सामान्य कार्यकर्ता हाच खरा योद्धा

विवेक मराठी    11-May-2022   
Total Views |
महाराष्ट्रात तीन पक्षांशी भाजपाला लढायचे आहे. त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही. निवडणुकीच्या राजकारणाची गणिते अतिशय वेगळी असतात. तिथे एकाच वेळेला बेरीज, वजाबाकी आणि भागाकार होत असतात. एक अधिक एक म्हणजे दोन असे पहिलीतले गणित निवडणूक गणित होत नसते, यांच्याशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक बूथचा विचार करून एका बूथच्या मागे किती कार्यकर्ते उभे राहू शकतात, किंवा करता येऊ शकतात याची आखणी करावी लागेल, आणि त्यांचे प्रशिक्षण करावे लागेल. सभेची गर्दी मतदानाची पेटी भरत नाही. मतदानाची पेटी भरण्यासाठी संपर्क आणि संवाद ही दोनच आयुधे उपयोगाची असतात आणि त्या बाबतीत आपल्या विचारधारेची बरोबरी करू शकेल, असे बळ अन्य कोणाकडेही नाही.

bjp

लोकसभा निवडणुका २०२४ला होतील आणि याच दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकादेखील होतील. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्ष मोदीविरोधात निवडणूक लढवतील, मोदींना पर्याय देण्याची भाषा करतील. दहा वर्षांत मोदींच्या शासन काळात लोकशाही कशी धोक्यात आली, आर्थिक प्रगती कशी मंदावली, धार्मिक तणाव कसे वाढले, वगैरे विषयांची कथानके तयार केली जातील. ही सर्व खोटी असल्यामुळे सामान्य माणसांची करमणूक होईल आणि मोदींविरुद्ध प्रचार करणारे महालबाड आहेत, हे त्यांच्या मनोमन लक्षात येईल.

 
भाजपाला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मात्र महाविकास आघाडीविरुद्ध लढायची आहे. लोकसभेची निवडणूक त्या मानाने सोपी आहे. महाराष्ट्राची निवडणूक त्या मानाने अवघड आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे एकमेकांचे राजकीय विरोधक सत्तेसाठी एकत्र आले आहेत, त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे - भाजपाच्या हाती सत्ता जाता कामा नये. या खेळात ते यशस्वी झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीतही आता त्यांची हीच व्यूहरचना राहील. भाजपाला या तिघांशी एकट्याने लढायचे आहे.

लढाई करताना आपली बलस्थाने कोणती आहेत आणि आपली दुर्बळ स्थाने कोणती, याचा विचार करावा लागतो. या बाबतीत शिवाजी महाराजांचा आदर्श गिरविला पाहिजे. महाराजांकडे सैन्य कमी, साधन-संपत्ती कमी, पैसा कमी आणि शत्रूकडे या सर्वाची रेलचेल होती. महाराजांनी काय केले? त्यांनी सह्याद्रीलाच आपला सेनापती केला. सह्याद्रीवरील किल्ले ही अतिदुर्गम स्थाने झाली. तिथपर्यंत पोहोचणे विजापूरच्या सैन्याला आणि मोघल सैन्यालाही महाकठीण गेले. आपली दुर्बळता छत्रपती शिवाजी महाराजांनी चातुर्याने भरून काढली. भाजपालादेखील हेच काम करावे लागेल. याचा अर्थ किल्ल्यात जाऊन बसावे लागेल, असा बावळट अर्थ कोणी करू नये.


bjp

भाजपाची शक्ती तीन विषयांत आहे - १) विचारशक्ती, २) नैतिक शक्ती 3) संघटनशक्ती. विचारशक्ती आणि नैतिक शक्ती यांचे राष्ट्रीय पातळीवरचे दोन महान आदर्श सर्व भाजपापुढे आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह. भाजपातील अन्य केंद्रीय नेते आदर्श नाहीत, असा याचा अर्थ नाही. हे दोन नेते भाजपाचे चेहरे झालेले आहेत. ते विचाराला शरण आहेत, संघटनेला शरण आहेत आणि नैतिक मूल्यांचे ते काटेकोर पालन करतात.

