मराठेशाहीचं धार्मिक धोरण

विवेक मराठी    13-Jun-2022
Total Views |
 
@कौस्तुभ कस्तुरे । 9921080087
 
सरसंघचालकांचं विधान, विशेषत: त्याचा उत्तरार्ध ऐतिहासिक कसोट्यांवर जुळणारा वाटतो. या विधानाचा परामर्श घ्यायचा झाल्यास, दिसणारी प्रत्येक मशीद ही मंदिरच आहे असं समजून चालण्याची गरज नाही, इतकाच गर्भितार्थ मी त्या वाक्यातून घेतो आणि या प्रमेयावर घडून गेलेल्या इतिहासाचा डोलारा पुढे उभा करतो आहे. मुख्यत्वेकरून मराठेशाहीतील दोन प्रमुख व्यक्तींची उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे थोरले नानासाहेब पेशवे.
 

mandir
 
ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सध्या अनेक चर्चा ऐकू येत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अर्थात यावर ठोस भाष्य करणं हे अनुचित असलं, तरीही इतिहास अभ्यासकांच्या मतमतांतरावरून ’नेमकं काय झालं होतं?’ हा गलबला सुरूच आहे. यातच आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे नुकतीच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका वक्तव्याने. सरसंघचालकांचं विधान हे कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित होतं की पुरोगामित्वाच्या दृष्टीने वाटचाल करणार्‍या एका संघटनेला दिशा देण्यासाठी केलं होतं, हा विषय वेगळा आहे. त्याच्याशी अर्थाअर्थी माझा संबंध नाही. परंतु, एक इतिहास अभ्यासक म्हणून मला या विधानाच्या उत्तरार्धाविषयी काही मतं मांडावीशी वाटल्याने हा लेखनप्रपंच.
 
 
ज्ञानवापीजवळ असलेली मशीद ही मूळ काशीविश्वेश्वर मंदिर असून ते मंदिर इतिहासात तीन वेळा भग्न करण्यात आलं आणि शेवटच्या वेळेस, औरंगजेबाने जेव्हा तिथे मशीद उभारली ती अजूनही आहे हे दर्शवणारा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावरचा माझा लेख नुकताच दै. तरुण भारतमध्ये प्रकाशित झाला होता. केवळ ज्ञानवापीच नाही, तर मथुरेचा केशवराज, काशीचा बिंदुमाधव, त्र्यंबकेश्वरचा शंभूमहादेव आदी अनेक मंदिरं औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या विकृत जिहादी मानसिकतेला बळी पडली. ही मंदिरं भग्न पावून तिथे मशिदी उभ्या राहिल्या. यातली अनेक मंदिरं पुढच्या हिंदू राज्यकर्त्यांनी पुन्हा उभी केली. पण म्हणून, एक गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही की हिंदू राज्यकर्त्यांनी सार्‍याच मशिदी पाडून मंदिरं बांधण्याचा संकल्प सोडला नव्हता. सदसद्विवेकबुद्धीने एखादी गोष्ट करताना त्याचे दूरगामी परिणाम जसे बघितले जातात, तसेच त्या गोष्टीचा भूतकाळदेखील पाहिला जातो. इथे मला सरसंघचालकांचं विधान, विशेषत: त्याचा उत्तरार्ध ऐतिहासिक कसोट्यांवर जुळणारा वाटतो. या विधानाचा परामर्श घ्यायचा झाल्यास, दिसणारी प्रत्येक मशीद ही मंदिरच आहे असं समजून चालण्याची गरज नाही, इतकाच गर्भितार्थ मी त्या वाक्यातून घेतो आणि या प्रमेयावर घडून गेलेल्या इतिहासाचा डोलारा पुढे उभा करतो आहे. वाचकांनी आपापल्या परीने या सार्‍याचा अर्थ लावावा.
 
 
mandir
इ.स. 1649-50मधलं शिवछत्रपती महाराजांचे वडील शहाजीराजांचं एक सनदापत्र उपलब्ध आहे, ज्यात कर्नाटकातील राणेबेन्नूर येथील एका मशिदीला जमीन इनाम दिली आहे. अनेक आणखीही उदाहरणं मिळतील, पण या दोन व्यक्ती म्हणजे ज्यांनी स्वराज्याच्या या मंदिराचा पाया रचला ते पुण्यश्लोक थोरले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या काळात या स्वराज्याचा विस्तार अटक ते कटक असा झाला ते धुरंधर श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे. या दोन्ही व्यक्तींनी धार्मिक बाबींसंबंधी ज्या काही गोष्टी आचरणात आणल्या, त्या पाहता ’हिंदुत्व’ ही संकल्पना किती व्यापक होती, याची प्रचिती येते.
 
