वाढत्या उष्णतेची धग

विवेक मराठी    14-May-2022
Total Views |
@डॉ. श्रीकांत कार्लेकर । 9764769791
भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवण्याची काही निश्चित कारणं आहेत. वेगाने कमी होणारी झाडांची संख्या, काँक्रिटीकरणाचं वाढतं प्रमाण, शहरात तयार होणारी उष्णतेची बेटं (Heat islands)), अतिनील किरणाचं वाढतं प्रमाण ही त्यातली काही महत्त्वाची कारणं. या संकटाचा सामना करण्यासाठी दर वर्षी उन्हाळ्यात निश्चित नियोजन करण्याची नितांत गरज आहे. शहरांतील आणि ग्रामीण भागातील उन्हाळ्यातील तापमानाच्या गेल्या काही वर्षांतील नोंदी एकत्र करून त्यावर आधारित असे उष्णतेच्या लाटेचे अंदाज फायदेशीर ठरू शकतात.

hit


वाढत्या उष्णतेची धग गेल्या काही दिवसांत कमी होत आहे असं वरकरणी वाटत असलं, तरी त्याची तीव्रता अजूनही अनेक ठिकाणी जाणवतेच आहे. या वर्षीचा मार्च-एप्रिलमधला उन्हाळा वैशाख वणव्यासारखा भाजून काढणारा असल्याचा अनुभवही सार्वत्रिक आहे.

एप्रिल 2022 हा 1901 ते 2022 एवढ्या कालखंडातील गेल्या 122 वर्षांतला तिसरा सर्वाधिक उष्ण महिना होता, तर मार्च 2022 हा 33.10 से. नोंद झालेला आत्तापर्यंतचा सर्वात अतिउष्ण महिना होता!

या वर्षीची ही उष्णतेची लाट जास्त कालावधीची व नेहमीपेक्षा लौकर आली म्हणून आणि तिने मोठं भौगोलिक क्षेत्र व्यापलं म्हणून लक्षणीय ठरली आहे. अशा लाटा साधारणपणे मे आणि जूनमध्ये येतात. या वर्षीची मार्चमध्ये आलेली ही लाट जूनपर्यंत, म्हणजे जास्त काळ टिकण्याचीही शक्यता आहे.

या वर्षी भारतात सरासरी सर्वाधिक तापमानाची नोंद 35.300 से. झाली, जी 2010 (35.40 से.) आणि 2016 (35.320 से.)च्या तुलनेत थोडीशीच कमी आहे. 1981 ते 2010 या कालावधीतील 33.90 से. या सर्वाधिक नोंदीपेक्षा ती दीड अंशांनी जास्त आहे. या वर्षी मार्चमध्ये सरासरी, सरासरी कमाल आणि सरासरी किमान तापमानात 1.610, 1.860 व 1.370 से.नी वाढ झालेली आढळून येते. तापमानातील ही वाढ प्रामुख्याने वायव्य भारतात दिसून आली.
 
या वर्षी 10 मे 2022 रोजी विदर्भातील अकोला इथे 45.80 से. इतकी जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली, जी इथल्या नेहमीच्या सर्वोच्च तापमानापेक्षा 2.60नी जास्त आहे. याच दिवशीचं मुंबईचं तापमान 1.80नी व रत्नागिरीचं 2.20नी जास्त होतं. 2019मध्ये महाराष्ट्रात सगळीकडे उष्णतेत अशीच वाढ झाल्याचं अनेकांना आठवत असेल. जाणवणारी उष्णता आणि हवेतील उच्च आर्द्रता यामुळे आग ओकणार्‍या सूर्याची दाहकता कमी झाल्याचं कुठेही जाणवत नव्हतं.

hit

खरं म्हणजे आपल्याला ह्या सदैव वाढत्या उष्णतेची जाणीव गेल्या काही वर्षांपासूनच होऊ लागली आहे, पण तरीही या वर्षी हा प्रकोप जास्तच तीव्र झालाय. जागतिक तापमान वाढ आणि स्थानिक पातळीवर निसर्गात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप आणि त्यामुळे ढासळू लागलेलं वातावरणाचं संतुलन या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षांतले उन्हाळे याहीपेक्षा अधिक उष्ण होऊ शकतात, असं हवामान शास्त्रज्ञांचं भाकीत आहे!
 
