ट्रस्ट म्हणजे काय?

सदर : आरोग्य... स्वयंसेवी संस्थांचे

विवेक मराठी    10-Jun-2022
Total Views |
@सीए चंद्रशेखर वझे  । 9820424072
स्वयंसेवी संस्थांचा विचार करताना ‘ट्रस्ट’ हा विषय सर्वात महत्त्वाचा असतो. त्यासाठी ट्रस्ट म्हणजे नक्की काय? त्याबाबतचे कायदे काय आहेत? याविषयी थोडक्यात माहिती देणारा लेख.

trust

’ट्रस्ट’ म्हणजे अर्थातच ’विश्वास’. कोणाचा विश्वास? कोणावर विश्वास? कशासाठी विश्वास?
 
या लेखमालेमध्ये ’ट्रस्ट’ हा शब्द व्यापक अर्थाने सोयीसाठी वापरला जाईल. म्हणजे ’सोसायटी’ ’ना नफा कंपनी’ या वेगवेगळ्या कायद्यांतर्गत स्थापन होत असल्या, तरी आपण ’ट्रस्ट’ या संज्ञेमध्ये या सर्वांचा उल्लेख करू या. मात्र संदर्भ वेगळा असेल तर अर्थातच या शब्दाची व्याप्ती कमी होईल किंवा बदलेल.
 
 
’ट्रस्ट’मध्ये तीन व्यक्ती असतात.
 
एक - संस्थापक - सेट्लर, ऑथर, निर्माता.
 
दुसरे ’विश्वस्त’ - निर्माता विश्वासाने कोणाकडे काही सोपवतो, दायित्व देतो तो ’ट्रस्टी’.
तिसरे म्हणजे ’लाभार्थी - बेनेफिशिअरी. ज्याच्यासाठी ट्रस्ट निर्मिलेला असतो.
उदाहरणार्थ, एका आजोबांना तीन मुले आहेत. सहा नातवंडे आहेत. ती लहान आहेत. आजोबा आपली मालमत्ता, पैसा-अडका आपल्या तीन मुलांकडे देतात; मात्र त्यांच्यावर बंधन घालतात की ती मालमत्ता त्यांनी नातवंडांच्या हितासाठी (शिक्षण, विवाह, आरोग्य) वापरावी.
 
यात आजोबा आहेत सेट्लर किंवा निर्माता. त्यांची मुले ही विश्वस्त आणि नातवंडे ही लाभार्थी आणि ती मालमत्ता म्हणजे ’विश्वस्त निधी’ (ट्रस्ट फंड.)
 
मुलांनी नेमके काय करावे, पैसे कसे वापरावेत वा गुंतवावेत, निर्णय कसे घ्यावेत, त्यांचे अधिकार काय, कर्तव्ये कोणती या सर्व मार्गदर्शक गोष्टी आजोबा लिहून ठेवतात. कोणत्या नातवाचा किती हिस्सा हेही लिहितात. याला म्हणतात ’ट्रस्ट डीड’.
 
या उदाहरणात सगळे लाभार्थी हे निर्मात्याचे नातलग आहेत. कुटुंबीय आहेत. पण समजा, आजोबांनी ठरवले की सगळ्या मालमत्तेचा विनियोग समाजहितासाठी व्हावा, तर नातवंडांऐवजी ते तसे लिहितील - म्हणजे लोकांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, संशोधनासाठी, पर्यावरणासाठी.
 
यावरून ’ट्रस्ट’चे किंवा ’न्यासा’चे दोन मुख्य प्रकार होतात. एक खाजगी ट्रस्ट (नातवंडे किंवा कुटुंबीय, विशिष्ट व्यक्ती) आणि ’सार्वजनिक ट्रस्ट’ (समाज). प्रायव्हेट ट्रस्ट आणि पब्लिक ट्रस्ट.
 
 
समाज म्हणजे सर्व नागरिक असे गरजेचे नाही. समाजाचा मोठा घटक - विशिष्ट धर्माचे, ज्ञातीचे लोक, महिला, विद्यार्थी, वृद्ध लोक, अनाथ मुले इत्यादी.
 
