‘राष्ट्र प्रथम’ या भावनेची प्रेरणा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12 Apr 2022 16:38:54
डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यातून एका मोठ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिला सबलीकरणाविषयीचे त्यांचे त्या काळातील विचारही प्रगत होते. तसेच आजच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेचे मूळही त्यांच्या विचारांमध्ये दिसून येते. त्यांच्या विचारांच्या प्रभावातून अनेकांना आयुष्याची दिशा मिळाली. अशांपैकीच काही प्रातिनिधिकव्यक्तींच्या आयुष्यावर डॉ. बाबासाहेबांच्या कोणत्या विचारांनी परिणाम केला याचा आढावा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या लेखात घेतला आहे. या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करत आहेत.

babasaheb

भारताला स्वातंत्र्य मिळणे गरजेचे होतेच, पण भारतीय समाजातील जातिव्यवस्था आणि विचारसरणीतील त्रुटी जोपर्यंत दूर होणार नाहीत, तोपर्यंत त्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही हे डॉ. बाबासाहेबांना समजले होते. वंचितांना आपले हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलेच, त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था समजून घेऊन ती सुधारण्याकडेही त्यांनी लक्ष पुरवले. यातून त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र विचारसरणीचे होते. अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजातून वर येऊन अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेणे ही गोष्ट तेव्हाच्या काळात सोपी नव्हती. परंतु तल्लख बुद्धिमत्ता आणि असंख्य बर्‍यावाईट अनुभवांची शिदोरी जोडीला असल्याने त्यांच्या विचारांना एक वेगळीच धार मिळाली. त्यांच्या विचारसरणीचे दूरगामी परिणाम समाजावर झालेले आहेत. आपल्याला अनेक व्यक्तिमत्त्वांतून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांच्या जयंतीनिमित्त काही निवडक व्यक्तींच्या आयुष्यावर झालेल्या बाबासाहेबांच्या विचारसरणीच्या परिणामांचा आपण आढावा घेणार आहोत. या निमित्ताने डॉ. दिवाकर माणिकराव कुलकर्णी, स्नेहलता स्वामी व सीमा कांबळे यांच्याशी चर्चा झाली. तिघेही आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत, त्याचबरोबर समाजसेवासुद्धा करत आहेत.
दिवाकर कुलकर्णी व्यवसायाने डॉक्टर आहेत, तसेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या हेडगेवार रुग्णालयाच्या माध्यमातून कार्य करतात. संभाजीनगरमधील ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेतकरी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते. घरातले वातावरणही तसेच. इतरांसाठी चहाची, पाण्याची वेगळी भांडी, अत्यंत कडक सोवळेओवळे. वडील बर्‍यापैकी पुढारलेले असले, तरी त्यांचा सुधारणावाद घराचा उंबरा ओलांडून आत आला नव्हता. मुलांवर संस्कारही याच प्रकारचे. गावात सुदाम गायकवाड म्हणून महार समाजाचा मित्र होता. त्यांच्याशी खेळून आल्यानंतर घरात घेताना डोक्यावरून अंघोळ होत असे. दिवसातून अशी 4 ते 5 वेळा अंघोळ व्हायची, त्याशिवाय आई घरात घेत नसे. दिवाकर यांनी शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयात प्रवेश घेतला, तेव्हा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे की नाही हा वाद चालू होता. त्यावर आंदोलन चालू होते. या वातावरणात त्यांच्याविषयी अत्यंत जुजबी माहिती असल्याने दिवाकरांचा सक्रिय सहभाग नव्हता. आंबेडकरविरोधी समिती विद्यापीठात कार्यरत होती. त्यात अनेक सवर्ण विद्यार्थ्यांचा सहभाग होता. जुनियर कॉलेजमध्ये असताना यात दिवाकर यांचाही सहभाग होता. जालन्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्यावर विद्यार्थी परिषदेशी त्यांचा संपर्क आला, त्यांनी परिषदेचे सदस्यत्वही स्वीकारले. विद्यार्थी परिषदेचे काम करताना संघाशी ओळख झाली. एके दिवशी धुळवडीच्या कार्यक्रमात नाना नवले यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी भाषणात बाबासाहेब आणि गाडगेबाबा यांचा उल्लेख केला. त्या वेळी त्यांना भेटून दिवाकर यांनी आंबेडकरांच्या चरित्राबाबत उत्सुकता दाखवली. तेव्हा नाना नवलेंनी आपल्याकडचे धनंजय कीर यांनी लिहिलेले आंबेडकरांचे चरित्र दिवाकर यांना वाचायला दिले. त्या दिवसापासून ‘नमस्कार’ असे आपले अभिवादन न करता डॉ. दिवाकरांनी ‘जय भीम’ असे करायला सुरुवात केली. हे त्यांच्या आयुष्यातील मोठे व महत्त्वाचे वळण होते, असे म्हणता येईल.
अशा वातावरणात घरापासून सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने दिवाकरांचे प्रयत्न सुरू झाले. आपल्या भावाला बरोबर घेऊन त्यांनी आपल्या घरात काम करायला सुरुवात केली. वरून पाणी देण्याची पद्धत बंद झाली, कोनाड्यात ठेवलेली वेगळी कपबशी दिसेनाशी झाली. अशात भावाचे लग्न आले. गावात अशी प्रथा होती की प्रत्येक घरी आमंत्रण पत्रिका घेऊन न जाता अक्षता देऊन आमंत्रण दिले जाई. गावातील हनुमान मंदिरापासून ह्याची सुरुवात होऊन पुजारी, त्यानंतर गावाचे पाटील व इतर ब्राह्मण समाज अशी होत असे. या वेळी वाजंत्री सोबत असे. दिवाकर आणि त्यांच्या भावाने हनुमान मंदिरानंतर दलित वस्तीत जाऊन नव्या पद्धतीची सुरुवात केली. मातंग आणि बौद्ध समाजाच्या सर्वच लोकांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आले. त्यांचा अशा प्रकारे सन्मान यापूर्वी केव्हा झाला नव्हता.

