दांभिकतेचे अवडंबर!

विवेक मराठी    17-Jun-2022   
Total Views |
 
भारतात कोणत्याही कारणाने सतत झुंडशाहीच्या आधारावर समाजावर, सरकारवर, प्रशासनावर आणि राजकारण्यांवर दबाव ठेवण्याचे कारस्थान खेळले जात आहे. गठ्ठा मतांच्या आधारे राजकारण करणारे पक्ष त्याला खतपाणी घालत आहेत. अगदी क्षुल्लक कारणाने यांच्या भावना दुखावतात. जाकिर नाईक याने काही म्हटले तर भावना दुखावत नाहीत. मात्र नुपूर शर्मा यांनी तीच मांडणी केली की लगेच भावना दुखावतात, अपमान होतो. गोंधळ घालायला मोकळीक मिळते. सीएएसारख्या विषयात नेमका कायदा काय आहे ते न पाहता गोंधळ घालत शाहीनबाग करायला हे तयार होतात. ही या लोकांची दांभिकता आहे.

nupur sharma

सध्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या नावाने जगभर गोंधळ घालण्याचे कारस्थान चालू आहे. काहीही निमित्त काढून भारतातील सामाजिक, राजकीय वातावरणात आपले कुरापतमूल्य दाखवत आडमुठेपणा करण्याचे जे कारस्थान झुंडशाहीच्या आधारावर सतत येथील अल्पसंख्याक समाजाने केले आहे, त्याला या वेळी आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले आहे. भारतीय मुत्सद्देगिरीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची जी कोंडी केली, त्यातून कोंडी फोडून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानही या प्रकरणाचा उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातील काही नतद्रष्ट आपल्या तात्कालिक राजकीय फायद्यासाठी या विषयावर सतत किंचाळत सुटले आहेत. कोणत्याही विषयात कुठेही वैचारिक धोबीघाट सुरू करून हिंदुत्वाच्या विरोधात धुणी धुण्याची संधी शोधणारे कथित डावे, पुरोगामीही यात सरसावून पुढे आले आहेत. आपण या उन्मादात देशाचे, समाजाचे अतोनात नुकसान करत आहोत याचे भान या लोकांना राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे हे स्वरूप लक्षात घेऊन या प्रकरणाशी संबंधित नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर वेळीच कारवाई केली आहे. तरीही त्यांना वार्‍यावर न सोडता त्यांना पुरेसे संरक्षणही दिले आहे. या प्रकरणावर उथळ प्रतिक्रिया देणार्‍या दोन्ही बाजूंच्या लोकांनी या वस्तुस्थितीचे पूर्ण आकलन करूनच व्यक्त झाले पाहिजे.
मुळात हा वाद सुरू झाला तो एका टीव्ही चॅनलमधील चर्चेपासून. यामध्ये विषय ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाचा चालला होता. शिवलिंगाचा अवमान करत अल्पसंख्याक मंडळींकडून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्याचा उल्लेख करत भाजपाच्या पूर्वप्रवक्ता नुपूर शर्मा यांनी “आमच्या श्रद्धास्थानांचा अवमान करता, तसे आम्हीही बोलू शकतो. तुमच्या श्रद्धास्थानाबाबत असे बोलले जाते” असे म्हणत ते वादग्रस्त वक्तव्य केले. त्या वक्तव्यात मुस्लीम समाजाच्या प्रेषिताचा अवमान झाला असे म्हणत जो गोंधळ सुरू झाला आहे, तो भारतातील रस्त्यावर निदर्शने, दंगली, अशांतता माजवण्यापुरता थांबला नाही, तर जगातील अनेक देशांत या निषेधाचे लोण पसरवून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आणण्यापर्यंत या कुरापतींची मजल गेली आहे.

