कार्यमग्नतेचे थक्क करणारे उदाहरण - डॉ. प्रतिभा फाटक

05 Mar 2022 16:36:13
@डॉ. सुहास आजगावकर  9403018917
संभाजीनगरमधील वनवासी आणि ग्रामीण भागात विविध मार्गांनी मोलाचे सामाजिक काम करणार्‍या डॉ. प्रतिभा फाटक. विशेषत: महिला वर्गाचे आरोग्य असो किंवा आर्थिक स्वावलंबन असो, मुलांच्या शिक्षणाविषयी असो, किशोरींना सजग करण्याबाबत असो किंवा मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे असो - त्यांच्या कार्याने या भागात खूप मोठे परिवर्तन घडत आहे.

fathak

नाव - डॉ. प्रतिभा आनंद फाटक
शैक्षणिक तपशील -
B.A.M.S. (1991) - शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड
MPH (2013) - मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ
M.A. Rural Development  (2007) - ग्रामीण विकास
जबाबदारी - विभागप्रमुख, सार्वजनिक आरोग्य विभाग, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, डॉ. हेडगेवार रुग्णालय.
आवडीचे विषय - सार्वजनिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरण.
 
 
खरे तर प्रतिभाताईंचा हा औपचारिक परिचय, पण एवढा परिचय पुरेसा नाही. धुळे जिल्ह्यात वनवासी भागामध्ये डॉ. आनंद फाटक यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ काम केले. 1997 साली लग्नानंतर डॉ. प्रतिभाताई पिंपळनेर येथे डॉ. आनंद यांच्यासह सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा बजावली आहे. आता संभाजीनगर येथे डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये डॉ. आनंद यांच्यासह कार्यरत आहेत. वनवासी भागातील काम निरंतर सुरू राहावे यासाठी त्यांचा मनापासून खटाटोप चालू असतो. याकरिता बारीपाडा-पिंपळनेर परिसरास नियमित भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत कामाला नवीन आयाम देतात. या अशा प्रवासाच्या निमित्ताने माझी प्रतिभाताईंशी पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांची भेट होत गेली. प्रत्येक भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवीन पैलू उलगडत गेला. आता तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी दर्शन होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये प्रतिभाताईंचे लहानपण गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण देगलूरला झाले. वडील लक्ष्मणराव कळसकर मराठवाड्यात एका नामांकित कंपनीचे विपणन संभाळत होते. त्या निमित्ताने त्यांचा सर्वत्र प्रवास व्हायचा. लक्ष्मणरावांना चार कन्या आणि दोन सुपुत्र. परंपरागत व्यवसाय सोडून लक्ष्मणरावांनी जगण्याच्या वेगळ्या वाटा निर्माण केल्या आणि आपल्या मुलांना शिक्षणाचा आग्रह केला. मुलांनीही त्यात कुठेही कसर सोडली नाही. प्रतिभाताई नांदेडला आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएस करून वैद्यकीय क्षेत्राबरोबरच ग्रामविकास या विषयाचे विद्यापीठ बनल्या आहेत. प्रतिभाताईंच्या आई गृहिणी असून आपल्या मुलांचे शिक्षण आणि करिअर चांगले व्हावे, यासाठी त्यांनी आवर्जून प्रयत्न केला, त्याबरोबरच नांदेडमधल्या राष्ट्र सेविका समितीच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत प्रतिभाताई नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये दाखल झाल्या. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासात अव्वल तर होत्याच. कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणारी मुलगी अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीत सक्रिय सहभागी होते, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उजेडात आलेला आणखी एक पैलू.
 

fathak
 
महाविद्यालयांमध्ये अव्वल दर्जाचे यश संपादन केले आणि पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करत असताना अनुभव घेण्यासाठी प्रतिभाताई डॉ. हेडगेवार रुग्णालयात रुजू झाल्या. तिथे मा. नाना नवले यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि तिथे आयुष्याला दिशा मिळाली. डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये काम करत असताना लातूरचा भूकंप झाला आणि या आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांसाठी वैद्यकीय मदत घेऊन निघालेल्या टीममध्ये डॉ. प्रतिभाताईसुद्धा होत्या. जीवनाचे वेगळे भीषण वास्तव समोर आल्यावर आणि नानांशी चर्चा करून त्यांनी उच्च शिक्षणाचा आग्रह बाजूला ठेवून सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घेतले.
 
