संघ आणि संविधान

विवेक मराठी    27-May-2022   
Total Views |
रा.स्व. संघाचा तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्ग नागपूरला होता. यंदाच्या वर्गात साडेसातशेच्या आसपास स्वयंसेवक आहेत. त्यांचे दर्शन म्हणजे हिंदू राष्ट्राच्या लघुरूपाचे दर्शन असते. माझ्याकडे या वर्षी शिक्षार्थींच्या तीन गटांपुढे तीन दिवस संविधान हा विषय मांडण्याचे काम आले. गेल्या तीन-चार वर्षांत या विषयावर मी दोनशेहून अधिक भाषणे केली आहेत. तरीदेखील तृतीय वर्ष स्वयंसेवकांपुढे संविधान हा विषय कसा मांडायचा, याचे मला खूप चिंतन करावे लागले.
 
 
RSS
 
रा.स्व. संघाविषयी खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा प्रचार सतत होत असतो. त्यासाठी नवनवीन विषय शोधले जातात. काही लोक संघाच्या नावाने खोटी पत्रके करून त्याचे प्रसारणदेखील करतात. संघ दलितविरोधी आहे, संघ मुस्लीमविरोधी आणि ख्रिश्चनविरोधी आहे, संघ गांधीविरोधी आहे, संघ डॉ. आंबेडकरविरोधी आहे आणि संघ घटनाविरोधी आहे अशा प्रकारचा प्रचार न थकता काही लोक करीत राहतात. त्यांना अपेक्षित असलेला या प्रचाराचा परिणाम समाजमनावर फारच कमी होतो. काहीच वाचन नसलेली साधीभोळी माणसे अशा प्रचाराची शिकार जरूर होतात. परंतु थोडासा चौकस माणूस अशा प्रचारावर लगेच विश्वास ठेवीत नाही.
 
 
याचे कारण असे की, संघ हा पुस्तकी नाही. संघ जगणारे अनेक कोटी स्वयंसेवक आहेत आणि ते समाजात राहतात. कुणा ना कुणाचे ते शेजारी असतात. जेथे काम करतात, तेथे कुणाचे सहकारी असतात आणि त्यांचा व्यवहार समाजातील सर्व घटक पाहत असतो. संघस्वयंसेवकाचा व्यवहार सर्वांशी प्रेमाने वागण्याचाच असतो. तो जातिधर्मापलीकडे जाऊन विचार करतो. कुणाची काही अडचण असल्यास तो तत्काळ मदतीला धावून जातो. याचा विरोध-त्याचा विरोध यातून असा स्वयंसेवक घडत नसतो, हे लोकांना कळते. जनता इतकी अडाणी राहिली नाही. वेगवेगळी कथानके करणार्‍या डोकेबाज लोकांच्या हे लक्षात येत नाही, याचे कारण असे की, त्यांच्या डोक्याचे खोके झाले असावे.
 
 
RSS
 
दर वर्षी संघस्वयंसेवकांचे प्रशिक्षण वर्ग भरतात. त्यांना प्राथमिक वर्ग, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष असे म्हटले जाते. एप्रिलपासून हे वर्ग सर्व ठिकाणी सुरू होतात. हे वर्ग सामान्यतः चोवीस दिवसांचे असतात आणि क्रमाने प्रत्येक वर्ग कार्यकर्त्याला करावा लागतो. याला संघशिक्षण म्हणतात. प्राथमिक वर्ग, नंतर प्रथम वर्ष, नंतर द्वितीय वर्ष, नंतर तृतीय वर्ष अशी प्रशिक्षणाची क्रमवारी असते. प्रत्येक वर्गाची संख्या नियंत्रित संख्या असते. कुणालाही वर्गाला पाठविले जात नाही. वर्गाचे शुल्क असते. ते प्रत्येकाला भरावे लागते. स्वतःचा गणवेश स्वतःच्या पैशाने करावा लागतो. वर्गात जाताना झोपण्याचे साहित्य, ताट, वाटी, पेला, अंघोळीचा साबण वगैरे सर्व आपले आपल्याकडे असावे लागते. यात कुणालाही कसलीही सवलत मिळत नाही. अतिश्रीमंत आहे, त्याला चादरीवर झोपण्याची सवय नाही म्हणून त्याला गादी दिली जात नाही. सर्व प्रकारची समानता हा वर्गाचा एक मूलभूत विषय असतो. एक प्रकारचेच भोजन असते. ते शाकाहारी असते. सरसंघचालकांनाही तेच जेवण आणि शिक्षार्थींनाही तेच जेवण असते. कसल्याही प्रकारचा पंगतीभेद नसतो.
 
