“पंढरपूर हे समतेचे प्रेरणा केंद्र” - औसेकर महाराज

14 May 2022 11:45:09
पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्रभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर हे समतेचे केंद्र आहे” असे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रतिपादन केले.

pandharpur
 
दि. 9 मे रोजी पंढरपूर येथील तनपुरे महाराजांच्या मठात विवेक प्रकाशित ‘भेटवा विठ्ठला’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.
 
 
या वेळी व्यासपीठावर बद्रिनाथ महाराज तनपुरे, राणा महाराज वासकर, आ. प्रशांत परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे, सुनील सर्वगोड, लेखक विद्याधर ताठे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक खरेदी करण्यासाठी

भेटवा विठ्ठला

https://www.vivekprakashan.in/books/bhetwa-vithala/

१ मे १९४७ रोजी साने गुरुजींनी हरिजनांच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले व दि. १० मे रोजी त्यांचा लढा यशस्वी होऊन उपोषणाचीही यशस्वी सांगता झाली. महात्मा गांधी, शंकराचार्य, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, समस्त बडवे कमेटी आणि सनातनी ब्रह्मवृंद यांच्या परस्पर भिन्न भिन्न भूमिकांनी हा लढा प्रचंड गाजला. 
https://www.vivekprakashan.in/books/bhetwa-vithala/


ते पुढे म्हणाले की, “हिंदूंमध्ये सामाजिक समरसता यावी यासाठी पूज्य साने गुरुजींनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेशाचे आंदोलन सुरू केले होते. या समरसतेसाठी पंढरपूरच का? याबाबत साने गुरुजी म्हणाले होते की, पंढरपूर हे मराठी लोकांचे, महाराष्ट्राचे हृदय आहे आणि मराठी माणसाचे हृदयच जिंकावयास हवे. यासाठी आंदोलनाला पंढरपूरच योग्य आहे.”
75 वर्षांपूर्वी पंढरपुरात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार नसलो, तरी आपल्या आजोबांचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरीतील विठ्ठल मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुले केल्यामुळे संपूर्ण देशात समतेचा संदेश पोहोचला असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

‘मी हे आंदोलन समाज तोडण्यासाठी नाही, तर समाज जोडण्यासाठी करतोय’ ही साने गुरुजींच्या आंदोलनामागची भूमिका असल्याचे सांगून विद्याधर ताठे यांनी या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व विशद केले.


pandharpur
“75 वर्षांपूर्वी पंढरपुरात पूज्य साने गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी दहा दिवस उपोषण केले. त्यातून सामाजिक क्रांती झाली, समाज जोडला गेला. या सत्याग्रहाचा इतिहास ‘भेटवा विठ्ठला’ पुस्तकरूपाने आपल्याला वाचता येणार आहे” असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिपादन केले.
 
पुस्तकामागील विवेकची भूमिका मांडताना सा. विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे म्हणाले की, “साने गुरुजींचा हा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह म्हणजे पंढरपूरमधून केलेला समतेचा एल्गार होता. आजही आपल्या मनात अस्पृश्यता असेल, तर साने गुरुजींच्या आंदोलनाला आणि इथल्या उत्पात आणि बडवे मंडळींनी घेतलेल्या पुढाकाराला अर्थ राहणार नाही. चंद्रभागेच्या निर्मण जलासारखं मानवी मनही निर्मळ झालं पाहिजे.
ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये साने गुरुजींनी सत्याग्रह केला आणि पांडुरंगाचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं, त्याप्रमाणे आपणही आपआपल्या गावाचं पंढरपूर केलं पाहिजे. आजही अनेक मंदिरांमध्ये माझ्या बांधवांना प्रवेश नाही, तिथे साने गुरुजींचा आदर्श घेऊन, पंढरपूरचा आदर्श घेऊन तिथल्या ग्रामस्थांनी आपल्या बांधवांना सन्मानाने मंदिरात घेऊन जावं आणि आपल्या गावाचं पंढरपूर करावं. समतेचं, समरसतेचं हे आंदोलन या निमित्ताने सुरू व्हावं आणि पंढरपूर आणि साने गुरुजी त्याची प्रेरणा असावी.” तर विठ्ठलाचा एकादशीचा रथ ओढण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

pandharpur 
कार्यक्रमात बडवे, उत्पात, कोळी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विठ्ठलराव उत्पात यांनी “हा माझा सन्मान नाही, तर तो माझ्या वडिलांचा सन्मान आहे, त्यामुळे तो मी त्यांच्या पायावर समर्पित करणार” असे म्हणून हा सत्कार हातात न स्वीकारता आपण आणलेल्या पिशवीत स्वीकारला. तसेच बद्रिनाथ महाराज तनपुरे यांचा 75वा वाढदिवस असल्याने सा. विवेकच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हरीश ताठे, लक्ष्मण पापरकर, वीरेंद्रसिंग उत्पात यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
नंदकुमार कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर विवेक पुस्तक विभागाच्या शीतल खोत यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0