कोकणातील कृषिविकासासाठी कटिबद्ध कोकण कृषी विद्यापीठ

विवेक मराठी    23-May-2022
Total Views |
@अरविंद कोकजे। 9423290309
कोकणातील भात, नाचणी, आंबा, काजू आणि मासेमारी या विषयांवर संशोधन, सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहोचावे, त्यातून शेतकरी वर्गाचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. यंदाचे विद्यापीठाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाने केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
  
kokan
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व महाराष्ट्र राज्यस्थापनेला अनुक्रमे 75 व 62 वर्षे झाली. या कालावधीत कोकण विकासाच्या दृष्टीने ज्या सकारात्मक गोष्टी झाल्या, त्या कमी आहेत. कोकणाच्या दृष्टीने शेतीविषयक गुणात्मक आणि सकारात्मक विकासासाठी कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव 13 ते 18 मे 2022 या कालावधीत होत आहे. कोकणातील तत्कालीन सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शेती विद्यापीठाची मागणी केली. कोकणातील भात, नाचणी, आंबा, काजू आणि मासेमारी या विषयांवर संशोधन सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहोचावे, त्यातून शेतकरी वर्गाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी त्याची स्थापना झाली. ज्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना झाली, तो उद्देश काही प्रमाणात सफल झाला आहे. विद्यापीठाचे काम गेली पन्नास वर्षे उद्देशाप्रमाणे चालू आहे, असे मागे वळून पाहता मान्य करावे लागेल.
 
 
विद्यापीठाच्या स्थापनेच्या काळात कोकणातील भातशेती, कोकणातील समुद्राच्या पाण्याने खराब झालेल्या खार जमिनीचा शेती उत्पादनासाठी परत वापर करणे याबाबत संशोधन झाले. खार जमिनीत भात घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून कोकणातील पालघर ते सावंतवाडी भागातील सुमारे तीन हजार हेक्टर जमीन परत लागवडीखाली आणण्यात आली, तर शेतात येणारे खारे पाणी अडविण्यासाठी घातलेल्या बांधावर नारळाची लागवड करून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड यशस्वी करण्यात आली आहे. त्याशिवाय कोकणातील नाचणी पिकाचा विचार करून नाचणीची तीन प्रकारची वाणे संशोधित करून शेतकरी वर्गाला ते पीक घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे. जो शेतकरी नाचणी पीक घेण्यापासून लांब जात होता, तो आता परत या पिकाकडे वळला आहे. त्याला बाजारपेठही मिळत आहे.
 
 
गेल्या तीन वर्षांत विद्यापीठात शेतीच्या संदर्भात विविध प्रकारचे संशोधन झाले. पण कोकणचा हापूस आंबा, कोकणचा रायवळ आंबा, कोकणातील काजू लागवड व उत्पादन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आंब्याचे, काजूचे अधिक उत्पन्न देणार्‍या जाती विकसित करताना देवगडचा व रत्नागिरीचा ‘हापूस आंबा’ शौकिनांना अधिक प्रिय करण्यासाठी संशोधन आणि हापूसची गोडी अधिक करण्याकडे भर देण्यात आला. कोकणातील हापूस आंब्यावर साका धरण्याचे प्रमाण अधिक होते. साकाविरहित आंबा असे उद्दिष्ट समोर ठेवून त्यावर संशोधन करण्यात आले. देवगड तालुक्यातील आंबा संशोधन केंद्रात यासाठी सातत्याने पाच वर्षे संशोधन करून साकाविरहित आंबा उत्पादन घेण्याचा मार्ग खुला झाला. विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आपल्या आंबा बागाही साकाविरहित करत आहेत. शासनाच्या रोहयोखाली आंबा लागवड करताना साकाविरहित आंबा ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली आहे. आज रोहयोच्या माध्यमातून तीन लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड झाली आहे. त्या बागेतून मिळणारे उत्पादन सुमारे नव्वद टक्के साकाविरहित असते.
 
 
आंबा संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाने ‘निलम’ या आंब्याची जात विकसित केली आहे. हापूस आंब्याच्या तोडीस तोड असलेल्या या जातीच्या आंब्याला बाजारातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज नवीन लागवडीच्या वेळी ‘निलम’ लागवडीसही प्राधान्य दिले जाते. उपलब्ध आकडेवारीप्रमाणे सुमारे पन्नास हजार एकरात या निलमची लागवड आहे. विद्यापीठाच्या संशोधनात मिळत असलेले हे यश आहे. त्याशिवाय कोकणात रायवळ जातीचा आंबा आहे. त्याची चव हापूसप्रमाणे नाही. त्यावरही संशोधन चालू आहे. पण ते अद्यापपर्यंत आंबा बागायतदार, शेतकरी वर्गापर्यंत गेलेली नाही. ते शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्यास काही कालावधी जाणार आहे.
 
