पंचाचार्य परंपरा आणि महात्मा श्री बसवेश्वर यांच्यातील अनुबंध

विवेक मराठी    07-May-2022
Total Views |
डॉ. श्यामाताई घोणसे । 9890615861
  
पाच हजार वर्षांपासून ही वीरशैव पंचाचार्य परंपरा आहे. स्वत: महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, की माझं आणि शिवाचं युगानुयुगाचं नातं आहे. बसवेश्वर केवळ आपलं नातं सांगतात असं नाही, तर युगानुयुगे भक्ताचं परमेश्वराशी नातं आहे हे सांगण्याची हिंदूंची जी परंपरा आहे, त्यातलं हिंदुत्वदेखील अधोरेखित करतात.


veershaiv lingayat samaj
अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजय शलाकया
चक्षुरुन्मिलितंयेन तस्मै श्री गुरवे नम:।
भारतीय तत्त्वप्रणालीतील आगम आणि निगम या दोन प्रमुख विभागांपैकी शैवागम ही लोकशाही परंपरेला विकसित करणारी, लोकशाही तत्त्वाचा निर्देश करणारी विचारधारा असून त्यातील एक महत्त्वाचं मत म्हणजेच वीरशैव मत, ज्याच्या दोन प्रमुख परंपरा - पंचाचार्य आणि विरक्त, ज्या वैदिक आणि अवैदिक म्हणून ख्यातिप्राप्त आहेत.
खरं तर वेद आणि उपनिषदं यांची किमान पाच-सहा हजार वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय दर्शन शास्त्रातील एक प्रमुख दर्शन, वीरशैव दर्शन असूनदेखील काही जण स्वत:ला आम्ही हिंदूंपासून वेगळे आहोत असं सांगतात आणि पराकोटीचा हिंदुद्वेष बाळगून, वीरशैव आणि लिंगायतदेखील वेगवेगळे असल्याचं सांगून वीरशैवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताहेत.
खरं पाहिलं, तर सगळ्यात मोठं दुखणं आहे आपल्या समाजातील जातिभेदाचं. आज आपण का विभागले गेलेले आहोत? या जातिभेदाचा तीव्र निषेध करणारं एक सूत्र पारमेश्वरागम यांत आपल्याला दिसतं.
आज बसववादी असं म्हणताहेत की आमचा हिंदू धर्माशी संबंध नाही. विरक्त पीठाचार्यांनी हिंदू धर्माअंतर्गत असलेल्या नायनमार परंपरेलादेखील आदरस्थानी मानलेलं आहे. बसवेश्वरांनी त्यांना अनुभवमंटपाचं पहिलं आचार्यपद दिलं, अध्यक्षपद दिलं आणि जातिनिर्मूलनाचा पहिला सक्रिय प्रयत्न केला. भगवान बुद्धांचं जे वाक्य आहे ‘अत्त दीप भव’ - आपणच आपले दीपक झालो पाहिजे, आपणच आपला शोध घेतला पाहिजे आणि आपल्यामधील जो एकत्वाचा धागा आहे त्याला बळकट केला पाहिजे आणि तो धागा आहे हिंदुत्वाचा रेशमी धागा.

 
‘वचनपितामह डॉ. फ.गु. हळकट्टी यांचे महनीय विचार’ या नावाने शिवानुभाव पत्रिका, संपुट 15मध्ये हा लेख आहे. ते म्हणतात, ‘वीरशैव अनुयायांनी आद्यपुरातन या नावाने पंचाचार्यांचा उल्लेख आपल्या वचनांमध्ये केलेला आहे. जोपर्यंत धर्माच्या मूळ सिद्धान्तांमध्ये बदल होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला नवीन धर्म स्थापन केला असं म्हणता येणार नाही. मूळ आहेत - अष्टावरण, पंचाचार आणि षट्स्थल सिद्धान्त. या धर्मात काही बाह्य बदल झालेत आणि ते होतच असतात, कालानुरूप; पण म्हणून त्याने नवीन धर्म-निर्मिती होत नाही.’