 
उष्णतेच्या लाटेचा थोडा इतिहास बघितला, तर या भाकितातील सत्यता लक्षात येते. गेल्या काही वर्षांपासून सगळा भारत देश मार्च-एप्रिल महिन्यांत होणार्‍या उष्णतेच्या लाटांचा अनुभव घेतो आहे. अगदी अलीकडच्या काळातली, म्हणजे वर्ष 1995मधली उष्णतेची लाट अशीच तीव्र होती, ज्यात हजार दीड हजार माणसं उष्माघाताचे बळी ठरले होते. त्याहीआधी सन 1979मध्ये आलेली लाट आणि नंतरच्या काळातल्या 2011, 2012, 2013 आणि 2015 व 2019मधल्या लाटा आजही अनेकांच्या स्मरणात असतील. वर्ष 1900पासूनच जगभरात या लाटेने अनेक वेळा अक्षरशः हैदोस घातलाय. विसाव्या आणि एकविसाव्या शतकांत या लाटेची तीव्रता वाढण्याचे संकेत तेव्हापासूनच मिळत होते. भारतातली सन 2015मधली लाट अनेक अर्थांनी विध्वंसक होती. त्या वेळी मे महिन्यातलं दिवसाचं उच्चतम तापमान देशात अनेक ठिकाणी 450 ते 470च्या आसपास होतं, जे सामान्य तापमानापेक्षा 30 ते 70नी जास्त होतं! त्या वर्षी दिल्लीचं एप्रिल-मेचं तापमान 45.50 से., अलाहाबादचं 47.80, हैदराबादचं 460, तर तेलंगणातील खम्माम या शहरातलं तापमान 480 सेल्शिअस इतकं नोंदवलं गेलं होतं! आंध्र प्रदेशात आणि तेलंगणात, तसंच पश्चिम बंगालमध्ये आणि ओडिशात या लाटेचा मोठाच परिणाम जाणवला होता. या वर्षी त्याहीपेक्षा अधिक तीव्रतेच्या उष्णतेच्या लाटेत देशाचा मोठा भाग अक्षरशः होरपळून निघतो आहे.

उष्णतेची ही लाट नेमकी कशामुळे आणि कशी तयार होते हे पाहिलं, तर त्यावर नियंत्रण ठेवणं का कठीण जातं तेही कळून येतं. भारतीय हवामान विभागानुसार, मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचं तापमान जेव्हां 40 अंश से. इतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त, समुद्रकिनार्‍यावरील ठिकाणी 37 अंश से. इतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातील ठिकाणी 30 अंश से. इतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त होतं आणि तापमानात सरासरी तापमानापेक्षा 4.50 ते 6.40 सेल्शिअसनी वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. तापमानाने 460 से. ही मर्यादा ओलांडली की उष्णतेची अतितीव्र लाट निर्माण झाली असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात जिथे जिथे 400पेक्षा जास्त तापमान नोंदलं गेलं, तिथे ही आपत्ती खर्‍या अर्थानं जाणवली. त्यामुळेच अशा ठिकाणी सुरुवातीला ’ऑरेंज अ‍ॅलर्ट’ आणि नंतर ’रेड अ‍ॅलर्ट’ अशी धोक्याची सूचना हवामान विभागाकडून देण्यात आली.

उष्णतेच्या लाटेचा विचार करताना केवळ हवेचं वाढलेलं तापमान बघून भागात नाही. वाढलेल्या तापमानामुळे जाणवणारी परिसरातील उच्चतम उष्णता (Heat) व आर्द्रता हीसुद्धा लक्षात घ्यावी लागते. दिवसाचं जास्तीत जास्त तापमान आणि रात्रीचं कमीत कमी तापमान हे एखाद्या ठिकाणी नोंद होणार्‍या विशिष्ट उच्चतम तापमानापेक्षा (Threshold) किती वाढतं, यावरून तिथे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे की नाही ते ठरवलं जातं आणि या विशिष्ट मर्यादेच्या वर किती काळ हे तापमान त्याच स्थितीत आहे, त्यावरून लाटेच्या तीव्रतेची पातळी ठरवली जाते.
 
