देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

विवेक मराठी    16-Jun-2022
Total Views |

१४ जून रोजी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी श्री क्षेत्र देहू दौर्‍यावर होते. त्यांनी जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भव्य शिळा मंदिराचे लोकार्पण केले. या अनुषंगाने येथील ऐतिहासिक शिळा मंदिरातील जगद्गुरू तुकोबारायांची चैतन्यमूर्ती घडविलेल्या (चिखली) पिंपरी-चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध शिल्पकार चेतन हिंगे यांच्याशी संवाद साधलाय मुक्त संवादक सारंग पापळकर यांनी


tukaram mahraj
जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या ऐतिहासिक मूर्तीचे शिल्पकार...' अशी आता आपली ओळख.. काय वाटते?
'उजळले भाग्य आता | अवघी चिंता वारली ||
संत दर्शने हा लाभ | पद्मनाभ जोडला ||
तुका म्हणे होता ठेवा | तो या भावां सापडला...'
पांडुरंगाची कृपा आणि आईवडिलांची पुण्याई म्हणून श्री क्षेत्र देहू शिळा मंदिरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती घडविण्याचे भाग्य लाभले, हेच जन्माचे खरे सार्थक आहे! कारण माझ्यासाठी फक्त हे काम नव्हते, तर माझ्या आयुष्याचे संचित होते असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही.
हा दैवी योग कसा जुळून आला?
खरे म्हणजे अनेक जण मला विचारतात, टेंडर कुठे भरले? किती रुपये घेतले? वगैरे... परंतु मी कुठेही टेंडर भरले नाही वा कोणतेही मूल्य ठरविले नाही. केवळ पांडुरंगाच्या व जगद्गुरू तुकोबारायांच्या कृपेने हा योग जुळून आला. मागील वर्षी १८ जून २०२१ला माझे गुरुतुल्य बंधू रा.स्व. संघाचे माजी प्रचारक डॉ. संदीपराज महिंद्र गुरुजी यांच्यासह देहू येथे जाण्याचा योग आला. अन्य कामे असल्याने जाण्याचे मी टाळत होतो, परंतु त्यांच्या हट्टामुळे मला जावे लागले. कदाचित पांडुरंगाचीच, शिवछत्रपतींचीच इच्छा... त्या दिवशी त्यांची मंदिर विश्वस्तांबरोबर बैठक होती, त्यात आपले काय काम? म्हणून मी बाहेर उभा होतो. अचानक पाऊस सुरू झाला आणि मी संस्थानच्या कार्यालयात जाऊन बसलो. त्यादरम्यान बैठक आटोपताच संदीपजींनी मंदिर विश्वस्तांशी 'शाहीर व शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे' असा माझा परिचय करून देताच ह.भ.प. भानुदास महाराज मोरे यांनी "अहो, आम्ही शिल्पकाराच्याच शोधात आहोत आणि पांडुरंगाने तुम्हाला या ठिकाणी पाठविले" असे उद्गार काढले. खरे तर २००८ सालीच शिळा मंदिराचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर १३ वर्षांत महाराजांच्या मूर्तीचे काम राजस्थान, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणी करण्यास देण्याचा प्रयत्नही झाला, परंतु काही कारणांमुळे ते पूर्णत्वास गेले नाही असेही कळले. त्यांनतर लगेचच श्री भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे व अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मला संत तुकाराम महाराजांची साधारण दोन फूट मूर्ती बनवून देण्यास सांगितले. परंतु ही मूर्ती कुठे बसवायची? हे विचारल्यावर त्यांनी मला शिळा मंदिराचा गाभारा दाखविला आणि मला सांगण्यात आले की सुरुवातीला दोन फुटांची प्रात्यक्षिक मूर्ती बनवून द्यावी आणि ती आवडल्यानंतरच प्रत्यक्ष मूर्तीची विचार केला जाणार होता.




tukaram mahraj
 
संस्थानला ४२ इंच उंचीची मूर्ती हवी होती, कारण महाराजांच्या वैकुंठगमनप्रसंगी त्यांचे वय ४२ वर्षे होते. मूर्तीबाबत सर्व तांत्रिक व अन्य बाबतीत सखोल चर्चा करून आधी शाडू मातीची व नंतर पाषाणात मूर्ती साकारण्याचे ठरले. या कामासाठी मानधन विचारणा झाल्यावर पांडुरंगाच्या चरणावरील एक रुपया घेऊन परवानगी मागितली व कुठलाही नफा न घेता फक्त मूर्तीचा खर्च घेण्याचे मी ठरविले आणि हा विलक्षण प्रवास सुरू झाला.
 
 
*हितगुज शिल्पकाराशी*
शिल्पकार - चेतन रवींद्र हिंगे, (पिंपरी-चिंचवड)

संवादक - सारंग सतीश पापळकर ( ९८८१०१६९१५ )
महाराजांच्या हयातीतील एकही चित्र उपलब्ध नसताना ही मूर्ती साकारताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले? मूर्तीची काय वैशिष्ट्ये आहेत?
नक्कीच, माझ्यासमोर अनेक आव्हाने होती, परंतु महाराजांचा आशीर्वाद पदोपदी सोबत असल्याने मार्गावरील अडथळे आपसूकच दूर होत होते.
 
