उत्तर प्रदेशचा सर्वांगीण विकास योगींच्या समर्थ नेतृत्वाचे फलित

विवेक मराठी    21-May-2022
Total Views |
@सागर शिंदे  8055906039
 
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक निकालांचा अभ्यास करण्यासाठी साप्ताहिक विवेकची तीन जणांची टीम 15 दिवस उत्तर प्रदेश राज्यात अभ्यासदौरा करून आली. या दौर्‍यात राज्याचे राजकारण, समाजकारण, भाजपाच्या विजयाची व अन्य पक्षांच्या पराजयाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे काही निरीक्षणे व विश्लेषण प्रस्तुत लेखात मांडले आहेत.
 
yogi
महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेले असताना तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र हजारो भोंगे शांततेत खाली उतरवले. मशिदींच्या व मंदिरांच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला प्रतिसाद देत स्वत:होऊन भोंगे उतरवले आणि भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आणली. आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील नेते अयोध्येला जाण्याच्या तारखा, पोस्टर्स जाहीर करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मात्र हिंदुत्ववादी असणे काय असते, हे त्यांच्या व्यवहारातून, निर्णयांतून सिद्ध केले आहे. रामजन्मभूमी अयोध्येच्या दीर्घ संघर्षानंतर आज भव्य मंदिरनिर्माणाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची निर्मिती केली गेली. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात असलेल्या तथाकथित वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीचा वाद न्यायालयात सुरू आहे. न्यायालयीन आदेशाने मशिदीचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणामध्ये विहिरीत शिवलिंग आढळून आले आहे. सुस्पष्ट पुराव्यांच्या आधारे ही जागा मंदिराच्या ताब्यात येईल, यात शंका नाही. मशिदीच्या सर्वेक्षणाला काही प्रमाणात मुस्लिमांकडून विरोध झाला असला, तरी सर्वेक्षण पूर्ण झाले. कुठेही तणावाची, हिंसेची घटना घडली नाही. क्षुल्लक कारणांवरून धार्मिक दंगे होणार्‍या उत्तर प्रदेशात आता मात्र दंगे थांबलेले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेले आहेत. चार दशकानंतर राज्यात सत्तेतील सरकार सलग दुसर्‍यांदा स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेत आले आहे. हा बदल कसा घडला असेल?
 
मोदी-योगींचे नेतृत्व, विकासाचे यशस्वी धोरण आणि प्रभावी अंमलबजावणी, योजनांच्या लाभांनी मोठ्या संख्येत निर्माण झालेला लाभार्थी वर्ग, संघटित गुन्हेगारीला घातलेला आळा आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेली सुरक्षिततेची व विश्वासाची भावना, हिंदुत्व, मजबूत व सर्वव्यापी पक्ष संघटना आणि कार्यक्षम निवडणूक यंत्रणा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपाचा विजय, असे म्हणता येईल.

भारतीय राजकारणात उ.प्र. राज्याचे अनन्यसाधारण महत्त्व व भूमिका राहिलेली आहे. 25 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या या राज्यात राहते. विधानसभेची सदस्यसंख्या 403, तर लोकसभेसाठी 80 खासदार या राज्यातून निवडून जातात. हिंदूंची धार्मिक, सांस्कृतिक तीर्थक्षेत्रे या राज्यात आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात धर्माचे व जातीचे राजकारण आक्रमक राहिलेले आहे. परंतु या निवडणुकीत मात्र उत्तर प्रदेशच्या जनतेने स्पष्ट बहुमताने भाजपाला पुन्हा संधी दिली. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हे ऐतिहासिक परिवर्तन म्हणावे लागेल. हे परिवर्तन नेमके कसे झाले? इतका मोठा जनाधार भाजपाच्या मागे उभा राहिला, यातून उत्तर प्रदेशमधील जनता काय सुचवू इच्छिते? भाजपाच्या विरोधात मुस्लिमांचे अतिधार्मिक ध्रुवीकरण झाले, पण तरीही भाजपाला सत्तेत येण्यापासून ते रोखू शकले नाही.
 
