“संघ हा कृतीतून बोलतो” - डॉ. श्रीपाल सबनीस

विवेक मराठी    05-May-2022
Total Views |
“मी डावा किंवा उजवा नाही, तर मी संवादावर भर देणारा माणूस आहे. संघ हा कृतीतून बोलतो, हे गिरीशकाकांचं म्हणणं मला पटतं. मला वाटतं, डाव्या-उजव्यांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जे चांगलं आहे, ते स्वीकारलं पाहिजे. या दोघांच्या संवादातून देशाचं भलं करण्याचा विचार मला महत्त्वाचा वाटतो” असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उद्गार काढले.
 
 
rss
 
मातंग साहित्य परिषद आणि विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने गिरीश प्रभुणे लिखित ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील सावरकर स्मारक केंद्र येथे रविवार, 1 मे 2022 रोजी पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सुनील कांबळे, डॉ. अंबादास सगट, अविनाश कोल्हे, प्रमोद आडकर, राजन लाखे, डॉ. अविनाश सांगोलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, “संघ काय चांगलं करतो, हे पाहण्यासाठी या पुस्तकाने कोंडी फोडली आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक कोंडी फोडण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. सेवा आणि समर्पण याला जातधर्म नसतो. हे समर्पण गिरीशकाकांनी सिद्ध केलं आहे.”
 
 
पुस्तकातील व्यक्तिचित्रणांविषयी बोलताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मी सतरा-अठरा वर्षांचा असताना माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते, म्हणून मी डॉ. काका कुकडेंकडे गेलो. त्यांनी मला एक औषधाची बाटली दिली आणि जेव्हा केव्हा तुझ्या डोक्यात असा विचार येईल तेव्हा हे औषध घे असं सांगितलं. त्या बाटलीतल्या औषधाचा आणि त्यांच्या बोलण्याचा सकारात्मक परिणार माझ्यावर झाला. त्यामुळे आज जे काही मी दिसतो आहे, ती कुकडेकाकांची कृपा आहे. तसंच मा. भैयाजी जोशी भटके-विमुक्ताच्या एखाद्या पाल्यामध्ये जाऊन चटणी-भाकरी खातात, तिथे समरसतेचा आणि समतेचा प्रत्यय दिसतोच. ही कृती स्वागतार्हच आहे. अशी काही माणसं संघाच्या परंपरेत माणुसकीचा, संवेदनशीलतेचा इतिहासात घडवीत आहेत.”
 

rss 
पुस्तकाच्या वैशिष्ट्याविषयी सांगताना ते म्हणाले, “या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक निखळ धर्माचं, निखळ राजकारणाचं, अंधश्रद्धेला वाहिलेलं पुस्तक नाही. एक अस्सल प्रतिभासंपन्न, शैलीदार लेखक तन्मयतेने, आत्मीयतेने एखाद्या भूमिकेशी किती एकरूप होऊ शकतो, हे या पुस्तकातून लक्षात येतं. एक वेगळा प्रयोग पुस्तकाच्या रूपाने अनुभवता आला. या सबंध मांडणीत गिरीशकाकांची जी जीवननिष्ठा संघाशी संबंधित आहे, त्यांचा ज्यांच्याशी अनुबंध जुळला ते मान्यवर लोक तर आहेतच, पण मला सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य दिसलं ते म्हणजे संघप्रवाहाच्या परिघातील अत्यंत सामान्य अशी माणसं त्यांनी जाणली, पचवली आणि त्यांना शब्दरूप दिलं आणि पुस्तकात अजरामर करून ठेवलं. आणि म्हणून हे पुस्तक एका वेगळ्या दिशेने आपल्याला जाणवतं. या पुस्तकात केवळ संघाची व्यक्तिचित्र आहेत का? तर नाही, डॉ. नरेंद्र जाधव, लता मंगेशकर, देवदत्त दाभोळकर, आर.आर. पाटील, गो.नी. दांडेकर, कवी ग्रेस यांचीही व्यक्तिचित्रं तितक्याच आत्मीयतेने, एकनिष्ठने मांडली आहेत.
 