 
वर्गातील सगळे स्वयंसेवक ‘आम्ही हिंदू आहोत’ या एकाच भावनेने जागे असतात. हिंदू समाजातून हे सर्व शिक्षार्थी येत असल्यामुळे प्रत्येकाची जन्मजात असतेच. पण ती संघात विचारली जात नाही, म्हणून वर्गात हिंदू समाजातील सर्व जातींचे प्रतिनिधित्व बघायला मिळते. एका अर्थाने संघातील स्वयंसेवकांचे दर्शन म्हणजे समरसता दर्शन असते.
 

RSS
 
या वर्गाची कार्यक्रम पत्रिका घड्याळाच्या काट्याप्रमाणे आखीव असते. पहाटे चार किंवा साडेचार वाजता जागरण होते आणि रात्री साडेदहाला दीपनिर्वाण होते. सकाळी साडेपाचपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत प्रत्येक तासाचा कार्यक्रम ठरलेला असतो. तो ठरलेल्या वेळेसच सुरू होतो आणि ठरलेल्या वेळेतच संपतो. दुपारी 3 ते 4 या वेळात बौद्धिक वर्ग असतो. वक्ता वेळेवर बोलणे सुरू करतो आणि बरोबर वेळेवर आपले बोलणे थांबवितो. संघ शिक्षा वर्गातील बौद्धिक वर्ग कधीही लांबत नाही. ते आखीव आणि रेखीव असतात.
 
 
तृतीय वर्षाचा वर्ग नागपूरला होता. या वर्गासाठी सर्व देशातून स्वयंसेवक येतात. यंदाच्या नागपूरच्या वर्गात साडेसातशेच्या आसपास स्वयंसेवक आहेत. त्यांचे दर्शन म्हणजे हिंदू राष्ट्राच्या लघुरूपाचे दर्शन असते. तामिळ भाषा बोलणारे आणि पंजाबी भाषा बोलणारे, गुजराती बोलणारे आणि बंगाली भाषा बोलणारे अशा सगळ्या भाषा बोलणारे स्वयंसेवक असतात. माझ्याकडे या वर्षी शिक्षार्थींच्या तीन गटांपुढे तीन दिवस संविधान हा विषय मांडण्याचे काम आले. तसा संविधान हा विषय मला नवीन राहिलेला नाही. गेल्या तीन-चार वर्षांत या विषयावर मी दोनशेहून अधिक भाषणे केली आहेत. तरीदेखील तृतीय वर्ष स्वयंसेवकांपुढे संविधान हा विषय कसा मांडायचा, याचे मला खूप चिंतन करावे लागले.
 
 
रोज एक गट, वेळ दुपारी 11 ते 12.05 असे तीन दिवस एकच विषय मांडायचा होता. शिक्षण, संघ जबाबदारी आणि वय याप्रमाणे या गटांची रचना केलेली असते. यापूर्वी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात कै. मा.गो. वैद्य यांनी संविधान हा विषय मांडलेला होता. त्यामुळे हा विषय प्रथमच होत होता असे समजण्याचे कारण नाही, ऐकणारे प्रथमच ऐकत होते हे मात्र खरे. एकूणच समाजात संविधान या विषयाची अक्षरओळख नसणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. संघस्वयंसेवक समाजातूनच येत असल्यामुळे बहुसंख्य स्वयंसेवकांना संविधानाची काहीही माहिती नसणे यात विशेष काही नाही.
 