हनुमान मंदिरानंतर दलित वस्तीत जाऊन नव्या पद्धतीची सुरुवात केली. मातंग आणि बौद्ध समाजाच्या सर्वच लोकांच्या डोळ्यात तेव्हा पाणी आले. त्यांचा अशा प्रकारे सन्मान यापूर्वी केव्हा झाला नव्हता.
babasaheb

डॉ. दिवाकर कुलकर्णी

डॉ. दिवाकर कुलकर्णी म्हणतात, “गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एक जण लौकिक अर्थाने अशिक्षित, तर दुसरा जगाच्या पाठीवर सर्वात अधिक शैक्षणिक पात्रता आणि विद्वत्ताप्राप्त प्रकांडपंडित. या दोहोंच्याही जीवनाचे ध्येय जवळजवळ सारखेच. ही दोन्ही चरित्रे अभ्यासली आणि त्या क्षणापासून जय भीम हे अभिवादन मनाच्या तळापासून आपसूक ओठांवर यायला लागले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच तत्त्वत्रयी नवभारत घडवण्यास समर्थ आहे, अशी जीवन श्रद्धा निर्माण झाली. अभाविप, सामाजिक समरसता मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आलेल्या विविध कार्यसंधी या महापुरुषांच्या जीवन संदेशाच्या प्रकाशात पार पडत गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉ.हेडगेवार रुग्णालय, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या माध्यमातून करता आलेले सेवा कार्य अधिक निष्ठेने करता आले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रेरणेमुळेच. वंचित, उपेक्षित समाज सामाजिक न्यायाचा भुकेला आहे, तो सामाजिक न्याय त्याला मिळवून देण्यासाठी आपण आपले जीवन त्यासाठीच जगले पाहिजे ही ती जीवनप्रेरणा आहे. ती मिळाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनातून! प.पू. डॉ.जींचे संपूर्ण त्यागमय जीवन, सेवायोगाचे महान आदर्श श्री संत गाडगेबाबांचे लोकशिक्षण घडवणारे सेवा समर्पित जीवन, तर आधुनिक भारतात सामाजिक न्यायआधारित समतायुक्त, शोषणमुक्त, निर्दोष, एकसंध समाज घडावा म्हणून गावकुसाबाहेरील समाजबांधवाला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी आपले जीवन खर्ची घालणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर... हेच जीवनाचे पाथेय आहे.”


babasaheb

महिलांनी राजकारणाबरोबरच अर्थकारणात यावे, असा विचार डॉ. बाबासाहेबांनी त्या काळात मांडला.
- सीमा कांबळे

सीमा कांबळे या समाजसेविका आहेत. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपले पूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहून घेतले. डिक्की - दलित इंडियन कॉमर्स चेंबर ऑफ इंडस्ट्री या संस्थेच्या माध्यमातून त्या आणि त्यांचे पती मिलिंद कांबळे दलित उद्योजकांचे एकत्रीकरण करतात. त्यांचा तयार कपड्यांचा व्यवसाय आहे, तोही त्या सांभाळतात. त्याचबरोबर महिला उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायात मार्गदर्शन करतात. त्यांना येणार्‍या अडचणी सोडवणे, प्रेरणा देणे, अशी त्यांची भूमिका असते. बौद्ध समाजात जन्म झाल्याने त्यांना लहानपणापासूनच घरात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे बाळकडू मिळाले. समाजासाठी आपण काही करावे, मेहनत करणार्‍यांच्या उपयोगी पडावे या हेतूने त्या सामाजिक कार्याकडे ओढल्या गेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रविषयक विचारांचा मोठा प्रभाव सीमा कांबळे यांच्यावर दिसून येतो.