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक निकालांचा अभ्यास करण्यासाठी साप्ताहिक विवेकची तीन जणांची टीम 15 दिवस उत्तर प्रदेश राज्यात अभ्यासदौरा करून आली. या दौर्‍यात सामान्य नागरिकांपासून, पत्रकार, राजकीय विश्लेषक, लेखक, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते, राज्य सरकारमधील मंत्री अशा अनेकांच्या भेटी घेऊन संवाद साधला व राज्याचे राजकारण, समाजकारण, भाजपाच्या विजयाची व अन्य पक्षांच्या पराजयाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे काही निरीक्षणे व विश्लेषण प्रस्तुत लेखात मांडले आहेत.


yogi
भाजपाच्या विजयाबद्दल लोक काय बोलले...
 
आम्ही प्रयागराज शहरापासून अभ्यासदौर्‍याला सुरुवात केली. गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आम्ही तेथील तरुण नावाडी राजकुमार निषादशी निवडणूक निकालांविषयी संवाद साधला. तो म्हणाला, “अच्छी सरकार है, अच्छा हुआ आ गये, बिकास हो रहा है। रोड बन रहा है, गरीबोको रेशन मिल रहा है।”

मोफत रेशन वितरण - आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो, त्यात रेशनचा मुद्दा समान होता. कोरोनासारख्या महाआरोग्यसंकटात लोकांचे रोजगार गेले, पोटापाण्यासाठी राज्याच्या बाहेर गेलेले लोक घरी परतले होते, हाताला काम नाही अशा भयंकर परिस्थितीत केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबाला महिन्यातून दोनदा मोफत रेशन दिले. ही योजना आजही उत्तर प्रदेशात आणखी काही महिन्यांसाठी सुरू आहे. राज्यातील इतक्या मोठ्या लोकसंख्येला कोणताही भेदभाव न करता व भ्रष्टाचार न करता घरा-घरापर्यंत रेशन पुरवणे एक अभूतपूर्व सेवाच म्हणता येईल. कोरोनाने देशभरात लाखो बळी घेतले, पण भुकेने कोणी मरू नये याची काळजी केंद्र व राज्य सरकारांनी घेतली. उत्तर प्रदेशातील विविध समाजघटकांतील लाभार्थी गरीब जनतेने कोणताही गाजावाजा न करता संयमाने व शांततेने भाजपाला मतदान केल्याचे जाणवले. भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यात ज्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, त्यात मोफत रेशन वितरण हे सर्वात प्रभावी ठरल्याचे लोकांच्या बोलण्यातून जाणवले.

संघटित गुन्हेगारीवर बुलडोझर चालवून कायदा-सुव्यवस्थेत मोठी सुधारणा - येथील नागरिकांनी, अभ्यासकांनी व विशेष म्हणजे आम्ही लखनौ काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनासुद्धा भेटलो तर त्यांनीही राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या धोरणाची स्तुती केली. उत्तर प्रदेशात संघटित गुन्हेगारीचा, लुबाडणुकीचा, अत्याचारांचा सुळसुळाट होता. सामान्य जनतेसाठी - विशेषत: महिलांसाठी असुरक्षित वातावरण होते. उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीवर आपण अनेक चित्रपट तसेच वेबसिरीजही पहिल्या असतील. गोरखपूरमध्ये लोक सांगत होते की, “इतके पोसलेले गुंड या भागात होते. दिवसाढवळ्या खून, लोकांच्या जमिनी लाटणे, बलात्कारासारख्या घटना घडत असत. पण मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींनी अतिशय कठोर पावले उचलत या गुंडांवर कारवाई केली. अनेक कुख्यात गुंडांचे एन्काउंटर झाले. सरकार फक्त अटकेची कारवाई करून थांबले नाही, तर या गुंडांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवला. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले. आणि हे सर्व करताना जाती-धर्माचा भेदभाव केला नाही. हे धोरण राज्यातील सामान्य जनतेला भावले आणि सरकार बदल आणू शकते हा विश्वास दृढ झाला. जनतेच्या भावना होत्या की, आमच्या आया-बहिणींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याच्या बर्‍याच भागांमध्ये मोठे उद्योजक गुंतवणूक करण्यास घाबरायचे आणि विकास व रोजगार यावर त्याचा परिणाम व्हायचा, असेही लोक बोलले. कायदा-सुव्यवस्था ठीकठाक केल्याने सामान्य जनता आश्वस्त झाली आणि जनतेने योगींना पुन्हा संधी दिली, असे म्हणता येईल. मुख्यमंत्री योगींची कणखर प्रतिमा निर्माण झाली. निवडणूक काळात योगी ‘बुलडोझर बाबा’ म्हणून प्रसिद्ध झाले.


