पृथ्वीमाहात्म्य

13 Jun 2022 17:39:57
@डॉ. श्रीकांत कार्लेकर । 9764769791
 
पृथ्वीसारखाच ग्रह शोधण्याचे असे प्रयत्न चालू असले, तरी आपल्या पृथ्वीला अवकाशाच्या प्रचंड पसार्‍यात आजही तितकाच सक्षम पर्याय नाही, हे सत्य आहे आणि म्हणूनच तिच्या रक्षणाचे सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पृथ्वीचे हे वेगळेपण कळावे, म्हणूनच ’एकमेवाद्वितीय पृथ्वी’ (Only one Earth) असे या वर्षीचे पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य होते! नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे वेगळेपण सांगणारा लेख.

earth
 
संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nationsने) वर्ष 1972मध्ये जागतिक पर्यावरण दिवस पुरस्कृत केला आणि वर्ष 1974पासून दर वर्षी 5 जून हा दिवस पर्यावरणासंबंधी जागृती आणि पर्यावरण रक्षण ह्या मुख्य उद्देशाने जगभरात साजरा केला जातो आहे. हा खर्‍या अर्थाने लोकांचा दिवस असून त्यांनी वैयक्तिक पातळीवर, गटागटाने किंवा समूहाने, स्थानिक पातळीवर किंवा राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत, असे या मोहिमेमार्फत सगळ्यांना आवाहन केले जाते.
आज या मोहिमेत जगातले 150 देश दर वर्षी सक्रिय सहभाग घेतात. पर्यावरणाच्या विविध समस्या, त्याचा र्‍हास, असंतुलन या संदर्भांत दर वर्षी वेगवेगळी घोषवाक्ये (Themes) घेऊन ही मोहीम चालवली जाते. या दिवसाचे यजमानपद (Host) दर वर्षी एखाद्या देशाला दिले जाते. पर्यावरण रक्षण व संधारण यांत जगभरात जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचा आढावा घेऊन यजमान देश त्यास भरपूर प्रसिद्धी देतो आणि त्या वर्षीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देतो.
या वर्षीचे पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य ’एकमेवाद्वितीय पृथ्वी’ (Only one Earth) असे होते आणि या दिवसाचे यजमानपद स्वीडनकडे सोपवण्यात आले होते. 2018मध्ये हे यजमानपद भारताकडे होते आणि त्या वेळचे घोषवाक्य ’प्लास्टिक प्रदूषणाशी सामना’ असे होते. या वर्षी ’एकमेवाद्वितीय पृथ्वी’ (Only One Earth) या थीमवर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. असे घोषवाक्य असण्याचे कारण म्हणजे विश्वात अब्जावधी आकाशगंगा आणि आपल्या आकाशगंगेत अब्जावधी ग्रह असूनही त्या सर्वांत आपली पृथ्वी ‘फक्त एकमेव पृथ्वी’ आहे. ’Only One Earth’ या घोषवाक्याच्या अनुषंगाने निसर्गाशी एकरूपतेने जगणे आवश्यक असल्याचा संदेश दिला जावा, असा त्याचा उद्देश होता. पृथ्वीच्या संरक्षणासाठी, तिच्या पुनर्निर्माणासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर काय प्रयत्न करायला हवेत यासाठी जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

 
आपल्या आजूबाजूचे नैसर्गिक पर्यावरण सध्या लक्षणीय वेगाने बदलते आहे. पूर्वी पर्यावरणात होणारे नैसर्गिक बदल सहजासहजी लक्षात येत नसत. पण गेल्या काही वर्षांतल्या, विशेषत: विसाव्या शतकाच्या अखेरीच्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना पाहता पर्यावरणातील बदलांची प्रक्रिया जलद होऊन बदलांचा वेगही खूपच वाढल्याचे जाणवते आहे.
 