 
उजव्या आणि डाव्या या दोन विचारसरणींच्या कप्प्याच्या पलीकडे जाऊन एक माणूसपण नावाची वास्तवता असते, ती गिरीशकाकांनी हेरली. पुस्तक लिहीत असताना त्यांच्या डोळ्यासमोर व्यक्तिचित्रणं आहेत, माणूसपण आहे आणि त्या माणसांच्या स्वभावधर्मामध्ये भूमिकेच्या रंगांमध्ये जो विचार आहे, त्याची कृतिशीलता आहे. गिरीश प्रभुणे हे केवळ लेखक नाहीत, तर कृतीचा संदेश प्रत्येक भागाभागावर आलेला आहे. या पुस्तकातील अगदी स्त्रीपात्रदेखील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तिथे कुठेही जात आडवी येत नाही. अशा व्यक्तिचित्रांचे प्रयोग मराठी साहित्यात नाहीत. डाव्या-उजव्याला समान भूमिकेतून पचवणारी प्रतिभाच नाही. ते पुढे म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण परंपरेत जे मोजके विवेकवादी अशा प्रकारचे लेखक वाटतात, त्यात दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी मी प्रचंड प्रभावित आहे. बाळासाहेब देवरस ही मला आवडणारी व्यक्ती, कारण त्यांनी जातिव्यवस्थेचं उच्चाटन करणं हे आवश्यक म्हटलं.
 
 
दोन्हीकडे प्रामाणिक माणसं आहेत, माणसातील प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो. माणसाची कृतिशीलता महत्त्वाची आहे. समाजचिंतनाचा स्पर्श या सबंध पुस्तकातून दिसतो. राष्ट्रीय निष्ठा आणि राष्ट्रीय भूमिका हा या पुस्तकाचा पाया आहे. कृतिशील उपक्रम आणि समर्पण लेखकाचा स्थायिभाव आहे. मी संघाचा शत्रू नाही, काही बाबतीत मतभेद आहेत आणि ते मी जाहीरपणे मांडतो.”
 
 
“जातिवंत हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी गिरीशला ओळखतो. त्याचं हे पुस्तक एक आगळंवेगळं पुस्तक आहे. फार कमी शीर्षकं अशी असतात, जी अतिशय अचूक असतात. ’परिसांचा संग’ हे त्या सदरात मोडतं. शीर्षकाच्या या दोन शब्दांतून पुस्तकाचं सार लक्षात येतं. या पुस्तकातील धर्मपाल यांचा लेख वेगळ्या धाटणीचा आहे. धर्मपालांचं महत्त्व या लेखातून लक्षात येतं, त्यामुळे बुद्धिवंतांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं” असे मत डॉ. अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केले.
 
 
“साहित्यातून माणूस कसा घडतो आणि आजूबाजूच्या माणसांना कसा घडवतो, हे जाणून घ्यायचे असेल तर गिरीशकाकांचं व्यक्तिमत्त्व मला महत्त्वाचं वाटतं. ते केवळ साहित्यिक नाहीत, तर चोखंदळ वाचकही आहेत, त्याच्या खुणा पानापनावर जाणवतात. अत्यंत ध्येयवादी, त्यागी असं हे व्यक्तिमत्त्व आहे” अस मत डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी व्यक्त केले.
 
 
“गिरीश प्रभुणे समाजाचं काम करतात. समाजाच्या गर्भात शिरूनच समाजाचं महत्त्व जाणून घेतल्याशिवाय समाजाचं दुःख कळत नाही. ते दुःख गिरीश प्रभुणेंना कळलं, कारण ते समाजाच्या गर्भात शिरले, म्हणून त्यांना हे परीस गवसले” असे प्रतिपादन राजेश लाखे यांनी केले.
 
 
समरसता ही संकल्पना नव्याने गिरीशजींने ऐरणीवर आणली असल्याचे प्रतिपादन अंबादास सगट यांनी केले. तसेच संविधानाचा प्रामाणिकपणे अंमल केला, तरी समरसता प्रस्थापित होईल, असेही ते म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल डॉ. धनंजय भिसे यांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.
 
मीनाक्षी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शीतल खोत यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आसाराम कसबे, धनाजी जाधव, शिवाजी पोळ इत्यादींनी परिश्रम घेतले.
पुस्तकासाठी संपर्क - 9594961858