'विवेक समूह 'निर्मित 'दुर्दम्य लोकमान्य' लघुपट दूरदर्शनवर झळकणार!

14 May 2022 17:37:51
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड

lokmanay
 
मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनकार्यावर विवेक समूह व मुंबई तरुण भारतद्वारा निर्मित 'दुर्दम्य लोकमान्य - तो स्वराज्यसिंह एक' हा लघुपट आता दूरदर्शनवर झळकणार असून शुक्रवार, दि. २० मे रोजी सायं. ७.३० वाजता सह्याद्री वाहिनीवर हा लघुपट पाहता येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'तही या लघुपटाची निवड झाली आहे.
 
या लघुपटाचे दिग्दर्शन विनोद पवार यांनी केले असून संहिता अंबरीश मिश्र यांनी लिहिली आहे. तसेच, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मुख्य सूत्रधार म्हणून काम केले आहे. तसेच, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अरूणा ढेरे, गिरीश प्रभुणे, कुमार केतकर, भानू काळे, डॉ. मिलिंद कांबळे, अरविंद गोखले, ऍड. किशोर जावळे, अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर तज्ज्ञांनी या लघुपटात सहभाग घेतला आहे. तसेच, प्रमोद पवार, अपर्णा चोथे यांनीही या लघुपटात भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाचा टीझर सा. विवेक आणि महाएमटीबी आदी वेबपोर्टल्सच्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलद्वारा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 
बुद्धिमान, द्रष्टे, त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक, आधुनिक लोकशाही राष्ट्रवादाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळकांचे अंतरंग उलगडून दाखवणारा, अनेक दिग्गज - मान्यवरांच्या सहभागाने परिपूर्ण असा हा लघुपट आहे. नुकतीच या लघुपटाची प्रतिष्ठेच्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त निवड झाली आहे. तेव्हा दि. २० मे रोजी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हा लघुपट पाहावा, असे आवाहन विवेक समूह व मुंबई तरुण भारततर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0