 

RSS
 
म्हणून विषय मांडणी करताना संविधान म्हणजे काय, ते कसे निर्माण केले जाते, घटना समिती कशी अस्तित्वात आली, या घटना समितीत कोण होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखा समितीचे अध्यक्ष कसे झाले, घटना समितीचे कामकाज किती वर्षे चालले, त्यातील चर्चेचा स्तर कसा होता, घटनेचे एक कलम किती समित्यांतून फिरून येत असे, त्यात कशा कशा सुधारणा सुचविल्या जात, आणि या सर्वांचा विचार करून डॉ. बाबासाहेब हे कलम पुनर्लिखित करून कसे मांडत, ही सर्व माहिती सांगावी लागली.
 
 
राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो, हे खरे. परंतु राज्यघटनेचे एक तत्त्वज्ञान असते, राज्यघटनेची मूल्यव्यवस्था असते, राज्यघटनेचा एक ध्येयवाद असतो, यातून राज्यघटनेचा म्हणून एक आत्मा तयार होतो, हे सर्व समजावून सांगावे लागले. आपली राज्यघटना कोणत्या तत्त्वज्ञानावर उभी आहे आणि तिची मुळे भारतीय दर्शनात कशी आहे, हे उदाहरणे देऊन सांगावे लागले. तसेच आपली परंपरागत मूल्ये ही राज्यघटना कोणत्या कलमातून कशी सांगते, याचे मी विवरण केले, आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे आणि कथा सांगितल्या.
 
 
आपण जे संघकाम करतो, ते एका अर्थाने घटनेतील सामाजिक ध्येयवादाचेच पालन करीत असतो. ते कसे? तर आपले कलम 15 सांगते की, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. आपला वर्ग हे याचे जिवंत उदाहरण असते. या वर्गात सर्व उपासना पंथांचे स्वयंसेवक असतात. जातीवरून इथे कोणताही भेदभाव नसतो. राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीपासून आपण हे काम करतो आहोत. ही आपल्या राष्ट्राची मूल्यव्यवस्था आहे. आपल्या राज्यघटनेने तिचा अंगीकार केला आहे, त्यामुळे त्यात आपल्या दृष्टीने काही नवीन आहे असे नाही.
 
 
संघरचनेमध्ये ‘समरसता गतिविधी’ या शब्दाद्वारे समरसतेचे काम केले जाते. ते सर्व भारतभर होते. समरसता हा शब्द आपल्या राज्यघटनेत आहे. राज्यघटनेच्या भाग 4मध्ये मूलभूत कर्तव्याचा एक अध्याय आहे. या मूलभूत कर्तव्यातील क्रमांक 5चे कलम असे आहे - ‘भारत के सभी लोगों में समरसता और समान भ्रातृत्व की भावना का निर्माण करे जो धर्म, भाषा और प्रदेश या वर्ग आधारित सभी प्रकार के भेदभाव से परे हो, ऐसी प्रथाओं का त्याग करें जो स्त्रियों के सम्मान के विरुद्ध है।’ संघस्वयंसेवक हे कलम प्रत्यक्ष जगत असतात. आम्ही राज्यघटनेचे हे कलम जगतो आहोत, हे मात्र त्यांना माहीत नसते. त्याची माहिती करून देण्याचे काम मी केले.
 
 
संघ शिक्षा वर्गातील माझा तीन दिवसांचा मुक्काम हा संघऊर्जा वाढविणारा ठरला. नागपुरात या दिवसांत प्रचंड ऊन असते. दुपारी नळातून येणारे पाणी इतके गरम असते की, त्याने तोंड धुणेही अशक्य होते. अशा प्रचंड उष्णतेतही संघकामाची ऊर्जा निर्माण करण्याचा हा यज्ञ रेशीमबागेत गेली अनेक दशके चालू आहे आणि त्यातूनच राष्ट्रीय पुनर्निर्माण करणारे लक्षावधी कायकर्ते उभे राहिले आहेत. ते जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यातील एक स्वयंसेवक आज पंतप्रधान आहे. एक विचार म्हणून आपण म्हणजे संघ देशाच्या मध्यवर्ती स्थानी आलेला आहे. म्हणून स्वयंसेवकांनी ज्या कायद्याद्वारे देश चालतो आणि पुढे चालवायचा आहे, तो मूलभूत कायदा, त्याचा विचार आणि मूल्यसंकल्पना समजून घेणे आवश्यक झालेले आहे. यात मी खारीचा वाटा उचलला, याचे मला समाधान आहे.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.