नुपूर शर्मा यांच्या विधानावर इतका गहजब चालला आहे, ते विधान त्यांनीच पहिल्यांदा केले आहे काय? तसे नाही. याबाबत अनेकांनी उल्लेख केला आहे की अगदी मुस्लीम अभ्यासक म्हणवून घेणारे जाकीर नाईक यांनी नुपूर शर्मा जे बोलल्या ते अनेकदा बोलून दाखविले आहे. नुपूर शर्मा यांच्या या प्रकरणाबाबत बागपतचे महामंडलेश्वर भैया दास यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले की, “जाकीर नाईक यांनी हे विधान अनेकदा केले आहे. काही कारवाई करायची असेल तर जाकीर नाईक यांच्यावर आधी करायला हवी. केवळ नुपूर शर्मा यांनी विधान केल्यावरच गोंधळ का घातला जात आहे?” यूट्यूबवर महाराजांची मुलाखत आहे. महामंडलेश्वर यांनी विचारलेला हाच प्रश्न एबीपी न्यूजचे निवेदक सुमित अवस्थी यांनी मुलाखत घेताना असदुद्दीन ओवैसी यांना विचारला. “मुस्लीम अभ्यासक म्हणवणारे जाकीर नाईक यांनी जे विधान केले तर तुम्हाला त्यावर आक्षेप नाही, मग नुपूर शर्मा यांनी तेच विधान केले तर त्यावर इतका गहजब का?”


nupur sharma
 
या नेमक्या प्रश्नावर उत्तर न देता ओवैसी यांनी सफाईदारपणे विषयांतर करत पळवाट काढली. ते म्हणाले, “जाकीर नाईक यांचे व्हिडिओ टाकून याबाबत विचारले जात आहे. मी म्हणतो या संघीयांना जाकीर नाईक यांचे आताच इतके प्रेम का आले? तुम्ही जाकीर नाईक यांना अनेक कलमे लावता. यूएपीए लावता. आणि तुम्ही हा प्रश्न मला का विचारता?” (संघीयांना विचारा.)
म्हणजे ओवैसी मूळ त्या अवमानकारक विधानावर जाकीर नाईकवर टीका किंवा निषेध का नाही आणि नुपूर शर्माचा निषेध आणि इतका गहजब का, यावर काही बोलणार नाहीत. गोंधळ आणि गहजब चालूच राहील यासाठी नेमके मौन पाळणार किंवा विषयांतर करून सटकणार.
 
 
 
ओवैसी आणि गोंधळ घालून तमाशा करणारे सटकतील, पण विचारी लोकांनी तर्कावर आधारित विचार केला पाहिजे की जाकीर नाईक बोलले तर चालते आणि नुपूर शर्मा बोलल्या की भडकावून जीव घेईपर्यंत भाषा आणि कृती करण्यापर्यंत मजल जाते. हे सगळे भावना भडकवणे सोयीने चालते. भारतात ओवैसीसारख्यांना आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. ओवैसी पुढे झाले की मग गठ्ठा मतांचे राजकारण करणार्‍या अन्य कथित सेक्युलर पक्षांच्या तोंडाला मतांचे पाणी सुटते. मग तेही या भावना भडकविण्याच्या खेळात उघडपणे किंवा छुप्या कारवाया करत सामील होतात. मोदी आणि भाजपा यांचा द्वेष करणारे आणि काहीही करून भाजपा सरकारला अडचण निर्माण करण्याच्या कायम प्रयत्नात असतात. सीएए, कृषी कायदे, हिजाब अशा विषयात गोंधळ घालून झाला. आता त्यांना नुपूर शर्मा यांचा विषय सापडला. असे बळ मिळाल्याने नुपूर शर्मा या विषयाचे भांडवल करणार्‍या लोकांनी भारतातील गावागावात मोठे मोर्चे काढत, गोंधळ आणि दंगली माजवत नुपूर शर्मा यांचा निषेध करणे चालू आहे.nupur sharma
 
या निदर्शनाचे देशांतर्गत चित्र पाहा. पश्चिम बंगालमध्ये हावडा जिल्ह्यात रस्ते तसेच खडकपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. दहासनगर रेल्वे स्थानकाजवळ निदर्शने केली, तर डोमजूर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून ते पेटवून देण्यात आले. उत्तर प्रदेशात प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंद अशा ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
 