वीरशैव आणि लिंगायत हे वेगवेगळे आहेत असं म्हणणं म्हणजे मूळच्या धर्माच्या राष्ट्रीय स्वरूपास नष्ट करण्यासारखं आहे, असं हळकट्टी सर म्हणतात. केवळ नाव बदलल्याने धर्म आणि धर्माची मुख्य लक्षणं बदलत नाहीत.

म्हणजे, वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असं बोलताना आपल्याला सांगितलं जातं की आम्ही वेदांना मानत नाही.. का मानत नाही? तर सिद्धान्त शिखामणीमध्ये असं म्हटलं आहे. त्यात काय म्हटलं आहे की, ‘वेदमार्गविरोधेन विशिष्टाचार सिद्धये असन्मार्ग निरासाय प्रमोदाय विवेकिनाम्।’ याचा अर्थ असा की वेदमार्गाला बाधा न आणता शिवाचाराच्या सिद्धीसाठी आणि विद्वान परंतु विवेकी, लोकांच्या आनंदासाठी वीरशैव सिद्धान्ताची निर्मिती झाली. विद्वान परंतु विवेकी यासाठी की असा विद्वान मनुष्य विवेकी असतो, ज्याला प्रतिकूलतेतसुद्धा स्वत:च्या राष्ट्रधर्माचं विस्मरण होत नाही. बसवेश्वरांनी पंचाचार्य परंपरेप्रमाणे किंवा भारतीय वेदोपनिषदांच्या परंपरेप्रमाणेच वेदांची परंपरा मान्य केली. बसवेश्वर त्यांच्या एका वचनामध्ये म्हणतात, ‘आपलं वर्तन वेदांच्या आज्ञेप्रमाणे, वेदागमांच्या आज्ञेप्रमाणे असलं पाहिजे.’ या संदर्भात इसवी सन 1924मध्ये एक खटला झाला होता. परळी येथे वीरशैवांनी वेदाध्ययन करावं की करू नये, पूजापाठ करावा की करू नये यावर. त्या वेळी तेथील कोर्टाने जो निर्देश दिला, त्यानुसार वीरशैव लिंगायतांना वेदाध्ययन आणि पूजापाठ करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

बसवेश्वर आणि शिवशरण यांच्या वचनांत अनेक वेदश्रुतींचे उल्लेख आहेत. हो, जेथे वेदांनी कर्मठपणा दाखवला आहे, कठोर वचनं दिलेली आहेत, तेथे त्यांना फटकारलेलंदेखील आपल्याला आढळतं. हे कार्य तर महाराष्ट्रात ज्ञानदेवांनीसुद्धा केलंच आहे ना.... ‘वेद कृपणु जाहला त्रिवर्णांच्या कानी लागला।’ पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी वेदांचा सपशेल निषेध केलेला आहे. ‘विष्णु: हृदय: संवत्सरं प्रजजन’ म्हणे श्रुती, अठरा पुराणं, श्रुती किंवा मनुस्मृतीचं एखादं वाक्य मनन करून आचरणात आणताना समस्त प्राण्यांचा विनाश करावा असा एखादा उपाय सांगितला आहे का? - नाही, या सर्वांमध्ये जीवदयाच सांगितलेली आहे. अशा रितीने हृदयात सर्वभूतहितभावना असलेला तो सर्वांपलीकडे स्ववस्तु दसवेश्वर लिंगच होय.

