हिंदुत्वाचा टिळा लावण्याचा प्रयत्न

विवेक मराठी    18-Jun-2022
Total Views |
@अभय पालवणकर 
आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी शिवसेनेकडून आजपर्यंत अनेक प्रयत्न केले गेले. या सर्वांत ते अपयशी ठरले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता आपल्या घराण्याच्या वारशाप्रमाणे हिंदुत्वाचा चेहरा निर्माण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातीलच पहिला प्रयोग म्हणजे अयोध्येत जाऊन हिंदुत्वाचा चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यातही ते अपयशी ठरले, तर शिवसेनेला 'विविअन रिचर्डस'सारखा नवा चेहरा, नवा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर नाही, असे दिसते.

shivsena
 
आदित्य ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा पार पडला. माध्यमांनी या दौर्‍याला ठळक प्रसिद्धी देऊन, सदर दौरा म्हणजे अदित्य ठाकरे हे जणू काही व्हाइट हाउसलाच भेट देण्यास गेले आहेत आणि तेथे महाराष्ट्राच्या हिताचे मोठे करार होणार आहेत, अशा प्रकारचे वार्तांकन केले. त्यांनी वार्तांकन काय करावे आणि काय नाही करावे हा वेगळा विषय होईल. खरे तर या दौर्‍याची तयारी महिनाभर अगोदरपासून सुरू होती. संपूर्ण शिवसेना त्यांच्यासाठी कामाला लागली होती. महत्त्वाचे नेते अयोध्येत अगोदरच पोहोचले होते. त्यामुळे तो दौरा नियोजनबद्ध होणार यात शंकाच नव्हती. हा दौरा घडला तो म्हणजे राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळेच, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळूच सरकली.आता आपण जर हिंदुत्ववादी भूमिका घेतली नाही, तर नक्कीच राज ठाकरे हे महाराष्ट्रातील आपली हिंदुत्वाची स्पेस घेतील, त्यामुळे आपल्या हिंदुत्ववादी व्होट बँकला धक्का बसेल, असे शिवसेनेतील राजकीय चाणक्यांना वाटू लागले. लागलीच आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची घोषणा केली. राज हे आपल्या शस्त्रक्रियेमुळे अयोध्येत जाऊ शकले नाहीत, पण आदित्य ठाकरे यांचा दौरा भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. यातून शिवसेनेने काय साध्य केले? याचे उत्तर असेल - ‘काहीच नाही.’ खरे तर हा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवा होता. कारण पक्षाला पुन्हा भगव्या भूमिकेत आण्यासाठी ती खर्‍या अर्थाने गरज होती. त्यांनी आदित्य यांना पुढे केले. त्यांच्या 11 वर्षांच्या राजकारणाच्या कारकिर्दीत त्यांनी असे एखादे हिंदुत्ववादी भाषण केले नाही किंवा भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा कुठे ठळकपणे दिसून आली येईल. एक पर्यावरणप्रेमी हाच त्यांचा चेहरा सध्या महाराष्ट्राला परिचित झाला आहे. त्यातही काही फारसे यश आले नाही. त्यामुळे अशा बिनहिंदुत्ववादी चेहर्‍याला हिंदुत्वाचा टिळा लावण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.


shivsena
बाळासाहेबांनी 1986नंतर जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार केला. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण केली. औरंगाबादचे नामांंतर संभाजीनगर ही मागणी असो वा मुंबईची दंगल असो, सर्वच ठिकाणी बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्ववादी राहिली आहे. बाबरीचा ढाचा पाडल्यानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तर बाळासाहेबांची हिंदुत्ववादी ओळख देशभरात झाली. त्यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी मिळाली. कपड्यांपासून विचारांपर्यंत बाळासाहेब नेहमीच हिंदुत्ववादी राहिले. उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात हीच री ओढली, तेही त्यात फारसे उजळून निघाले नाहीत. त्यांची हिंदुत्ववादी भूमिका ही नेहमीच दुटप्पी दिसून येत असते... त्यांचा हिंदुत्ववादी आवाज शिवसैनिकांच्या काळजाला भिडला नाही. तरीही वडिलांच्या पुण्याईने एक ‘सॉफ्ट हिंदुत्ववादी’ म्हणूनच त्यांची प्रतिमा आहे. आता तिसर्‍या पिढीत म्हणजे आदित्य ठाकरे यांचा चेहरा तर आजपर्यंत अजिबातच हिंदुत्ववादी नाही. अगदी गंडादोराही आदित्य ठाकरे यांच्या हाताला नसतो... आजोबांच्या पुण्याईने आदित्यला नियोजनबद्ध रितीने 2010 साली महाराष्ट्राच्या राजकारणात आणले गेले. प्रथम युवासेना अध्यक्ष म्हणून काम करताना जे यशस्वी काम होईल तेथेच उतरवले गेले. कोणत्याही आंदोलनात उतरवताना गुन्हा दाखल होईल, रस्त्यावरच्या आंदोलनात त्रास होईल तेथे न उतरवणे... आदी सर्व बाबी लक्षात घेऊनच मग त्या आंदोलनात उतरवले जात असे. तरीही आदित्य ठाकरे राजकारणात 11 वर्षांत आपला प्रभाव टाकू शकले नाहीत. 2019 साली वरळी या मराठमोळ्या, अगदी सुरक्षित मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर ते पर्यावरण व पर्यटन या दोन महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाले आहेत. एवढे मोठे पद देऊन त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. पर्यावरण विषयात थोडेफार काही करतात, पण पर्यटन क्षेत्रात मुंबईची नाइट लाइफ चालू करण्यासाठी विशेष प्रयत्नशील दिसतात. एकंदरीच आदित्य ठाकरे यांचे राजकीय भविष्य यामुळे शिवसेनेला उज्ज्वल दिसत नाही.


shivsena
2014नंतर देशातील राजकारण बदलले आहे. देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच देशात हिंदुत्ववादी भूमिका घेतली तरी देशात, राज्यात स्थिर सरकार येऊ शकते हे सिद्ध झाले आहे. 1986पासून शिवसेनेची प्रतिमाच हिंदुत्ववादी होती. पण 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर, त्यातच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून हिंदुत्व आणि स्वाभिमान यांची कुरबानी दिली आहे. हक्काची व्होट बँक आता शिवसेनेपासून दुरावत आहे आणि ही व्होट बँक भविष्यात राज ठाकरे गिळंकृत करू नये, म्हणून आदित्य ठाकरे यांचा हिंदुत्ववादी चेहरा निर्माण करू लागल्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल.

आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी शिवसेनेकडून आजपर्यंत अनेक प्रयत्न केले गेले. या सर्वांत ते अपयशी ठरले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता आपल्या घराण्याच्या वारशाप्रमाणे हिंदुत्वाचा चेहरा निर्माण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातीलच पहिला प्रयोग म्हणजे अयोध्येत जाऊन हिंदुत्वाचा चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यातही ते अपयशी ठरले, तर शिवसेनेला 'विविअन रिचर्डस'सारखा नवा चेहरा, नवा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर नाही, असे दिसते.