रपटामुळे डाव्या-उजव्यात विभागला गेला आहे. वैयक्तिकपणे मला वाटते की आदर्शवादाचा पगडा मनावर न ठेवता, सारासार विचार आणि आपल्या अभ्यासातून मिळवलेले तारतम्य लक्षात घेतले, तर ‘हा’ वादाचा विषय होऊच शकत नाही.
 
 
प्रत्येक मताला छेद देणारे दुसरे मत असते. आपण काय शिकतो, आपण काय जगतो आणि आपण जे दु:ख अनुभवतो, कधी सह-अनुभूतीतून अनुभवतो, त्याची गोळाबेरीज म्हणजे आपले मत असते. ते इतरांवर लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु, म्हणून ‘ते थोतांड आहे’ असे म्हणून मोकळे होण्याला काय म्हणावे!
 
 
द्वेषाच्या आहारी न जाता ‘सगळे विसरून, माफ करून पुढे जा’ हे मान्यच; पण त्याहीपेक्षा सगळे माहीत करून घेऊन, लक्षात ठेवून माफ करून पुढे जा’ हे जास्त समर्पक वाटते मला.
 
 
पाखंडी समाजाची अवहेलना सोसून, आपल्या ज्ञानाचा दीप समाजासाठी निरंतर तेवत ठेवणार्‍या माउलींनी जे दान मागितलं, तेच मला या चित्रपटानंतर म्हणावेसे वाटते -
 
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे पडो।
मैत्र जीवांचे॥