 
थोरले छत्रपती शिवाजी महाराज
 
 
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेस कल्याण-भिवंडी जिंकून घेतली, तेव्हा तिथल्या मशिदी जमीनदोस्त केल्या असं अफजलखानाने खुद्द शिवाजी महाराजांना प्रतापगडच्या युद्धाच्या आधी सांगितलं होतं. याबरोबरच महाराजांनी आपल्या बळाबळाचा विचार न करता काजी-मुल्लांना कैद करून मुसलमानांचा मार्ग अडवल्याचंही अफजलखान म्हणतो. शिवभारताच्या 18व्या अध्यायात याचं वर्णन आहे. शिवभारत हे समकालीन आहे आणि खुद्द महाराजांच्या आज्ञेवरून कवींद्र परमानंदांनी हा ग्रंथ लिहायला घेतला होता. आता यात महाराजांनी मंदिरं पाडून मशिदी बांधल्या गेल्या होत्या त्याच पाडल्या, असा थेट उल्लेख नाही. पण एकंदरीत महाराजांची मानसिकता पाहता उगाच सगळ्या मशिदी पाडून मंदिरं बांधण्याचा सपाटा महाराजांनी लावला असेल असं निश्चित वाटत नाही. याला आधार म्हणूनही काही उदाहरणं देता येतात.
 
 
 
इ.स. 1673-74चं शिवछत्रपती महाराजांनी पुण्याच्या राघो बल्लाळ सुभेदार यांना लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. यात सैद सादत हजरत पीर वगैरे लोकांच्या तंट्याबद्दल तक्रार आली होती. त्या तक्रारीचा निवाडा करताना ‘महाराज साहेबाचे (शहाजीराजांच्या) वेळेस भोगवटा चालिला असेल, व अफजल मारिला त्याचे आधी साहेब (शिवाजी महाराज) पुण्यात असता ते वेळेस भोगवटा चालिला असेल तेणेप्रमाणे करणे’ असं महाराजांनी म्हटलं आहे. मौजे फुरसुंगीच्या मशिदीबद्दल काही भांडण झालं होतं, त्यातही जो योग्य असेल त्याला नेमून द्या असं या पत्रात महाराज म्हणतात. दत्तात्रय बळवंत पारसनीस कृत सनदापत्रांतील माहितीमध्ये हे संपूर्ण इनामपत्रं वाचता येईल. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, तर परगणे इंदापूर येथील काझी हाफिज नावाच्या एका माणसाने आपल्याकडे असलेल्या मशिदीसंबंधीच्या इनामाचा भोगवटा दुमाला करण्यासाठी, म्हणजेच पुढेही सुरू ठेवण्यासाठी महाराजांना विनंती केली. या काझी हाफिजची विनंती महाराजांनी स्वीकारून पूर्वीप्रमाणेच याचं सगळं पुढे चालवण्याची आज्ञा इंदापूर परगण्याच्या कारकुनाला आणि देशमुखांना केली. शिवचरित्र साहित्य खंड 3मध्ये लेखांक 665 म्हणून हे पत्रं प्रसिद्ध झालं आहे. अशी महाराजांची इनामपत्रं पाहिली, म्हणजे आधीपासून जे चालत आलं असेल, आणि जे अन्यायाने घडलेलं नसेल ते ते पूर्वीप्रमाणेच सुरळीत चालू ठेवण्याविषयी महाराजांची आज्ञा स्पष्ट दिसते.


mandir
 पूर्वी मंदिर असलेल्या जागेवरील मशिदी पाडून मंदिरांचे पुनरुद्धार करण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण स्पष्ट करणारे फ्रेंच भाषेतील पत्र
 
जर असं असेल, तर वर म्हटल्याप्रमाणे महाराजांनी कल्याण-भिवंडीच्या मशिदी जमीनदोस्त का केल्या? याचं कारण असं सांगता येतं की तिथे आधी मूळची मंदिरं असून ती पाडून मशिदी बांधण्यात आल्या असाव्यात. महाराजांच्या काळातलं अशा प्रकारचं आणखी एक स्पष्ट उदाहरण आपल्याकडे आहे. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयादरम्यान जिंजीचा किल्ला जिंकून घेतला, त्या वेळच्या एका सविस्तर हकीकतीचं एक हस्तलिखित प्रसिद्ध झालं होतं. त्या हस्तलिखितांतील काही मजकूर मराठी भाषेत शिवचरित्र साहित्य खंड 8, पृष्ठ 55वर प्रकाशित झाला आहे. तो मजकूर (मूळ फ्रेंच लिखाणाचा सारांश) असा - जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केल्यानंतर शिवाजी महाराज ’तिरुवन्नमाले’कडे गेले. ते शिवभक्त होते. येथे हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिरुवन्नमाले येथील शिवाचं व समोत्तिरपेरुमल याचं देवालय पाडून मुसलमानांनी मशिदी बनवल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्या दोन्ही मशिदी नष्ट केल्या आणि तेथे शिवाच्या देवालयांची पुन्हा प्रतिष्ठापना केली आणि ’समोत्तिरपेरुमल’ याच्या देवालयातील विटांचा उपयोग करून नायकराजांनी बांधलेला एक हजार खांबांचा जो मंडप आहे, त्यापुढे गोपुर बांधिलं. शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना त्या सभामंडपात एक लाख गाई आणल्या होत्या. तेथील टेकडीवर कार्तिक महिन्यात दीपोत्सव शिवाजी महाराजांनी सुरू केला.
 
