क्षयरोगाचे नवे रूप

विवेक मराठी    19-Apr-2022
Total Views |
 @डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
 
क्षयरोग औषधांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे तर सर्व जण जाणताच. मात्र हळूहळू या ‘औषधांना दाद न देणारा क्षयरोग’ (Drug Resistant TB) हा नवा प्रकार वाढीस लागला आहे. या क्षयरोगाच्या प्रकारामध्ये मृत्यूचा धोका कैक पटींनी वाढतो. औषधांना दाद न देणारा क्षयरोग बरा करणे कठीण असते, कारण उपचारासाठी एका वेळी 7 ते 9 औषधे घ्यावी लागतात व क्षयाच्या प्रकारानुसार ती साधारण 1 ते 2 वर्षे घ्यावी लागतात. तसेच रुग्णालयामध्ये दाखल होऊन सुरुवातीचे उपचार घेणे आवश्यक असते.


tb
 
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाने जशी त्याची रूपे बदलली, तशा पद्धतीने क्षयाच्या जंतूनेदेखील त्याचे रूप बदलले की काय अशी शंका जर तुमच्या मनामध्ये आली असेल, तर निश्चिंत राहा, कारण तसे घडलेले नाही. क्षयाचा जंतू हा जीवाणू असल्याने विषाणूसारख्या गतीने त्याचे उप-प्रकार निर्माण होत नाहीत.
 
 
मात्र असे असले, तरीदेखील क्षयाचा एक प्रकार सर्वांसाठी चिंताजनक ठरला आहे आणि याविषयी आपणा सर्वांना माहिती असणे अत्यावश्यक आहे, म्हणून हा लेखनप्रपंच!
 
 
‘2025पर्यंत भारताला टीबीमुक्त बनवायचे’ या ध्येयासाठी क्षयरोग (टीबी) नियंत्रण कार्यक्रमाने आपले रूप बदलून आता राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन (उन्मूलन) कार्यक्रम असे रूप धारण केले आहे. क्षयरोगाच्या अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना मोफत औषधोपचार देण्यासाठी व क्षयमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
 
 
1945पूर्वी क्षयरोगाचे उपचार हे रुग्णाला शुद्ध हवेच्या ठिकाणी इतरांपासून दूर ठेवणे आणि पौष्टिक अन्न देणे आणि फुप्फुसाचा खराब झालेला भाग काढून टाकणे अशा प्रकारचे होते. 1945नंतर मात्र जसजशी क्षयरोगावर प्रभावी औषधे सापडत गेली, तसे क्षयामुळे मृत्यूचे प्रमाण व रुग्णसंख्या कमी होऊ लागली. काही पुढारलेल्या देशांमध्ये तर क्षयरोग हा महत्त्वाचा आजार राहिलेला नाही.
 
 
सध्या जगभरात 30 देशांमध्ये क्षयरोगाचे 86% रुग्ण आढळून येत आहेत. क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात. 66% रुग्ण आढळणारे प्रमुख 8 देश म्हणजे भारत, चीन, इंडोनेशिया, फिलीपाइन्स, पाकिस्तान, नायजेरिया, बांगला देश आणि दक्षिण आफ्रिका. जगभरात साधारण 1 कोटी लोकांना क्षयाची लागण होते आणि साधारण 15 लाख जण क्षयाने मृत्युमुखी पडतात.
 
 
2021 साली भारतात क्षयरोगाचे 21,35,830 एवढे रुग्ण नोंदवले गेले. यामध्ये मुख्य भाग एचआयव्हीबाधितांचा आहे. गेले दशकभर या रुग्णसंख्येमध्ये सतत घट होत होती, मात्र 2021मध्ये प्रथमच 19% वाढ झाली आहे. यातील 1,99,976 - म्हणजे जवळजवळ 2 लाख रुग्ण (जवळपास 10%) महाराष्ट्रातील होते.
 