 
रोहयोअंतर्गत आंबा लागवड सुरू झाल्याने आंबा कलम तयार करण्यावर विद्यापीठाने भर दिला. आंबा कलम तयार करण्याची नवीन पद्धत विकसित करून ती शेतकरी वर्गाकडे नेली. आंबा, काजू यांची कलमे तयार करणार्‍या नर्सरी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन रोजगारनिर्मिती झाली. पालघर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोकण कृषी विद्यापीठाच्या नर्सरीचा उद्योग चांगला विकसित झाला आहे. हापूसच्या तोडीचा निलम आंबाही बाजारात विकला जात आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या पन्नास वर्षांच्या कालावधीत संशोधकांना मिळालेले हे यश नोंद घेण्यासारखे आहे. आंबा पीक गेल्या तीन वर्षांपासून परदेशात जात असून त्यातून परकीय चलन मिळत आहे. परदेशात आंबा पाठविण्यासाठी रासायनिक खतांपैकी सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो. आंबा उत्पादक आता तोही करू लागले आहेत. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदलाचा पिकावर होणारा परिणाम याबाबत कृषी विद्यापीठ सातत्याने अभ्यास करते.
 

kokan
 
आंबा पिकाबरोबर काजू लागवड हे कोकणची आर्थिक उन्नती करणारे एक पीक आहे. विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्रात काजूच्या एकूण नऊ जाती विकसित केल्या आहेत. या सर्व जाती उत्तम उत्पन्न देणार्‍या आहेत, यापैकी ‘वेंगुर्ला’ ही जात शेतकरी वर्गात जास्त लोकप्रिय आहे. आज आंब्याबरोबर काजू लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. काजू बी काढल्यानंतर त्याचे बोंड फुकट जाते. त्यापासून सिरप बनविण्याचा प्रयोग विद्यापीठाने यशस्वी केला आहे. शासनाने फळप्रक्रिया उद्योगात समावेश केल्यानंतर आंबा प्रक्रिया उद्योगाबरोबर त्याचा समावेश होईल. त्याला राजमान्यता मिळणे गरजेचे आहे.
 
 
करवंद, रातांबा यावर प्रक्रिया करता येऊ शकते, याबाबत विद्यापीठात प्रयोग व संशोधन चालू आहे. विविध फळांवर प्रक्रिया, आंबा लोणचे, आवळा सरबत असे तयार करण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करण्यासाठी 15 दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंतचे प्रशिक्षण देण्याचे अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केले आहेत. महिलांना प्रशिक्षित करण्याचे काम विद्यापीठ करत आहे. नारळ, सुपारी बागायत, मिरी लागवडीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. गेल्या पन्नास वर्षांत विद्यापीठाने कोकणाला काय दिले? कोकणातील शेतकर्‍यांना या विद्यापीठाचा फायदा काय झाला? असे अनेक प्रश्न निर्माण केले जातात. त्यांना विद्यापीठाने कृतीने उत्तर दिले आहे. गेल्या पन्नास वर्षांत विद्यापीठाने बरेच काही केले, पण त्याचा आपण काय फायदा करून घेतला? याचा शोध आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
 
 
विद्यापीठाने फलोत्पादन आणि मासेमारी या दोन क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. त्यात अल्पभूधारक शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून प्रयोग केले, त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत. ज्या अल्पभूधारक शेतकर्‍यांकडे किमान 10 ते 20 गुंठे जमीन आहे, त्याने त्या जमिनीचे कसे नियोजन करून उत्पन्न घ्यावे, याचा अभ्यास केला आहे. त्यासाठी नियोजन हवे.
 
 
कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि त्यातून मिळणारे मच्छी उत्पादन, कोळंबी आणि अन्य माशांवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगाची वाढ झाली. त्यातून सुमारे तीनशे ते पाचशे कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न परकीय चलनाच्या रूपाने मिळते. आज हा व्यवसाय, छोटा मच्छीमार, रापणकार सर्वच अडचणीत आहेत. त्याचा प्राथमिक अभ्यास करून विद्यापीठ त्यातून मार्ग काढण्याचा अभ्यास करत आहे. देशात परकीय चलन मिळवून देणार्‍या या व्यवसायाचा अभ्यास होण्याची गरज आहे.
 
 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने या विद्यापीठाने केलेल्या कामगिरीचा हा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.