‘अथर्ववेदे शिवोऽमा पितरौ पितृदेवौ भवति पितरौ तस्यमही’ असं म्हटलेलं आहे. परंतु आम्ही आमच्या परंपरेच्या विरुद्ध जेव्हा काही सांगतो, तेव्हा आपण ज्यांना पूज्य मानतो त्यांनाच कमीपणा आणतो आहे, इतकी साधी विवेकाची बाब ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना खरोखर विद्वान म्हणावं का?
परब्रह्म हे सर्वव्यापक आहे आणि निगमागमांनाही त्याचा पार लागत नाही, ही जी हिंदू तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे, तर ‘निर्लेप, निप्पत्ती, निरंजन होऊनी वेदही न जाणती.... शास्त्र, श्रुति-स्मृति तुम्हांस न जाणती..’ यात पुन्हा पुन्हा जे वेद, शास्त्र, पुराण, यांचे उल्लेख येतात, याचं काय कारण असेल? आपल्याला सिद्धान्त शिखामणीतील उक्ती माहीत आहे की ‘वेदशास्त्रपुराणेशु कामिकाद्यागमेशु..’ इष्टलिंग शरीरावर धारण करणं हा जो सिद्धान्त आहे, तो वेद, शास्त्र, पुराणं, कामिकादी अशा 28 आगमांमधून आलेला आहे. ॠग्वेदामध्ये एक ॠचा आहे ‘पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पतये।’ व्यास महर्षींनी लिंगपुराणाच्या उत्तर भागात एकविसाव्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेला आहे. ‘अयं मे हस्तो भगवानयं ते भगवंतर:। अयं माता अयं पिता अयं जीवातूरगमा।’ याचा अर्थ असा की ‘हा लिंगरूपी परशिव माझ्या हातामध्ये आहे, हे करपीठस्थ जे लिंग आहे तेच मला ईश्वररूप असून हेच माझे रोग हरण करणारी दिव्य औषधीही आहे, ते आईप्रमाणे माझे पालन करतात, वडिलांप्रमाणे माझे रक्षण करतात आणि म्हणून हे विश्वबंधो...’ अवघे विश्वची माझे घर, ऐसी मति जयाची स्थिर, हे आमच्या हिंदुत्वाचं सांगणं आहे, जे प्राचीन कालापासून चालत आलेलं आहे. आता याच ॠचेचं उपनिषदकारांनी काय केलं - ‘त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव।’ ही सर्वश्रुत प्रार्थना आहे.

आता हे सगळं ऐकल्यानंतर बसवेश्वर आणि शिवशरण हे वेदविरोधी होते, त्यांनी वेदांचा अपमान केला होता, असं म्हणणार्‍यांनी थोडं थांबून वेद-उपनिषदांचे संदर्भ पाहावेत, पूर्वपरंपरेशी असलेलं त्यांचं नातं पाहावं. तेव्हा लिंगायत बांधवांना आणि नवलिंगायतांनासुद्धा माझं हेच कळकळीचं सांगणं आहे की या सर्व गोष्टींचा अगोदर विचार करा, इतिहासात तुमची नोंद राष्ट्रीय विध्वंसक म्हणून झालेली तुम्हाला चालणार आहे का त्याचाही थोडा विचार करायला हवा. आणि मगच अशी राष्ट्रविध्वंसक आणि समाजाला फोडणारी विधानं करा.

बसवेश्वरांच्या वचनांमधून वेद-श्रुतींचा आश्रय घेतलेला आढळतो, तसेच शिव पुराणातील अनेक संदर्भ मिळतात.
या परंपरेतील पुरातन शैव संतांची वचनं म्हणजे परीस आहेत आणि यायोगे पुन्हा आपण पाहा हिंदुत्वाशी कसे जोडले गेलेले आहोत. यातील काही वचनं नायनमाराशीदेखील संबंधित आहेत आणि जातिभेदामुळे जरा गोठलेल्या, साकळलेल्या हिंदुत्वाला गती देण्याचं काम ज्या भक्ती आंदोलनाने केलं, त्या आंदोलनाचे प्रणेते म्हणून नायनमार आणि अळवार म्हणजे वैष्णव संत आहेत. त्यांनी जो शैव सिद्धान्त सांगितला, त्यामधील चार तत्त्वं म्हणजे सालुक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य हे मोक्षाचे प्रकार, आणि आपल्याकडील भृत्याचार, शिवाचार वगैरे पंचाचाराच्या कल्पनेशी नातं सांगणारं ते आहे. वीरशैवांनी वेदमार्गाला पुष्टी दिली. वेदमार्ग न मानणार्‍या, विशेषत: बौद्ध आणि जैन मतप्रणालींच्या विरोधात ते वैदिकांच्या बरोबरीने उभे राहिले. पण वीरशैवांचं वेगळेपण असं आहे, की वीरशैवांनी वेदमार्गाला बाधा आणली नाही, केवळ त्रिवर्णांना जवळ करणं आणि शूद्रांना आणि स्त्रियांना दूर करणं याचा निषेध केला. कर्मकांडाचा, जातीयतेचा निषेध केला.