 
माणसाच्या विविध क्रिया-प्रक्रियांमुळे, पृथ्वी माणसालाच राहण्यासाठी प्रतिकूल बनत असल्याची अनेक उदाहरणे रोज आपल्यासमोर येत आहेत. पृथ्वीवरील पृष्ठजल, भूजल, मृदा, वनस्पती आणि वातावरणाचा थर यातील बदलांचा विचार करता गेल्या पाच हजार वर्षांचा काळ हा मनुष्ययुगाचा कालखंड आहे, असा दावा काही शास्त्रज्ञ करीत आहेत.

 
कोणताही अडथळा नसेल, तर पृथ्वीवरील जीवविविधता घातांकी दराने वाढत राहते. मात्र गेल्या काही शतकांत माणसाच्या निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे ही वाढ काही ठिकाणी संथ गतीने होते आहे, तर काही ठिकाणी पूर्णपणे थांबली आहे. माणसाच्या निसर्गातील व पर्यावरणीय प्रक्रियांतील वाढत्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील जीवविविधता झपाट्याने कमी होत असून पृथ्वीवरील सर्व परिस्थितिकी संस्था (Ecosystems) या एकसारख्याच बनू लागल्या आहेत. त्यातील वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 2010मधील एका संशोधनानुसार जगातील सगळ्या समुद्रातील हरित प्लवकांचे (Phytoplanktonsचे) प्रमाण गेल्या दशकात निम्म्यावर आले आहे. प्रवाळ व प्रवाळ प्रदेश, सदाहरित जंगले आणि आर्द्रभूमी प्रदेश ही पृथ्वीवरची ऊर्जाकेंद्रे आहेत. इथूनच जैविक विविधता सर्वदूर पसरते. त्यांच्या विनाशाला आणि लोप पावण्याला आजचा मनुष्यच कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या मते आत्ताच्या अंदाजानुसार सध्या अस्तित्वात असलेले प्रवाळ हे या मनुष्ययुगातील घटनांचा पहिला बळी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या लाखभर वर्षांत वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण 180पीपीएम पासून 280 पीपीएमपर्यंत बदलते राहिले आहे.
 
 
आपण वेगाने बदलणारे आणि अत्यल्प विविधता असलेले एक एकसुरी जग आपल्याभोवती तयार करतो आहोत. या जगात अनेक जीवजंतूंच्या जमाती लोप पावत आहेत. गवताळ प्रदेश वाळवंटे बनत आहेत. वेगाने वाढणारी शहरे पृथ्वीचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहेत. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. त्यानंतरच्या काळात अंतराळातून अनेक वेळा लक्षावधी लघुग्रहांचा पृथ्वीवर मारा झाला. अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूखंडे, समुद्र आणि भूरूपे तयार झाली. आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक यासारखे अनंत आघात झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर झालेला जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत ही पृथ्वी आजही भक्कमपणे टिकून आहे.


earth
पृथ्वी सूर्यापासून अगदी आदर्श अशा अंतरावर आहे. हे 15 कोटी कि.मी. अंतर सजीवांच्या अस्तित्वासाठी आणि उत्क्रांतीसाठी अगदी नेमके आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आज एका प्रदीर्घ उत्क्रांतीचा साक्षीदार आहे. विविध ठिकाणी आढळणारे, खनिजभूत आणि शीलाभूत स्वरूपात अश्मीकरण झालेले प्राण्यांचे सांगाडे, दात, झाडांची पाने, बिया आणि त्यांचे ठसे यावरून अशा विविधरंगी जीवनाचा पुरावा मिळतो. आतापर्यंत सजीवांच्या अस्तित्वाचा केवळ एक टक्का एवढाच जीवाश्म पुरावा आपल्या हाती गवसलाय! भूमिखंडांची मोठ्या प्रमाणावर झालेली हालचाल किंवा भूखंड वहन आणि हवामानातील बदल यामुळेही जीवजंतूंचा विनाश झालाय. कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वी ह्या सगळ्या बदलांशी जुळवून घेत आहे! आपली ही पृथ्वी म्हणजे एक वैश्विक आश्चर्यच आहे! विलक्षण लवचीकता असलेला असा दुसरा ग्रह आपल्या ग्रहमालेत नाही.
 