 
सहारनपूरमध्ये तोडफोड, तर प्रयागराजमध्ये दगडफेक करण्यात आली. दिल्लीत जामा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. कर्नाटकात बेळगाव येथे विजेच्या तारांना नुपूर शर्मा यांचा पुतळा लटकविण्यात आला. हैदराबाद येथे नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. लुधियाना येथे नुपूर शर्मा आणि जिंदाल यांचा पुतळा जाळण्यात आला. जम्मू काश्मीर येथे श्रीनगरसह अनेक शहरांत शेकडोंच्या जमावाने निदर्शने करत गोंधळ घातला. गुजरातमध्ये बडोदा, सुरत, अहमदाबाद येथे तणावाची स्थिती निर्माण होण्यापर्यंत मजल गेली.nupur sharma

 
नुपूर शर्मा आणि जिंदाल हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याने या विषयात जागतिक दबाव आणण्यासाठी समाजमाध्यमातून हा विषय जगभर पसरविण्याचा प्रयत्न झाला. चुकीचे पायंडे पाडले की ते वारंवार समाजजीवन आणि राष्ट्रजीवन संकटात टाकत असतात. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी भारतातील तथाकथित सेक्युलर लोकांनी अशीच जगभर ओरड करत मोदींना अमेरिकेचा व्हिसा नाकारून त्यांची फजिती होईल असे प्रयत्न केले होते. त्याच मोदींना बहुमताने पंतप्रधान झाल्यावर अमेरिकेत रेड कार्पेट, प्रचंड गर्दी, मोदी मोदींच्या घोषणा हे चित्र पुढे अनुभवायला मिळाले. मात्र परदेशात भारताची बदनामी करण्याचा जो पायंडा या लोकांनी निर्माण केला, तो शेतकरी आंदोलनात आणि आता नुपूर शर्मा प्रकरणातही वापरला गेला. त्याचे परिणाम जगात मुस्लीम देशांत काही काळ दिसले. कतारने आणि कुवेतने भारतीय राजदूतांकडे निषेध नोंदविला. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने या विधानावर आक्षेप घेतला. अशी विधाने करणार्‍यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली. पॅलेस्टाइनमधून भारतविरोधाचा सूर काढला गेला. इस्लामी देशांतील काही आततायी लोकांनी तर पाकिस्तानी सैन्याला आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतविरोधी फूस लावण्यापर्यंत मजल गाठली.
नुपूर शर्मा या विषयाचे हे आंतरराष्ट्रीय परिणाम होणार आणि भारतातील संकुचित लोक याची जगात ओरड करून सरकारला अडचणीत आणण्याची खेळी करणार, हे लक्षात आल्याने वेळीच भारतीय जनता पक्षाने कारवाई केली. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांना पक्षातून काढून टाकले. प्राथमिक सदस्यत्वातूनही त्यांना बडतर्फ करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई केली, तरी ज्यांना हा विषय तापवत ठेवायचा आहे, त्या लोकांनी या दोघांना अटक करा, शिक्षा द्या अशा मागण्या पुढे करत रोज नवीन मागणी करत आंदोलन चालू राहील असे प्रयत्न सुरू केले आहेत.
 
 
या सर्व अतिरेकाची प्रतिक्रियाही आता उमटू लागली आहे. अहमदाबादमध्ये एक प्रचंड रॅली काढून नुपूर शर्माचे समर्थन करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी रॅली अडवून परवानगी दिली नाही. काशी धर्मपरिषदेत या अल्पसंख्याकांच्या उन्मादाच्या विरोधात ठराव करून अशांतता माजविणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मुस्लिमांच्या या दांभिक अवडंबराच्या विरोधात आता लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया प्रकट होण्याला सुरुवात झाली आहे. अल्पसंख्याकांनी गेल्या अनेक वर्षांत एकतर्फी पंथवेड्या दांभिकतेचे अवडंबर करत प्रत्येक वेळी समाजाच्या शांततेला नख लावत गोंधळ घातले. मात्र आता अलीकडे जागरूक अशा समाजातून प्रतिक्रियात्मक ध्रुवीकरण होत शक्तिशाली प्रतिकार होऊ लागला आहे. लोक संघटित शक्तीचा आविष्कार करत या दादागिरीला किंवा झुंडशाहीला विरोध करू लागले आहेत.


