सांस्कृतिक राष्ट्रवाद टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य : डॉ. शांतिश्री पंडित

विवेक मराठी    21-May-2022
Total Views |
पुणे, दि. 21: “सांस्कृतिक राष्ट्रवाद भारताचा मूळ पाया असून आधुनिक काळात तो टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी केले.
 
“आपल्या भारतीय विचारधारेमध्ये स्त्रीवाद आहे. पुराणकाळातील द्रौपदी, सीता याचे उत्तम उदाहरण आहेत. आपला धर्म ही लोकशाहीच आहे. भारत एक सांस्कृतिक राज्य आहे. ते आता औद्योगिक क्रांतीमध्येही सामील झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि नागरी राष्ट्रवाद यामध्ये भरपूर विचार आणि वाद सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
Dr. Shantishree Pandit
 
‘एकता’ मासिकाच्यावतीने नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते शांतिश्री पंडित यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. शांतिश्री पंडित, अ‍ॅड. एस. के. जैन, ’एकता’ मासिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, ‘एकता’चे संपादक मनोहर कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘एकता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल दामले व त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. पुण्यातील ’एकता’ मासिकाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदाचे वर्ष हे ’एकता’ मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
 
“माझी ज्या विद्यापीठात नेमणूक झाली तेथे एक विचारधारा रुजलेली आहे, ती आधी नष्ट करावी लागेल.” या विद्यापीठाने एकाच परिवाराचा इतिहास तयार केल्याचे सांगताना डॉ. पंडित यांनी लोकमान्य टिळक, गोखले,सावरकर यांच्या सारख्या महापुरुषांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली.
 
सरिता माळी या मुंबईतील फूलविक्री करणार्‍या तरुणीचा प्रेरणादायी प्रवासदेखील त्यांनी सांगितला.

Dr. Shantishree Pandit 
भाषांचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी
“आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘डिजिटल’ काळात भाषा लोप पावत असून भाषांचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.
 
डॉ. पंडित यांच्याविषयी बोलताना डॉ. मुळे यांनी त्यांची विद्वत्ता आणि अनुभव हा पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगून त्यांनी आपल्या नव्या प्रवासात देश घडवण्याचे स्वप्न तरुणांना द्यावे आणि निसर्गाचे नुकसान न होऊ देता तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानदानात करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
तत्पूर्वी ’एकता’च्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळ, पुणेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी अ‍ॅड. एस. के. जैन म्हणाले की, “तत्त्वाशी तडजोड न करताही तुम्ही मोठे होऊ शकता याचे डॉ. शांतिश्री पंडित या उत्तम उदाहरण आहेत. कुटुंब, गाव, शहर, राष्ट्र याचा विचार करणारे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. या साठी उत्तम साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजेत. पत्रकारितेचा उपयोग समाजनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. चांगले साहित्य वाचले तर विचार चांगले होतात, योग्य मार्गदर्शन करतात. ‘एकता’ हे मासिक समाजात, राष्ट्रात एकता घडवेल,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
 
प्रास्ताविक अमोल दामले यांनी केले. डॉ. मुळे आणि डॉ. पंडित यांचा परिचय निमेश वहाळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन रुपाली भुसारी यांनी केले, तर आभार मनोहर कुलकर्णी यांनी मानले.
 
माधवी पोतदार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. ‘एकता’चे अनेक वाचक, हितचिंतक, संघ व विचार परिवारातील कार्यकर्ते बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
 

Dr. Shantishree Pandit