अध्ययन - अध्यापन सिद्धान्तांची कृतिपुस्तिका

विवेक मराठी    19-Apr-2022
Total Views |
@प्रा.डॉ. वैभव ढमाळ 9921968686
 विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य प्रकारे वळण देणे आणि व्यक्तिमत्त्वामध्ये सर्वांगीण विकास घडवून आणणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही अध्ययन-अध्यापन पद्धतींचे हेच ध्येय असायला हवे. वर्गातील अध्ययन व वर्गाबाहेरील प्रकल्प यांच्याद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वविकास व वर्तनात बदल करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचे विशिष्ट व्यक्तिगत सामर्थ्य, तसेच त्यांच्या वयानुरूप उपक्रम, प्रयोग, प्रकल्प यांची निवड व नियोजन करणे व मुलांकडून ते प्रभावीपणे करून घेणे हे शिक्षकांचे/ शिवराज पिंपुडे यांचे सर्वात प्रभावी कौशल्य असते. उपक्रम कसे आखावेत व कसे राबवावेत याविषयी मार्गदर्शन करणारी एक शास्त्रशुद्ध व प्रभावी कृतिपुस्तिका म्हणजे शिवराज पिंपुडे यांनी लिहिलेले ‘अन् पारिजातक हसला!’ हे पुस्तक होय.
 
book
 
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथील अभ्यासू, कल्पक, उपक्रमशील व व्रतस्थ शिक्षक शिवराज पिंपुडे यांनी लिहिलेले, ‘अन् पारिजातक हसला!’ हे पुस्तक ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन यांनी एप्रिल 2021मध्ये प्रकाशित केले आहे.
 
 
वर्षानुवर्षे तेच ते शिकून व शिकवून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये एकसुरीपणा अथवा साचलेपणा येतो. त्याने आळस, निरुत्साह वाढतो व कल्पकता-साहस-शोधकवृत्ती-सर्जकता हरवते. साचलेपण घडू द्यायचे नसेल व सर्जन घडवायचे असेल, तर शिक्षण प्रक्रिया किंवा शिक्षक यांना बदलावे लागेल. परंतु शिक्षण व्यवस्था बदलणे हे शिक्षकांकडून शक्य नाही. मग शिक्षकाला स्वतःलाच बदलावे लागेल. कृतिशील, उपक्रमशील व्हावे लागेल. रोजच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये वर्गाबरोबरच वर्गाबाहेरील शिक्षणाचा-अनुभवांचा-ज्ञानाचा अंतर्भाव करावा लागेल.
 
 
हाच विचार अखंडपणे समोर ठेवून शिवराज पिंपुडे विविध उपक्रम राबवत असतात. अशा निवडक उपक्रमांच्या संकल्पना (ळवशर) व कार्यान्वयन (शुशर्लीींळेप) यांचा सुगम, उत्साहवर्धक, मार्गदर्शक आविष्कार म्हणजे त्यांचे ‘अन् पारिजातक हसला!’ हे पुस्तक होय.
 
 
या पुस्तकाचे एकूण तीन विभाग आहेत. पहिल्या दोन विभागांमध्ये विविध स्वरूपाच्या 11 व 6 उपक्रमांविषयी सांगितले आहे, तर परिशिष्ट हा तिसरा विभाग आहे. कोविड संसर्गाच्या काळाने सामाजिक व शैक्षणिक जीवन सर्वाधिक प्रभावित केले. अध्ययन-अध्यापन प्रक्रियांमध्ये मोठे बदल घडवले. परंतु कोविडच्या अवघड काळातही मुलांना सक्रिय ठेवून त्यांच्याकडून अधिक चांगले काम करून घेण्याच्या कितीतरी क्लृप्त्या या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतील. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’, ‘हसरी बोल फुले’, ‘आज कुछ नया करते है’ यासारखे उपक्रम मुलांना लिहिते राहण्यासाठी प्रवृत्त करतील. त्यांची निरीक्षणशक्ती वाढण्यास व विविध नोंदी ठेवण्याच्या सवयीस मदत होईल. त्यामुळे संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची वृत्ती वाढीस लागेल. ‘ती झाली माय आणि मी तिची लेक’, ‘व्रतोत्सवाचा पंधरवडा’ (भाग 1) व ‘व्रतोत्सवाचा पंधरवडा’ (भाग 2) हे व्यक्तिशः मला सर्वाधिक आवडलेले उपक्रम/प्रकल्प आहेत.
 