 
केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदू धर्माच्या आड येणार्‍या आणि जबरदस्तीने मंदिरे पाडणार्‍या, धर्मांतराची सक्ती करणार्‍या प्रत्येकाला महाराजांचा हा इशारा होता. इ.स. 1667मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आश्रयाखाली ख्रिश्चन मिशनरी कोकणातील प्रजेचं जबरदस्तीने धर्मांतर करत होते, तेव्हा महाराजांनी एकदम बारदेशात धडक मारून चार पाद्री पकडून आणले. हे पाद्री इतरांचं धर्मांतर करत असत, त्यामुळे महाराजांनी या पाद्य्रांना हिंदू धर्मात याल का असं सरळ सरळ विचारलं. या चौघांनी नकार दिल्यावरून महाराजांनी या चौघांचीही शिरच्छेद केला. ‘इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी’च्या पृष्ठ 119वर ही घटना वाचायला मिळेल.
 
 
थोरले नानासाहेब पेशवे
 
 
शिवाजी महाराजांप्रमाणेच नानासाहेब पेशव्यांचंही एक उदाहरण याचप्रमाणे आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वरचं शिवमंदिर औरंगजेबाने पाडलं. मंदिर नेमकं केव्हा पाडलं याबद्दल निश्चित तारीख उपलब्ध नाही, पण पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्र्यंबकचा किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरी जिंकून घेतला आणि जवळच असलेलं ज्योतिर्लिंग मुक्त करून, तिथे पुन्हा भव्य मंदिर बांधलं. धडफळे यादीत एक नोंद आहे ती अशी - ‘सिव्हस्तामुळे श्रीमंत नानासाहेब भाऊसाहेब यांची स्वारी नासिक प्रांती गेली होती. त्रिंबक किल्ला मोंगलांकडे होता तो घेऊन ठाणे बसविले. श्री त्रिम्बकेश्वरावर मशीद होती ती काढून श्रीचे देवालय बांधावयास काम चालविले. कुशावर्त बांधिले.’ पेशव्यांच्या बखरीतही या बाबतीत स्पष्ट उल्लेख आहे की, ‘सरकारची स्वारी त्र्यंबकेश्वर येथे येऊन, तेथे राहून त्र्यंबकच्या किल्ल्यावर ठाणे बसविले. तेव्हा भाऊसाहेब यांचे मनात आले की त्र्यंबकेश्वराचे देवालय बांधावे. असे मनात येताच (त्रिम्बकेश्वरावर) मोंगलाई राज्यातील मशिदी वगैरे होत्या ते सारे मोडून देवालयास काम लाविले.’ त्र्यंबकेश्वराचं हे प्रचंड मंदिर पुढे 31 वर्षांनी बांधून तयार झालं.
 