सुरुवातीच्या काळात डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये विविध विभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. रुग्णालयाच्या कामाबरोबरच नागरी सेवावस्ती आरोग्य प्रकल्पात महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम केले. हे काम करत असताना महिला बचत गट, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण वर्ग, साक्षरता वर्ग इत्यादी विविध उपक्रमांची सुरुवात केली. नेवरगावला मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या आग्रहास्तव आरोग्य केंद्र सुरू झाले होते. नेवरगावला जाता-येताना प्रल्हादजींचा प्रेरक सहवास प्रतिभाताईंना लाभला. एका प्रवासात त्यांनी सहज प्रतिभाताईंना विचारणा केली, “आपले राहणीमान ग्रामीण भागाशी अनुकूल असेल तर महिला लवकर जोडल्या जातील.” प्रल्हादजींचा सहज संवाद, पण प्रतिभाताई अत्यंत निष्ठेने हे व्रत म्हणून पाळत आहेत. अशा छोट्या गोष्टीतून स्वत:ला बदलत त्यांनी समाजभिमुख व्यक्तिमत्त्व बनवले. एका प्रवासात प्रल्हादजी म्हणाले, “आपण सररास बोलताना ‘सर’, ‘मॅडम’ असं संबोधन करतो. शाळेतील शिक्षिकांना आपण बाई म्हणतो, तर डॉक्टरीणबाईंना बाई म्हटलं तर चालेल का?” त्या दिवसापासून प्रतिभाताई आमच्या बाई बनल्या.

1993 साली संभाजीनगर जिल्ह्यातील तीन गावांत डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्याचे काम सुरू झाले. डॉ. सुरेश रिसबुड, डॉ. विशाल बेद्रे आणि डॉ. सतीश घोटणकर यांच्यासह बाई महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून नियमित वैद्यकीय सेवा बजावू लागल्या. माता-बाल आरोग्याचे काम सुरू झाले, पण 2003 साली महाराष्ट्र शासनाची सहसंस्था ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’बरोबर प्रकल्प स्वरूपात त्याचे रूपांतर झाले. नियमित ओपीडी ते माता-बाल आरोग्य प्रकल्प हे स्थित्यंतर जीवनाची दिशा सुस्पष्ट करणारे ठरले. हा उपक्रम 10 गावांत यशस्वीपणे राबवल्यावर 2009 साली माता आणि बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विप्रो केअर्सच्या संजीवनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाची सुरुवात झाली आणि डॉ. अंबादास कुलकर्णी, डॉ. कैलास खंडेलवाल, डॉ. अनंत देव, डॉ. विनय धर्माधिकारी आणि आता डॉ. अपर्णा लाहोटी यांच्या समर्थ साथीमुळे हे काम 70 गावांमध्ये राबवले जातेय. ग्रामीण भागात जोवर घरातील मातृशक्ती उठून काम करू शकत नाही, तोवर तिच्या आरोग्याची हेळसांड होते. त्यामुळे अशा दुर्लक्षित विषयाला पारंपरिक उत्सवाचा आधार घेत आरोग्याचा संदेश देणार्‍या कार्यक्रमांची शृंखला बाईंनी सुरू केली. नवदांपत्य सोहळ्यात नवपरिणित जोडप्यांना बोलावून संसार मांडताना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे भान करून देणे असेल, नाहीतर बाळंतिणीला लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्यांसहित ओटी भरून केलेला डोहाळेजेवण कार्यक्रम, नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने गावातील नवजात शिशूची काळजी घेण्याबरोबर कुटुंबनियोजन करण्याचे संस्कार असतील किंवा उष्टावणाच्या कार्यक्रमात घरात उपलब्ध गोष्टींपासून पौष्टिक पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेणारे, असे अभिनव उपक्रम राबवून बाईंनी सार्वजनिक आरोग्याच्या कामाची विशेष ओळख निर्माण केली. या उपक्रमापूर्वी गर्भधारणेनंतर चौथ्या-पाचव्या महिन्यात डॉक्टरांकडून आरोग्यतपासणी करणार्‍या माता आता दुसर्‍या महिन्यातच नोंदणी व तपासणी करू लागल्या. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर घरात प्रसूती होत होती, आता मात्र पूर्णपणे प्रसूतिगृहामध्ये प्रसूती होते आणि त्यामुळे प्रसूतीदरम्यानचा माता बालमृत्युदर आता शून्यावर आला आहे. आता तर अनेक जणींनी ‘संजीवनी’ असे स्वत:च्या मुलीचे नामकरण केले आहे.