भारताच्या सगळ्या धमन्यांमधून गेली हजारो वर्षं जो धर्म, जे तत्त्व वाहत आहे, तो धर्म, सर्वव्यापक आहे आणि सगळ्यांना समजून घेणारा आहे. अलीकडच्या काळात दुर्दैवाने काय झालं आहे की आपल्यासाठी धर्म म्हणजे तापल्या तव्यावर पोळी शेकण्याचं एक साधन झालेला आहे आणि म्हणूनच या सार्‍या गोष्टी आता आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
 
आता दुसर्‍या एका सूत्राकडे मी तुम्हाला नेते. ‘यदा यदा हि धर्मस्य...’ ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी होते, त्या त्या वेळी परमेश्वर अवतार घेतो.. ही सर्व आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीची श्रद्धा आहे. ही श्रद्धा अर्थातच वीरशैवांमध्ये आहे, आद्य शंकराचार्यांमध्ये आहे, ज्याला भागवत धर्म म्हणतो, म्हणजे वारकरी धर्माचा पूर्वावतार आहे तेथेही दिसते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही धर्मग्लानी आली, माणसांनी माणूस म्हणून वागणं सोडून दिलं, तेव्हा तेव्हा काही शिवगणांनी अवतार घेऊन पुन्हा मानवधर्माची आठवण करून दिली पाहिजे असं मानलं गेलं.

पाच हजार वर्षांपासून ही वीरशैव पंचाचार्य परंपरा आहे. स्वत: महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, की माझं आणि शिवाचं युगानुयुगाचं नातं आहे. बसवेश्वर केवळ आपलं नातं सांगतात असं नाही, तर युगानुयुगे भक्ताचं परमेश्वराशी नातं आहे हे सांगण्याची हिंदूंची जी परंपरा आहे, त्यातलं हिंदुत्वदेखील अधोरेखित करतात.

बसवेश्वर म्हणाले होते, ‘ब्रह्माची अवहेलना करू नका; चार पुस्तकं वाचून कोणी विद्वान होत नाही, या अहंकाराने आपलाच नाश होतो, आपला गर्व आपलं कधी आणि कसं अध:पतन करेल, सांगता येत नाही.’ सध्या एक फॅशन झाली आहे असं सांगण्याची की हिंदू आम्हाला मानत नाहीत, हिंदू आम्हाला दूर ठेवतात.

केदारपीठाचे जे जगद्गुरू आहेत, त्यांना जन्मेजयानेदेखील दिलेलं दानपत्र, भूमिदानाचा ताम्रपट आजही तिथल्या मठात आहे. गेली किमान पाच हजार वर्षं हे पीठ समाजात सुसंघटनेचं, समन्वयाचं आणि सामाजिक समरसतेचं तत्त्व रुजवत आहे. प्रतिकूलतेतही त्यांनी लोकांच्या मनातली धर्मभावना जागृत केलेली आहे. आपल्याला लंबनसूत्र काय बघायचं असेल तर लंबनसूत्राचं अतिशय सुंदर आणि मराठमोळं स्पष्टीकरण ज्ञानदेवांच्या अमृतानुभवात आणि चांगदेव पासष्टीमध्ये येतं. त्यामुळे ज्या विद्वानांना वाटतं ना, की आम्हाला कोण विचारतंय.. त्यांनी समकालीन अन्य संप्रदायांचादेखील अभ्यास केला पाहिजे.