 
त्र्यंबकेश्वराचं हे उदाहरण तरी खूप नंतरचं आहे. या घटनेच्या दहा वर्षांपूर्वी नानासाहेबांनी खुद्द काशीविश्वेश्वर पुन्हा बांधण्यासाठी पावलं उचलली होती. इ.स. 1743मध्ये नानासाहेब जवळपास ऐंशी हजार फौजेसह त्रिस्थळी यात्रा करून पुढे बंगालात गेले. या वेळी काशीत मराठ्यांच्या फौजा येतात म्हटल्यावर अयोध्येचा नवाब सफदरजंग याचं धाबं दणाणलं. सफदरजंग या वेळेस मराठ्यांना अनुकूल नव्हता. तो पुढे इ.स. 1750च्या काळापासून मराठ्यांच्या स्नेहात आला. या वेळेस, जेव्हा नानासाहेबांनी काशी घेण्याचा मनोदय दर्शवला आणि मल्हारराव होळकरांना ज्ञानवापीजवळची मशीद पाडून मंदिर पुन्हा उभं करण्यासाठी पाठवलं, तेव्हा आधीच नारायण दीक्षित पाटणकर आदी काशीतील ब्राह्मण पेशव्यांसमोर येऊन म्हणू लागले की आपण आत्ता काशी घेऊ नये. आपण येण्यापूर्वीच मन्सूर अली खान उर्फ सफदरजंगाने आम्हाला धमकी दिली आहे की पेशव्यांच्या ढाला पुन्हा दक्षिणेकडे वळल्यावर तुम्हा सगळ्यांना मारून टाकू. नानासाहेबांचा मूळ हेतू हा बंगालात जाऊन अलिवर्दीचं राजकारण निपटण्याचा असल्याने या वेळेस काशी जिंकून घेण्याचा विचार नानासाहेबांनी बाजूला ठेवला. याच सफदरजंगाला आपल्या बाजूला ओढून काशी मराठ्यांच्या हातात यावी असं राजकारण नानासाहेबांनी पुढे केलं, जे अर्थात काही ना काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकलं नाही. असो, मुख्य मुद्दा हा की ही जी तीर्थक्षेत्र सुलतानी अंमलात असताना भग्न होऊन तिथे मशिदी बनल्या होत्या, त्या त्या मशिदी पाडून पुन्हा मंदिरं करण्याचा नानासाहेबांचा विचार हा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच दिसून येतो.
 

mandir
काशीविश्वेश्वर मंदिर पुन्हा बांधण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी पावलं उचलली होती 
आता पूर्वीप्रमाणेच दुसर्‍या मुद्द्यावर जाऊ. काशीविश्वनाथ असेल वा त्र्यंबकेश्वर असेल, नानासाहेबांनी या मशिदी पाडून मंदिरं करण्याचा घाट घातला म्हणजे त्यांनी संबंध राज्यातील एकूण एक मशिदी पाडण्याचा विचार केला असं म्हणता येत नाही. त्र्यंबकच्या वेळेसच नानासाहेबांनी निजामाला ठणकावून सांगितलेलं, आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो. हे महाराजांचे शिष्य आहोत म्हणताना महाराजांच्या धार्मिक धोरणांची पायमल्ली होऊ नये याचीही काटेकोर काळजी घेतली गेली. इ.स. 1758मध्ये नानासाहेब पेशव्यांनी विजापूरमधील एका दर्ग्याच्या फकिरांना दिलेलं एक इनामपत्र इतिहास संग्रह-पेशवे दप्तरांतील सनदापत्रं, पृष्ठ 242वर प्रसिद्ध झालं आहे. या दर्ग्याला पूर्वी आदिलशाही आणि मोंगलांकडून इनाम चालत आलेलं होतं. हे इनाम मराठ्यांच्या कारकिर्दीत काही काळ बंद पडलं, तेव्हा इथल्या फकिरांनी पुण्याला येऊन नानासाहेबांना विनंती केली. नानासाहेबांनी लगेच हे बंद पडलेलं इनाम सुरू करून दिलं. इथे मोंगलांनी वा आदिलशहाने दिलेलं इनाम केवळ परधर्मीय अथवा मुसलमान आहेत म्हणून बंद करून हा दर्गा जमीनदोस्त करण्यात आला नाही. अशी इतरही उदाहरणं सापडतील.
 
 
एकंदरीतच, या सगळ्या लेखनप्रपंचामागचा उद्देश हा, की हिंदू - विशेषत: मराठे हे आत्यंतिक धर्माभिमानी असले, तरी परधर्माविषयी त्यांनी द्वेष कधीच केला नाही. पण एखाद्याने द्वेषातून आपल्या धर्मावर घाला घातला असेल, तर त्याला तसंच सोडलंही नाही. भालजी पेंढारकरांच्या ’छत्रपती शिवाजी’ चित्रपटात एक वाक्य आहे - ‘स्वत:च्या धर्माबद्दल अढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता हे मराठेशाहीचं ब्रीद आहे.’ हे वाक्य चित्रपटात असलं तरीही तत्कालीन हिंदू राज्यकर्त्यांच्या धर्मव्यवस्थेला तंतोतंत लागू होतं. आम्ही उगाच कोणाच्याही नादाला लागणार नाही, जे मूळ, कोणालाही त्रास न देता चालत आलेलं असेल ते तसंच पुढे चालवू, पण आमच्यावर अत्याचार करून एखादी गोष्ट केली असेल तर ती पूर्ववत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा एकच विचार या सगळ्यामागे होता.
बहुत काय लिहिणे? लेखनावधी.
 
 
 
mandir
 
कौस्तुभ कस्तुरे । 9921080087
(लेखक शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)