रायवळ आंबे टिकवू या

विवेक मराठी    07-May-2022
Total Views |
@विजय सांबरे। 9421329944

हापूसची गोडी अविटच आहे, यात शंका नाही. म्हणून आपले देशी आंबे म्हणजे टाकाऊ नाहीत, हे ध्यानी घ्यायला हवे. व्यावसायिक तत्त्वावर केलेल्या हापूसच्या सार्वत्रिक लागवडीमुळे आपल्याकडे पूर्वीपासून असलेले रायवळ आंब्यांचे वैविध्य आपण गमावत चाललो आहोत, या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुर्मीळ होत चाललेल्या देशी जंगली आंब्याच्या जातींचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे.

mango
आम्रवृक्षाचे मूळ भारतीय उपखंडात मानले जाते. पुराजीव शास्त्रज्ञांच्या अभ्यासात लाखो वर्षे प्राचीन जीवाश्मात आंब्याचे पुरावे आढळले आहेत. हिंदुस्थानातील बहुतांश उष्ण प्रदेशात सुमारे चार हजार वर्षांपासून आंब्याची लागवड होते आहे. संस्कृत वाङ्मयातून याचा पुरावा मिळतो. कोश वाङ्मयात आंबा या शब्दाला अलिप्रिया, करक, कामवल्लभ, कामशर, कामांग, केशवायुध, कोकिलावास, कोशिन, चामरपुष्प, चुत, चूतक, प्रियाम्बू, भृंगाभिष्ट, मधुद्रुम, मध्वावास, माकंद, मन्मथालय, मृषालक, मोदाख्य, रसाल, रसालय, लक्ष्मीश, वसंतद्रुम, शिववल्लभ, स्त्रिप्रिय, सहकार, सौरभ अशी अनेक पर्यायी नावे आहेत. आंब्याशी संबंधित अनेक ग्रामनामे सर्वदूर आढळतात. अंबित, आंबेघर, आंबेगाव, आंबेवंगण, आंबेठाण, आंबेवणी, आंबा, अंबवडे, आंबे हातविज ..... अशी कितीतरी मोठी यादी तयार होईल.

 
भारतीय उपखंडात आंब्याच्या 1300 जातींची नोंद आहे. त्यापैकी फक्त पंचवीस ते तीस जातींच्या आंब्यांना व्यापारी महत्त्व आहे. आंब्याचे मुख्य भेद दोन - एक ‘रायवळ’ किंवा ‘गावठी’ व दुसरा ‘कलमी’. जाती अनेक आहेत. काही तज्ज्ञ ‘इससाल’ नावाच्या चांगल्या जातीच्या बीच्या रोपापासून तयार केलेला आणखी एक प्रकार असल्याचे सांगतात. तो महाराष्ट्रातच असावा. आपल्या देशाची प्रदेशनिष्ठ अशी आम्रविविधता खूप मोठी आहे. अगदी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ते कर्नाटक, गोवा, तामिळनाडूपर्यंत नानाविध नामांकित जातीचे आंबे खवय्यांची भूक भागवतात. वानगीदाखल सांगायचे, तर उत्तर प्रदेशचा फजरी, चौसा, गोपाळभोग व दशेरी, बिहारचा लंगडा व हेमसागर हे आंबे प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात नीलम, रुमाली, बेनिशान, तोतापुरी, तर कर्नाटकात मडप्पा, पीटर या नावाच्या नामांकित जाती आहेत. गोव्यातील मांकुराव आंबा तर हापूसपेक्षा चढ्या भावाने विकला जातो. गोव्यातील चोराव आयलँड फार्मर्स क्लब पाकिस्तानातील कराचीला दर वर्षी टनाने हा आंबा निर्यात करतो. वरील उदाहरणे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आंब्यांची आहेत. याशिवाय अनेक ज्ञात-अज्ञात आंबे देशभर आढळतात.


mango
मापलाथोटा भट्ट - रायवळ आंब्यांच्या 80पेक्षा जास्त जातींची लागवड करणारे कर्नाटकातील शेतकरी

