ई-कचरा संकलन मोहिमेचा जनजागर

विवेक मराठी    27-Apr-2022
Total Views |
@वैद्य मनोजकुमार पाटील । 9404990108

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध व्यक्ती, सामाजिक संस्था आणि संघटना एकत्र येऊन एक समिती स्थापन करतात. त्या समितीमार्फत ई-कचरा संकलनाची एक मोठी मोहीम आखली जाते. तिला समाज भरभरून प्रतिसाद देतो. सांगलीमध्ये सुरू झालेल्या या ई-कचरा संकलन उपक्रमाची व्याप्ती पाहून महानगरपालिकेने सहजपणे आपली स्वीकृती आणि आपला सहभाग नोंदवला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये एकूण 43 संकलन केंद्रांची ऑनलाइन नोंदणी झाली.


e west
कचरा व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये उद्योगाच्या प्रचंड संधी आहेत. मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम होण्याची आवश्यकतासुद्धा आहे, हे वास्तव आता सगळ्यांना पटू लागले आहे.

परंतु ह्याबरोबरच एक वास्तव असेसुद्धा आहे की, आधी संकलन करण्याची व्यवस्था निर्माण करायची की आधी प्रक्रिया करण्याची व्यवस्था निर्माण करायची? खरा तर हा यक्षप्रश्न! अंडे आधी की कोंबडी आधी? या प्रश्नासारखा! पण समाज याच्यावर उत्तर शोधू शकतो, हे सांगली-मिरज-कुपवाडच्या नागरिकांनी सिद्ध करून दाखवले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध व्यक्ती, सामाजिक संस्था आणि संघटना एकत्र येऊन एक समिती स्थापन करतात. त्या समितीमार्फत ई-कचरा संकलनाची एक मोठी मोहीम आखली जाते. तिला समाज भरभरून प्रतिसाद देतो. या मोहिमेचे तीन टप्पे पूर्ण होतात. दहा टनांहून अधिक कचरा संकलित केला जातो आणि चौथा टप्पा म्हणून 5 मेला संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये ई-संकलन केंद्रे उभी करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. एवढेच नाही, तर शहरांमधले तीन तरुण उद्योजक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी यावर प्रक्रिया करून उपयुक्त वस्तू निर्माण करण्यासाठी आपल्या आपल्या आस्थापना प्रशासनाच्या विविध खात्यांकडून मंजूर करून घेतात आणि हे सारे घडते केवळ एक वर्षाच्या आत! 15 ऑगस्ट 2021ला सुरू झालेली मोहीम पाच मे 2022पर्यंत वरती वर्णन केलेले सर्व टप्पे पूर्ण करते.

‘पर्यावरण संरक्षण गतिविधि’ समाजामध्ये मिसळून, समाजाला सोबत घेऊन विविध उपक्रम राबवते. ते उपक्रम झाडासंबंधीचे असतात, पाण्यासंबंधीचे असतात, कचरा व्यवस्थापनासंबंधीचेही असतात. समाजातील सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, मठ, मंदिरे, संत, महापुरुष यांच्याशी जोडलेल्या धार्मिक संस्था सूक्ष्म स्तरावरून करावयाचे कोणतेही सामाजिक परिवर्तन ज्यांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही, अशा महिला आणि त्यांच्या संस्था.. या सर्वांच्या माध्यमातून तिचा प्रसार केला जातो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला यश मिळतेच मिळते!


e west
 
ई-कचरा म्हणजे काय?
कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जी निरुपयोगी आहे, खराब झाली आहे अथवा तिचे आयुष्य संपले आहे ती इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये समाविष्ट होते. आपल्या घरामध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला टीव्ही, रेडिओ, इस्त्री, हेडफोन, मोबाइल, चार्जर, मिक्सर, प्रिंटर, मोटर, पंप अथवा वायर या सगळ्या गोष्टी एकदा निकामी झाल्या की अडगळ तर होतातच, आणि शेवटी कचर्‍यातच जमा होतात. तंत्रज्ञान सुधारतेय, तशा घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात आणि जुन्या वस्तू बाजूला पडत जातात. अशा एक ना अनेक वस्तू - सीडी-डीव्हीडीपासून अगदी वॉशिंग मशीनपर्यंत ज्या काही बंद अवस्थेत पडून आहेत आणि त्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही, अशा सर्व वस्तू ई-कचरा म्हणून गणल्या जातात.