fathak
बालकुपोषणाचे प्रमाण सुरुवातीला 51% एवढे होते, ते सुदृढ बालक स्पर्धा, सासू-सुना संमेलन आयोजित करून घरात उपलब्ध गोष्टींपासून पौष्टिक पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन, बाल आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आवश्यक असल्यास औषधांचा वापर करून 17% एवढे कमी करण्यात यश मिळाले आहे. परंतु स्थलांतरादरम्यान होणार्‍या कुपोषणामुळे हे प्रमाण आपण यापेक्षा कमी करू शकत नाही, याचे बाईंना शल्य वाटते आहे.

सर्वच ठिकाणी डॉक्टर आरोग्यसेवा देणे शक्य नाही म्हणून गावपातळीवर आरोग्यमित्र तयार करून गावात आरोग्य बँक स्थापन करून सेवा दिली. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाईंनी निरामय आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र चालवले. हे केंद्र झॠऊककउच, गृह रुग्णसाहाय्यक, आरोग्यमित्र याविषयी प्रशिक्षण देते. या केंद्रातून प्रशिक्षित आरोग्यमित्रांची बहुतांश ठिकाणी आशा कार्यकर्ती म्हणून निवड झाली. या विषयाची सुरुवात करणार्‍या डॉ. श्याम अष्टेकर यांची बाईंशी भेट झाल्यावर त्यांनी कौतुकाची थाप दिली. निरामय आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून एक वर्षाचा रुग्णसाहाय्यक प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग सुरू केला. दहावीनंतर शिक्षण थांबवले जाणार्‍या ग्रामीण भागातून सुरुवातीला पालकांना विश्वासात घेऊन मुलींना प्रशिक्षण दिले. या संधीचे सोने करत मुलींनी घराचे कर्तेपण मिळवले. आता या परिसरात किमान 200हून अधिक मुली कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. डॉ. हेडगेवार नर्सिंग कॉलेजच्या आखणीपासून ते उभारणीत बाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली. याबरोबरच प्रसूतिकाम करणार्‍या परंपरागत दाईचे प्रशिक्षणदेखील त्यांनी घडवून आणले. बाईंनी हरियाणा राज्यात जाऊन तेथील झज्जर जिल्ह्यातील 50 दायांचे प्रशिक्षण वर्ग घेतले आणि जिल्ह्यातील माता-बाल आरोग्यात सुधारणा झाली म्हणून झज्जर जिल्हाधिकार्‍यांनी बाईंचे विशेष कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत आस्था फाउंडेशन आणि टाटा समाजशास्त्र संस्थेच्या माध्यमातून चालणार्‍या ज्येष्ठ नागरिक आरोग्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाला बाईंनी मूर्त रूप दिले. आशाताई जाधव या बाईंच्या मानसकन्या. सुरुवातीला संसारात पिचलेल्या आशाताईंना सामाजिक समरसतेचे जीवनव्रत अंगीकरणार्‍या बाईंचे पाठबळ मिळाल्यावर त्यांनी एक वर्षाचा रुग्णसाहाय्यक प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग करून गृह रुग्णसाहाय्यक ब्यूरो सुरू केला. आता वैद्यकीय क्षेत्रात लागणार्‍या विविध सेवा पुरवठा करणार्‍या उद्योजिका बनून 50पेक्षा अधिक कुटुंबांचा आधार बनल्या आहेत.

संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून बाईंनी गावातील प्रशिक्षित आशांना आरोग्यमित्र प्रशिक्षणाद्वारे अधिक कुशल आणि ज्ञानसमृद्ध बनवले. ‘केअर मदर’ या गर्भवती मातांची मूलभूत तपासणी करून मोबाइल अ‍ॅपद्वारे 70 गावांतील मातांना आरोग्यसेवा देतात. बाईंनी गावातील आशाताईंना बरोबर घेऊन ‘श्रुती’ हे कान तपासणी करणारे उपकरण वापरून कानांच्या रोगांचे निदान केले. आरोग्याच्या समस्येवर मात करताना तंत्रज्ञानाची मदत घेऊन अनेकांचे प्राण तर वाचवलेच, तसेच ह्या गावच्या आशाताई जीवनदूत म्हणून समाजासमोर निर्माण करताना नैतिक सेवेची मूल्ये निर्माण केली. कोरोनाच्या काळात या जीवनदूतांनी केलेले काम मार्गदर्शक ठरले आहे. आरोग्याच्या प्रशिक्षणाबरोबरच कर्तव्यकठोर बाईंच्या स्नेहाची, मायेची, वात्सल्याची अनुभूती लाभलेल्या प्रभावतीताई पडूळ, लताताई गायकवाड, वर्षाताई जाधव, नंदाताई मते, मंजूताई काकडे, अशा अनेक सावित्रीच्या लेकी बाईंचा वारसा समर्थपणे चालवताना दिसत आहेत.

सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांत राहणार्‍या वनवासी समाजाला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका हा कुपोषण आणि मातामृत्यू याकरिता ओळखला जातो. वनवासी आरोग्याच्या संशोधन यात्रा करून या भागातील गर्भवती महिलांचा आणि बालकांचा विशेष अभ्यास बाईंनी करून याहामोगी प्रकल्पाच्या माध्यमातून केअर मदर किटचा वापर करून 84 वनवासी पाड्यांमध्ये मातृत्व सुसह्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक एकलव्य संस्थेच्या मदतीने नर्मदामातेच्या किनार्‍यावर वास्तव्य करणार्‍या वनवासी मातांच्या जीवनात आलेल्या या सुखद बदलाची नोंद जिल्हा यंत्रणांनीदेखील घेतली आहे.

2009पासून उज्ज्वल भारत शालेय आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी 92पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायक सवयी रुजवल्या. या उपक्रमात डॉ. सई पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन, प्रत्येक शाळेतील शिक्षकांना व पालकांना विश्वासात घेऊन फास्टफूडवर होणारा अवास्तव खर्च आठवड्याच्या 35रुपयांवरून 9 रुपयांपर्यंत आणण्यात यश मिळाले. तसेच आरोग्यदायक सवयी - जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुणे, शाळेत जाताना खाऊन जाणे, नख आणि केस यांची निगा आणि सूर्यनमस्कार यांचा आग्रह धरला. येणारे रुग्ण स्वत:च्या आरोग्याच्या समस्या घेऊन येत होते, पण या अनारोग्याच्या मुळाशी अज्ञान, दारिद्य्र, अंधश्रद्धा, संपर्काची साधने आणि सोईंचा अभाव आहे हे लक्षात येत होते. त्यामुळे आरोग्याच्या समस्येवर उपचार करत सामाजिक विषयांची उकल करण्यासाठी बाई पुढे आल्या.