भाजपाचा विचार हा मूलत: संघविचार आहे. संघविचार म्हणजे राष्ट्रविचार. राष्ट्र प्रथम, नंतर मी, नंतर संघटन ही संघाची शिकवण आहे. सर्व काही राष्ट्रासाठी, माझे काहीच नाही, या भावनेने काम करायचे. डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस ते आजच्या विद्यमान सरसंघचालकांपर्यंत सर्व जण याचे चालतेबोलते आदर्श आहेत. हे एक राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र म्हणजे उपासना पंथावर आधारित पौराणिक ग्रंथांवर आधारित राष्ट्र नव्हे, हे सनातन राष्ट्र आहे. सनातन याचा अर्थ ‘जे नित्य नूतन ते सनातन’, काळानुरूप व्यवस्था स्वीकारून जगणारे हे राष्ट्र आहे. त्याची विचारपरंपरा आहे, त्याची जीवनपद्धती आहे, त्याची मूल्यव्यवस्था आहे. हे राष्ट्र परमवैभवाला घेऊन जायचे हे संघाचे ध्येय आहे.

संघाचा हा विचार राजकीय क्षेत्रात प्रथम जनसंघाच्या माध्यमातून व्यक्त झाला, पुढे जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली. विचाराची अभिव्यक्ती त्या त्या क्षेत्राच्या परिभाषेत करावी लागते. भाजपाची राजकीय क्षेत्राची परिभाषा सनातन भारतीय राष्ट्राची आहे, भारतीय राष्ट्रवादाची आहे. हिंदुत्व आणि भारतीयत्व यात काहीच फरक नसतो. ही विचारधारा आपल्याला यशस्वी करायची आहे, म्हणून विचारधारेला समर्पित कार्यकर्ते १९५१ सालापासून अथक परिश्रम करीत राहिले. राजकीय यश पहिली काही वर्षे काहीच मिळाले नाही, पण ते निराश झाले नाहीत. निवडणूक हरले तरी ‘अगली बारी अटल बिहारी’ ही घोषणा देऊन पुन्हा कामाला लागले. विचाराची शक्ती अशी असते.
विचार अमूर्त असतात. ते व्यक्तीच्या माध्यमातून दिसावे लागतात. दीनदयाळ उपाध्याय ते नरेंद्र मोदी ही त्याची चालती-बोलती जिवंत प्रतीके आहेत. विस्तारभयास्तव अनेक नावे इथे लिहिलेली नाहीत. राजकीय जीवनात विचार कसा जगायचा, याचा या सर्व थोर लोकांनी आदर्श उभा केला. राजकीय नैतिकतेचे मापदंड निर्माण केले. राजकीय जीवनात प्रतिस्पर्ध्याचा विरोध करायचा असतो, पण विरोधकदेखील आपलाच आहे, ही भावना विसरायची नसते. राजकीय विचारांचा आणि कार्यक्रमांचा विरोध करताना व्यक्तिगत पातळीवर स्नेहसंबंध जोडायचे असतात. परस्परांविषयी विश्वासार्हता निर्माण करायची असते. एकमेकांवर वार करताना पातळी सोडायची नसते. जनसंघ-भाजपाच्या सर्व नेत्यांनी या सर्व नैतिक मूल्यांचे पालन करून दाखविले, त्या मार्गानेच आजच्या भाजपालाही जायचे आहे.
 
अमूर्त विचार व्यक्तीच्या माध्यमातून प्रकट होतात, पण तेवढ्याने राजकीय शक्ती निर्माण होत नाही. त्यासाठी संघटन लागते. अखिल भारतीय पक्षांचा विचार करता भाजपा हा एक असा पक्ष आहे, जो संघटनेवर अधिक भर देतो. अन्य पक्ष व्यक्तिवादावर, घराणेशाहीवर, घणाघाती भाषणबाजीवर उभे असतात. भाजपाचे स्वत:चे राजकीय संघटन आहे. महाराष्ट्राचा विचार करता ते महाराष्ट्रव्यापी आहे.