ई-कचर्‍याचे शरीरावर होणारे परिणाम
 
ई-कचर्‍यामध्ये अनेक प्रकारचे धातू - उदा., पारा (मर्क्युरी), शिसे (लेड), कॅडमियम, लिथियम, बेरियम इ. वापरले जातात. हे पदार्थ मानवी शरीरासाठी विषारी असतात आणि आपल्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. पारा आणि शिसे मेंदूवर आणि श्वसनप्रणालीवर परिणाम करतात, तसेच लहान मुलांच्या वाढीवरही घातक परिणाम करतात. कॅडमियमसारखे पदार्थ आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणतात, जे बरे तर करता येत नाहीतच, तसेच ते हळूहळू शरीरातील प्रत्येक अवयव - मूत्रपिंड (किडनी) यकृत (लिव्हर) निकामी करत जातात. शक्यतो आजकाल इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लास्टिकने आच्छादलेली असतात. हे प्लास्टिक जेव्हा जाळले जाते, तेव्हा त्यातून डायॉक्सिन बाहेर पडते, ज्याचा परिणाम आपल्या पुनरुत्पादन प्रणालीवर आणि लहान मुलांच्या वाढीवर तर होतोच, तसेच आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील याने कमी होते. आजकाल हॉर्मोनल प्रॉब्लेम्स वाढलेले दिसून येतात, हा या सर्व कचर्‍यातून बाहेर पडणार्‍या वायूंचाच एक परिणाम आहे.

ई-कचर्‍याचे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम
 
ई-कचरा उघड्यावर फेकून देणे हे अतिशय घातक आहे, पण का? जेव्हा आपण हा कचरा फेकून देतो, तेव्हा कालांतराने त्याचे नैसर्गिकरित्या विघटन सुरू होते. या प्रक्रियेत त्यातून अनेक हानिकारक घटक बाहेर पडतात आणि त्याचा परिणाम फक्त हवेवरच नाही, तर पाण्यावर आणि मातीवरही दिसून येतो. विघटनातून तयार झालेले अगदी बारीक कण आणि वायू हवेत मिसळतात. वायुप्रदूषणात तर भर पडतेच, तसेच आपल्या श्वसनाद्वारे ते आपल्या शरीरात जातात. अनेक प्राणी, पक्षी जे कचर्‍याच्या ढिगात खाद्य शोधत असतात, त्यांच्या शरीरातही हा कचरा जाऊन त्यांच्या शरीरावर व पुढच्या पिढीच्या आरोग्यावर याचे कायमस्वरूपी परिणाम दिसतात. भोपाळ दुर्घटनेने सर्व जगाचे डोळे उघडले, पण अजूनही त्यातून म्हणावी तशी सुधारणा अथवा जागरूकता आपल्यामध्ये आलेली नाही.

जिथे शहरातील सर्व कचरा एकत्रपणे गोळा करून जाळला जातो, तिथे तो कचरा जमिनीत मुरतो आणि भूमिगत असलेल्या पाण्यात मिसळला जातो. हे पाणी शेती, दैनंदिन जीवनात अथवा पिण्यासाठी आपण वापरतो आणि आपल्या अन्नातून अथवा पिण्यातून कचरा शरीरात जातो. अनेक कारखाने प्रक्रियेत तयार होणारे रासायनिक पाणी नदीत, नाल्यांमध्ये, तलावामध्ये सोडतात, तसेच लोक इलेक्ट्रॉनिक वस्तूही फेकून देतात. वाहत्या प्रवाहात पाण्याबरोबर या वस्तूंच्या रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यात मिसळतात. शेतीमध्ये हे पाणी वापरले जाऊन शेतीउत्पादनात त्याचे अंश उरतात, तर थेट वापर केल्यास त्याचे शरीरावर परिणाम करतात.

सांगलीमध्ये सुरू झालेल्या या ई-कचरा संकलन उपक्रमाची व्याप्ती पाहून महानगरपालिकेने सहजपणे आपली स्वीकृती आणि आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे हे काम खूप सोपे झाले. याला कोणतीही कायदेशीर अडचण येऊ शकली नाही. मान्यवर प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्या दिवशी स्वतः उपस्थित राहिले.कचरा गोळा करणारी सर्व यंत्रणा मदतीला उभी राहिली.
 
