युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन देणारी अमेरिका व युरोपमधील अन्य राष्ट्रे यांनी युक्रेनचा विश्वासघात केला, असे म्हणावे लागेल. या राष्ट्रांचे सैन्य मदतीला आलेले नाही. त्यांनी फक्त युद्धसामग्री पाठवलेली आहे. युक्रेनच्या सैन्याचे संख्याबळ कमी आहे, पण तरीही ते रशियाला मात देत आहेत. येणार्या काळात रशियावर ज्या प्रकारे जागतिक दबाव पडत आहे, त्यामुळे त्याला युद्ध करणे भाग आहे. तसेच युक्रेनलाही हे युद्ध आपल्याला महाग पडले याची जाणीव झाली आहे.
अभ्यासाच्या दृष्टीने आजच्या काळात हा विचार करण्याची आवश्यकता आहे की, युद्ध अचानक कशी होतात? कोणतेही युद्ध अचानक होत नाही. कोणत्याही युद्धाची एक भौगोलिक पार्श्वभूमी आणि इतिहास असतो. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचीही अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. या युद्धाची तयारी जवळजवळ 2011पासून चालली होती. कारण 2014मध्ये रशियाने युक्रेनचा एक भाग क्रिमियावर ताबा मिळवला आणि तो भूभाग आजही रशियाच्या ताब्यात आहे. त्या वेळी युनायटेड नेशन्स, अमेरिका यांनी किंवा कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. जेव्हा आपण शत्रूच्या कोणत्याही कारवाईकडे लक्ष देत नाही, त्या वेळी त्याला असे वाटते की लोक आपल्याला घाबरत आहेत, किंवा आपण जे केले आहे, त्याला संमती देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची कारणे काय होती? रशिया म्हणजेच ज्याला आधी आपण सोव्हिएत युनियन म्हणत होतो, त्यातून जितकी राष्ट्रे बाहेर पडली, त्यांपैकी युक्रेनचा भूभाग मोठा आहे. त्याची लोकसंख्या मोठी आहे. युक्रेनमध्ये नैसर्गिक संपदाही भरपूर आहे. आजही तिथे युरेनियम, तांबे, अभ्रक आदी खनिजे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे भौगोलिक आणि नैसर्गिक दोन्ही दृष्टींनी युक्रेन हे महत्त्वाचे राष्ट्र आहे. 1991मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, बल्गेरिया, रोमानिया ही सारी राष्ट्रे सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडली. रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना अजूनही असे वाटत आहे की आपण येणार्या काळात या सर्व राष्ट्रांना परत सामावून घेऊ.
1994मध्ये एक करार झाला होता. त्यानुसार बेलारूस, कझाकिस्तान आणि युक्रेन यांनी त्यांच्याकडे असलेली अण्वस्त्रे नष्ट करावी अशी मागणी रशियाने केली आणि त्याबदल्यात रशियाने खात्री दिली की रशिया पुन्हा कधीही या देशांवर आक्रमण करणार नाही. कारण एकसंध असताना रशियाची जी काही अण्वस्त्रे होती, ती सर्व या तीन प्रदेशांमध्येच होती. आजचा जो रशिया आहे, त्याच्याकडे एकच समुद्री मार्ग आहे, तो म्हणजे ब्लॅक सी. ब्लॅक सीमधील दळणवळणावर युक्रेनचा प्रभाव अधिक आहे. जर युक्रेनने अडवणूक केली, तर रशियाची नौसेना, रशियाची विमान वाहतूक सर्व काही ठप्प होऊन जाईल. रशियाला भीती वाटत आहे की युक्रेन कधीही आपली समुद्री वाहतूक बंद करू शकेल आणि तसे युक्रेनने केलेही आहे. युक्रेनचा भाग असलेला क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर आता रशियाची नजर युक्रेनवर पडली आहे. ही सर्व या युद्धाची पार्श्वभूमी आहे.
रशिया युक्रेनला पराभूत का करू शकला नाही?
रशियाचे सैन्य जरी खूप मोठे असले, तरी रशियाला युद्धाचा अनुभव नाही. दुसर्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनच्या सैन्याने कधीही बाहेर जाऊन युद्ध केलेले नाही. 1987मध्ये ते अफगाणिस्तानात आले, पण ते युद्ध जिंकू शकले नाहीत. त्यांचा पराभव झाला. 1991मध्ये हे सैन्य परत मायदेशी गेले. परत गेल्यानंतर एका वर्षाच्या आत सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. त्यात वर उल्लेखलेल्या तीन राष्ट्रांचा उदय झाला. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या सैन्यावर आक्रमण केले, पण त्या सैन्याला युद्धाचा अनुभव नसल्याने मोठमोठ्या शहरांवर आक्रमण कसे करायचे, हे त्यांना कळत नव्हते. ज्याप्रमाणे मुंबईवर कब्जा करायचा तर मुख्य मुंबईसह तिला जोडलेली सर्व उपनगरे आपण मुंबई मानतो, परंतु जोपर्यंत मंत्रालय, राजभवन, मुख्यमंत्री निवास, शेअर बाजार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर तो कब्जा होत नाही, तोपर्यंत मुंबईवर कब्जा केला असे म्हणणे चुकीचे ठरेल, त्याचप्रमाणे रशियाने कीव शहरावर हल्ला केला म्हणजे कीव शहराच्या एका भागावर हल्ला केला आहे. तसेच आधुनिक युद्धामध्ये तुमचे रणगाडे, तुमच्या तोफा, तुमची युद्धसामग्री तुम्ही शहराच्या आत नेणार कसे? आणि ते नेल्याशिवाय सैन्य तेथील इमारती उद्ध्वस्त करणार कशा? याकरिता रशिया मोठमोठी मिसाइल्स, ड्रोन यांचा वापर करून तेथील इमारती नष्ट करत आहे. परंतु ते केल्यानंतर तेथील भूमी ताब्यात कोण घेणार? त्यामुळे रशियाचे सैन्य कीवसारख्या मोठ्या शहरात घुसले असले, तरी शहर रशियाच्या ताब्यात नाही. आणि हे युद्ध असेच चालणार आहे. रशियाची ही कमतरता युक्रेनच्या लक्षात आली आहे. जणू युक्रेनचे सैन्य रशियाला म्हणतेय की, “तुम्ही आत या, मग आम्ही तुम्हाला बघतो.” रशियाचे जितके सैन्य युक्रेनमध्ये शिरले होते, ते फार मोठ्या संख्येने मारले गेले आहे. आणि आता रशियाला वाटत आहे की, युद्ध करून आपण फार मोठी चूक केली आहे. युद्ध नसते केले, तर आज ही स्थिती नसती आली.