yogi
बदलते राजकारण - लखनौमध्ये आम्ही वरिष्ठ पत्रकार रतन मणिलालजी यांना भेटलो, उत्तर प्रदेशच्या राजकारणाची उत्तम जाण असलेल्या रतनजींनी अभ्यासू विश्लेषण मांडले. उत्तर प्रदेशचे राजकारण मागील चार दशके अस्थिर राहिलेले आहे. अनेकदा दोन दोन वर्षांत सरकार बदलले, 1985 ते 2007 दरम्यान कोणत्याही सरकारने पाच वर्षे कार्यकाल पूर्ण केला नाही आणि कोणतेही सरकार बहुमताचे नव्हते. आघाडी करूनच सरकार बनत असे. या दरम्यान तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागली गेली, मंडल-कमंडलचे राजकारण, त्यानंतर 2007ला राज्याच्या जनतेने खूप वर्षांनंतर स्पष्ट बहुमताचे सरकार दिले, जनतेने बसपाच्या मायावती यांना संधी दिली. नंतर 2012ला बसपाला धक्का देत जनतेने सपाच्या अखिलेश यादव यांना स्पष्ट बहुमत देऊन सत्तेत बसवले. 2017ला जनतेने बसपाला, सपाला नाकारून भाजपाला स्पष्ट कल दिला आणि आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री झाले. म्हणजे उत्तर प्रदेशच्या जनतेने विविध पक्षांना संधी देऊन पहिली, मात्र पुन्हा त्याच पक्षाला संधी दिली नाही. 2022ला मात्र जनतेने भाजपाला सलग दुसर्‍यांदा स्पष्ट बहुमत दिले, हे फार महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा निघतो की भाजपाने चांगले काम केले, जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आणि म्हणून जनतेने पुन्हा संधी दिली.


मोदी-योगींचे नेतृत्व - उत्तर प्रदेशमध्ये अन्य पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाकडे लोकप्रिय, प्रभावी चेहरे आहेत. सपा, बसपा तर तसेही प्रादेशिकच पक्ष आहेत. भाजपाकडे नेत्यांची फळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासक, संवादी नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला. ‘डबल इंजीन की सरकार’ला लोकांनी पसंती दाखवली. 200हून अधिक भाजपा उमेदवारांकरिता मोदींनी 32 प्रचारसभा घेतल्या, त्यापैकी 80 टक्क्यांहून अधिक जागांवर यश मिळाले. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. “न मुझे किसी ने बुलाया है, न मै यहा आया हूँ, मुझे तो माँ गंगा ने बुलाया है” असे म्हणत मोदींनी उत्तर प्रदेशातील जनतेला भावनिक साद घातली. वाराणसी शहराचा अभूतपूर्व विकास करत, काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची भव्य निर्मिती केली. जनतेला केंद्राच्या अनेक योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला. जनतेने विकास पाहिला व अनुभवलासुद्धा. 2014च्या अगोदर उत्तर प्रदेशच्या राजकारणात ‘जात’ घटक खूप जास्त प्रभावी असायचा. 2014नंतर जातीचे राजकारण कमी झाले. राष्ट्रवाद, हिंदुत्व, विकास हे मुद्दे प्रभावी झाले. नरेंद्र मोदींना व भाजपाला याचे श्रेय जाते.