आजघडीला मात्र आपण सर्व प्रकारच्या विविधतेपासून दुरावत चाललो आहे. अन्नधान्यातील खाद्यवैविध्य जसे संपले आहे, तशी शोकांतिका आपण आंब्याच्या बाबतीत अनुभवतो आहे. आपले मूळ स्रोत ते सर्व कालबाह्य, कुचकामी व परदेशातून आलेले सर्वोत्तम, या मानसिक गुलामगिरीतून आपण पोर्तुगीजांनी आणलेला हापूस आंबा डोक्यावर घेऊन नाचतो आहोत. हापूस म्हणजे राजा या मनोभूमिकेतून आपण त्याचे नको तितके अवडंबर माजवले आहे. ‘आंब्यात आंबा हापूस, सावळीचा सुंदर कापूस, इंग्लंडची राणी दिलखुश, टाकून तोंडात हापूसची फोड, नेहरू अन क्रुशेव बोलतात गोड...’ असे गमतीशीर गाणे आमच्या घाटावरील आजी म्हणून दाखवायच्या. त्यातील भारताचे पंडित नेहरू, रशियाचे क्रुशेव व इंग्लंडची राणी हे त्रिकूट व हापूस यांचा संबंध काय? हा त्या वेळी बालसुलभ मनाला पडलेला प्रश्न आजही अनुत्तरित आहे. असो! विनोदाचा भाग सोडू. पण हापूसचे हे गारुड चिंताजनक आहे, हे मात्र खरे. हापूसची बदनामी करणे हा हे लिहिण्यामागचा उद्देश नाही, हे वाचकांनी कृपया समजून घ्यावे. हापूसची गोडी अविटच आहे, यात शंका नाही. म्हणून आपले देशी आंबे म्हणजे टाकाऊ नाहीत, हे ध्यानी घ्यायला हवे. त्याचीसुद्धा एक गोडी आहे, चव आहे. नैसर्गिकरित्या तयार होणार्‍या रानटी रायवळ आंब्याला थळश्रव/जीसरपळल या टॅगची गरजच नाही. वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना बौद्धिक स्वामित्व या संकल्पनेतून भौगोलिक निर्देशांक (जी आय टॅग) मिळत असतो. तसा तो देवगड हापूसलाही मिळाला आहे. कोकणपट्टीत सर्वत्र हापूस पिकतो.. अगदी गुजरातमध्येसुद्धा व कोकणाबाहेर जुन्नरलासुद्धा. दर वर्षी हमखास उत्पादन मिळावे यासाठी विषारी रसायनांचा वापर, बिगर हंगामी (जानेवारी महिन्यात) हापूस येण्यासाठीचे कृत्रिम प्रयोग या गोष्टी किती शाश्वत आहेत, किती शास्त्रशुद्ध आहेत, हे आपण कधी तपासणार? एकूणच भविष्यात आंबा म्हणजे हापूस असाच ट्रेंड पडणार. यात आर्थिक लाभाच्या कितीही संधी दिसत असल्या, तरी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची एकल पीकपद्धती तितकीच धोकादायकही आहे, हे सर्व घटकांनी लक्षात घ्यायला हवे. आजही हापूस आंबा बाजारात पाठवण्यासाठी ज्या लाकडी पेट्या वापरतात, त्या रायवळ आंब्याच्या लाकडापासून बनवतात. थोडक्यात, या उपक्रमातून लाडका हापूस हा रायवळचा काळ ठरतो आहे, हे निश्चित. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुर्मीळ होत चाललेल्या देशी जंगली आंब्याच्या जातींचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे.


mango
अस्तंगत होत असलेल्या आम्रवैविध्याचा धांडोळा घेण्याचे काम पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राने (सीईईने) केले आहे. 2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी शालेय मुलांच्या व शिक्षकांच्या सहभागातून सह्याद्रीतील आंब्याची विविधता नोंदवली. यातून खूपच रंजक माहिती पुढे आली. स्थानिक लोक आंब्याच्या झाडाला ज्या नावाने ओळखतात, अशा नावांची यादी मुलांनी केली, फळांचे फोटो घेतले व गुणवैशिष्ट्ये नोंदवली. एकूण 205 प्रकारच्या गावठी आंब्यांची यादी या अभ्यास प्रकल्पातून तयार झाली. त्यात आकारानुसार, चवीनुसार आंब्यांची नावे पडलेली आहेत. मधगोटी, साखरगोटी, तांबड्या, बाटी हापूस, केसरी, नकटा तामट्या, चिकाळू, साखर्‍या, नारल्या, खोबर्‍या, शेपट्या, दगडी, धब्बा, अंबुटकी, कापा, कारल्या, केशर्‍या, गोटी, गोधडी, घागरी, जरंबा, टांक, ढाखला, बरका, बाठळ, बोरशा, गाडगी, लिटी, शेंदर्‍या, घडिया, भिकुले, नकट्या, भेगपड्या अशी मजेशीर नावे असणारी आम्रप्रभावळ या देशी नांदत होती, हे वाचताना आपण विस्मयचकित होतो. या नानाविध वैशिष्ट्यपूर्ण आंब्यांची लागवड व कलम करण्याचा उपक्रम सह्याद्रीतील शाळांमध्ये इको क्लबच्या माध्यमातून घेण्यात आला.