सीमा म्हणतात, “डॉ. आंबेडकर हे खरंच एक द्रष्टा नेता होते. 1944 साली त्यांनी एका ठिकाणी भाषण केले, त्यात ते म्हणाले होते, एखादा समाज प्रगत आहे असे मी तेव्हाच मानेन ज्या वेळेला समाजातील स्त्री आणि पुरुष दोघेही सक्षम होतील. सर्व प्रकारे सक्षम म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्तरांवरसुद्धा. त्यांचे म्हणणे होते की महिलांनीसुद्धा फक्त राजकारणात न येता समाजकारणात व अर्थकारणात यावे. बाबासाहेबांचे हे वाक्य तो काळ पाहिला तर काळाच्या बरेच पुढे असलेले दिसते. तसेच ते आजही तंतोतंत लागू होते. महिला जोपर्यंत सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत, तोपर्यंत समाज सक्षम होत नाही. हे अनेक कसोट्यांवर तपासून पहिले तरी ते बरोबर वाटते. 1975 ते 1985 हे आंतरराष्ट्रीय महिला दशक मानले जाते. आज आपण महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण म्हणतो, ते बाबासाहेबांनी त्या वेळीच सांगितले होते. बाबासाहेबांच्या विचारसरणीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचा विचार नेहमी व्यवहार्य असलेला आहे. कोणत्याही दृष्टीने विचार करताना ते समाजाच्या गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे पावले उचलत. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकाराला, त्या वेळी त्यांनी हाच विचार केला की इथला समाज कशा प्रकारे या धर्माचे पालन करू शकेल. इथला हा समाज पिढ्यानपिढ्या रूढी-परंपरा मानणारा होता. देवदेवतांच्या जोखडात अडकलेला होता. तर या समाजाला वेगळी दिशा देताना तो समाज मोडून पडणार नाही अशी काळजी घेत त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. जोपर्यंत हा समाज प्रगत होत नाही, तोपर्यंत आजच्या मूळ प्रवाहात येऊ शकणार नाही.”
स्नेहलता स्वामी यांच्याशी बोलताना त्यांच्या शब्दाशब्दातून बाबासाहेबांविषयी नितांत आदर जाणवतो. स्नेहलता स्वामी या नांदेड येथे राहणार्‍या असून नांदेड येथे प्रशासकीय सेवेत त्या तहसीलदारपदावर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए., एलएल.बी., एलएल.एम.पर्यंत झाले आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत, तसेच ’गांधारी’ नावाची एक कादंबरीही प्रकाशित झालेली आहे. त्या स्वतः लिंगायत समाजातील आहेत.त्या म्हणतात, “आज जेव्हा लिंगायत समाजातील व्यक्ती हा स्वतंत्र धर्म असायला हवा अशी अपेक्षा करतात, तेव्हा मला बाबासाहेबांचे विचार आठवतात. त्यांचे धोरण नेहमी राष्ट्र प्रथम असे होते. आज अनेक राष्ट्रविघातक प्रवृत्ती निर्माण होत असताना लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळेल हे प्रलोभन ठेवून हा समाज हिंदू धर्माचा भाग नव्हता अशी वल्गना केली जाते.

ह्या विचारधारेचा विचार करते व बाबासाहेब आंबेडकर यांनी समोर ठेवलेले हे तत्त्व पाहते, तेव्हा लक्षात येते की लिंगायत स्वतंत्र धर्म आहे ही मांडणी म्हणजे ‘फोडा, झोडा, राज्य करा’ ह्याच राष्ट्रविरोधी विचारधारेचा परिपाक आहे. त्यामुळे कुठल्यातरी बाष्कळ गोष्टी खर्‍या आहेत हे दाखवण्यासाठी दिशाभूल करणारी मांडणी केली जात आहे. समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळणे यापेक्षाही मला राष्ट्र प्रिय आहे, त्यामुळे मी हिंदू आहे हे मी ठामपणे मान्य करते. मी भारतीय नागरिक आहे व मला माझ्या देशातील समृद्ध व व विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे असेच मी म्हणेन. राष्ट्र प्रथम ही बाबासाहेबांची विचारसरणी मला खूप प्रेरणा देते. आज खर्‍या अर्थाने ही विचारसरणी सर्व भारतीय नागरिकांनी आत्मसात करणे मला नितांत गरजेचे वाटते. आज मी ज्या भूमीवर जन्मलो, ती भूमी मला प्रिय आहे, त्यामुळे त्या भूमीचे हित महत्त्वाचे आहे. आधी राष्ट्र, मग माझा धर्म.. मग समाज.. मग अन्य काही, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारतानाही या विचारानेच स्वीकारल्याचे दिसते.”

संकलन : मृगा वर्तक
Powered By Sangraha 9.0