बहुआयामी शास्त्रज्ञ प्रा. डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर

विवेक मराठी    13-May-2022
Total Views |
डॉ. क.कृ. क्षीरसागर । 9422080865


agharkar

ब्रिटिशांच्या काळात भारतीय नागरिकांना सर्व क्षेत्रांत दुय्यम आणि अन्याय्य वागणूक मिळत होती. शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, प्रशासन, वैद्यक अशा सर्वच क्षेत्रांत हा अनुभव सातत्याने यायचा. मात्र या परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न अनेक राष्ट्रभक्तांनी केले आणि पर्यायी साधनसुविधा निर्माण केल्या. अशा महत्त्वाकांक्षी व्यक्तींमध्ये थोर वैज्ञानिक प्रा. डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे स्थान अग्रगण्य ठरेल. ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या डॉ. महेंद्रलाल सरकार यांनी कलकत्त्यात 1876मध्ये स्थापन केलेल्या व स्वदेशी विज्ञानाला वाहून घेतलेल्या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी) या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. यासंबंधी 7 ऑक्टोबर 1944 रोजी बॅरिस्टर मुकुंद रामाराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ, कृषिवैज्ञानिक आणि काही उद्योजक यांची चर्चासभा झाली. त्या वेळी वैज्ञानिक संशोधन गतिमान करण्यासाठी ‘इंडियन लॉ सोसायटी’च्या सहकार्याने जागा व संशोधन साहित्याची सुविधा उपलब्ध करून द्यायचे निश्चित झाले. संस्थेच्या स्थापनेपासून तिचा कार्यविस्तार करण्यासाठी डॉ. आघारकर यांचे नेतृत्व उपयोगी पडले. या संस्थेला उच्च दर्जाच्या संशोधनासाठी आता केवळ भारतातच नाही, तर जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. डॉ. शं.पु. आघारकरांनी संस्थेची पायाभरणी केली. नंतर डॉ. गो.बा. देवडीकर यांनी त्यावर इमारत उभी केली.
 
 
कोकणातील दापोली तालुक्यात असलेल्या कोलथरे या गावात, दातार कुटुंबात 18 नोव्हेंबर 1884 रोजी डॉ. आघारकरांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज अघारी या गावाचे सरपंच होते. त्यामुळेच त्यांचे नाव आघारकर झाले. आघारकरांचे वडील पुरुषोत्तम आघारकर त्या वेळच्या मुंबई इलाख्यातील लोकनिर्माण (पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट - झथऊ) खात्यात ओव्हरसिअर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे शं.पु. आघारकरांच्या शिक्षणाची थोडी आबाळ झाली. काही काळ कर्नाटकमधील हरणाईच्या आणि धारवाडच्या शाळेत त्यांना शिकावे लागले. त्यामुळे त्यांनी कन्नड भाषेवर प्रभुत्व मिळविले. तेथील शाळांमध्ये अध्यापकांची संस्था अपुरी असे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अध्यापनाची जबाबदारी सोपविली जाई. आघारकरांना याचा फायदा मिळाला व त्यांचे अध्यापन कौशल्य वाढले.
 
