त्या तिघी आणि ती..

विवेक मराठी    26-Apr-2022   
Total Views |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगते अग्निकुंड. परंतु आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव असे की आज देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असतानाही सावरकरांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तित्वाची म्हणावी तेवढी दखल घेतली जात नाही. उलट, त्यांच्या बदनामीचीच मोहीम समाजातील काही ठराविक मंडळी सातत्याने राबवत असतात. गेल्या काही वर्षांत स्वा. सावरकर यांना जाणून घेण्याची, त्यांचे जीवनकार्य माहिती करून घेण्याची उत्सुकता विशेषतः युवा वर्गात वाढताना दिसते.  
1  
 
थापि, सावरकरांसारख्या अग्निकुंडात हात घालण्याचे आव्हान व त्याचसोबत विशिष्ट विचारधारेचा शिक्का बसण्याची भीती यामुळे मुख्य प्रवाहातील साहित्य, चित्रपट, नाटक, कला क्षेत्राने सावरकरांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अर्थात, काही सन्माननीय अपवाद वगळता. मात्र दुसरीकडे आपल्या करिअरच्या सुरुवातीला केवळ सावरकरच नाही तर सावरकरांच्या कुटुंबातील स्त्रियांचे जीवनकार्य, त्यांचा त्याग, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा एकपात्री नाटकातून लोकांसमोर मांडण्याचे धाडस केले ते अपर्णा चोथे या युवा अभिनेत्रीने.

1
 
नुकताच मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे अपर्णाच्या ‘त्या तिघी – स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’’ या एकपात्री नाट्यप्रवेशाचा पंचविसावा प्रयोग पार पडला. एकपात्री भूमिका करणे आणि तीही सावरकर कुटुंबातील स्त्रिया हा विषय घेऊन, म्हणजे प्रचंड इच्छाशक्तीचे काम. ती इच्छाशक्ती सादरीकरणावेळीही तिच्या शब्दाशब्दातून ठळकपणे जाणवते. मूळची पुण्याची असलेली अपर्णा चोथे सध्या कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असते. औषधनिर्माण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिने त्या क्षेत्रात काही काळ कामसुद्धा केले. एके दिवशी डॉ. शुभा साठे यांनी लिहिलेले 'त्या तिघी' हे पुस्तक अपर्णाच्या हाती आले आणि ती म्हणते, अक्षरशः एका बैठकीत ते पुस्तक तिने वाचून काढले. त्यानंतर झपाटल्यासारखी ती हा विषय अभ्यासू लागली आणि त्यातूनच या एकपात्री नाट्यप्रवेशाची संकल्पना आकारास आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी माई, थोरल्या येसूवहिनी आणि शांताबाई या तिन्ही सुनांनी आपापले पती स्वातंत्र्यकार्यासाठी घरापासून दूर असताना कशाप्रकारे आपला चरितार्थ चालवला, तसेच त्यावेळी त्यांना काय भोगावे लागले, काय सहन करावे लागले, याविषयी अपर्णाचा हा एकपात्री नाट्यप्रवेश प्रकाश टाकतो. या एकपात्री नाट्यप्रवेशाच्या एकूणच निर्मितीच्या काळात अपर्णाचे आई-बाबा तसंच तिची बहीणही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

1 
प्रकाशयोजना, संगीत आणि दिग्दर्शन करणारी अशी तिची एक लहानशी टीम आहे. त्या सर्वाना घेऊन तिने ‘त्या तिघी’चे राज्यभर प्रयोग केले आहेत. तिच्या नाटकाचे एकूण २५ प्रयोग झाले आहेत. पुणे, ठाणे, पनवेल, बेळगाव, यवतमाळ, नाशिक आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी ती तिच्या छोट्याश्या टीमला घेऊन जाते. या नाटकाची निर्माती तीच आहे, संहिता लेखनसुद्धा तिनेच केले आहे आणि त्या तिघींच्याही भूमिका तीच स्वतः करते. अशातच कोरोना महामारीच्या काळात तिचे प्रयोग काही काळासाठी बंद झाले. चांगल्या कामात अडचणी येतातच. त्यावरही मात करायची.. स्वस्थ न बसणं हा तिचा स्वभाव. पहिल्या टाळेबंदीच्या काळात तिने येसूवहिनींवर म्हणजे यशोदाबाईंवर एक साधार चरित्र लिहिले. 'तू धैर्याची असशी मूर्ती' हे त्याचे नाव. त्याच्या पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती वर्षभरातच संपल्या. लगेचच त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्याचबरोबर शांताबाई सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘हरिदिनी’ हे पुस्तकही तिने पुन्हा संपादित करून प्रकाशित केले आहे. मृत्युंजय प्रकाशनातर्फे या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.

1 
अपर्णा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर एक वेगळा, लोकांपर्यंत न पोहोचलेला इतिहासाचा भाग जगासमोर मांडण्याचा आणि घराघरात, मनामनात पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी अभ्यासकही आहे. अभ्यासक, लेखक, निर्माती, अभिनेत्री म्हणून तिचा हा प्रवास असाच अखंड राहावा, अशा साप्ताहिक विवेककडून सदिच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.