संगमनेरच्या लोकपंचायत संस्थेने कळसूबाई-हरिश्चंद्र परिसरात वीस गावांतील शालेय मुले, युवक व महिला यांच्या पुढाकारातून गावठी आंब्याच्या कोयींचे संकलन व रोपवाटिका तयार केल्या. शेतांच्या बांधांना व देवरायांमधील मोकळ्या जागेत शेकडो रोपांची लागवड केली आहे.


mango

‘बायफ’ संस्थेने महाराष्ट्रातील अहमदनगर, पालघर, गडचिरोली या निवडक जिल्ह्यांत स्थानिक गावकर्‍यांच्या व शालेय मुलांच्या मदतीने रायवळ आंब्यांच्या नोंदी घेण्याचा उपक्रम राबवला आहे. अकोले (17 प्रकार), जव्हार (7 प्रकार), एटापल्ली (13 प्रकार) या तालुक्यांत किमान 37पेक्षा अधिक आंब्यांची नोंद केली आहे.


 
महाराष्ट्रात वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात नानाविध रंग-चवींच्या रायवळ आंब्यांचे जतन व संवर्धन कार्य मागील सात-आठ वर्षांपासून हाती घेतले आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड हा जिल्हा सह्याद्रीतील एक महत्त्वाचा प्रांत आहे. जीवविविधतेने संपन्न अशा या परिसरात गावोगाव असंख्य गावरान आंब्याच्या जाती आढळतात. कानडी भाषेत त्यांना काडू मावू असे संबोधतात. अस्तंगत होत असलेल्या आंब्यांच्या जतनासाठी येथील स्थानिक शेतकरी पुढे आले आहेत. मारकांजा गावातील मापलाथोटा भट्ट नावाच्या प्रयोगशील शेतकर्‍याने मागील 25 वर्षांत तब्बल 80 प्रकारच्या रायवळ आंब्यांचे जतन केले आहे.


mango
या पार्श्वभूमीवर रायवळ आंबा का टिकला नाही व आता जर टिकवायचा असेल, तर व्यापक स्तरावर काय प्रयत्न करता येतील? यावर विचारमंथन व प्रत्यक्षात कृती करायला हवी. अभ्यासकांच्या मते लोणचे उद्योगामुळे कच्च्या आंब्याचा वारेमाप वापर होतो व त्यामुळे नैसर्गिकरित्या पक्व कोयीपासून नवीन रोपे निर्माण होत नाही, या मताचासुद्धा अभ्यास व्हायला हवा. आजघडीला पर्यावरण रक्षण व जीवविविधता संवर्धन याविषयी समाज संवेदनशील बनत आहे. विविध सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते, अभ्यासक, आम्रप्रेमी मंडळी आपल्या पातळीवर विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांना या आंबा संवर्धनाच्या व्यापक प्रयत्नात कार्यरत करता येईल. नानाविध गोडीचे आंबे फक्त आपण पिढ्यान पिढ्या चाखत आलो, पण पद्धतशीररित्या त्या आंब्यांची लागवड, जोपासना यात आपला ग्रामीण व आदिवासी भाग मागे पडला, हे नाकारता येणार नाही. आता या कामी फार मोठी संधी आहे. परिसरातील दर्जेदार आंब्याचा अभ्यास करून त्याच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे. जीवविविधता कायदा, वनाधिकार कायदा, रोजगार हमी योजना या कायदेशीर चौकटीत आम्रसंवर्धनाचे कार्य निश्चित पुढे नेता येईल, त्यातूनच ‘रायवळ आंब्यांच्या देशा’ ही आपली ओळख टिकेल व गोव्याच्या भूमीतील लोकगीते महिला आनंदाने गातील...

आम्या तुजो ताळो ...ताळो मोडूनी रथ घडियालो


लइराई मातेचो रथ घडियालो...

लइराई मातेची ही करुणा

लइराई मातेला जाऊ शरणा

दारातला आंबा गे तो

तवरानी झेले गे ..तवरानी झेले गे

रवळनाथ देव माणार येता परसादी बोले गे..


mango@विजय सांबरे। 9421329944