 
केवळ क्षयामुळे दर वर्षी साधारण 5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. क्षयाच्या नव्या प्रकारांमुळे यामध्ये वाढ होऊ शकते.
 

tb
 
क्षयरोगाचा हा नवा प्रकार नेमका काय आहे?
 
क्षयरोग औषधांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे तर सर्व जण जाणताच. त्यासाठी क्षयाच्या रुग्णाला एका वेळी 4-5 औषधांचे सेवन करावे लागते. तसेच हे औषधोपचार कमीत कमी 6 ते 8 महिने घ्यावे लागतात. ही औषधे घरच्या घरी घेणे शक्य असते.
 
 
मात्र हळूहळू या ‘औषधांना दाद न देणारा क्षयरोग’ (Drug Resistant TB) हा नवा प्रकार वाढीस लागला आहे. या क्षयरोगाच्या प्रकारामध्ये मृत्यूचा धोका कैक पटींनी वाढतो.
 
 
क्षयरोगाचा जंतू किती औषधांना दाद देत नाही, त्यावर त्यांचे गांभीर्य व पुढील उपचार अवलंबून आहेत.
 
 
Isoniazid (INH)-resistant TB (H-Mono) - यामध्ये Isoniazid हे औषध लागू पडत नाही
 
 
RRTB -- यामध्ये Rifampicin हे औषध लागू पडत नाही.
 
 
MDR-TB (RR and INH resistant)- यामध्ये एकाहून जास्त प्राथमिक स्तरातील औषधे लागू पडत नाहीत. याला Multi-drug resistance TB असे म्हणतात.
 
 
Pre-extensively drug-resistant TB (pre-XDRTB) यामध्ये Rifampicinसह दुसर्‍या स्तरातील औषधांपैकी ( fluoroquinolone) किमान एक औषध लागू पडत नाही
 
 
XDR-TB - - नावानुसार हा Extensively Drug resistance TB आहे. हा सर्वाधिक गंभीर प्रकारचा क्षयरोग आहे.
 
 
यामध्ये Rifampicinसह दुसर्‍या स्तरातील औषधांपैकी (fluoroquinolone) किमान एक औषध लागू पडत नाही, तसेच उपचारासाठी जी नवी औषधे उपलब्ध झाली होती, त्यातील bedaquiline and linezolid यापैकी एक औषधदेखील लागू पडत नाही.
 
 

tb
 
औषधांना दाद न देणारा क्षयरोग बरा करणे कठीण असते, कारण उपचारासाठी एका वेळी 7 ते 9 औषधे घ्यावी लागतात व क्षयाच्या प्रकारानुसार ती साधारण 1 ते 2 वर्षे घ्यावी लागतात. तसेच रुग्णालयामध्ये दाखल होऊन सुरुवातीचे उपचार घेणे आवश्यक असते.
 
 
उपचार घेऊनदेखील मृत्यूचा धोका नियमित क्षयरोगापेक्षा अधिक असतो. वर उल्लेखिलेल्या पहिल्या H-Mono या प्रकारामुळे साधारण 5% रुग्ण मृत्यू पावतात, तर शेवटच्या XDR-TB या प्रकारामुळे 21% रुग्ण मृत्युमुखी पडू शकतात.
 
 
ग्लोबल टीबी रिपोर्ट 2021नुसार जागतिक स्तरावर चे प्रमाण MDR-TB प्रतिलाख लोकसंख्येमध्ये 4 रुग्ण आणि MDR-TBचे प्रमाण प्रतिलाख लोकसंख्येमध्ये 1 रुग्ण इतके आहे. मात्र हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.
 
 
2019 साली भारतात एकूण 60,873 इतके MDR-TBचे/ RRTBचे रुग्ण उपचार घेत होते व त्यापैकी 10,501 रुग्ण महाराष्ट्रातील होते. तसेच, त्या काळामध्ये XDR-TBच्या 3025 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील 1066 रुग्ण महाराष्ट्रातील होते. म्हणजे भारतातील MDR-TB/RRTBचा 6पैकी 1 रुग्ण आणि XDR-TBचा 3पैकी 1 रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडतो. एका अहवालानुसार मुंबईमध्ये यातील 60% रुग्ण आढळून येतात.
 