fathak
जून 2005पासून त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात नाबार्डच्या अ‍ॅड ऑन प्रकल्पातून महिलांचे 137 स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन केले. कधीही आपल्या पंचक्रोशीच्या बाहेर न पडलेल्या महिलांनी पहिल्यांदा बँकेत पाऊल टाकले. बँकेत खाते उघडायचे तर सही करावी लागते. फक्त व्यवहारामध्ये हुशार असणार्‍या महिला साक्षर नसल्यामुळे मागे पडत होत्या, त्यामुळे त्यांना आवश्यक असणारे आर्थिक प्रशिक्षण आणि साक्षरता यांचे वर्ग सुरू झाले. दररोज नवीन समस्या आणि त्याचे निराकरण निरंतर कामाचे स्वरूप बनले. या कामांमध्ये श्रीलेखा वझे यांची अत्यंत मोलाची साथ मिळाली. दिवसा आरोग्यसेवा आणि संध्याकाळी बचत गटाच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध समस्यांवरील उत्तरांची शोधयात्रा.

गावातील काही लोकांनी कर्ज बुडवल्यामुळे बँकांनी आपली दारे बंद केली होती. बचत गटांच्या चळवळीमुळे ती दारे उघडली गेली. आंबेगाव आणि डोनवाडा ह्या गंगापूर आणि संभाजीनगर तालुक्यातील गावांसाठी बँकांनी आपले दरवाजे बंद केले होते. याच गावात महिलांनी केलेल्या बचत गटाच्या कर्ज परतफेडीमुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे बँक पीककर्ज आणि शेतीसाठी आवश्यक कर्ज पुरवू लागली. हळूहळू संपूर्ण गाव बँकेशी जोडले गेले आणि सावकारी पाशातून काहीशी मुक्ती मिळाली. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या प्रोबेशनरी ऑफिसरसाठी याची यशोगाथा मांडण्यात आली.

एका ग्रामीण आरोग्य केंद्रात तीन कुमारी माता तपासणीसाठी आल्या. गावातील एका माणसाकडून त्यांना फसवण्यात आले होते. जीवन व्यवहार हा विषय शाळेत शिकवला जातो असा घरच्या मंडळींचा समज झाला होता. यातून किशोरवयीन मुलींमध्ये होणारे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक बदल यांची जाणीव करून देणारा व्यक्तिमत्त्वविकासाचा मानबिंदू असणारा ‘किशोरी विकास प्रकल्प’ बाईंच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राबवण्यात आला. बाईंनी ‘एक कळी उमलताना’ या किशोरवयीन मुलींच्या जागृतीचे आतापर्यंत 500हून अधिक कार्यक्रम केले आहेत, ज्यात सुमारे 50,000 किशोरवयीन मुलींचा समावेश आहे. एका कार्यक्रमात काही किशोर मुलांनी बाईंची भेट घेतली आणि आमच्यासाठीही काम करा असा आग्रह केला. ‘दोस्ती’ हा किशोरवयीन मुलांसाठी चालणारा उपक्रम आता 10 गावांतील 1000 मुलांसाठी सुरू झाला आहे.


fathak
मराठवाडा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग आहे. आपल्यातले काही शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत जीवनाची लढाई अर्धवट सोडून मृत्यूला जवळ करत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या बाईंनी माधुरी गावीत यांच्या मदतीने या समस्येचा मूलभूत अभ्यास केला आणि विविध संशोधन पत्रिकांतून आणि परिषदांतून मांडला. या अभ्यासातून नापिकीबरोबर बिघडलेले कौटुंबिक संबंध, हरवलेले मानसिक स्वास्थ्य अशी विविध कारणे समोर आली. गावोगावी ‘मानसमित्र’ तयार करून आणि ‘हॅलो जिंदगी’ ही हेल्पलाइन सुरू करून निराशेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी ‘अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्प’ काम करतोय आणि मराठवाड्यासाठी निवासी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा संकल्प बाईंनी केला आहे.