 
आपल्या पृथ्वीसारखेच जीवन असलेला आणखी कुठला ग्रह अवकाशाच्या अथांग पोकळीत आहे का? याचा शास्त्रज्ञ अनेक दिवसांपासून शोध करीत आहेत. या संदर्भात नासाच्या केप्लर मोहिमेतून वर्ष 2017मध्ये माहितीचा प्रचंड साठा शास्त्रज्ञांच्या हाती पडला. एखाद्या गवताच्या गंजीतून धुंडाळताना महत्त्वाचा ऐवज सापडावा, तसा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाला या माहितीच्या प्रचंड साठ्यातून, वसती करण्यायोग्य आणि जीवनाला पोषक ठरू शकतील अशा 20 नव्या ग्रहांचा शोध लागला होता.

 
2009पासूनच्या मोहिमेत केप्लरने अक्षरश: अगणित नवीन घटनांचा शोध घेतला. त्याने शोधलेल्या स्वत:च्या सूर्यांभोवती फिरणार्‍या 20 बहिर्ग्रहांवर माणसाला वसती करता येईल अशी परिस्थिती असावी, असे लक्षात आले होते. त्याआधी केप्लर यानाने एकूण 219 बहिर्ग्रहांचा शोध घेतला होता. त्यापैकी 10 वसती करण्यायोग्य असावेत असा अंदाज करण्यात आला होता. नासाच्या अवकाश निरीक्षण केंद्राने 7 मार्च 2009 रोजी, इतर तार्‍यांभोवती फिरणार्‍या पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती.
 
या ग्रहांपैकी एक ग्रह तर आपल्या पृथ्वीसारखाच असल्याचे दिसून आले होते. तिथल्या एका वर्षाचे दिवसही 395 म्हणजे पृथ्वीवरच्या 365 दिवसांशी मिळतेजुळते आहेत आणि त्याचा आकारही पृथ्वीच्या आकाराच्या 97 टक्के इतका आहे! तो ज्या सूर्याभोवती फिरतोय तो सूर्यही आकाराने, वस्तुमानाने आणि वयोमानानेही आपल्या सूर्यासारखाच आहे. मात्र त्याचे धातुत्व आपल्या सूर्याच्या दुप्पट आहे. धुक्याने वेढलेल्या या खडकाळ थंड ग्रहावर जीवनाचे अस्तित्व असू शकेल इतकी ऊब आणि उष्णताही आहेच. त्यामुळेच काही शास्त्रज्ञांच्या मते या ग्रहावर माणसासारखेच किंवा आपण कल्पना करतो तसे परग्रहवासी (Aliens) असण्याची दाट शक्यता आहे. या ग्रहावरचे हवामान पृथ्वीवरच्या सैबेरियासारख्या टुंड्रा हवामानाशी साधर्म्य सांगणारे आहे.


earth
 
 
यापैकी बर्‍याच ग्रहांच्या, त्यांच्या स्वत:च्या सूर्याभोवती फिरण्याच्या गती, त्यावरील तापमान, सामान्य हवामान हे पृथ्वीवरील या सर्व घटकांच्या कमी-अधिक प्रमाणासारखेच असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच दुसरी ’वसुंधरा’ शोधण्याचे माणसाचे प्रयत्न अवकाशाच्या याच भागात सुफळ संपूर्ण होतील, असाही आशावाद बळावला होता. मात्र त्या बाबतीत समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत.
पृथ्वीसारखाच ग्रह शोधण्याचे असे प्रयत्न चालू असले, तरी आपल्या पृथ्वीला अवकाशाच्या प्रचंड पसार्‍यात आजही तितकाच सक्षम पर्याय नाही, हे सत्य आहे आणि म्हणूनच तिच्या रक्षणाचे सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पृथ्वीचे हे वेगळेपण कळावे, म्हणूनच ’एकमेवाद्वितीय पृथ्वी’ (Only one Earth) असे या वर्षीचे पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य होते!
Powered By Sangraha 9.0