पहिल्या भारतीय महिला डॉक्ट र कादंबिनी गांगुली

विवेक मराठी    23-May-2022
Total Views |
@डॉ. क.कृ. क्षीरसागर । 9422080865
 ब्रिटिश राजवटीला समर्थपणे सामोर्‍या जात व वर्णद्वेषाचा सामना करत वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांच्या जीवनचरित्राचा परिचय करून देणारा लेख.
 
doctor
जुलमी ब्रिटिश काळात अनेक अडचणींना यशस्वीपणे सामोरे जात वैद्यकीय क्षेत्रात चमकणार्‍या प्रारंभीच्या महिला डॉक्टर म्हणजे डॉ. आनंदी गोपाळ जोशी आणि बंगालमधील डॉ. कादंबिनी गांगुली. यापैकी डॉ. आनंदी गोपाळ जोशी या पहिल्या वैद्यकीय पदवीधर असल्या, तरी दुर्दैवाने त्यांना वयाच्या बाविसाव्या वर्षीच मृत्यूने गाठले आणि त्या प्रत्यक्षात रुग्णांची सेवा करू शकल्या नाहीत. मात्र डॉ. गांगुली यांनी 1886मध्ये वैद्यकीय पदविका मिळवून त्या वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकल्या. त्यामुळे पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून त्यांची नोंद झाली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचा राष्ट्राभिमान वेळोवेळी प्रत्ययाला आला. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर्सच्या यादीत डॉ. रखमाबाई राऊत यांच्याही नावाचा समावेश करायला पाहिजे. त्यांनीही अनेक अडचणींना सामोर जात 1894 साली पाश्चात्त्य वैद्यकीय पदवी मिळवली व मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये व्यवसायास सुरुवात केली.
 
 
कादंबिनी यांचा जन्म 18 जुलै 1861 रोजी झाला. ब्राह्मो समाजाचे तत्त्वचिंतक ब्रजकिशोर बोस हे कादंबिनीचे वडील. ते भागलपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांनीच भारतीय महिलांचे सबलीकरण करण्यासाठी 1862मध्ये ‘भागलपूर महिला समिती’ या संस्थेची स्थापना केली. कादंबिनीवर अगदी बालपणापासून त्यांच्या विचारांचे संस्कार झाले आणि त्या राष्ट्रभक्त डॉक्टर झाल्या.
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा देण्याची इच्छा तीव्र असूनही, त्या महिला असल्याने कलकत्ता विद्यापीठाने आपल्या तत्कालीन धोरणानुसार त्यांना ही संधी नाकारली.
 
याच सुमाराला त्यांच्यापेक्षा 17 वर्षांनी वयस्कर असलेल्या द्वारकानाथ गांगुलींशी त्यांचा परिचय झाला. कादंबिनींची बुद्धिमत्ता आणि वैद्यकीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा लक्षात घेऊन द्वारकानाथांनी कादंबिनींना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले. महिलांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलेच पाहिजे, कारण महिला रुग्णांच्या आरोग्यविषयक समस्या त्याच सोडवू शकतील असे त्यांचे मत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर 1877मध्ये यश आले आणि कलकत्ता विद्यापीठाने कादंबिनींना प्रवेश दिला. प्रारंभी तत्कालीन फर्स्ट आर्ट्स या परीक्षेत त्या 1880 साली उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे कलकत्ता मेडिकल कॉलेजमधील त्यांचा प्रवेश निश्चित झाला. त्यांच्याबरोबरच चंद्रमुखी बसू यांनाही प्रवेश मिळाला. प्रत्यक्ष परीक्षेसाठी मात्र विद्यापीठाने महिला विद्यार्थ्यांची व्यवस्था वेगळी केली होती. या प्रवेश परीक्षेत त्या द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.

 
1883मध्ये कादंबिनी आणि द्वारकानाथ गांगुली विवाहबद्ध झाले. द्वारकानाथांचा हा पुनर्विवाह होता. या नूतन दांपत्याला एकूण आठ मुलींचा सांभाळ करायचा होता. समाजाला द्वारकानाथांचा दुसरा विवाह मान्य नव्हता. समाजाच्या विरोधाला सामोरे जात ते जगले.


doctor
 
ब्रिटिश शासनाने कादंबिनींना दरमहा वीस रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परंतु त्या महिला म्हणून कलकत्ता मेडिकल कॉलेजचा अध्यापक वर्ग शिकवायला नाराज होता. परिणामत: 1886च्या परीक्षेत त्यांना एका गुणाने अनुत्तीर्ण करण्यात आले. यावर तक्रार करता त्यांना पुन: परीक्षा द्यायला परवानगी मिळाली, परंतु याही परीक्षेत त्याच प्राध्यापकांनी त्यांना उत्तीर्ण होऊ दिले नाही. त्यामुळे त्या निराश झाल्या व आपले स्वप्न हे अखेर स्वप्नच राहणार अशी त्यांची खात्री झाली. तरीही शेवटी त्यांनी विद्यापीठाच्या प्रतिनिधी सभेत आपली कैफियत मांडली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.ए. कोट्स यांनी त्यांना मदत केली आणि त्या उत्तीर्ण झाल्याचे जाहीर केले. त्यांना ‘ग्रॅज्युएट ऑफ बेंगॉल मेडिकल कॉलेज’ची पदविका मिळाली. हे महाविद्यालय लंडनच्या लंडन विद्यापीठाशी संलग्न होते. शेवटी कादंबिनींना वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकृत मान्यता मिळाली. नेमक्या 1886मध्येच डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांनाही वैद्यकीय पदवी मिळाली होती. यापूर्वी 1881मध्ये अबला बोस या महिलेने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती; परंतु त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला, म्हणून त्या मद्रासला गेल्या. मात्र त्या कधीच पदवीधर होऊ शकल्या नाहीत.

