“संघ ही अनुभवण्याची गोष्ट” - हरीशजी कुलकर्णी

विवेक मराठी    10-Jun-2022
Total Views |
 
परभणी : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ पुस्तकातून समजणारी बाब नसून संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या शाखा स्तरापासून अनुभव घेण्याची गोष्ट आहे” असे परभणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत कार्यवाह हरीशजी कुलकर्णी यांनी परभणी येथे झालेल्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप भाषणात प्रतिपादन केले.
 

RSS
 
मागील 21 दिवसांपासून परभणी येथील राजे संभाजी गुरुकुल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता या संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सातेफळ तालुका वसमत येथील प्रल्हादजी बोरगड, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक व वर्ग अधिकारी अनिलजी भालेराव, परभणी शहर संघचालक डॉ. रामेश्वरजी नाईक, वर्गाचे कार्यवाह अभिजितजी अष्टूरकर आदींची उपस्थिती होती.
 
 
वर्गाचे कार्यवाह अभिजित अष्टूरकर यांनी समारोपाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रल्हाद बोरगड यांनी आपले मनोगत मांडले. या प्रसंगी व्यासपीठावरून प्रमुख वक्ते हरीशजी कुलकर्णी यांनी “ज्यांना कुणाला संघ समजून घ्यावयाचा आहे, त्यांनी संघाचा किमान एक वर्ष तरी अनुभव घ्यावा आणि मगच ठरवावे की, संघाबरोबर काम करायचे की नाही. संघाच्या अनुभवाशिवाय संघ समजला जाऊ शकणार नाही” असे प्रतिपादन केले. संघाची कार्यपद्धती, संघाची रचना, संघकार्याचा विस्तार अशा संघाच्या विविध पैलूंवर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, हिंदू समाजात एकात्मता भाव निर्माण करणे गरजेचे आहे. आम्ही राष्ट्र म्हणून सर्व जण एक आहोत ही भावना रुजली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे आहे. स्वयंपूर्ण व सक्षम स्वयंसेवक व कार्यकर्ते घडविण्याचे काम अशा प्रकारच्या 21 दिवसाच्या संघ प्रशिक्षण वर्गातून होत असते. अशा प्रकारचे वर्ग देशभरातून विविध ठिकाणी होत असतात. त्यापैकीच देवगिरी प्रांताचा या वर्षीचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग परभणी येथे आयोजित करण्याचे भाग्य परभणीकरांना मिळाले.
 

RSS
 
देवगिरी प्रांतच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गासाठी एकूण 142 स्वयंसेवक सहभागी झाले आणि प्रशिक्षित होऊन संघकार्याचा संकल्प घेऊन ते आता समाजात काम करतील.
 
 
या समारोपाचे बौद्धिक होण्यापूर्वी वर्गाचे मुख्य शिक्षक अभिजित बहिवाळ यांनी स्वयंसेवकांकडून संघ शिक्षा वर्गात घेतलेल्या प्रशिक्षणातील नियुद्ध, दंड युद्ध, यष्टी, समता, पदविन्यास इत्यादी विविध प्रकारच्या शारीरिक अभ्यासाची प्रात्यक्षिके करून घेतली.


पोळी संकलन - एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

या वर्गाच्या शिक्षार्थींसाठी संघाच्या स्वयंसेवकांनी एका पूर्वनियोजनबद्ध कार्यपद्धतीद्वारे 21 दिवसांच्या नित्य भोजनाची व्यवस्था केली होती. यात दररोज परभणी शहर व ग्रामीण भागातून शिक्षार्थींच्या संख्येनुसार पोळी संकलन करण्यात आले. त्यामुळे या संघ शिक्षा वर्गात मातृशक्तीचे योगदान मोलाचे ठरले.
 
21 दिवसांच्या या संघ शिक्षा वर्गात नित्य बौद्धिकातून सहभागी स्वयंसेवकांना शारीरिक व बौद्धिक विविध विषयांवर अनेक विद्वान मान्यवरांचे विचारदर्शन घेता आले. दररोजच्या बौद्धिक सत्रामधून स्वयंसेवकांना संघाची कार्यपद्धती, ध्येयधोरणे व संकल्पना स्पष्ट होत गेल्या.
 
 
RSS
 
अशा या वैशिष्ट्यपूर्ण संघ शिक्षा वर्गासाठी अनेकांनी विविध स्वरूपात आपले योगदान दिले आहे. परभणी जिल्ह्यासह अनेक ठिकाणांवरून या संघ शिक्षा वर्गाच्या व्यवस्थेकरिता स्वेच्छेने 75 स्वयंसेवक आले होते. अशा सर्व स्वयंसेवकांनी शिस्त व अनुपालनाद्वारे आपली जबाबदारी पूर्ण करून संघ शिक्षा वर्गास आपले योगदान दिलेले आहे.
 
संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेले समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
 
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
 

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )

सा. विवेकच्या ‘कर्तव्यभूमीचे पुजारी’ या उपक्रमाअंतर्गत पहिल्या 5 पुस्तिका नुकत्याच प्रकाशत झाल्या. साहित्याच्या कथनात्म आविष्काराचा साज चढवून नेमकेपणाने स्वयंसेवकाचे संपूर्ण भावजीवन केवळ 32 पानांमध्ये सामावून घेण्याचा अनोखा प्रयत्न या पाचही पुस्तिकांमधून केला आहे. पाच वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केलेल्या पाच स्वयंसेवकांची ही गाथा आहे.


फक्त २५०/- रुपयांत
https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/