 
कोविडच्या महामारीदरम्यान, म्हणजे 2021मध्ये H-Mono/PolyDRTBचे 13,724 रुग्ण, pre-XDRTBचे 8455 रुग्ण आणि XDR-TBचे 376 रुग्ण शोधण्यात आले. एकट्या महाराष्ट्रामध्येच XDR-TBचे 254 रुग्ण शोधण्यात यश आले.
 
 
रुग्ण शोधणे हा कोणत्याही आजाराला नियंत्रित करण्याचा पहिला टप्पा असतो आणि म्हणून आता रुग्णांनी दवाखान्यामध्ये येण्याची वाट न बघता जोखमीच्या गटामध्ये तपासणी करून, तसेच घरभेटीच्या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन टीबीसदृश रुग्णांची तपासणी करून अधिकाधिक रुग्ण शोधले जात आहेत.
 
 
हे फार महत्त्वाचे आहे, कारण जर टीबीच्या रुग्णावर उपचार झाले नाहीत, तर एक रुग्ण एका वर्षाच्या काळामध्ये 10-15 नवे रुग्ण निर्माण करू शकतो. त्यामुळे क्षयरोगाचा प्रत्येक रुग्ण सापडणे आणि त्याला योग्य तो उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच ज्या रुग्णांना उपचार सुरू झाले आहेत, त्यांनी उपचार योग्य पद्धतीने पूर्ण करणे, वेळोवेळी तपासणी करून आजार बरा होत आहे याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अर्धवट उपचार घेतल्याने औषधांना दाद न देणारा क्षयरोग वाढीस लागू शकतो.
 
 
भारताला टीबी-मुक्त बनवण्यासाठी, तसेच या औषधांना दाद न देणार्‍या क्षयरोगाला वाढू न देण्यासाठी आपण काय करू शकतो?
 
 
क्षयरोग कोणालाही (अगदी श्रीमंतांनाही) होऊ शकतो, सर्व वयोगटांमध्ये होऊ शकतो, तसेच शरीराच्या कोणत्याही अवयवाला होऊ शकतो हे समजून घ्या. मात्र फुप्फुसांचा क्षयरोग सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळून येतो.
 
 
क्षयरोगाची लक्षणे अगदी साधी असतात. 2 आठवडे बरा न होणारा खोकला, वजन कमी होणे, संध्याकाळी बारीक ताप येणे, बडक्यातून रक्त पडणे असे कोणतेही लक्षण दिसले की डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या. असे रुग्ण आढळल्यास त्यांना तपासणीसाठी प्रोत्साहित करा. रुग्ण सापडणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. बडका तपासणी व आवश्यकतेनुसार एक्स-रे अशा तपासण्या केल्या जातात. यासाठी रुग्णालयाला 2-3 वेळा भेट द्यावी लागू शकते.
 
 
क्षयरोगाच्या रुग्णाबरोबर भेदाभेद करू नका. कामाच्या ठिकाणी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करा.
 
 
शक्य असल्यास सरकारी केंद्रामधून मोफत तपासण्या व मोफत उपचार घ्या. टीबीची औषधे अतिशय उत्तम प्रतीची आहेत व 90%हून अधिक रुग्ण याद्वारे बरे होत आहेत.
 
 
जर खाजगी डॉक्टरकडे जाणार असाल, तर टीबीचे निदान झाल्यानंतर तुमचा टीबी औषधांना दाद देणारा आहे किंवा नाही यासाठी पुढील तपासण्या अवश्य करा. या तपासण्या (CBNAAT, LC इ.) झाल्याखेरीज औषधे सुरू करू नका. हीदेखील महत्त्वाची पायरी आहे, कारण दोन्ही प्रकारच्या क्षयरोगांची लक्षणे सारखीच असतात. तपासणी अत्यावश्यक आहे.
 