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये एकूण 43 संकलन केंद्रांची ऑनलाइन नोंदणी झाली. 15 ऑगस्टपूर्वी या सर्व संकलन केंद्राच्या कार्यकर्त्यांनी आपल्याआपल्या परिसरामध्ये जागृतीचे काम केले. सोशल मीडिया आणि प्रस्थापित प्रिंट मीडियासुद्धा या नावीन्यपूर्ण मोहिमेमध्ये सहभागी झाले. ही मोहीम केवळ शहरापुरती न राहता तासगाव तालुका, पलुस तालुका, इस्लामपूर तालुकासुद्धा यामध्ये सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरामधूनसुद्धा अशी मोहीम काढण्यात आली. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेमध्ये सर्व कामकाज पूर्ण झाले आणि इलेक्ट्रॉनिक कचरा आणि काठोकाठ भरलेली वाहने पुढील प्रक्रियेसाठी रवानासुद्धा झाली.
 
योजनेप्रमाणे 15 ऑगस्टची पहिली मोहीम पार पडल्यानंतर, दिवाळीच्या सुमारास 2 ऑक्टोबर - गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या जयंतीचे औचित्य साधून दुसरी मोहीम आणि 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिसरी मोहीमसुद्धा पार पडली.
हे एवढ्यावरच थांबले नाही... हेच या मोहिमेचे खरे वैशिष्ट्य!

मेगा ड्राइव्ह झाला, तरीही लोकांचे कचरा दानाचे पुण्यकार्य चालू राहण्याची शक्यता पाहून त्यांना प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने दोन गोष्टींची योजना करावी लागणार यासाठी...
 
स्थायी संकलन केंद्रे

त्यासाठी शोधाशोध करायला हवी, त्याच्यावर योग्य नियंत्रण राहील आणि त्याचा कोणाला त्रास होणार नाही अशा प्रकारे ते व्हायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला जेव्हा द्यावे असे वाटते, तेव्हा आपल्याला काही सुविधा पुरवता येईल का? त्यासाठी एक पर्याय देण्यात आला रजिस्ट्रेशन करण्याचा!
 
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये हे लोण तिसर्‍या मोहिमेपर्यंत पोहोचले.

सांगली जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थायी संकलन केंद्रे, साप्ताहिक अथवा मासिक स्थायी श्रमकेंद्रे सुरू होण्याची प्रक्रिया पार पडली.

 
’ई-कट्टा’
आपापल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असलेल्या पर्यावरणावर प्रेम करणार्‍या जागरूक नागरिकांचा संच! महिन्यातून एका रविवारी बैठक करेल, चर्चा करेल, योजना करेल आणि निर्णय करेल. त्यानंतरच्या रविवारी किंवा सुट्टीच्या अथवा सणाच्या दिवशी एक कृतिरूप कार्यक्रम राबवला जाईल.
 
महिन्यातून एकदाच!
आपल्या आपल्या आवडीप्रमाणे!
 
आपल्या आपल्या सवडीप्रमाणे!
आपल्या आपल्या निवडीप्रमाणे!
 
आपल्या आपल्या गरजेप्रमाणे!
त्याच्यासाठी काही संकल्पनांची यादी तयार झाली.
सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर व्यापारी, उद्योजक, बुद्धिजीवी यांनी तर दखल घेतलीच! तरुण उद्योजक या क्षेत्रामध्ये उद्योग उभारण्यास पुढे आले. उद्योगाचा आणि रोजगारनिर्मितीचा एक नवा मार्ग सुरू झाला.

अनेक संस्था आपला बॅनर आणि आपला अभिमान, अभिनिवेश बाजूला ठेवून एका विशिष्ट कार्यासाठी एकाच छताखाली एकत्र येऊन नियोजन करण्याची आणि एकच बॅनर हातात घेऊन काम करण्याची एक नवी परंपरा सुरू झाली. आजच्या या घडीला अत्यंत आवश्यक असलेले पर्यावरण संरक्षणाचे काम झाले, हे वेगळे सांगायची मुळीच आवश्यकता नाही.

एक वेगळी सकारात्मक संस्कृती दृष्टिपथामध्ये आली आहे. समाजातील समस्यांवर उत्तरे शोधण्याची आणि त्यांचे निराकरण करण्याची, सर्वांना सामावून घेणारी सर्वव्यापी संस्कृती!