नापिकीमुळे येणारी अस्वस्थता टाळण्यासाठी ‘कृषिकन्या’ हा शेतकरी महिलांसाठीचा कृषिविस्तार उपक्रम 25 गावांत राबवला. शेतीत होणारे कष्ट कमी करण्यासाठी छोट्या प्रयोगांचा, अवजारांचा वापर करत महिलांची संघटना उभारली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या निधीतून औरंगाबादमधील गावांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये महिलांच्या मानसिक आरोग्यावर ‘मुक्ता’ संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले. ग्रामीण भागात महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण फार कमी असते, म्हणून दर वर्षी 10 गावांतील महिलांची तपासणी करून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहार स्पर्धा, उपचार आणि प्रबोधन करून 70 गावांतील महिलांना त्यांनी आरोग्याविषयी सजग करून रक्ताल्पतेच्या समस्येतून बाहेर पडण्यास मदत केली आहे. ‘स्वानंद’ या उपक्रमातून त्यांनी शेतकरी महिलांना ‘आहार हेच औषध’ या सूत्राचा अवलंब करून विषमुक्त अन्न, भाजीपाला पिकवून त्याच्या पोषणमूल्यानुसार आहारात वापर करण्याचा आग्रह केला आहे. जालना जिल्ह्यातील 9 गावे ह्या उपक्रमात सहभागी आहेत.

ग्रामीण भागातील उन्नयनाचे उद्दिष्ट निश्चित करून मराठवाड्यातील आणि विदर्भातील युवा वैज्ञानिकांनी ‘सायन्स फॉर सोसायटी’ ही कंपनी स्थापित केली. त्यांच्यासह एक आरोग्य संशोधन प्रकल्प ग्रामीण भागात सुरू झाला. ग्रामीण भागात भाजीपाला उपलब्ध असतानाच आहारात येतो. त्याची वर्षभर उपलब्धता व्हावी, यासाठी भाजीपाला सौर वाळवण यंत्रात वाळवून आहारात आणण्याचा प्रयत्न केला आणि ‘ऊर्जामित्र’ या उपक्रमाद्वारे त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला. सोलर कंडक्शन ड्रायरचा (SCDचा) वापर करून निरोगी महिलांसाठी निरोगी आहारासाठी पथदर्शक प्रकल्प राबवला. या अभ्यासातून महिलांच्या आरोग्याचे निर्देशांक सुधारण्यात वाळवलेल्या भाजीपाल्याची मदत झाली. घरी वापरून, नातेवाइकांना देऊनसुद्धा हा वाळवलेला भाजीपाला शिल्लक राहिला. या शिल्लक राहिलेल्या भाजीपाल्याची विक्री करताना वाळलेल्या मसाल्याच्या बाजाराचा शोध लागला. याचे रोजगारमूल्य दूरदर्शी बाईंच्या लक्षात आले आणि आरोग्याच्या संशोधन प्रकल्पाचे रूपांतर रोजगारनिर्मिती करणार्‍या उपक्रमात झाले. मराठवाड्यातील कडक उन्हाळ्यात शेतीकामातून मिळणार्‍या उसंतीत घरबसल्या कांदा, लसूण, आल, हळद, टोमॅटो यांची वाळवण करून भर दुष्काळातही पैसे मिळवता आले. आता तर दोन महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बाईंनी शेतकरी उत्थानासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे आणि त्याला सायन्स फॉर सोसायटीने बळ देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सद्य:स्थितीत दर दिवशी 150 किलो भाजीपाला वाळवण्याची क्षमता असणार्‍या 150 शेतकरी महिला उद्योजक काम करत आहेत आणि आणखी 100 जणी त्याच्या तयारीत आहेत. याचबरोबर दर दिवशी 1000 किलो भाजीपाला वाळवण्याची क्षमता असणार्‍या 5 महिलांनी चालवलेले संयुक्त व्यवसाय केंद्र 5 ठिकाणी सुरू आहे आणि आणखी 50 ठिकाणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 105 गावांत शेतमाल खरेदी केंद्र सुरू करून त्याची विक्री करत महिला शेतकर्‍यांना नवीन दालन सुरू करून बाईंनी मराठवाड्यातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सायलीताई देशमुख आणि ज्योतीताई कोल्हे सीईओ म्हणून ह्या कामाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत.