 
दैनंदिन कौटुंबिक जीवनात आपण लहान मुलांच्या वर्तनात आवर्जून वर्तन बदल होण्यासाठी प्रयत्न करत नाही. योग्य वर्तनामध्ये सातत्य व उत्कृष्टता वाढवायची असेल, तर वरील तीन प्रकल्प सर्वाधिक उपयोगी आहेत. लॉकडाउनसारखा अवघड प्रसंग असो अथवा घरातील कोणाचे आजारपण अथवा एखादा वेगळा प्रसंग, अशा वेळी कुमारवयातील मुलांनी घरातील कामांची जाणीवपूर्वक जबाबदारी घ्यायला हवी. ती कामे व्यवस्थित पूर्ण करायला हवी. या कृतींमधून जबाबदारीने काम करण्याची वृत्ती व नेतृत्वकौशल्य वाढीस लागेल. त्याचबरोबर हे माझे घर आहे व घरातील कामेही माझीच आहेत, असा भाव वृद्धिंगत व्हायला मदत होईल.
 
 
‘व्रतोत्सवाचा पंधरवडा’ या दोन प्रकल्पांमध्ये एकूण चौदा उपक्रम आहेत - उदाहरणार्थ, ‘एक दिवस सकाळी दहा ते चार मौन पाळणे, एक दिवस सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत टीव्ही न पाहणे, एक दिवस स्वतः एकट्याने घरातील विशिष्ट काम करणे, एक दिवस संपूर्ण स्वावलंबन पाळणे, संपूर्ण दिवस केवळ इंग्लिशमधून संभाषण करणे, एक वेळ उपवास करणे, एक दिवस मीठ न घातलेल्या अन्नाचे सेवन करणे आणि एका दिवसात किमान शंभर पानांचे अवांतर वाचन करणे’ असे एकापेक्षा एक भन्नाट उपक्रम यामध्ये आहेत. कुमारवयातील मुलांनी ते जरूर करून पाहावेत. ‘आय टाक इंग्लिश’, ‘कुटुंबाचे मूळ शोधताना’, ‘ये हृदयीचे ते हृदयी’ आणि ‘दूरस्थ उपक्रम शिक्षणाचा स्वानुभव’ हेदेखील उपक्रमपूर्वक अनुभव वाचनीय व अनुसरणीय आहेत. इंग्लिशची भीती न बाळगता सहकार्‍यांच्या व पालकांच्या मदतीने खेळीमेळीच्या वातावरणात करता येण्यासारखे प्रयोग आपणही करून पाहायला हवेत. देशाचा व जगाचा इतिहास अभ्यासताना, आपले कुटुंब, नाव-गाव, देवदेवता, जुने फोटो, कागदपत्रे यांचाही आस्वाद मुलांनी घ्यायला हवा, असाही एक वेगळा उपक्रम यामध्ये आहे.
 
 
‘परिसर न्याहाळताना’ हा या पुस्तकांमधील दुसरा विभाग. यामधील सर्वच उपक्रम मुलांना निसर्गाशी, त्यांच्या सभोवतालच्या परिसराशी एकरूप व्हायला शिकवणारे आहेत. कीटकांपासून ते विविध ग्रहांपर्यंत आपले विश्व न्याहाळायला शिकवणारे आहेत. यामधील प्रत्येक प्रकल्प मुलांमधील वैज्ञानिक दृष्टी, निरीक्षणकौशल्य, संशोधक वृत्ती वाढवणारे आहेत. ‘चिवचिव’, ‘कीटक-किडे’, ‘अन पारिजातक हसला!’, ‘नभ झाकोळुनी गेले’ असे सर्वच विषय वाचनीय आहेत.
 
 
शिवराज पिंपुडे यांनी त्यांच्या शाळेत विविध ग्रंथांमधील अध्ययन-अध्यापन सिद्धान्त अनुसरले. मुले व पालक यांच्यासह ते राबवले. शैक्षणिक सिद्धान्त ही शोधप्रबंधातून व लेखनातून अथवा परिसंवादांमधून विद्वत्तेचे दर्शन घडवण्यासाठी नसून वर्गात व वर्गाबाहेर मुलांकडून करून घेण्याची गोष्ट आहे, हे त्यांनी आपल्या सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.
 
 
शिक्षणशास्त्राच्या पुस्तकांमधील अवघड तत्त्वज्ञान इतक्या सहजगत्या व आनंदी पद्धतीने येताना पाहणे फारच सुंदर आहे. पुस्तकाच्या पानोपानी मी हा अनुभव घेतला आहे.
 
 
शिक्षक-पालक-विद्यार्थी या सर्वांना शिवराज पिंपुडे लिखित ‘अन् पारिजातक हसला!’ हे पुस्तक एखाद्या रेडिमेड अन सेल्फ-एक्स्प्लनेटरी पुस्तिकेप्रमाणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. हे पुस्तक वाचून आपणही कृतिशील व्हावे असा उत्साह वाचकांमध्ये जागृत होईल, हे निश्चित.