सन्मान बांबू सेवकांचा

विवेक मराठी    08-Apr-2022   
Total Views |
‘सेवा विवेक’तर्फे भालिवली येथील प्रकल्पावर बांबू सेवक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मा. राज्यपालांच्या हस्ते 59 बांबू सेवकांचा सन्मान करण्यात आला. भालिवली प्रकल्पाच्या माध्यमातून येथील वनवासी बांधव, भगिनी बांबूच्या वस्तू तयार करतात. आपल्या मित्रपरिवारात, आपल्या संस्थेत, आपल्या निवासी संकुलात अशा सर्व वस्तूंच्या विक्रीचे काम आनंदाने आणि नि:स्वार्थी भावनेने करणारे ‘बांबू सेवक’ आहेत. राज्यपालांच्या हस्ते सत्कार हा सत्कारमूर्तींच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण होता.


bambu sevak
माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 3 एप्रिल 2022 रोजी भालिवलीच्या सेवा विवेकच्या प्रांगणात बांबू सेवकांचा सत्कार झाला. राज्यपालांची या प्रकल्पाला ही दुसरी भेट होती. कोरोनाचा प्रकोप सुरू होण्यापूर्वी राज्यपालांनी या प्रकल्पाला भेट दिली होती. त्या वेळची भेट प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांना आणि वनवासी भगिनींना प्रचंड ऊर्जा देणारी ठरली. या वेळची भेटदेखील ऐतिहासिक म्हणावी लागेल.

ही भेट ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणावी लागते की, या वेळी राज्यपालांच्या हस्ते 59 बांबू सेवकांचा सत्कार झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून हे बांबू सेेवक आले होते. बांबू सेवक म्हणजे काय, हे सर्वप्रथम स्पष्ट करायला पाहिजे. या प्रकल्पातील हे काम वनवासी भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आहे. त्यांच्या दारिद्य्राच्या, कुपोषणाच्या, उपासमारीच्या बातम्या शोधून शोधून देण्यात काही जणांना आसुरी आनंद होत असतो. त्यावर मग वृत्तपत्रीय लेखांचा मारा होतो. सरकार काय करते, यावर ताशेरे झाडले जातात आणि समाजजागृतीचे खूप मोठे काम केले, असे मानून प्रसारमाध्यमे आणि बातम्या शोधणारे पत्रकार धन्यता मानून झोपी जातात.


bambu sevak
प्रश्न झोपण्याचा नसून नित्य जागृतीचा आहे. प्रश्न सरकार काय करते याचा नसून आम्ही काय करतो याचा आहे. भालिवलीचा प्रकल्प आणि समाजाच्या दुःखाचा बाजार मांडणारे यांच्यात हाच फरक आहे. कुपोषण का होते? गरिबी का निर्माण होते? शोषण का होते? या प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे वनवासी भागात रोजगार उपलब्ध होत नाहीत आणि रोजगार नसल्यामुळे पैशांची आवक नाही. पैशांची आवक नसल्यामुळे बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याची क्षमता नाही. बाजारात धान्य मुबलक आहे, जीवनावश्यक वस्तू मुबलक आहेत, पण तो घेण्यासाठी पैसा नाही.
 
 
प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी विचार केला की, वनवासी भगिनींना हा पैसा कसा उपलब्ध करून देता येईल. पैसा उपलब्ध करून देण्याचे दोन मार्ग - पहिला मार्ग पैशाचे वाटप करणे आणि दुसरा मार्ग पैसा मिळविण्याची क्षमता निर्माण करणे. पहिला मार्ग लाचार बनविणारा आहे आणि त्याच्या मर्यादा आहेत. दुसरा मार्ग स्वाभिमान वाढविणारा, सक्षम करणारा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड जरी असला, तरी कायम स्वरूपाचे यश देणारा आणि मूल्यवर्धन करणारा आहे.

रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, याचे काही प्रयोग भालिवलीमध्ये झाले आणि त्यातून कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होत गेले. लुकेश बंड आणि प्रगती भोईर हे दोन प्रमुख कार्यकर्ते या प्रयोगांतून खूप शिकत गेले आणि मग त्यांना बांबू नावाचा कल्पवृक्ष सापडला. बांबूची बेटे आपण सर्व ठिकाणी बघत असतो. या बांबूचे सामर्थ्य दारिद्य्र मिटविण्याचे आणि आर्थिक विकास घडविण्याचे आहे. मेळघाट येथे प्रकल्प चालविणार्‍या सुनील देशपांडे यांच्या कामामुळे हे लक्षात आले.


bambu sevak
बांबूसाठी आपले आयुष्य समर्पित केलेला कार्यकर्ता म्हणजे सुनील देशपांडे. त्यांच्याविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या महान कार्याची ओळख करून देणारे पुस्तक यथावकाश प्रकाशित होईलच. विवेक प्रकाशनातर्फे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘परिसांचा संग’ या पुस्तकात सुनील देशपांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख आहे. सुनीलजी भालिवलीत आले आणि त्यांनी बांबूच्या वस्तूंचे बीजारोपण केले.
 