 
संघटन हे एक शास्त्र आहे आणि डॉ. हेडगेवार हे या संघटन शास्त्राचे महान आचार्य होते. ध्येयनिष्ठ संघटन कसे उभे करायचे, हे त्यांनी करून दाखविले. त्यांनी संघटनेची काही महान सूत्रे विकसित केली. संघटन शिस्तबद्ध असले पाहिजे, पण शिस्त म्हणजे झापडे बांधून चालणे नव्हे. संघटनेतील प्रत्येक सदस्य स्वतंत्र विचार करणारा आणि निर्णय करणारा असावा. संघटनेचा सदस्य स्वयंप्रेरणेने काम करणारा, संघटनेचा कार्यकर्ता संघटनेसाठी भरपूर वेळ देणारा असावा. संघटन म्हणजे संपर्क आणि संपर्क म्हणजे संवाद. संपर्क आणि संवाद ही संघटनेची दोन प्रमुख अंगे आहेत. संपर्क करीत असताना आळस करायचा नाही, संपर्कासाठी जितका प्रवास करावा लागेल तेवढा केला पाहिजे. संपर्कातून माणसांना जोडले पाहिजे. जोडण्यासाठी संवाद करावा लागतो, म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला संवादकौशल्य प्राप्त करावे लागते. त्यासाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांचे सतत प्रशिक्षण वर्ग करावे लागतात, त्याला काहीही पर्याय नाही.
महाराष्ट्रात तीन पक्षांशी भाजपाला लढायचे आहे. त्या तिघांची शक्ती स्वतंत्रपणे वेगवेगळी आहे. या तीन शक्तींचे एकत्रीकरण झाल्याने महाशक्ती निर्माण होईल, असे समजण्याचे काही कारण नाही. त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही. निवडणुकीच्या राजकारणाची गणिते अतिशय वेगळी असतात. तिथे एकाच वेळेला बेरीज, वजाबाकी आणि भागाकार होत असतात. एक अधिक एक म्हणजे दोन असे पहिलीतले गणित निवडणूक गणित होत नसते, हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येक बूथचा विचार करून एका बूथच्या मागे किती कार्यकर्ते उभे राहू शकतात, किंवा करता येऊ शकतात याची आखणी करावी लागेल, आणि त्यांचे प्रशिक्षण करावे लागेल. सभेची गर्दी मतदानाची पेटी भरत नाही. मतदानाची पेटी भरण्यासाठी संपर्क आणि संवाद ही दोनच आयुधे उपयोगाची असतात आणि त्या बाबतीत आपल्या विचारधारेची बरोबरी करू शकेल, असे बळ अन्य कोणाकडेही नाही.
काही जणांकडे बाहुबली आहेत आणि काही जणांकडे धनबली आहेत, त्यांचा ते भरपूर वापर करतील. ही एक प्रकारची आसुरी शक्ती आहे. आसुरी शक्तीशी लढण्याचा आपला सनातन मार्ग सत्यधर्माचा मार्ग आहे. पांडवांपेक्षा कौरव संख्येने अधिक होते, त्यांच्याकडे चाणक्यनीती करणारे अनेक जण होते, पैशाचे सामर्थ्य तर काय बघायला नको. तीच गोष्ट रावणाची. त्याची लंका सोन्याची लंका म्हटली जाते. त्याविरुद्ध लढणारा राम साधनांनी अगदीच दुर्बळ. पण दोन्ही युद्धांचे परिणाम काय झाले, हे प्रत्येक घरातील लहान मुलालादेखील माहीत आहे. आपणही अशाच रणांगणात आहोत, हे भान ठेवून कार्यकर्त्याला उभे करण्याच्या मागे लागले पाहिजे. श्रीगुरुजी सांगत असत की, ‘टेक केअर ऑफ पेनी, पाउंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्व्ज - पैशाची काळजी घ्या, रुपया आपली काळजी घेण्यास समर्थ आहे.’
या लढाईत सामान्य कार्यकर्ता हाच खरा योद्धा आहे.
vivekedit@gmail.com

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.