डॉ. कादंबिनी गांगुलींची जिद्द आणि अपूर्व यश फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यापर्यंत पोहोचले. महिलांवर होणार्‍या अन्यायाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.

डॉ. कादंबिनी गांगुली यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यासमोर भेदभावाचे डोंगर उभे राहिले. 1888मध्ये त्यांनी कलकतत्त्याच्या लेडी डफरिन महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली. वेतन होते दरमहा 300 रुपये. या ठिकाणीसुद्धा त्यांना वर्णविद्वेषाला सामोरे जावे लागले, कारण त्यांना एम.बी. ही पदवी मिळाली नव्हती. तेथील ब्रिटिश महिला डॉक्टर्स त्यामुळे त्यांना तिरस्कारपूर्ण हीन वागणूक द्यायच्या. एकदा एका श्रीमंत रुग्णाच्या उपचारासाठी त्याच्या घरी त्या गेल्या असता त्यांना बाहेरच्या व्हरांड्यामध्येच न्याहारी देण्यात आली आणि स्वत:च्या बशा व पेले त्यांनाच स्वच्छ करायला भाग पाडले.
 
 
काही गुंतागुंतीचे आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची संधी भारतीय महिलांना नाकारण्यात येत असे. त्यामुळे आपले व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची त्यांना संधीच मिळत नसे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधील अधिक जबाबदारीच्या व उच्च पदापासून त्यांना वंचित ठेवले जाई. शल्यकर्मांपासूनही त्यांना दूर केले जाई. एवढेच नाही, तर डॉ. कादंबिनींची भीतीच रुग्णांना घातली जाऊ लागली.

विज्ञान आणि गणित ही क्षेत्रे भारतीय महिलांसाठी नाहीत अशी समजूत या भेदभाव करणार्‍या समाजगटाकडून पसरवली जात असे. डॉ. कादंबिनी गांगुली यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवण्याचा खटाटोप या समाजकंटकांनी केला. त्यांना वेश्या ठरवले. मात्र त्यांचे पती या परिस्थितीशी यशस्वीपणे झगडले. ते न्यायालयापर्यंत गेले. कादंबिनीची बदनामी करणार्‍या बंगबशी या एका नियतकालिकाच्या संपादकाला त्यामुळे तुरुंगात जावे लागले. मोठा दंडही भरावा लागला. संपादकाचे नाव होते महेश पाल.
या सर्व विरोधी परिस्थितीशी झगडताना 1893मध्ये डॉ. कादंबिनींनी प्रगत अध्ययनासाठी इंग्लंडला जायचे ठरवले. एडिन्बरा येथील स्कॉटिश कॉलेजमध्ये त्यांनी तीन विविध पदविकांसाठी प्रवेश मिळवला. त्या वर्षीच प्रवेश घेतलेल्या एकूण 14 विद्यार्थ्यांमध्ये डॉ. कादंबिनी या एकमेव पहिली भारतीय महिला होत्या.

 
यानंतर डॉ. कादंबिनी भारतात परतल्या. वरिष्ठ पदावर लेडी डफरिन हॉस्पिटलने त्यांना नियुक्त केले, शिवाय त्यांनी आपला खासगी व्यवसायही सुरू केला. तो उत्तम प्रकारे वाढत गेला, म्हणून त्यांनी लेडी डफरिन हॉस्पिटलमधून निवृत्ती घेतली. 1895-96 या काळात नेपाळच्या महाराणींवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केले. यामुळे इतर राजघराण्यांकडूनही त्यांना उपचारासाठी निमंत्रणे मिळू लागली. या व्यग्रतेतून त्यांनी आपले घर आणि संसारही सांभाळला, हे विशेष.

 
एकदा पुरुष डॉक्टरांनी एका रुग्ण महिलेच्या आजाराचे चुकीचे निदान केले होते. गर्भाशयात कर्करोगाची गाठ असल्याचे त्यांचे निदान डॉ. कादंबिनींनी चुकीचे ठरवून ती गर्भधारणा असल्याचे सांगितले आणि सुलभ प्रसूती घडवून आणली.

 
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कार्याची माहिती डॉ. कादंबिनींना होती. त्यामुळेच देशभक्तीची बीजे त्यांच्या मनात अंकुरली आणि तत्कालीन राजकारणामध्येही त्या सक्रिय झाल्या. 1889मध्ये मुंबईमध्ये भरलेल्या ‘इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवशेना’त त्यांनी महिलांचे प्रतिनिधित्व केले. नंतरच्या 1906, 1908 सालच्या अधिवेशनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कलकत्ता मेडिकल कॉलेजचे महिलांना प्रवेश नाकारण्याचे धोरण त्यांच्या प्रयत्नांमुळे 1915मध्ये बदलावे लागले. त्यांच्या कार्याला खीळ बसली ती त्यांच्या पतीच्या 1898मधील निधनामुळे. त्यांचीही प्रकृती ढासळत गेली आणि 3 ऑक्टोबर 1923 रोजी 62व्या वर्षी या तेजस्विनीचा अंत झाला. आपल्या मृत्यूपूर्वी शेवटच्या 15 मिनिटांपर्यंत त्या रुग्णसेवेत मग्न होत्या.