yogi
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे नेतृत्व 2017च्या आगोदर गोरखपूर भागापुरते सीमित होते. 2017च्या पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्रिपदी योगींना बसवले गेले. 2017 ते 2022 या पाच वर्षांत या योगींनी स्वत:ला सिद्ध केले. प्रामाणिक, नि:स्पृह, कणखर, निष्कलंक आणि सक्षमपणे सरकार चालवले, केंद्राच्या मदतीने मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला, लोकहिताच्या अनेक योजना आणल्या व प्रभावी अंमलबजावणी केली. कोरोनाच्या आरोग्यसंकटात गतीने कार्य केले. कोट्यवधी कुटुंबांपर्यंत मोफत रेशन पोहोचवले. कणखर, निर्भय निर्णय घेऊन संघटित गुन्हेगारीला आळा घातला. योगींच्या काळात तुष्टीकरण बंद झाले. अगोदरच्या सरकारमध्ये काही विशिष्ट जातींचेसुद्धा तुष्टीकरण केले जात असे. एका गावात वीज तर दुसर्‍या गावात नाही असा भेदभाव केला जायचा. तसेच जातीय भेदभाव बंद झाला. सर्व घटकांना सन्मान दिला गेला. उत्तर प्रदेशच्या जनतेत योगीजी त्यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळे लोकप्रिय झाले आणि जनतेने त्यांना पुन्हा सेवा करण्याची संधी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपाचे चाणक्य समजले जातात. 2014, 2017, 2019 आणि 2022 या सर्वच निवडणुकांमध्ये अमित शाह यांचे नियोजन, कष्ट, मुत्सद्देगिरी व अनुभवी योगदान दुर्लक्षित करता येत नाही. मोदी-योगी व अमित शाह यांसारखे प्रचंड क्षमतेचे आश्वासक नेतृत्व भाजपाकडे असणे ही मोठी जमेची बाजू आहे. प्रयागराजमध्ये, वाराणसीमध्ये भाजपा कार्यकर्ते म्हणाले की, “आमच्या भागात लोकांनी स्थानिक उमेदवार पाहून मतदान नाही केले, तर पक्षाला आणि नेतृवाला मतदान दिले.”
 
हिंदू श्रद्धास्थानांचा विकास

रामजन्मभूमी अयोध्या - जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान आणि हिंदूंनी ज्यासाठी मोठा ऐतिहासिक संघर्ष केला असे पवित्र रामजन्मभूमी स्थळ अयोध्या. रथयात्रा, कारसेवा, कारसेवकांवर मुलायमसिंग सरकारने केलेला गोळीबार, नंतर सत्ताबदल, बाबरी ढाचा पाडला, त्यांनतरचा दीर्घ संघर्ष व राजकारण, न्यायालयात चाललेला खटला आणि सर्वोच्च न्यायालयाने रामलल्ला जन्मस्थळाचा निर्णय दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे भव्य मंदिर निर्माणाचे भूमिपूजन झाले. अखिल हिंदू समाजासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण होता.


yogi
भव्य काशी-दिव्य काशी - आम्ही दैनिक जागरणचे वाराणसीचे संपादक वसंत कुमार यांना भेटलो. वाराणसीच्या विकासाबद्दल ते म्हणाले की, “तुम्ही वाराणसीला याअगोदर आला असाल आणि आता पुन्हा आला असाल, तर जुनी वाराणसी आणि नवीन वाराणसी यामधील बदल तुम्हाला स्पष्ट दिसेल, इतका बदल विकासामुळे झाला आहे.” दशाश्वमेध घाटावर आम्हाला मांझी नावाचा नावाडी भेटला. तो म्हणाला, “बहुत बडा विकास हुआ है, गंगा स्वच्छ दिख रही है। पहले कम लोग आते थे, अभी बहुत ज्यादा भीड होती है।” हिंदू श्रद्धास्थानांवर, हिंदूंच्या मंदिरांवर मोगलांनी अनेकदा हल्ले केले, मंदिरे पडून मशिदी उभारल्या, हा काळा इतिहास आहे. अनेक हिंदू राजांनी या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. वाराणसीमध्ये पवित्र गंगा नदीच्या तिरावर असलेले काशी विश्वनाथाचे प्रसिद्ध मंदिर, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. जगभरातून हजारो हिंदू भाविक या ठिकाणी येतात. पण मंदिराला जाण्यासाठी अतिशय अरुंद रस्ता, पार्किंग व्यवस्था नाही, अस्वच्छता, गंगा घाट नीट नाही, प्रदूषित नदी अशी परिस्थिती होती. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडून आले आणि हळूहळू चित्र बदलायला लागले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प हाती घेण्यात आला आणि त्याचे लोकार्पणही झाले. गंगा नदी ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी प्रशस्त मार्ग तयार करण्यात आला. परिसरातील अनेक जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, जीर्णोद्धार केला गेला. यासाठी सुमारे 300पेक्षा अधिक घरे, दुकाने हटवण्यात आली. या मालमत्तांच्या मालकांचे पुनर्वसन करण्यात आले. एकही जण कोर्टात गेला नाही, हे विशेष म्हणता येईल. सुंदर कलाकुसर केलेले मोठे प्रवेशद्वार व एकूणच मंदिर परिसर. मोठे घाट, स्वच्छ गंगा, बोटिंग सुविधा. मंदिर परिसरात लाल दगडातील भिंती, परिसरात बसवण्यात आलेले पुतळे, यात्री सुविधा केंद्र, मोठे सभागृह.. एकूणच मंदिर परिसरात आणि संपूर्ण वाराणसी शहरातसुद्धा नियोजित विकास केलेला दिसला. संध्याकाळच्या गंगा आरतीला दररोज सुमारे 25000 भाविक उपस्थित असतात. काशी यात्रा करणार्‍या भाविकांना येथील भव्य-दिव्यतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या सर्व विकासकामांचा प्रभाव संपूर्ण देशात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील नागरिकसुद्धा या कामांबद्दल समाधानी दिसला. याचा परिणाम निवडणुकांमध्ये न दिसेल तर नवलच.