fathak
हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. विपश्यनेची निरंतर साधना करून मानसिक बळ प्राप्त केले. कॉर्पोरेट जगताशी जुळवून घेत कामाची पद्धती विकसित करताना सामाजिक भान कुठेही न विसरता सामाजिक कामाला व्यावसायिकतेची जोड देणारे उपक्रम उभे केले. समस्येच्या मुळाशी जाऊन काम करण्याची संशोधन वृत्ती बाळगत शास्त्रीय दृष्टीकोनातून चिकित्सा करून समस्या निवारणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मांडणी त्यांनी ‘टेक फॉर सेवा’ या पुण्याला झालेल्या परिषदेत मांडली. दहापेक्षा अधिक संशोधन शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. निरंतर परिश्रम करून या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नवनवीन विषयांत पथदर्शक काम उभे केले. त्याकरता नवीन प्रशिक्षण घेण्याची तयारी असते, मग ते इंग्लिशचे प्रशिक्षण असू दे अथवा सांख्यिकीचे एसपीएसएस हे सॉफ्टवेअर असू दे. त्यांची आवड म्हणून त्यांनी ग्रामीण विकास विषयात एम.ए. केले. दोन वर्षे नाशिकला शनिवार-रविवारी जाऊन मास्टर्स इन पब्लिक हेल्थ आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग सातत्याने करून त्या स्वत:ला अद्ययावत तर ठेवतातच आणि सहकार्‍यांनाही आग्रह करतात. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील लाइव्ह फोनवरील टॉक शोमध्ये महिलांच्या आरोग्यावरील हॅलो सखी कार्यक्रमात भाग घेतला आणि सातत्याने विकासात्मक विषयांवर अग्रगण्य मासिकांमध्ये विविध लेख लिहिले आहेत. नातू फाउंडेशन, पुणे येथील प्रतिष्ठित सेवावृत्ती पुरस्कार त्यांना 2009 साली प्राप्त झाला, तर लोकसत्ताने 2017 साली नवदुर्गा सन्मान देऊन त्यांना गौरवले आहे.

‘आपल्या मनातील समस्या हक्काने सांगण्याची आणि योग्य सल्ला मिळण्याची विश्वासाची जागा म्हणजे बाई’ असा विश्वास सहकारी, मैत्रिणी, कार्यकर्त्या यांना असल्यामुळे यांच्या आयुष्यात त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. मराठवाड्यात फाटक कुटुंब एक आदर्श मानले जाते. फाटक कुटुंबाचा पसारा त्यांच्या नातेवाइकांपुरता मर्यादित नसून त्यामध्ये संघकार्यकर्ते, वनवासी कार्यकर्ते, विकास कार्यकर्ते, सेवांकुरचे वैद्यकीय विद्यार्थी असे विस्तारित कुटुंब आहे. या सर्वांसाठी ही मायमाउली सर्व अडलेनडले पाहते.

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या (www.spmesmandal.org) संस्थापक कार्यवाह अशी भूमिका बजावून मंडळाची सविस्तर बांधणी करून आता नवीन पिढीच्या हातात हे काम सोपवून नवीन आव्हाने शोधत सतत कार्यरत राहणार्‍या बाई माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणास्रोत वाटतात. संघाच्या ग्रामविकास विभागाची महिला प्रमुखाची जबाबदारी निभावताना त्यांनी अनेक लोकांना प्रवाहात आणले. मागच्या आठवड्यात देव पिंपळगाव या जालना जिल्ह्यातील गावात एका कामानिमित्त बाई गेल्या होत्या. डोणवाड्याची किशोरी सूनबाई म्हणून या गावात आली होती. तिने बाईंना पाहिले आणि माहेरून आलेल्या माणसाप्रमाणे ती बाईंना बिलगली. ओळख नसलेल्या नवीन गावात काम सुरू झाले. स्त्री-पुरुष समानतेचे पाठ प्रत्यक्ष अवलंबणारी ही पाठशाळा भारतीय कुटुंबव्यवस्था सुदृढ बनवत आहे. बाईंच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून सलाम!

Powered By Sangraha 9.0