 
उच्च वातावरणातील वायुभाराच्या काही विशिष्ट परिस्थितीत या लाटा तयार होतात. वातावरणात 3000 ते 7600 मीटर उंचीवरच्या हवेतील वायुभार जेव्हा खूप वाढतो आणि एखाद्या भौगोलिक प्रदेशावर अनेक दिवस किंवा आठवडे तसाच टिकून राहतो, तेव्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची परिस्थिती तयार होते. उंचावरील जेट स्ट्रीम्समुळेही जास्त वायुभार प्रदेश निर्माण होत असतात. या वाढलेल्या उच्च वायुभारामुळे त्या प्रदेशावरील हवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली बसू लागते (Subsides or sinks) आणि ज्यात उष्णतेचं संक्रमण (Heat transfer) होत नाही, अशा आंतरिक प्रक्रियेमुळे (Adiabetic processमुळे) हवेच्या खालच्या थरांचं तापमानही वाढतं व हवा कोरडी होते. खाली येणारी उष्ण, उच्च दाबाची हवा, तापमानाचं उच्चस्तरीय व्यस्तन (High level inversion) घडवून आणते व वातावरणात पृष्ठभागाभोवती उष्ण हवेचं घुमटाकृती (Domal) आवरण तयार होतं. यामुळे हवेतील अभिसरण (Convection) कमी होतं आणि जास्त आर्द्रतेची उष्ण हवा खालच्या थरात अडकून बसते. घुमटाच्या बाह्य परिघावर (Peripheryवर) मात्र अभिसरण चालू असतं व हवेचा भारही कमी होतो. ह्या परिघीय अभिसरणामुळे वादळांच्या किंवा आवर्तांच्या अतिउंचीवरील बहिर्वाह (Outflow) प्रदेशातील हवा घुमटाकृतीत प्रवेश करते आणि उष्णतेत आणखीनच वाढ होते व उष्णतेची लाट जाणवू लागते. घुमटाकृतीतील उच्च दाबाची हवा ढगांना आत प्रवेश करू देत नाही. वार्‍याचं वहन थांबतं आणि सूर्यप्रकाश जास्त प्रखर जाणवतो.
 
 
भारतात मॉन्सूनपूर्व काळात अशी हवामान परिस्थिती नेहमीच तयार होते. मॉन्सूनपूर्व काळात भारतात जो पाऊस पडतो, तो कमी झाला किंवा झालाच नाही, तर हवेची आर्द्रता झपाट्याने कमी होऊन हवा कोरडी होते आणि उष्णतावृद्धी होते. मॉन्सूनपूर्व पाऊस एकाएकी संपून जाण्याच्या गेल्या काही वर्षांच्या वृत्तीचाही उष्णतेच्या लाटा व त्यांची तीव्रता वाढण्यात हातभार लागला असल्याचं एक निरीक्षण आहेच.
 
 
मार्च ते एप्रिल अखेरपर्यंतच्या काळात भारतात पडणार्‍या मॉन्सूनपूर्व पावसात 27 टक्क्यांनी घट होत असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. देशात मॉन्सूनपूर्व पावसाची सरासरी 59.6 मि.मी. आहे.

hit
 शास्त्रज्ञांच्या मते एल निनो आणि ‘लू’ नावाचे पाकिस्तान व वायव्य भारताकडून वाहणारे वारे यामुळेही उष्णतेच्या लाटेत वाढ होत असावी.


काही हवामान शास्त्रज्ञांच्या मते एल निनो आणि ’लू’ नावाचे पाकिस्तान व वायव्य भारताकडून वाहणारे वारे यामुळेही उष्णतेच्या लाटेत वाढ होत असावी. उष्णतेच्या लाटेतील हवेचं तापमान 400 से.पेक्षा जास्त असतंच, शिवाय हवेची आर्द्रताही 60 टक्क्यांपेक्षा जास्त असते. किनारी हवामानाच्या प्रदेशात तर आर्द्रता 70 ते 75 टक्केही असते. या लाटांचा प्रादुर्भाव असलेल्या भागांत उष्माघाताचे बळी तर होतातच, शिवाय शेतीचं मोठं नुकसान होतं, जंगलांत आगी लागतात, रस्त्यांवरील डांबर वितळणं, रेल्वे मार्गावरील रूळ तडकणं, फिश प्लेट्सचं प्रसरण होणं अशाही घटना घडतात.
 