जातीय राजकारणाकडून विकासात्मक राष्ट्रवादाकडे वाटचाल

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आम्ही ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र यांना भेटलो. राज्यातील जातीय राजकारणावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. उत्तर प्रदेशमध्ये जातीय राजकारण जोरकसपणे चालत आलेले आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर (2014) जातीय राजकारणाला झटका बसला. मोदी हे व्यापक समाजघटक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात. भाजपा राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असल्याने जातीचे राजकारण करत नाही, तर राजकारणात जातींचा समतोल साधतो, असे निरीक्षण पत्रकार योगेश मिश्र यांनी सांगितले.


सपाचे जातीय समीकरण - सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांना जातीय आधार आहे. यादवांचा आणि मुस्लिमांचा पक्ष म्हणून सपाकडे पहिले जाते. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम मतदार साधारणत: 20% आहे व यादवांची संख्या 9% आहे. यादव-मुस्लीम एकत्र संख्या 29%पर्यंत जाते. काही स्थानिक कार्यकर्ते म्हणाले की, अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या मुलायमसिंग यादव तसेच त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी यादवांसाठी म्हणून अनेक कामे केली, अनेक तरुणांना नोकरीला लावले, राजकारणात झुकते माप दिले. सपा कार्यकर्ते समाजात अन्य छोट्या जातींवर वर्चस्व गाजवतात, जातीय भेदभाव करतात. मुलायमसिंग व अखिलेश यांनी यादवांसाठी खूप काही केले, म्हणून आजही यादव त्यांच्या मागे आहेत असे मत एक कार्यकर्त्याने व्यक्त केले. मुलायमसिंग यादवांनी अन्य मागासवर्ग जातींना सोबत घेतले. पाल, गडेरिया, विश्वकर्मा, प्रजापती या जातींचे लोक सपाचे मतदार राहिले. पण सपामध्ये योग्य संधी न मिळण्यामुळे व भाजपाच्या सर्वसमावेशक राजकारणामुळे हे बहुतांश लोक भाजपाचे मतदार झाले आहेत. सपा फक्त यादव आणि मुस्लिमांचा पक्ष राहिला आहे.


बसपाचे जातीय समीकरण - बहुजन समाज पक्षाची स्थापना कांशीराम यांनी केली. साधारणत: सवर्ण जाती वगळून अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्ग व मुस्लीम यांना बरोबर घेऊन राजकारण करण्याचे धोरण कांशीराम यांनी मांडले. नंतर मायावती यांनी सर्व जातींना बरोबर घेणारे सोशल इंजीनियरिंग केले आणि 2007 विधानसभा निवडणुकीमध्ये 403पैकी 206 जागा जिंकून त्या स्पष्ट बहुमतात सत्तेत आल्या. परंतु त्यांची कामगिरी फार चांगली राहिली नाही. बसपाला पुढे विधानसभेच्या 2012च्या निवडणुकीत 80, 2017मध्ये 19 आणि 2022मध्ये फक्त 01 जागा मिळाली. दलित (अनुसूचित जाती) जाती हा बसपाचा कोअर मताधार राहिलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या 21% आहे, ज्यामध्ये संख्येने जास्त असलेल्या जाटव जातीची लोकसंख्या 13% आहे. त्यानंतर पासी जात साधारणत: 5% आणि बाकी तीन टक्क्यांत सोनकर, धोबी, वाल्मिकी व अन्य जाती आहेत. याप्रमाणे बसपाची मताधार संख्या 21% आहे. पण बसपाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. फक्त जाटवांचा पक्ष म्हणून राहिला आहे. भाजपाच्या ‘सबका साथ, सबका विकास’च्या व्यापक राजकारणाने अन्य दलित जाती भाजपाकडे शिफ्ट झाल्या आहेत. गैरजाटव पासी, वाल्मिकी, सोनकर या जाती भाजपामध्ये स्थिर झाल्या, असे म्हणता येईल. या 2022च्या निवडणुकीत जाटव नेते व मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपाकडे आल्याचे दिसते.