महाराजांच्या वैकुंठगमनानंतर जवळजवळ ३५० वर्षे महाराजांची मूर्ती नव्हती. त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्याच्या प्रसंगानंतर १३ दिवस महाराज अन्नत्याग करून तपश्चर्येसाठी ज्या शिळेवर बसले होते, त्याच शिळेचे हे पवित्र शिळा मंदिर! मात्र महाराजांच्या हयातीतील चित्र उपलब्ध नसल्याने काल्पनिक चित्राच्या आधारे हे काम करण्याचे आव्हान होते. परंतु संस्थानने दिलेल्या मूर्तींचे संदर्भ, चरित्र, गाथा इ. साहित्याच्या आधारे व संस्थानचे आजी-माजी विश्वस्त, वंशज, मोरे मंडळी, तसेच चित्रकला, शिल्पकला क्षेत्रातील दिग्गज यांच्या मार्गदर्शनात वटपौर्णिमा २०२१पासून मूर्ती घडविण्याचा प्रवास सुरू झाला. प्रात्यक्षिक मूर्ती पूर्ण झाल्यानंतर संस्थानकडून पाषाणाची मुख्य मूर्ती साकारण्यापूर्वी पुढील खर्चाची विचारणा झाली. वैयक्तिक श्रम व नफा यांचे मूल्य शून्य ठेवून केवळ भांडवल खर्चाची अंदाजे रक्कम सांगितल्यानंतर संस्थानला ती व्यावहारिक न वाटल्याने अन्य काही ठिकाणच्या शिल्पकारांचीही चाचपणी करण्यात आली. परंतु हे कार्य पुण्यातच व्हावे ही संस्थानची इच्छा असल्याने, तसेच माझ्या पूर्वसंचिताने अनेक अडथळे दूर होऊन हे दैवी काम पुन्हा एकदा माझ्यावरच सोपविण्यात आले.
खरे तर महाराज आधीच त्या पाषाणात विराजमान होते, आम्ही केवळ अतिरिक्त भाग बाजूला केला आणि तमाम वारकर्‍यांना, मुख्यत: देहू संस्थानला अपेक्षित मूर्ती तयार झाली अन् माझे जीवन धन्य झाले.



tukaram mahraj
मूर्तीची वैशिष्ट्ये -
४२ इंच उंचीची राजस्थानच्या भेसलाना येथील कृष्ण पाषाणाच्या खाणीतील २.५ टन वजनाच्या ५ x ४ x ३ फूट मापाच्या पाषाणात कोरलेली आहे.
 
मार्गशीर्ष पौर्णिमा ते शाकंभरी पौर्णिमेच्या काळात या मूर्तीचे काम पूर्ण झाले. महाराजांची पगडी, धोतर, अंगरखा यात कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाचा भाव यात रेखाटण्यात आला आहे.
चेहर्‍याची ठेवण, नाक, कान, डोळे व मुख्य म्हणजे चेहर्‍यावरील भाव यांचा अत्यंत बारकाईने विचार करण्यात आला. या कामासाठी शालेय मित्र नवनाथ मोरे, गणेश टोकेकर, सचिन सुतार, प्रवीण सुतार, अजिंक्य कुलकर्णी, अविनाश कदम, संकेत कबाडे, दिनेश साळवी यांचे सहकार्य लाभले.


हिंदू धर्मात मूर्तिपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूर्ती घडविताना शिल्पकार अक्षरशः त्यात प्राण ओततो. उत्कृष्ट मूर्ती घडविणे 'शिल्पकाराची साधना असते', तुमचा याविषयी काय अनुभव काय ?


"शिल्प / मूर्ती साकारताना त्यातील भाव जागृत करण्याकरिता त्याच्याशी शिल्पकाराला एकरूप व्हावे लागते. त्यामुळे ही एक प्रकारे साधनाच आहे असे वाटते. नुकत्याच आलेल्या अनुभवाबाबत बोलायचे झाल्यास, मुख्य पाषाण शिल्प साकारण्यास सुरुवात करण्यापूर्वी संस्थानला मी एक विनंती केली - आपल्या सर्व सूचना लक्षात घेऊन आधी मी मातीचे शिल्प बनविले आहे. आता जे पाषाण शिल्प बनविणार आहे, ते मला एकांतात निर्जन स्थळी साकारायचे आहे. यामध्ये मी, माझे तीन कारागीर सहकारी आणि अर्थातच महाराज!"
 
 
कारण जगासाठी ही जरी एक मूर्ती असेल, पण माझ्यासाठी एक तपश्चर्या, कलेची साधना होती. माझा भाव लक्षात घेता संस्थानने तत्काळ परवानगी दिली व मी एकांतात सोशल मीडिया, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी आदी भौतिक विषयांपासून दूर राहून सर्व शक्ती पणास लावली व हे दैवी कार्य महाराजांनी करून घेतले.
 

tukaram mahraj
नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक मंदिर लोकार्पण सोहळ्याचे अवलोकन करताना आपल्या काय भावना होत्या?
'याचसाठी केला होता अट्टहास...'
 
ध्यान, विवेक, वैराग्य, प्रपंच व परमार्थ यांची शिकवण देणार्‍या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची चैतन्यमूर्ती चंद्र-सूर्य असेपर्यंत या देहू नगरीत असणार आहे. कदाचित पुढच्या काही वर्षांत माझे नाव लोक विसरतील, पण आम्ही साकारलेल्या मूर्तीसमोर भागवत धर्माची पताका अभिमानाने फडकत राहील.
 
माझ्या पूर्वसंचित भाग्याने हा क्षण बघता आला. देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा प्रत्यक्ष परीसस्पर्श झाला, त्यांनी कौतुक केले. माझ्या आई-वडिलांची पुण्याई, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक सेवा कार्यांत सहभागी होऊन केलेली सेवा व सामाजिक कार्य या पुण्यकर्मानेच हे भाग्य लाभले, असे वाटते.
राम कृष्ण हरी !!