nupur sharma
मुस्लिमांच्या आक्रस्ताळेपणाला विरोध करणारे काही लक्षणीय प्रकार परदेशात घडले आहेत. हॉलंडचे एक खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी समाजमाध्यमातून नुपूर शर्मा हिचे समर्थन केले. त्यावरून गीर्ट यांनाही धमक्या येण्याला सुरुवात झाली. तसेचे भिवंडी येथील साद अशफाक अन्सारी या युवकाने सोशल मीडियावर नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली, तर त्याच्या विरोधात तक्रारी दाखल होऊन त्याला अटक करण्यापर्यंत विषय पोहोचला.

भारतात कोणत्याही कारणाने सतत झुंडशाहीच्या आधारावर समाजावर, सरकारवर, प्रशासनावर आणि राजकारण्यांवर दबाव ठेवण्याचे कारस्थान खेळले जात आहे. गठ्ठा मतांच्या आधारे राजकारण करणारे पक्ष त्याला खतपाणी घालत आहेत. अगदी क्षुल्लक कारणाने यांच्या भावना दुखावतात. जाकीर नाईक याने काही म्हटले तर भावना दुखावत नाहीत. मात्र नुपूर शर्मा यांनी तीच मांडणी केली की लगेच भावना दुखावतात, अपमान होतो. गोंधळ घालायला मोकळीक मिळते. सीएएसारख्या विषयात नेमका कायदा काय आहे ते न पाहता गोंधळ घालत शाहीनबाग करायला हे तयार होतात. ही या लोकांची दांभिकता आहे. याचा कसलाही बाऊ न करता अतिशय संयमाने आणि शांतपणाने यांना हाताळत हे कारस्थान हाणून पाडण्याची जी नीती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अवलंबिली आहे, ती योग्य आहे.
 
मात्र या दांभिक भावना दुखावण्याचे जे अवडंबर माजविले जात आहे, त्याची प्रतिक्रिया आता बहुसंख्याकांच्या मनात उमटत आहे. सहिष्णुतेची परीक्षा किती पाहणार असा प्रश्न मनात येत आहे. एकीकडे हिंदू विचारांचा प्रार्थना पद्धतीला विरोध नाही असे म्हणत आपली कक्षा आणि बाहू अधिक व्यापक करत देशातील नव्हे, तर विश्वातील मानवतेला, प्राणिमात्रांना कवेत घेण्याचे व्यापक हिंदुत्वाचे प्रात्यक्षिक घडवावे, याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या भाषणात तसे संकेत दिले आहेत. समन्वयाचा परीघ अधिक मोठा करण्याचे त्यांचे आवाहन आहे. अशा वेळी या दांभिकतेचे अवडंबर माजवत हा गोंधळ घातला जात आहे. मात्र अशा चुकीच्या संकल्पाने कृती करणार्‍यांना नैतिक बळ फार कमी असते, हे लक्षात घेऊन यांचा मुकाबला धैर्याने करावा लागेल. आपली विचारांवरील आणि मूळ तत्त्वज्ञानावरील निष्ठा ढळू न देता संयम ठेवावा लागेल. कोणी म्हणते म्हणून आपल्याला कोणाचा अवमान करण्याची परवानगी आहे असे मानून अशी विधाने करणे टाळावे लागेल. जगात भारताची प्रतिमा वरचेवर उंचावत जात असताना क्षुल्लक गोष्टींचा वापर करत जगात भारताची बदनामी करणार्‍यांपासून सावध राहावे लागेल. अशा नतद्रष्टांना शोधून त्यांचे माप त्यांच्या पदरात टाकावे लागेल. हजरतबल दर्ग्याच्या दंगलीपासून ते नुपूर शर्मा प्रकरणापर्यंत दांभिकतेचे प्रदर्शन आणि त्या आधारे अशांतता माजविण्याचे प्रयत्न प्रशासनाने कठोरपणे आणि जनतेने संयमाने मोडून काढले पाहिजेत, हाच या मंथनाचा अर्थ आहे.