बांबूकामात एकूण चार गावांमधील सात वस्ती-पाड्यातील 70 तेे 90 महिला काम करतात. घरातील फर्निचर बनविण्यापासून ते घर सुशोभीकरणासाठी अनेक लहान-मोठ्या वस्तूंची निर्मिती करतात. तसेच बांबूपासून मोठ्या प्रमाणात बनविल्या जाणार्‍या आणि प्रचंड मागणीस उतरणार्‍या बांबू राख्या तयार केल्या जात आहेत. तसेच दिवाळीसाठी आकाशकंदिलांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या दहा-पंधरा प्रकारच्या कंदिलांची निर्मिती केली जात आहे आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. तसे पाहिले, तर वस्तू बनविणे त्या मानाने सोपी गोष्ट आहे. त्यासाठी चाळिसेक दिवसांचे प्रशिक्षण द्यावे लागते. बांबू कसा तासायचा, त्याच्या बारीक पट्ट्या कशा बनवायच्या, जी वस्तू बनवायची, त्यासाठी कशा पट्ट्या बनवायच्या, असे सर्व प्रशिक्षण दिले जाते. आणि प्रत्येक स्त्रीच्या अंगी ईश्वराने कलागुण दिलेले असतात. त्यामुळे स्त्री या सर्व गोष्टी फार लवकर शिकते. तिच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.


bambu sevak
 
पण बनविलेल्या वस्तू विकायच्या कशा? विकत घेणार्‍या व्यक्तीपर्यंत या वस्तू कशा घेऊन जायच्या? त्याचे व्यापारीकरण केले, तर व्यापारी आपल्याकडून दहा रुपयात वस्तू घेईल आणि शंभर रुपयांत वस्तू विकेल. ते करायचे नाही, असे केले तर व्यापार्‍यांचे पोट भरण्यासाठी, त्यांना श्रीमंत करण्यासाठी आपण प्रकल्प चालू केला असे होईल, म्हणून मग रक्षाबंधनाच्या बांबूच्या राख्या, दिवाळीतील कंदील आणि बांबूच्या इतर गृहोपयोगी वस्तू यांची विक्री करणारा हवा, पण दलाल नकोे. त्यासाठी अशी एक टीम उभी करणे आवश्यक होते.

 
प्रगती भोईर आणि लुकेश बंड यांनी तीन-चार वर्षांमध्ये नीट योजना करून जवळजवळ शंभर-सव्वाशे जणांची महाराष्ट्रव्यापी टीम उभी केली. आणि ही सर्व टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी राहिली, हे तिचे वैशिष्ट्य. या टीमने समाजशक्ती काय असते, याचा परिचय करून दिला. अगदी कोरोना काळातही या मंडळींनी लाखो रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. त्यात कुणी कारखानदार आहेत, कुणी प्राध्यापक आहेत, कुणी हँडिक्राफ्ट वस्तू विकणारे दुकानदार आहेत, कुणी शिक्षक आहेत, कुणी छोट्या-मोठ्या सेवाभावी संस्था चालिवणारे आहेत, हे सर्व ‘बांबू सेेवक’.
 
सर्वांची समान वैशिष्ट्ये कोणती? तर प्रत्येक जण निःस्वार्थी भावनेने काम करतो, कोणत्याही आर्थिक मोबदल्याची त्याची अपेक्षा नाही. एक अतिशय चांगले काम करतो याचा त्याला आनंद आहे. राखी काय किंवा कंदील काय आणि अन्य गृहोपयोगी वस्तू काय, सर्व पर्यावरणपूरक वस्तू आहेत. त्यात प्लॅस्टिक नाही, केमिकल नाही, आणि प्रत्येक वस्तू हाताने बनविलेली आहे, यंत्राचा वापर नाही. हस्तकला हा शब्द आपण वाचतो, ऐकतो; भालिवली प्रकल्पात होणार्‍या वस्तू म्हणजे हस्तकलेचे प्रत्यक्ष रूप आहे. आपल्या मित्रपरिवारात, आपल्या संस्थेत, आपल्या निवासी संकुलात अशा सर्व वस्तूंच्या विक्रीचे काम आनंदाने करणारे ‘बांबू सेवक’ आहेत.