 
बालपणी त्यांच्या धार्मिक आणि उदात्त विचारांच्या आईच्या संस्कारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनासुद्धा आध्यात्मिक विचारांचे वळण लागले. वडील कार्यालयीन दौर्‍यावर दीर्घकाळ प्रवासात असताना त्यांच्या आईचा सहवास अधिक लाभला आणि त्यातून धार्मिक व अध्यात्मिक संस्कार अधिक दृढ झाले. त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली. धारवाडच्या सरकारी शाळेतून 1901मध्ये तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. 1902मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र या विषयांत त्यांनी बी.ए. ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. याच परीक्षेसाठी त्यांना इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वासाठी उपयोगी असा बेल पुरस्कारही मिळाला. पुढे 1909मध्ये ते प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र व भूशास्त्र या विषयांच्या एम.ए. या परीक्षेत उत्तीर्ण झाले. याआधी गँ्रट मेडिकल कॉलेजने त्यांना ‘व्यावहारिक वनस्पती विज्ञान’ या विषयाच्या अभ्यासासाठी ‘लिस्बोआ’ शिष्यवृत्ती दिली होती. हे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर जैविक विज्ञान (बायॉलॉजी) या विषयाचे प्राधापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1910 ते 1913 या तीन वर्षांमध्ये अध्यापनाचे काम केल्यावर त्यांनी पुढील संशोधन प्रकल्प हाती घेतले. त्याआधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी महाबळेश्वर व मेढाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात प्राणी आणि वनस्पती संकलनाचे काम केले. यामुळे त्यांच्या संशोधनकार्याची पायाभरणी झाली. त्या वेळी त्यांनी पाचगणी परिसरातील गोड्या पाण्याच्या जलाशयात सापडणार्‍या जेलीफिशच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला. त्यामुळे त्यांना कलकत्ता येथील प्राणी सर्वेक्षण या संस्थेत प्रतिनिधित्व मिळाले. त्यामुळे त्यांना हिल्टॉलॉजिकल तंत्रज्ञान अवगत करता आले आणि गोड्या पाण्यातील स्पंज या विषयावर सखोल संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांना अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक होत गेले. रॉयल बोटॅनिक गार्डनचे व्यवस्थापक डब्ल्यू.डब्ल्यू. स्मिथ यांच्यासारख्या विख्यात शास्त्रज्ञांशी संपर्क प्रस्थापित झाले. कलकत्ता विश्वविद्यालयातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीच्या लॉ कॉलेज भवनमध्ये महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या स्वदेशी जीवविज्ञानाला वाहिलेल्या संस्थेची स्थापना केली. त्या स्थापनेसाठी प्रा. एस.एल. आजरेकर, प्रा. एन.व्ही. जोशी, डॉ. पी.जे. देवरस, बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर आणि प्राचार्य जे.आर. घारपुरे यांचे प्रयत्न महत्त्वाचे होते.
 
 
डॉ. आघारकर यांच्या संशोधनाने भारतीय प्राण्यांच्या अनेक नवीन प्रजातींचा शोध लागला. डॉ. आघारकर यांनी अनेक संशोधन प्रकल्प यशस्वी केले. नवीन पिढीतील संशोधकांना अगत्यपूर्वक मार्गदर्शन करून भारतात उच्च दर्जाचे संशोधक निर्माण केले. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या या बाबतच्या अनुभवांचे आदरपूर्वक उल्लेख करतात. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉ. आघारकर यांना नेपाळमधील वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी 1921मध्ये उल्लेखनीय मदत केली. त्यांनी नेपाळचे महाराज सर चंद्र शमशेर जंग बहादुर राणा यांची अनुमती मिळवून दिली. 1921मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे प्रा. आर.एस. इनामदार, प्रा. एन.के. तिवारी गोसाईंथन या भागात आणि 1923मध्ये कालिगंडकी घाटातील मुक्तिनाथ व दामोदर कुंड या भागात डॉ. आघारकर त्यामुळेच संशोधनासाठी जाऊ शकले. नेपाळमध्ये वनस्पती विज्ञानाचे महत्त्व त्यामुळे स्थानिकांना परिचित झाले.
 
 
डॉ. आघारकर लवकरच विश्वविख्यात शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. देशोदेशींच्या आपल्या प्रवासात भारतीय युवा शास्त्रज्ञांसाठी नव्या संधी निर्माण करण्याकरिता ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. परिणामत: 1851मध्ये भारतीय संशोधकांना परदेशी संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्त्यांची सुविधा मिळाली व ती पुढे चालू राहिली. भारत गुलाम राष्ट्र असल्यामुळे ब्रिटिश शास्त्रज्ञ भारतीयांना दुय्यम लेखून त्यांना सर्व सुविधांपासून वंचित करीत. भारत सरकारच्या अर्थपुरवठ्याचा फायदा भारतीयांनाच नाकारला जायचा. याविरुद्ध डॉ. आघारकरांनी चिकाटीने प्रयत्न केले, त्यामुळे डॉ. के.एन. कौल आणि डॉ. डी.एन. चटर्जी यांना संधी मिळाली. या प्रयत्नांमध्ये डॉ. आघारकर यांना रँग्लर सर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची मोठी मदत मिळाली. वास्तविक 1851मध्ये लंडन येथे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी अनेक भारतीय संस्थानिक आणि उद्योजक यांनी आर्थिक मदत केली होती, तरीही जुलमी ब्रिटिशांनी भारतीय संशोधकांना डावलण्याचा घाट घातला होता. हे मान्य न झाल्यामुळेच डॉ. आघारकरांनी त्यावर मात करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवले. डॉ. रघुनाथ पु. परांजपे त्या वेळी लंडनमधील इंडियन काउन्सिलचे सदस्य होते. रँग्लर परांजपे यांनी सर्व कागदपत्रे तपासून पाहता असे दिसले की तत्कालीन ब्रिटिश सरकारने शिष्यवृत्तीसाठी 65,000 पौंडांची तरतूद करून ठेवली होती. परंतु एकाही भारतीयाला ती दिली गेली नाही. परांजपे आणि आघारकर यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे नंतर अणुतज्ज्ञ डॉ. होमी भाभा, डॉ. के.आर. सुरंगे आणि इतर काही जणांना ही शिष्यवृत्ती मिळाली. डॉ. आघारकरांच्या राष्ट्रीय वृत्तीची अशी इतर अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत.
 
