जात राजकारणी...

विवेक मराठी    26-May-2022
Total Views |
@अभय पालवणकर
 समता या गोंडस नावाखाली व शाहू-फुले-आंबेडकरांची नावे घेऊन जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देण्याऐवजी शरद पवार यांनी  जातीपातीचे राजकारण पोसले. एखाद्या जातीतील राजकीय नेता निर्माण करायचा, त्याने दुसर्‍या जातीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मौन बाळगायचे, नंतर तो वाद चिघळला की पुन्हा स्वत: पुढाकार घेऊन तोडगा काढण्यासाठी पुढे यायचे आणि बाहेर पत्रकारांसमोर मात्र वेगळेच सांगायचे... ही पवारनीती.
 
pawar
 
महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात 50पेक्षा जास्त वर्षे सक्रिय राहून राजकारण करणार्‍या काही मोजक्या व्यक्तीपैकी एक नाव म्हणजे शरद पवार! आपल्या राजकीय डावपेचाच्या जोरावर राजकीय वर्तुळालाच नव्हे, तर राजकारणाची जाण असलेल्या सर्वसामान्यांनाही त्यांनी अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले आहेत. त्यामुळे त्यांना अविश्वसनीय, आवसानघातकी, खंजीर खुपसणारा, एका निर्णयावर ठाम न राहणारा अशा प्रकारचे विशेषणे मिळतात.
 
 
 
पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी पवारांवर व त्यांच्या पक्षावर ‘जातीय तेढ निर्माण करणार पक्ष’ अशा प्रकारची टीका केली. या टीकेचे पडसाद सर्वत्र उमटू लागले, पवारांच्या जातीयवादी रूपाचे विश्वरूपदर्शन आता सर्वांना होऊ लागले आहे. समता या गोंडस नावाखाली व शाहू-फुले-आंबेडकरांची नावे घेऊन जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देण्याऐवजी त्यांनी जातीपातीचे राजकारण पोसले, असे दिसून येते. एखाद्या जातीतील राजकीय नेता निर्माण करायचा, त्याने दुसर्‍या जातीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मौन बाळगायचे, नंतर तो वाद चिघळला की पुन्हा स्वत: पुढाकार घेऊन तोडगा काढण्यासाठी पुढे यायचे आणि बाहेर पत्रकारांसमोर मात्र वेगळेच सांगायचे... ही पवारनीती. या राजकारणाचे दिवस आता संपत आले आहेत असे दिसते. पवारांचे राजकीय डावपेच मात्र उलटे पडू लागले आहेत. त्यांना आपल्या वक्तव्यापासून घूमजाव करावे लागत आहे. त्यांचे डावपेच समजू लागले आहेत. इतरांना राजकीय चक्रव्यूहात टाकणारे पवार आता मात्र स्वत:च त्यात अडकू लागले आहेत, असे गेल्या महिनाभराच्या राजकारणावरून दिसून येईल.
 
 
ब्राह्मण समाजाविषयी पक्षातील काही नेते व संघटना यांच्याकडून होणार्‍या वादग्रस्त विधानांमुळे ब्राह्मण वर्ग नाराज आहे, त्यामुळे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी प्रदीप गारगटकर यांच्यामार्फत काही ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली. अशा प्रकाराची बैठक बोलावणे हे चांगल्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे. पण तसे करतील ते पवार कसले... पवारांनी ती बैठक संपल्यावर “ब्राह्मण समाजांनी आरक्षणाची मागणी केली” अशा प्रकारच्या बातम्या मीडियावर सोडल्या. पण लगेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी या बातम्यांचे खंडन केले. “ब्राह्मण समाजाने अशा प्रकारचे आरक्षण मागितलेच नाही” असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे पवारांचा खोटेपणा उघड झाला. खरे तर ब्राह्मण समाजाला टार्गेट करणे हे त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. आजपर्यंत शरद पवारांनी व त्यांच्या पुरस्कृत संघटनांकडून टीकाटिप्पणी करून त्यामार्फत आपल्या पक्षाचे राजकारण पोसले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याची अनेक उदाहरणे - समर्थ रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य करणे, पुण्यात जाणूनबुजून पगडीचा वाद निर्माण करणे इ. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले. हे सर्वच पाहता ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याबरोबर बैठकीला जाणे चुकीचे वाटते, असे ब्राह्मण समाजातील अनेक सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातून फलित काहीच झाले नाही. उलट खोटीच माहिती बाहेर आली.
 
 
पवारांनी राजकारणासाठी आपल्या छत्रपतींच्या वंशजांनाही सोडले नाही. भाजपाने छत्रपती संभाजी राजे यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदार केल्यानंतर “छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत असत आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले, ” अशा प्रकारची अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज मात्र राजेंना सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तेव्हा दिल्लीत व राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे कदाचित विरोध करण्यासाठी काहीतरी भूमिका, टिप्पणी करणे ठीक होते. कारण कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम द्यावा लागतो. त्यातच पक्षाला कोणतीही विचारधारा नाही, तत्त्व नाहीत. त्यामुळे समजू शकलो असतो. पण आता राज्यात सत्ता आहे, विकासात्मक राजकारण करण्याची संधी आहे, तरीही जातीय राजकारणाचा आधार घ्यावा लागतो.. हे पक्षाचे दुर्दैव मानावे लागेल. आज 81 वर्षे वय असणार्‍या पक्षप्रमुखाचे विचार दिशादर्शक असले पाहिजेत. पण पवारांचे विचार पक्षालाच काय, राष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात ढकलून देणारे आहेत. राज्य कसे एकसंध राहील, राज्याचा विकास कसा होईल असे विचार असायला हवेत. पण येथे जातीपातीच्या राजकारणात राज्याचे कसे विभाजन होईल आणि यात आमचा पक्ष कसा यशस्वी होईल असे विचार आहेत.
 
 
जातीयवादी राजकारण जास्त दिवस टिकू शकत नाही, याचे उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशमधील दुसर्‍यांदा बहुमताने येणार्‍या भाजपा सरकारने दाखवून दिले आहे. तेथे आजपर्यंत जातीपातीचे राजकारण करून सत्ता मिळवणार्‍या पक्षांची अवस्था काय आहे, हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आता पवारांचे हे राजकारण महाराष्ट्रातील सुजाण जनता ओळखू लागली आहे. त्याचे उत्तर निवडणुकीत दिले जाईल, असे दिसते.