bambu sevak
 
त्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते झाला. भगतसिंग कोश्यारी हे दिलीप करंबेळकर यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘जनराज्यपाल’ आहेत. ते आता ऐंशीच्या उंबरठ्यावर आहेत. पण प्रवासाला निघाले की एकेका दिवसात तीन-चार कार्यक्रम करून येतात. सामाजिक, राष्ट्रीय आशय असलेल्या कोणत्याही कार्यक्रमास ते नाही म्हणत नाहीत. एकेकाळी राजभवन ही दुरून बघण्याची गोष्ट होती. त्या राजभवनाचे दरवाजे त्यांनी सामान्य लोकांसाठी खुले केले. असे हे जनराज्यपाल आहेत.
 
राज्यपालांच्या हस्ते सत्कार हा सत्कारमूर्तींच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण होता. मी मंचावर राज्यपालांच्या शेजारीच बसलो होतो, येणार्‍या सत्कारमूर्तींच्या चेहर्‍यावरील भाव पाहत होतो. प्रत्येक जण वाकून राज्यपालांचे चरणस्पर्श करू इच्छित होता आणि राज्यपाल त्याला थांबवीत होते. वयस्कांचे चरणस्पर्श करणे ही आपली संस्कृती आहे. हे बांबू सेवक समाजातील सर्व स्तरांतील आहेत. ते आपल्या कृतीने, आपल्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवीत होते. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार, फोटो असे एकामागून एक येत गेले. सेवा विवेकने असा कार्यक्रम घडवून आणला, आम्हाला सन्मानित केले, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.
 
 
माननीय राज्यपालांनी आपल्या भाषणात सर्वांचे मन:पूर्वक कौतुक केले. “मी पहाडी प्रदेशातून आलेलो आहे. येथेही आजूबाजूला डोंगर बघून मला आनंद होतो. पण एक खंतही मनात येते की, डोंगरदर्‍यांत राहणार्‍या आपल्या बांधवाच्या घरात अजून वीज गेलेली नाही. गाव-वसती-पाड्यांपर्यंत रस्ते झाले नाहीत. मोबाइल असेल तर तिथे नेटवर्क नसते. संपर्कापासून ही सर्व मंडळी शेकडो हात दूर असतात.”
 
पहिल्या रांगेत सर्व प्रशासकीय अधिकारी बसले होते. त्यांना उद्देशून राज्यपाल म्हणाले की, “आपल्या योजना अनेक आहेत, त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या देशबांधवांना सक्षम केले पाहिजे.” सेवा विवेक प्रकल्पाचा उल्लेख करून ते म्हणाले की, या प्रकल्पाची संकल्पना खूप चांगली आहे. आणि रोजगार देण्याचा विस्तार अनेक गाव-पाड्यातून झाला पाहिजे. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल, ते माझ्या क्षमतेत जेवढे आहे तेवढे मी जरूर करीन, असे आश्वासनही त्यांनी दिले.


bambu sevak
आपल्या प्रास्ताविकात दिलीप करंबेळकर यांनी पार्कतर्फे “आपण त्रिपुरा सरकारला बांबूविषयी एक धोरण लिहून दिले आहे” असे सांगितले. या प्रकल्पाचे काम मुग्धा वहाळकर यांच्याकडे आहे. हा बांबूविषयी रिपोर्ट स्वीकारला जाईल आणि त्यातून त्रिपुरामध्ये हजारो वनवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक राज्याने पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून आणि विकासाचा दृष्टीकोन अंगीकारून काम केले, तर वनवासी क्षेत्रातील दारिद्य्र समस्यांना आणि पर्यावरण र्‍हासाच्या समस्यांना जबरदस्त पायबंद बसेल.

या प्रकल्पात पुढील वर्षी एक गुरुकुल सुरू करण्याची योजनादेखील राज्यपालांपुढे ठेवण्यात आली. डॉ. कला आचार्य यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार केलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ‘आचार्य - पौरोहित्य, आचार्य - योगशास्त्र’ या विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय संस्कृती, भारतीय जीवनपद्धती सर्व प्राणिमात्रांचा उत्कर्ष करणारी संस्कृती आहे. विवेक गुरुकुल, भालिवलीमार्फत याचे प्रकटीकरण होणार आहे. समाजाची गरजपूर्ती हेच कोणत्याही प्रकल्पाचे यश असते आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यासारख्या सात्त्विक राज्यपालांच्या पदस्पर्शामुळे हे यश अधिकच उजळून निघणारे ठरणार आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.