मग या युद्धाचे भविष्य काय?
पहिले म्हणजे ज्या राष्ट्रांनी युक्रेनला म्हटले होते की जर रशियाने तुमच्यावर आक्रमण केले तर आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, ते सर्व खोटे पडले. अमेरिकेने थोडीफार शस्त्रे दिली. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आदी देशांनीही शस्त्रास्त्रांची मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्या शस्त्रांचा वापर करायचा कसा याचे प्रशिक्षण सैन्याला दिल्याशिवाय ते युद्ध करणार कसे? त्यामुळे युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन देणारी अमेरिका व युरोपमधील अन्य राष्ट्रे यांनी युक्रेनचा विश्वासघात केला, असे म्हणावे लागेल. या राष्ट्रांचे सैन्य मदतीला आलेले नाही. त्यांनी फक्त युद्धसामग्री पाठवलेली आहे. युक्रेनच्या सैन्याचे संख्याबळ कमी आहे, पण तरीही ते रशियाला मात देत आहेत. येणार्या काळात रशियावर ज्या प्रकारे जागतिक दबाव पडत आहे, त्यामुळे त्याला युद्ध करणे भाग आहे. तसेच युक्रेनलाही हे युद्ध आपल्याला महाग पडले याची जाणीव झाली आहे.
भारताची भूमिका महत्त्वाची
आता या सर्वच राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री हे सर्व भारताकडे का धावत आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या काही दिवसांत जवळजवळ 12 राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री भारतात येऊन त्यांनी मोदींची भेट घेतली. तसेच तीन राष्ट्रांचे पंतप्रधान आले. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क केला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तीन वेळा मोदींशी संवाद साधला. हे सर्व ते का करत आहेत? कारण त्यांना माहीत आहे की भारतच असा एकमेव देश आहे, जो युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धविराम/युद्धसंधी आणू शकतो. त्यासाठी भारतही प्रयत्नशील आहे. त्यामुळे लवकरच हे युद्ध थांबेल. हे युद्ध भारताच्याही फायद्याचे नाही. कारण आपल्याकडील अनेक उद्योगांसाठी लागणारे प्लांट हे युक्रेनमधून तयार करण्यात आले होतेे. युक्रेन त्या वेळी सोव्हिएत युनियनचा भाग होता. अजूनही आपण ती मेटॅलर्जी वापरत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे भारतात जे रणगाडे, टँक, युद्धविमाने आदी युद्धसामग्री आपण वापरत आहोत, ती रशियामध्ये बनलेली आहे, पण त्याचे वेगवेगळे भाग युक्रेन, बेलारूस, रोमानिया या देशांत तयार होतात. तिथून हे भाग एकत्र करून या गोष्टी असेम्बल केल्या जातात. त्यामुळे जर हे युद्ध सुरू राहिले, तर भारताच्या संरक्षण व्यवस्थेवर त्याचे परिणाम होतील. याकरिता हा युद्धविराम लवकरात लवकर होणे ही भारताचीही गरज आहे.
युद्धविराम कधी होणार?
युद्ध सुरू करणे, आक्रमण करणे हा एक मुद्दा आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते बंद होणार केव्हा? युद्ध केव्हा बंद होईल, याचा निर्णय तुमचा शत्रूच घेतो. त्याची जर हार होत चालली असेल तर तो युद्धविराम करण्याची विनंती करेल. जर तो विजयी होत असेल, तर त्याला युद्ध सुरू ठेवण्याची आवश्यकता वाटणार नाही. दोन्ही परिस्थितीत तुमचा शत्रू हा निर्णय घेतो की युद्ध केव्हा बंद करायचे आहे. त्याचप्रमाणे रशिया युक्रेनला म्हणतोय की तुम्ही युद्ध बंद करा, तर युक्रेन रशियाला म्हणतोय की तुम्ही युद्ध बंद करा. पण जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत युद्धातून नुकसान होत राहणार. भारताला याबाबत सजग राहण्याची आवश्यकता आहे. भारताने यातून धडा घेतला पाहिजे की, जर कोणतेही राष्ट्र म्हणत असेल की आम्ही चीनविरुद्ध किंवा पाकिस्तानविरुद्ध तुम्हाला मदत करू, तर त्यावर विश्वास ठेवू नका. तुमची संरक्षण व्यवस्था तुम्हालाच पाहावी लागेल. ते तुम्हाला युद्धासाठी शस्त्रसामग्री देतील. पण युद्ध मात्र तुमचे तुम्हालाच करावे लागेल. इंग्लिशमध्ये म्हटले जाते की "You can not outsource your national defence or national security.' यासाठीच आपले पंतप्रधान आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत, सुरक्षित भारत अशा संकल्पना मांडतात. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण शस्त्रासाठी, युद्धासाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून राहणार नाही.