 
तुमच्या क्षयरोग कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार योग्य ती औषधोपचार प्रणाली सुरू करा. सूचनेनुसार बडक्याची पुन:तपासणी करून उपचार योग्य प्रकारे सुरू आहेत याची खात्री करा. औषधे वेळेवर घ्या आणि 1-2 महिन्यांमध्ये तक्रारी कमी झाल्या व तब्येत सुधारत आहे असे वाटले, तरीदेखील उपचार संपूर्ण कालावधीसाठी घेऊन पूर्ण करा. हे खूप महत्त्वाचे आहे.
 
 
टीबीच्या प्रत्येक रुग्णाची नोंदणी शासकीय नि:क्षय प्रणालीमध्ये होणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे यासाठी आपल्या डॉक्टरांना सहकार्य करा, जेणेकरून किती रुग्ण बरे झाले आणि किती रुग्णांमध्ये औषधांना दाद न देणारा टीबी सापडला याची नोंद ठेवणे व योग्य उपचार देणे शक्य होते.
 
 
सरकारी औषधेही खाजगी डॉक्टरांमार्फत उपलब्ध केली जाऊ शकतात, मात्र त्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
 
 
आपल्या ओळखीतील कोणी टीबीचा रुग्ण असल्यास त्यांनी औषधे वेळेवर घ्यावी व उपचार पूर्ण करावा यासाठी औषध साहाय्यक म्हणून आपण मदत करू शकता व यासाठी सरकारकडून आपणास प्रोत्साहनपर काही रक्कम मिळू शकते.
 
 
क्षयरुग्णाने पौष्टिक अन्न घेणे आवश्यक आहे. त्यांनी पौष्टिक अन्न घ्यावे यासाठी सरकारतर्फे काही रक्कम दिली जाते.
 
 
आपणास मधुमेह असल्यास, एचआयव्ही बाधा असल्यास किंवा कोणत्या कारणाने इम्युनिटी कमी झाली असल्यास विशेष काळजी घ्यावी आणि शंका वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान झाल्यास टीबी लवकर बरा होतो.
 
 
कुटुंबातील कोणास क्षयरोग झाला असल्यास इतर सर्वांचीदेखील तपासणी केली जाते, तसेच आता टीबी टाळण्यासाठी काही औषधे दिली जातात. त्यांचे अवश्य सेवन करा आणि लक्षणे जाणवल्यास पुन्हा तपासणी करून योग्य उपचार सुरू करा.
 
 
क्षयरोगाविषयी मनातील भीती व गैरसमज दूर करून जास्तीत जास्त रुग्ण लवकरात लवकर सापडणे व त्यांनी योग्य ते उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे इतरांनादेखील याची माहिती सांगा.
 
 
सर्व जनतेने ठरवले, तर टीबीपासून मुक्ती मिळणे अवघड नाही. जगातील बर्‍याच देशांनी क्षयरोगाला नियंत्रणामध्ये आणले आहे. तसेच संपूर्ण जग 2030 साली टीबी मुक्त होण्यासाठी प्रयत्नदेखील करीत आहे.
 
 
रुग्णाचा क्षयरोग कोणत्या प्रकारचा आहे (औषधांना दाद देणारा की औषधांना दाद न देणारा) याची तपासणी केल्याखेरीज क्षयरोगाचे उपचार सुरू न करणे, लक्षण असलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करणे, जास्त जोखमीच्या गटातील सर्व रुग्णांची सरसकट तपासणी करणे आणि प्रत्येक रुग्णाने औषधोपचार पूर्ण करावेत यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करणे या बाबी आपल्याला टीबी-मुक्तीकडे नेण्यास सक्षम आहेत.
 
 
आपण जसा कोविडच्या महासाथीशी लढा दिलाय, त्याचप्रमाणे या क्षयरोगालादेखील भारतातून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू या!
 
 
टीबी हारेगा, और देश जितेगा!
 
 
लेखिका मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.