फिरकीचा जादूगार

विवेक मराठी    07-Mar-2022
Total Views |
@कौस्तुभ चाटे 8308945509
अनेक सामने - कसोटी असोत अथवा एक दिवसीय, त्याने एकट्याच्या बळावर जिंकून दिले आहेत. आमच्या पिढीने पाहिलेले तीन मोठे फिरकी गोलंदाज म्हणजे वॉर्न, मुरली आणि कुंबळे. त्यापैकी वॉर्नला पाहणं हे सुख असायचं. एखाद्या हॉलिवूड हिरोसारखा तो मैदानावर वावरायचा. कायमच तो काहीतरी खोड्या करत राहील असं वाटायचं. पण त्याचा मेंदू मात्र क्रिकेटच्या मैदानात अतिशय तल्लख असायचा.

shen
व्हिक्टोरिया प्रांतात फर्नट्री गली नावाचं एक छोटंसं गाव आहे. मेलबर्नपासून साधारण ३५-४० किलोमीटर अंतरावर. एकदा देवाला काय वाटलं कोणास ठाऊक. १९६९मध्ये त्याने त्या गावात एक पांढराशुभ्र गोळा जन्माला घातला, त्याला चांगलं गुटगुटीत बनवलं, डोक्यावर सोनेरी केस, हातात क्रिकेटचा चेंडू दिला, सोबतीला टेरी जेन्नरसारखा एक कोच, जवळच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडसारखं एक भव्य मैदान आणि त्याला सांगितलं, "जा वत्सा, सोड तो चेंडू पीचवर आणि वळव तुला हवा तसा, हव्या त्या कोनात, हव्या त्या अंशात... जा. मोठा बॉलर होशील." पोरगंही जरा बेरकीच होतं. देवाने दिलेल्या चार गोष्टी आत्मसात केल्याच, त्यात पदरच्या काही गोष्टींची मदत घेऊन भरभक्कम १२-१५ वर्षं क्रिकेटचं मैदान गाजवलं. आणि हो, इतकंच नाही, तर क्रिकेटबाहेरदेखील बरंच काय काय गाजवलं. स्वतःचं 'हॉलिवूड' हे टोपण नाव सिद्ध करत हा फिरकीचा जादूगार मैदानावर अनेक फलंदाजांची आणि मैदानाबाहेर अनेक युवतींची विकेट घेतच राहिला. मैदानावर तर जणू तो माइक गॅटिंग, डेरेल कलीनन आणि इतर मंडळींना 'मामा' बनवायलाच येत होता. फार नाही, पण ३-४ पावलांचा छोटासा रनअप, त्याआधी प्रत्येक चेंडू टाकण्यापूर्वी उगीचच केलेली फील्ड अॅमडजस्टमेंट, खांदा आणि मनगट दोन्हीला एक हलका झटका देऊन बॉल टाकण्याची ती स्टाइल आणि विकेट मिळाल्यानंतरचे चेहर्‍यावरचे ते भाव.. ह्या माणसाने क्रिकेट विश्व पूर्णपणे आपलंसं केलं होतं. आज शेन वॉर्न आपल्यात नाही. क्रिकेटच्या अनेक जादूगारांना आपण रसिक मुकलो आहोत, त्यात वॉर्न हे एक महत्त्वाचं नाव असेल.