 
काँग्रेसचे जातीय समीकरण - 1989च्या अगोदर काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठा पक्ष असायचा. मुस्लीम, दलित आणि ब्राह्मण हे काँग्रेसचे मताधार राहिले. 20% दलित, 21% मुस्लीम आणि 10-11% ब्राह्मण असा साधारणत: 52%चा मताधार काँग्रेसकडे असायचा. उत्तर प्रदेशमध्ये झालेले धार्मिक दंगे, हिंसक घटना यानंतर रामजन्मभूमी आंदोलनाने ब्राह्मण भाजपाकडे शिफ्ट झाला. बाबरी पडल्याने मुस्लीम मतदार काँग्रेसवर नाराज झाले व सपा-बसपामागे गेले. कांशीराम व पुढे मायावतीच्या राजकारणाने दलित मताधार गेला. 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सपाने भाजपाचे नेते राहिलेले कल्याणसिंग यांना पक्षात घेतल्याने मुस्लीम नाराज झाले व काँग्रेसमागे गेले, हा अपवाद होता. मुस्लिमांचे तुष्टीकरण, घराणेशाही, खिळखिळे झालेले पक्ष संघटन यामुळे उत्तर प्रदेशमधून पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 2014च्या व 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजयी उमेदवार 80पैकी अनुक्रमे 02 आणि 01 राहिले. 2022च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 403पैकी फक्त 02 जागांवर विजय मिळाला आहे. 97% उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

अन्य प्रादेशिक पक्ष - उत्तर प्रदेशमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, ज्यांचा प्रभाव विविध भागात आणि जातींमध्ये राहिलेला आहे. यातील अनेक पक्ष सपा, बसपा, भाजपाकडे येत-जात असतात.


yogi
उत्तर प्रदेशमधील मुस्लीम राजकारण - उत्तर प्रदेशातील मुस्लीम मतदार भाजपा वगळता विविध पक्षांमागे जाताना दिसतात. स्वातंत्र्यानंतरची काही दशके मुस्लीम मतदार हा काँग्रेसचा पक्का मतदार राहिला. 1965 ते 1989 दरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. 1980मध्ये मुरादाबादमध्ये मुस्लीम आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या वादात तणाव निर्माण होऊन अनेकांचे जीव गेले. 1987मध्ये मेरठमध्ये हाशिमपुरा कांड झाले, ज्यात अनेक मुस्लीम मारले गेले. मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या आदेशानुसार 1990मध्ये आयोध्या कारसेवकांवर गोळीबार झाला व यात अनेक रामभक्त मारले गेले होते. या घटनेपासून मुलायमसिंग मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाले. मुलायम मुस्लिमांचे नेते मुल्ला मुलायम झाले. अशा अनेक हिंसक घटना, तसेच पुढे रामजन्मभूमी आंदोलन, कारसेवकांनी बाबरी पाडली या घडामोडींमुळे मुस्लिमांनी काँग्रेसला सोडले आणि सपा-बसपा व अन्य स्थानिक पक्षांकडे विखुरले गेले. मुस्लिमांची लोकसंख्या मोठी असल्याने मुस्लिमांकडे मतपेढी म्हणून बघायचे, त्यासाठी त्यांचे तुष्टीकरण करण्याचे हे काँग्रेस, सपा, बसपा यांचे धोरण अनेक वर्षे सुरू आहे. 2014नंतर मात्र या धोरणाचा प्रभाव संपुष्टात आला. 2022च्या निवडणुकीमध्ये 90%पेक्षा जास्त मुस्लीम मतदारांचे सपाकडे ध्रुवीकरण झाले. 2017मध्ये 24 मुस्लीम उमेदवार जिंकले होते. 2022मध्ये 34 उमेदवार जिंकले. भारतीय जनता पार्टीने 2017मध्ये व 2022मध्ये एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, तरी दोन्ही वेळेला मोठा जनाधार घेत स्पष्ट बहुमतात सरकार आले.

