एका उत्तम पुस्तक दिंडीचा गजर!

विवेक मराठी    11-May-2022
Total Views |
@- चंद्रशेखर नेने

book

डोंबिवली येथील रहिवासी माधव जगन्नाथ जोशी यांचे ‘माझी कॉर्पोरेट दिंडी’ हे अप्रतिम पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी फार स्तिमित करणारे ‘साक्षात्कार’ होतात! कोकणातील पालगड ह्या लहानशा गावातून आलेला, मराठी माध्यमात सातवी शिकलेला हा एक मध्यमवर्गीय मुलगा मुंबईला पुढील शिक्षणासाठी आपल्या काकांकडे येतो. पुढे डोंबिवलीत राहून ते शालेय शिक्षण पूर्ण करतो. त्यानंतर पोदार कॉलेज येथून बी.कॉम.ची पदवी मिळवतो. इथवरचा प्रवास कदाचित त्याच्याप्रमाणे कोकणातील अनेक तरुणांनी पूर्ण केला असेल. पण त्यानंतरची माधव जोशी ह्यांची वाटचाल मात्र अगदी वेगळी, स्फूर्तिदायक आणि आजकालच्या तरुण-तरुणींना नवी वाट दाखवणारी ठरेल. कारण तिथून पुढे, अर्थार्जन करीत असतानाच, म्हणजे हाती पडेल ती नोकरी करताना जोशींनी कायद्याचे आणि कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतरचे त्यांचे सर्व आयुष्य एका वेगळ्याच वाटेने निघाले आणि त्यात प्रगतीच्या अनेक पायर्‍या चढत असताना ह्या हुशार आणि सहृदय गृहस्थाने महत्त्वाची कितीतरी पदे भूषवत एका झळाळत्या कॉर्पोरेट करियरची ‘दिंडी’ समाधानाने पूर्ण केली. खरे म्हणजे ह्या अभूतपूर्व दिंडीची वाटचाल अजूनही चालूच आहे! हे पुस्तक त्या दिंडीचा एक त्रोटक आलेख आहे. पुस्तक वाचताना ते संपूच नये असे वाटते. माधव ह्यांनी आणखीही विस्तृतपणे स्वतःचे अनुभव आपल्याला सांगत राहावे, असे वाटत राहते. असे वाटणे हे ह्या पुस्तकाचे एक सर्वात मोठे यश आहे.
सामान्यपणे मराठी माणसांना कॉर्पोरेट जग हे ‘दुरून डोंगर साजरे’ ह्याप्रमाणेच वाटत राहते. त्या जगातील कामाचे स्वरूप, त्यातील आव्हाने, यशापयशाचे अनुभव आणि मापदंड, त्यातील वावरणार्‍या सुप्रसिद्ध व्यक्ती ह्या सर्वांबद्दल आपल्याला एक कुतूहल असते. ह्या सर्व गोष्टी आपल्या समोर अगदी सोप्या भाषेत आणि विशेष म्हणजे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मांडण्याचे कठीण काम जोशी यांनी फारच सुलभरित्या केले आहे. रतन टाटा, हरीश साळवे, अरुण शौरी ह्यासारख्या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींबरोबर माधव जोशींनी बरोबरीच्या नात्याने केलेली महत्त्वाची कितीतरी कामे, त्यांना वेळोवेळी दिलेले बहुमोल सल्ले आणि मार्गदर्शन ह्याचा एक विस्तृत पटच आपल्या पुढे उलगडला जातो. हे सर्व सांगत असतानाच गेल्या पन्नास वर्षांत भारतीय कॉर्पोरेट विश्वात घडत गेलेले महत्त्वाचे आणि दूरगामी बदल अतिशय सोप्या भाषेत आणि निवेदनाच्या ओघात जोशी आपल्या पुढे ठेवत जातात. हा एक केवढातरी मोठा कालपट आहे आणि त्यातून जाताना आपल्या सर्वांचेच आयुष्य कितीतरी प्रकारांनी बदलले आहे. ह्या पुस्तकाच्या योगाने आपण त्या सर्व बदलांचा एक थरारक अनुभव घेत आहोत असे वाटत राहते. त्यात पुनः माधव जोशी हे ह्या बदलाच्या, विशेषतः संगणक आणि दळणवळण (म्हणजे आयटी आणि कम्युनिकेशन्स) ह्या क्षेत्रातील केंद्रस्थानी होते! त्यातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि संस्था ह्यांच्या अतिशय बारकाईने केलेल्या निरीक्षणाचा प्रत्यय त्यांच्या निवेदनातून आपल्याला सतत जाणवत राहतो. माझ्या सुदैवाने मी स्वतःदेखील ह्याच प्रकारच्या बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने त्यातील काही घटनांचा साक्षीदार आहे. मी माधवबरोबर काही वर्षे ह्युजेस टेली.कॉमचा आयटी प्रमुख होतो. त्या काळात माधवच्या दिलदार, ऋजू तरीही ठाम व प्रामाणिक स्वभावाची मला जवळून ओळख झाली आणि मला एक उत्तम मित्र मिळाला. तेव्हाचा आमचा बरोबर काम करण्याचा काळ हा माझ्या करियरमधील एक अतिशय आनंदाचा काळ होता!
ह्या प्रकारची पुस्तके बरेच वेळ क्लिष्ट आणि बोजड होण्याचा धोका असतो. पण माधवचे एक वैशिष्ट्य म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना त्यातील ‘माणसा’बद्दल त्याला वाटत असलेला अतीव जिव्हाळा! हा जिव्हाळा नुसत्या त्याच्या पुस्तकातच नव्हे, तर त्याच्या अफाट पसरलेल्या व्यक्तिसंग्रहातून, त्याने चालविलेल्या अनेकानेक समाजोपयोगी कार्यातून आणि विशेषतः डोंबिवली नगरातील सांस्कृतिक वैभवातील त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या भरघोस योगदानातून उमजून येतो. हे पुस्तक आपल्या सर्वांनाच विविध कोनांतून कॉर्पोरेट जगाची जाणीव करून देईल. होतकरू तरुण-तरुणींना तर ह्या पुस्तकातून आपल्या करियरमध्ये उत्तम यश कसे मिळवावे ह्यासाठी अनेक स्फूर्तिदायक ‘टिप्स’ मिळतील. अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून वाचकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे काबीज करावीत ही त्यांना शुभेच्छा! असे एक उत्तम दर्जाचे वाचनीय पुस्तक लिहिल्याबद्दल माधव जोशी ह्यांचे मनापासून आभार!
 


पुुस्तकाचे नाव - माझी कॉर्पोरेट दिंडी
लेखक - माधव जोशी
प्रकाशक - ग्रंथाली
मूल्य - 300 रु.
पृष्ठसंख्या - 256