 
डॉ. आघारकर यांनी वनस्पतिशास्त्रांतर्गत पेशीविज्ञान, वनस्पती प्रकृतिशास्त्र, पुरा-वनस्पतिशास्त्र, त्याचप्रमाणे तांदूळ, ज्यूट, आंबा, केळी या कृषी पिकांवरील संशोधनासाठी बर्‍याच सुविधा निर्माण केल्या.
 
 
त्यांनी 1923मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण सोसायटीच्या अधिवेशनात लखनौ येथे अध्यक्षीय व्याख्यान दिले. विषय होता ‘भारतातील जलवनस्पती’. 1938मध्ये भरलेल्या ‘भारतीय विज्ञान परिषदेत ‘प्रोग्रेस ऑफ बॉटनी इन इंडिया‘ हे त्यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले. पुढे 1943च्या एका चर्चासत्रात ‘भारतातील वनस्पती संशोधनाची स्थिती’ या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. त्या वेळच्या संशोधन पद्धतीतील आणि सुविधांतील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी उपाय सुचविले. त्यामुळे हे संशोधन अधिक गतिमान झाले.
 
 
 
वनस्पतिशास्त्र संशोधनासाठी असलेल्या घोष अध्यासनाचे मानद प्राध्यापक या पदावरून ते 1943मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कलकत्ता विद्यापीठाने त्यांच्या नावे सुवर्णपदक द्यायला सुरुवात केली. देशातील अनेक विख्यात वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सल्लागार वगैरे नात्याने त्यांनी कार्य केले. सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या 1924मधील राजीनाम्यानंतर डॉ. आघारकरांनी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे प्रमुख सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. या पदावर ते 1935पर्यंत कार्यरत होते. यानंतरही ते 1946पर्यंत कार्यकारिणीचे वरिष्ठ सदस्य होते. 1934मध्ये इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे संयुक्त कार्यकारी सचिव म्हणून त्यांची निवड झाली आणि बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना सन्माननीय पदक देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी 1935मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आणि ते या पदावर 1945पर्यंत कार्यरत होते. 1938मध्येच ‘सॉइल कॉन्झर्वेशन अँड अफॉरेस्टेशन’ कमिटीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. 1930पासून त्यांनी ‘इम्पेरिकल काउन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च’च्या अनेक समित्यांचे सदस्य म्हणून कार्य केले. कृषीप्रमाणेच तत्कालीन ‘रिसर्च फंड असोसिएशन’च्या, म्हणजे आताच्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून 1939 ते 1942 या काळात काम करीत होते. पुढे 12 वर्षे ते ‘न्यूट्रिशन अ‍ॅडव्हायझरी कमिटीचे’ सदस्य होते.
 
 
 
त्यांनी अनेक शास्त्रीय नियतकालिकांचे संपादक म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांची स्वतःची विविध प्रकाशने संदर्भ म्हणून उपयोगी पडतात. शेवटी ते प्रथम मुंबईला आले व नंतर पुण्यात स्थायिक झाले. या लेखात अन्यत्र उल्लेख केलेल्या महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीची स्थापना 7 ऑक्टोबर 1944 रोजी केली. त्यांच्या सुविधा पत्नी पार्वतीबाई यांची त्यांना सतत सक्रिय साथ मिळाली. त्यांनी आपले राहते घर विज्ञान वर्धिनीला अर्पण केले. दि. 11 एप्रिल 1981 रोजी त्यांचा मृत्यू झाला. असे डॉ. आघारकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सर्वांना प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला त्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली, असे म्हणता येईल.