सर्वव्यापी पक्ष संघटन आणि कार्यक्षम निवडणूक यंत्रणा

भाजपाच्या अनेक पदाधिकार्‍यांशी, मंत्र्यांशी व कार्यकर्त्यांशी आम्ही संवाद साधला. त्यातील मुख्य मुद्दे असे की, भाजपाच्या व्यापक पक्ष संघटनेने, पक्ष कार्यकर्त्यांनी ग्राउंड स्तरावर सातत्याने काम केले. जनतेशी संवाद साधणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, रेशन वितरणात भ्रष्टाचार न होऊ देणे यामुळे जनतेत विश्वास निर्माण केल्याने बाह्य प्रचाराला जनता बळी पडली नाही. बूथस्तरावर 21 जणांची समिती, मतदार यादीच्या प्रत्येक पानाला (एक पानावरील मतदारसंख्या) एक प्रमुख, त्याला ‘पन्ना प्रमुख’ म्हणून जबाबदारी. पन्ना प्रमुख ते वरपर्यंत सुसंघटित पक्ष यंत्रणा. जनतेला सरकारच्या योजना, काम समजावून सांगणे ते मतदारांना मतदानासाठी जागृती करण्याचे काम पक्ष यंत्रणेने केले. या सर्व प्रक्रियेत वैचारिक परिवारातील विविध अनुकूल सहयोगी संस्था-संघटनांशी समन्वय व त्यांचेही योगदान मिळवले गेले. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने भाजपाने यशाकडे वाटचाल केली.


yogi

गतिमान आणि कार्यक्षम नेतृत्व
अनेक दशकांनंतर उत्तर प्रदेशचे राजकारण स्थिरावले आहे. मुंबईत टॅक्सी चालवणारा उत्तर प्रदेशचा एक चालक म्हणाला की, “आता पुढेही योगी आणि योगीच येत राहणार आहे आणि संधी मिळाली तर आम्हीसुद्धा आमच्या गाव/शहरात परत जाऊ.” 2022ची निवडणूक तशी घासून होईल असे चित्र मीडियाने उभे केले होते. मोदी-योगी विरोधकांनी काही घटनांच्या अनुषंगाने सरकारवर अपप्रचाराची राळ उठवली होती. हाथरसची घटना, किसान आंदोलन, लखीमपूर खेरीची घटना, कोविड काळातील मृतदेहांचे माध्यमांत प्रसिद्ध झालेले फोटो.. योगी सरकार शेतकरीविरोधी, दलितविरोधी असल्याचा अपप्रचार केला गेला. पण वास्तव काही वेगळेच होते. जनतेला सत्य आणि अपप्रचार यातला फरक चांगलच माहीत होता. लोकांनी तसे बोलूनही दाखवले. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव अतिशय नगण्य राहिला. हाथरस, लखमीपूर खेरी येथे भाजपाचे उमेदवार निवडून आले. राज्यात अनुसूचित जाती वर्गातून सर्वात जास्त उमेदवार भाजपाचे निवडून आले आहेत. 2017च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 84 जागांपैकी 74 जागांवर भाजपा व सहयोगी पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. 2022मध्ये 84पैकी 63 जागांवर उमेदवार निवडून आलेले आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत, त्या दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. भेदभावरहित व्यापक जनहिताच्या राजकारणामुळे भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा जनाधार लाभलेला आहे. राष्ट्रवादी विचाराने पुन्हा सत्तेत आलेले योगी सरकार ज्या गतीने व कार्यक्षमतेने कार्य करत आहे, त्याची भारतभर स्तुती होत आहे. अन्य राज्यांतील सरकारसुद्धा त्या पद्धतीने निर्णय घेताना व कार्य करताना दिसत आहेत. पुढील पाच वर्षांत मोदी व योगी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश विविध क्षेत्रांत मोठी आघाडी घेत सर्वांगीण विकास साधत एक आदर्श निर्माण करेल, असे जाणवत आहे.