शेन वॉर्न - फिरकीचा जादूगार, पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळत होता. मैदान होतं ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर आणि दिवस होता ४ जून १९९३. समोर माईक गॅटिंगसारखा फलंदाज, आणि गोलंदाजीला आलेला पोरगेलेसा बॉलर, त्याचा इंग्लंडमधला पहिलाच चेंडू. अॅडशेस मालिकेचं ह्या दोन्ही देशांसाठी काय महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको. आणि तशातच त्याने तो चेंडू टाकला. सुमारे हातभार वळलेला तो चेंडू फलंदाजासमोरून त्याची ऑफ स्टंप घेऊन गेला. हाच होता तो 'बॉल ऑफ द सेंच्युरी'. आज तीसेक वर्षांनंतरही तो चेंडू तसाच डोळ्यासमोर आहे. त्या बॉलरने मोठ्या दिमाखात त्याचं अॅयशेसमधलं पदार्पण गाजवलं होतं आणि पुढेही कितीतरी वर्षं तो गाजवतच राहिला. कधी इंग्लंड, कधी वेस्ट इंडीज, कधी न्यूझीलंड तर कधी श्रीलंका.... आणि मायदेशात तर खेळायला येणार्‍या प्रत्येक संघाची कत्तल. त्याने कोणालाही सोडलं नाही. ऑस्ट्रेलिया त्या काळात क्रिकेट जगतातील सर्वोत्तम संघ होता आणि त्यामागे जे अनेक हात होते, त्यापैकी एक हात होता शेन वॉर्नचा. समोरचा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसायचा, त्याची तुलना कशाशीही करणं अशक्य आहे. ह्या सोनेरी केसांच्या जादूगाराने भल्याभल्यांना पाणी पाजलंय. अनेक सामने - कसोटी असोत अथवा एक दिवसीय, त्याने एकट्याच्या बळावर जिंकून दिले आहेत. एकदा स्टीव्ह वॉ म्हणाला होता की "वॉर्न सपाट डांबरी रस्त्यावरदेखील चेंडू वळवू शकतो." कप्तानाची ऑर्डर समजून वॉर्नने तेसुद्धा केलं असेल.
क्रिकेट विश्वाने अनेक अप्रतिम स्पिन बॉलर्स पहिले आहेत. दुर्दैवाने आमची पिढी त्या बॉलर्सना नाही पाहू शकली. आमच्या पिढीने पाहिलेले तीन मोठे फिरकी गोलंदाज म्हणजे वॉर्न, मुरली आणि कुंबळे. त्यापैकी वॉर्नला पाहणं हे सुख असायचं. एखाद्या हॉलिवूड हिरोसारखा तो मैदानावर वावरायचा. कायमच तो काहीतरी खोड्या करत राहील असं वाटायचं. पण त्याचा मेंदू मात्र क्रिकेटच्या मैदानात अतिशय तल्लख असायचा. वॉर्नच्या गोलंदाजीबद्दल सगळेच बोलतील, पण त्याने मैदानावर आणि प्रामुख्याने स्लिपमध्ये घेतलेले झेल हासुद्धा त्याच्या क्रिकेटिंग करियरचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तो एक अप्रतिम स्लिप फील्डरही होता.

शेन वॉर्न मैदानाइतकाच बाहेरही गाजला. त्याची अनेक प्रकरणं, अनेक महिलांशी केलेलं (गैर) वर्तन, मध्येच कधीतरी कुठे कुठे छापून आलेले फोटो, पब्समध्ये घातलेले गोंधळ, बुकी आणि मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेला शेन वॉर्न, वर्ल्ड कपच्या आधी ड्रग्स घेतल्याची कबुली... एक ना अनेक. हे पाणी जरा वेगळंच होतं. पण अशातही तो हवा असायचा, कारण तो मैदानावर चैतन्य घेऊन यायचा. मैदानावरच कशाला, खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर कॉमेंट्री करतानाचा वॉर्नसुद्धा मजामस्ती करायचा. त्याच्या चेहर्‍यातच काहीतरी जादू होती, त्याच्या बोटांवर तर होतीच होती आणि त्याच्या फिरकीतही होती. खरोखर, जादूगारच होता तो. शेन वॉर्न 'फूटी'चा (ऑस्ट्रेलियन फूटबॉलचा)देखील मोठा फॅन होता. त्याचा क्लब होता 'सेंट किलडा' (St. Kilda). तो क्लबसाठी खेळायचादेखील. अर्थात क्रिकेटच्या मैदानावर रमणारा हा जादूगार बाकी कुठल्या मैदानावर फार काही करेल ही अपेक्षा करणंही चुकीचंच.

शेन कीथ वॉर्न - तू कायम स्मरणात असशील. तुझ्यामधल्या जादूगाराने खूप काही दिलंय. चल, आता त्या स्वर्गात तुझा खेळ सुरू कर आणि हो, तेव्हाही बॉल टाकायच्या आधी उगीचच दोन फील्डर्स हलवायला विसरू नकोस. इथे मात्र तुझी उणीव कायम भासत राहील.
shen