ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात

विवेक मराठी    18-May-2022
Total Views |
 @अभय पालवणकर
 अधिवेशन म्हटले की ठराव आले आणि हे ठराव करताना त्यात एक द्रष्टेपणा असावा लागतो, सर्वंकष आकलन असावे लागते. पण ठराव पारित करताना असे आकलन दिसून आले नाही, यावरून ते ठराव काय असतील हे लक्षात येते. काँग्रेसला घराणेशाहीची कीड लागलेली आहे आणि ती नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती नष्ट होण्याची शक्यता कमी वाटते. कारण हिचा उगमच शीर्षस्थ नेतृत्वातून होत आहे.
 
congress
 
राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन नुकतेच पार पडले. भोंग्यांचे आवाज आणि हिंदुत्व हुंकार यामुळे मराठी माध्यमांत काँग्रेसच्या अधिवेशनाची फारशी दखल घेतल्याचे दिसून आले नाही. नेहमीप्रमाणे हे अधिवेशन म्हणजे काही फुटकळ व हास्यास्पद ठरावांमुळे चर्चेत आले आहे. त्यात महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला तेथे स्थान नव्हते, ही एक उल्लेखनीय बाब होती. देशातील काही मोजक्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर आहे, त्यापैकी महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर आहे. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने कोणतेही लक्ष न देताही येथील काँग्रेस जिवंत आहे, तरीसुद्धा येथील एकाही नेत्याला तेथे निमंत्रण मिळाले नाही, हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचे दुदैव म्हणावे लागेल. अधिवेशन म्हटले की ठराव आले आणि हे ठराव करताना त्यात एक द्रष्टेपणा असावा लागतो, सर्वंकष आकलन असावे लागते. पण ठराव पारित करताना असे आकलन दिसून आले नाही, यावरून ते ठराव काय असतील हे लक्षात येते. काँग्रेसला घराणेशाहीची कीड लागलेली आहे आणि ती नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती नष्ट होण्याची शक्यता कमी वाटते. कारण हिचा उगमच शीर्षस्थ नेतृत्वातून होत आहे. त्यामुळे पक्षासाठी किती चांगले ठराव पारित केले, तरी काँग्रेसची अवस्था सुधारण्याची शक्यता धुसर वाटत आहे. हे ठराव नेमके काय झाले झाले, हे पाहू या.
 
पक्षातील घराणेशाही संपवण्यासाठी काँग्रेसने एक व्यक्ती एक पद, एक कुटुंब एक तिकीट असा ठराव उदयपूर अधिवेशनात पक्षाने सहमत केला आहे. वरकरणी पाहता हा ठराव खूप चांगला आहे. कारण काँग्रेस पक्षाची हानी कुणी केली असेल तर ती घराणेशाहीने, त्यामुळे तिचा जर समूळ नाश केला नाही, तर एक दिवस काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे दिसते. जरा विचार केला तर काँग्रेसला ही उपरती आता का झाली आहे? कारण सोनिया गांधी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी पद घेण्यास पात्र झाले. दुसरे, ते तिकीटही घेण्यास पात्र झाले. आता प्रियंका गांधी आपण बोलत असलो तरी त्या वड्रा झाल्या असल्यामुळे त्याही उद्या कोणतेही पद घेऊ शकतात. पण असा युक्तिवाद तळागाळातील कार्यकर्तेसुद्धा करणार आणि तिकिटे आपल्या मुलांना, सुनेला, मुलींना, भाच्यांना - म्हणजेच पदे आपल्या परिवारात राहतील याचा विचार करतील, असे दिसते. याअगोदर राहुल गांधींनी युवक काँग्रेसची पदे पक्षातंर्गत निवडणुका घेऊन दिल्या जातील असे जाहीर केले. त्यानुसार निवडणुका झाल्या, पण निवडणुकीत कोण निवडून आले? तर काँग्रेसच्या नेत्यांचे नातेवाईक... त्यामुळे त्या वेळी कार्यकर्त्यांनी हा प्रयोग कसा अयशस्वी केला, याचे हे ज्वलंत उदाहरण होते. त्यामुळे हा ठरावही कार्यकर्ते फोल ठरवणार की कागदावरच राहणार येणाऱ्या काळात समजेल... खरे तर बदल करायचा असेल तर सर्वप्रथम काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसच्या जी-२३ या समितीचे म्हणणे विचारात घेतले पाहिजे. नाहीतर पुन्हा ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असे सुरू राहणार!
 

congress
दुसरा एक ठराव आहे - राहुल गांधी कार्यकर्त्यांना घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी अशी यात्रा काढणार आहेत. राहुल गांधी खरेच अशी यात्रा काढणार असतील तर त्यांचे अभिदनंदनच केले पाहिजे. कारण एरवी थायलंड, अमेरिका, इटली इकडे फिरणारे राहुलजी स्वदेशात भ्रमंती करणार आहेत... भलेही हे अगतिकतेतून असले किंवा उशिरा सुचलेले शाहणपण असले, तरी चांगलेच म्हणावे लागेल. कारण पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी अशा यात्रांची गरज असते. पण ती यात्रा किती नियोजनबद्ध होते, यावर तिचे सर्व फलित अवलंबून असते. जर ते फक्त रोडशो झाले, तर प्रचार रॅली होईल. पण आडवाणींच्या रथयात्रेसारखी किंवा गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेसारखी झाली, तर त्यातून नक्कीच पक्षाला चांगले दिवस येतील. पण राहुल गांधी यांच्या आजवरच्या सभा, भाषणे यांचा इतिहास पाहता त्यांच्या कृतीतून पक्षावरच अरिष्ट ओढवते. त्यामुळे ही यात्रा ते नीट पार पाडतील का? याबद्दलही शंका उपस्थित होते.
काँग्रेस आयटी सेल मजबूत करणार आहे असा ठराव सहमत झाला आहे. आजच्या डिजिटल युगात हे गरजेचे आहे. पण देशात संगणक क्रांती राजीव गांधींमुळे झाली असे काँग्रेस अभिमानाने सांगते आणि त्याच पक्षाला आपले आयटी सेल सक्षमीकरण करण्याचे २०२२ साली सुचते, हे तर पक्षाचे दुर्दैव आहे. भाजपाने आयटी सेल २०१३पासूनच मजबूत केले होते आणि २०१४ साली देशात सत्ता आल्यानंतर डिजिटल क्रांतीच केली. आधुनिक काळानुरूप आपल्या प्रचारतंत्रातही डिजिटल बदल केल्याने भाजपा देशात नंबर एकचा पक्ष झाला आहे.
 
आज देशात काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व वाढत आहे. राज्यातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसची जागा घेत आहेत. मात्र काँग्रेस अजूनही आपण नंबर दोनचे पक्ष आहोत याच भ्रमात आहे. भारत फक्त दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत, एक भाजपा आणि दुसरे आम्ही असेच वाटते. भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसला वगळून मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात आज ममता बनर्जी व अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या छोट्या – मोठ्या बातम्यांची दखल देशभरातील माध्यमे घेतात. पण काँगेसच्या पक्षाच्या बातम्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. यावरूनच देशातील पक्षाची स्थिती काय आहे, हे दिसून येते. त्यामुळे काँग्रेसची झालेली ही गलितगात्र अवस्था सुधारण्यासाठी आणखी पन्नास अधिवेशने घेऊन जरी चांगले ठराव सहमत केले, तरी पक्षाची अवस्था सुधारण्याची शक्यता कमी वाटत आहे, असे आजघडीला दिसून येत आहे.