 
प्रत्येक देशाचं दैनंदिन उच्चतम तापमान त्याच्या अक्षवृत्तीय स्थानावर अवलंबून असल्यामुळे निरनिराळ्या देशांनी उष्णतेच्या लाटेचे त्यांचे त्यांचे निर्देशांक ठरवले आहेत. नेदरलँड्स, बेल्जियम, लुक्सझेनबर्ग इथे सलग पाच दिवसाचं तापमान 250 से.पेक्षा जास्त व त्यापैकी निदान तीन दिवसाचं तापमान 300 से.पेक्षा जास्त असलं, तर उष्णतेची लाट असल्याचं मानलं जातं. डेन्मार्कमध्ये देशाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भागात सलग तीन दिवस तापमान 280पेक्षा जास्त असेल तर, स्वीडनमध्ये सलग पाच दिवस 250पेक्षा जास्त, अमेरिकेत सलग दोन ते तीन दिवस 320पेक्षा जास्त, ऑस्ट्रेलियात सलग पाच दिवस 350पेक्षा जास्त किंवा सलग तीन दिवस 400पेक्षा जास्त तापमान असणं यासाठी गरजेचं मानलं जात.
 
 
भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवण्याची काही निश्चित कारणं आहेत. वेगाने कमी होणारी झाडांची संख्या, काँक्रिटीकरणाचं वाढतं प्रमाण, शहरात तयार होणारी उष्णतेची बेटं (Heat islands), अतिनील किरणाचं वाढतं प्रमाण ही त्यातली काही महत्त्वाची कारणं. या संकटाचा सामना करण्यासाठी दर वर्षी उन्हाळ्यात निश्चित नियोजन करण्याची नितांत गरज आहे. शहरांतील आणि ग्रामीण भागातील उन्हाळ्यातील तापमानाच्या गेल्या काही वर्षांतील नोंदी एकत्र करून त्यावर आधारित असे उष्णतेच्या लाटेचे अंदाज फायदेशीर ठरू शकतात. त्यानुसार नागरिकांचं स्वास्थ्य, पाण्याच्या आणि ऊर्जासाधनांच्या सोई यासारख्या गोष्टींचं प्राधान्याने नियोजन करता येतं. मोकळ्या हवेत काम करणार्‍या आणि वाढत्या उन्हामुळे लगेच बाधित होणार्‍या लोकांसाठी त्वरित मदत मिळण्याच्या योजना तयार करणं व उष्णतेची लाट असलेल्या काळात अशा सगळ्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी राबवणं या गोष्टींची भारतासारख्या देशाला भविष्यात मोठी गरज भासू शकते, हे नक्की.
 
 
उष्णतेच्या लाटेमुळे परिणाम खूप वेगवेगळ्या प्रकारचे असल्याचं जगभरातील अभ्यासातून दिसून येतं. आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा विभिन्न पातळ्यांवर या लाटेची धग सर्वदूर परिणाम करीत असते. लाटेच्या काळातील अतिउष्णतेमुळे मानसिक ताणतणाव वाढत असल्याचं निरीक्षण अनेकांनी नोंदवल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे माणसाची क्रयशक्ती (Performance) कमी होते. अनेक वेळा गुन्हेगारी वृत्तीतही वाढ होते. सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर व्यक्तीव्यक्तींतील संघर्ष आणि कलह वाढतो. वाढलेल्या तापमानाचा देशाच्या आर्थिक उलाढालींवर होणारा परिणाम उत्पादनक्षमतेच्या घसरणीत दिसून येतो. 400 से.पेक्षा जास्त तापमानात एक अंशाने वाढ झाली, तर दर दिवसाची आर्थिक उत्पादनक्षमता दोन टक्क्यांनी कमी होते, असंही एक गणित मांडण्यात आलेलं आहे. उष्णतेची लाट असलेल्या काळात वीजनिर्मितीत वाढ करावी लागत असल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होऊन त्याचाही परिणाम उद्योगधंद्यावर होतोच.
 
 
या सर्वांबरोबरच परिसर - पर्यावरण - परिस्थितिकी यावरही या लाटेचे मोठेच परिणाम होताना दिसतात. एखाद्या प्रदेशात या लाटेचा प्रादुर्भाव पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला, तर प्राणी-पक्षी-वनस्पती-पृष्ठजल-भूजल वेगाने बाधित होऊ लागतात. पर्यावरणाचं संतुलन ढासळू लागतं. शेतीप्रधान देशातील शेती व्यवसायावर लाटेचा दूरगामी परिणाम होण्याची चिन्हं दिसू लागतात.
 
निसर्गाच्या या प्रकोपापासून सगळ्यांचं रक्षण कसं करता येईल हे पाहणंच केवळ आपल्या हातात आहे. या वर्षीचं देशातील उच्चांकी तापमान पाहता सगळ्या उपलब्ध यंत्रणा सक्षमपणे राबवून उष्णतेच्या लाटेची आणि परिणामांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न आता प्राधान्याने करणं आवश्यक झालं आहे, यात शंका नाही.