आतापर्यंत ज्या समाजामध्ये मी सन्मानाने जगले, त्यांच्याबद्दल तुम्ही असं कसं लिहिता? का इतका हिंदुद्वेष तुमच्या मनात? आज माझी स्थिती पंचतंत्रातल्या त्या गंगदत्त बेडकासारखी होणार आहे हे मला कळत कसं नाही? आज आपण आम्ही हिंदू नाही, आम्ही वीरशैव नाही, आम्ही लिंगायत नाही, आम्ही कोणीच नाही? आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार, आम्ही हेकटपणा तरी करणार किंवा आम्ही आत्ममग्न तरी राहणार. आणि करणार काय, तर या सगळ्यामध्ये माझ्या राष्ट्राची वाट लागली तरी चालेल, मला संपवलं तरी चालेल किंबहुना अशा संपवणार्‍यांना मी संधी तरी देणारच आहे.
 
मला वाटतं बंधु-भगिनींनो, हेच पंचाचार्यांनी, महात्मा बसवेश्वरांनी, भारतातील सगळ्याच संतसज्जनांनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी वीरशैव लिंगायत संप्रदायाच्या रूपाने जातिभेदविरहित, आत्मसामर्थ्यसंपन्न समाजनिर्मितीचा प्रयत्न केला. आज समाजात जातीय अस्थिरता दिसते आहे, अंधश्रद्धा दिसते, भाषावार प्रांतरचना दिसते आणि त्याच्या नावावर सवत्या-सुभ्याची मागणी केली जाते आणि या तापलेल्या की तापवलेल्या तव्यावर स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजणारे स्वयंघोषित पुढारी, सोशल मीडिया, समूहमाध्यमातून भडक, कडक अशा पोस्ट्स टाकणारे, भाषण करणारे, सवंग लोकप्रियतेच्या मागे लागणारे लोक दिसतात. या संकुचित वृत्तीला आपण खतपाणी घालायचं की त्याचा आपल्या पद्धतीने प्रतिकार करायचा? आपली राष्ट्रीय एकात्मता इतकी सवंग नाही. तथाकथित मार्गदर्शक विचारवंत आहेत आणि आपण मात्र डोळ्यावर किती काळ कातडं ओढून बसणार आहोत, कानात बोळे घालून बसणार आहोत?
 
एक नक्कीच आहे की आपण लोकशाहीवादी आहोत, लोकशाहीला, राज्यघटनेला मानणारे आहोत. आपल्याला हा लढा लढायचाच आहे, आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करायचंच आहे; मात्र ते करत असताना आपण मन:परिवर्तन करण्यासाठी धमकी देऊन नाही चालणार, हे परिवर्तन प्रेमातूनच केलं गेलं पाहिजे. आज आपण केवळ जातीपातीत विभागलेले आहोत असं नाही, तर दुर्दैवाने वीरशैव, लिंगायत असेही विभागले जात आहोत. तेव्हा यापुढे आपल्या बोलण्यात, आपल्या कृतीत एकवाक्यता ठेवली गेली पाहिजे. बोलायचं असेल तर बोल कसे हवे - धाग्यात गुंफलेल्या मोत्यांप्रमाणे. शब्द कसे हवे - लखलखणार्‍या माणकासारखे, निळाईला छेद देणार्‍या स्फटिक रेषेसारखे. बोल असे हवेत की ईश्वरानेदेखील मान तुकवली पाहिजे, ग्वाही दिली पाहिजे की वाह, हे बोलताहेत ते सत्य आहे. मात्र हे कधी होईल? जेव्हा या बोलण्याला उक्तीची जोड मिळेल, कृतीची जोड मिळेल आणि मग त्या वेळेला आपण सगळे नक्कीच अभिमानाने म्हणू की ‘हो, आम्हीच वीरशैव आहोत, आम्हीच लिंगायत आहोत आणि आम्हीच व्यापक अशा हिंदू धर्माचा एक भाग आहोत.’


शब्दांकन - अनुराधा धर्माधिकारी
। 9909089169