 
या लेखमालेत आपण ’सार्वजनिक न्यासा’चाच - पब्लिक ट्रस्टचाच विचार करणार आहोत. खाजगी म्हणजे ’प्रायव्हेट ट्रस्ट’ हा या विषयाच्या कक्षेत येत नाही. जरी या आजोबांचे कुटुंबीयच या निधीचे व्यवस्थापन करणार असतील, ट्रस्टचे नाव कुटुंबातल्या व्यक्तीचेच असेल तरी लगेच तो ’खाजगी’ ट्रस्ट होत नाही - जर लाभार्थी हे समाजातील मोठा घटक असतील तर तो सार्वजनिक ट्र्स्टच धरला जातो. थोडक्यात म्हणजे संस्थापक कोण, यापेक्षा लाभार्थी कोण यावर ’खाजगी’ की ’सार्वजनिक’ हे ठरते. असो.
 
 
आता ‘सोसायटी’ म्हणजे काय? ही सोसायटी ’सोसायटीज रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1860’खाली स्थापन केलेली असते. ‘सहकारी संस्था’ म्हणजे ’को-ऑपरेटिव्ह’ सोसायटी नव्हे. ती सहकारी संस्था कायदा 1960च्या अंतर्गत असते. थोडक्यात म्हणजे या लेखमालेत ’सोसायटी’ म्हणजे ’सहकारी संस्था (को-ऑप. सोसायटी)’ नव्हे, हे लक्षात ठेवायला हवे.
 
 
trust

तिसरा कायदा म्हणजे ’कंपनीज अ‍ॅक्ट - कंपनी कायदा’. कंपनी कायदा 1956 कलम 25 किंवा नवीन कायदा 2013 अन्वये कलम 8 खाली ’ना नफा कंपनी’ स्थापन करता येते. साधारणपणे ’कॉर्पोरेट’ मानसिकता असलेले लोक या प्रकाराला पसंती देतात. सोसायटीत किंवा कंपनीत ’संस्थापक’ असा वेगळा नसतो. सात किंवा अधिक लोक एकत्र येऊन ’सोसायटी’ स्थापन करतात किंवा दोन किंवा अधिक लोक एकत्र येऊन ’ना नफा कंपनी’ स्थापन करतात. ट्रस्टसुद्धा दोन किंवा अधिक लोक एकत्र येऊन स्थापन करू शकतात. एक संस्थापक आणि एक विश्वस्त.
 
 
सोसायटीच्या आणि कंपनीच्या बाबतीत जे संस्थापक असतात, त्यांना ’प्रवर्तक’ (प्रमोटर) म्हणता येईल. ते सोसायटीची घटना आणि नियमावली बनवतात. त्यात उद्दिष्टे स्पष्ट करतात. जसे ट्रस्ट डीडने ट्रस्टचे नियमन होते, तसे घटना, नियमावली आणि संबंधित कायदे यांनुसार सोसायटी-कंपनीचे नियमन होते.
 
 
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी - सोसायटीज रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1860 आणि कंपनीज अ‍ॅक्ट 2013 हे अखिल भारतीय कायदे आहेत. मात्र घटनेनुसार ’सार्वजनिक न्यास’ ही गोष्ट राज्यांच्या अधिकारात येते. त्यामुळे भारतात केवळ मोजक्या म्हणजे 6 ते 7 राज्यांनीच आपापले ’सार्वजनिक न्यास’विषयीचे कायदे बनवले आहेत. महाराष्ट्रात ’महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट्स अ‍ॅक्ट 1950’ हा कायदा लागू आहे. तात्पर्य - अनेक राज्यांत स्वत:चा असा ’पब्लिक ट्रस्ट’ कायदाच नाही.
 
 
ट्रस्टच्या स्वरूपाविषयीचे आणखी विवरण पुढील लेखामध्ये बघू या.