तुकोबांचे अभंग आणि अंत्योदयाचा मार्ग

विवेक मराठी    18-Jun-2022
Total Views |
@डॉ. दिनेश थिटे । 9822025621
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असाध्य कामे पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. प्रयत्नांच्या जोरावर त्यांना त्यात यशही मिळत आहे. या सर्वामागे त्यांचा तुकोबांसारख्या संतांनी निर्माण केलेल्या महान भारतीय आध्यात्मिक परंपरेवरील विश्वास कारणीभूत आहे. या अस्सल भारतीय विचारधनाने दिलेली अंत्योदयाची प्रेरणा आहे. ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती’ हे तुकोबांचे वचन मोदी यांच्या आचरणात पुरेपूर आहे.
 

modi 
 
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
 
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांच्या या प्रसिद्ध ओळींचा उच्चार केला आणि उपस्थित वारकरी-गावकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन मंगळवार, दि. 14 जून 2022 रोजी पुण्याजवळ देहू येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वारकर्‍यांशी संवाद साधताना झालेल्या भव्य कार्यक्रमात मोदी यांनी तुकोबांच्या अभंगातील या गाजलेल्या ओळींचा उल्लेख केला. त्यापाठोपाठ ते म्हणाले की, “समाजाच्या शेवटच्या ओळीतील व्यक्तीला आपलेसे करणे आणि त्याचे कल्याण करणे हेच संतांचे लक्षण आहे आणि हाच देशासाठी अंत्योदयाचा संकल्प आहे. हा संकल्प घेऊन देश पुढे जात आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले, की दलित, वंचित, मागासलेले, आदिवासी, श्रमिक यांचे कल्याण करण्याला देशाने प्राधान्य दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आक्रमक परराष्ट्र धोरण, भक्कम संरक्षण, राष्ट्रीय अस्मितेचे अयोध्या येथील राममंदिरासारखे प्रश्न मार्गी लावणे, एक स्वच्छ पारदर्शक प्रशासन देणे, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर कठोर कारवाई करणे, देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे अशी अनेक ऐतिहासिक कामे मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत केली आहेत. पण या सरकारचे अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी कार्य आहे ते गरीब कल्याणाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा ज्या प्रभावीपणे राबवला आहे, तो पाहिला की मन थक्क होते. ते स्वत: एका खेडेगावात गरिबीत वाढले. संघाचा परीसस्पर्श झाला आणि त्यांचे जीवन उजळून निघाले. संघाचे प्रचारक म्हणून केलेले कार्य आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतील प्रभावी काम या पार्श्वभूमीवर ते 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर गेल्या वीस वर्षांत देशाने नरेंद्र मोदी यांच्यातील उत्तम शासक पाहिला. उपलब्ध कायदे आणि नोकरशाही यांचाच वापर करून ते असे काही विलक्षण काम करून घेतात की समाजात मोठे बदल होतात. गेल्या आठ वर्षांत आपण देशपातळीवर असे बदल पाहत आहोत. त्याच पद्धतीने त्यांनी देशातील गरिबांसाठी अंत्योदयाचा विचार राबवत घर, पाणी, वीज, स्वच्छतागृहे, आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा सर्व बाबतीत मदत करणार्‍या योजना आखल्या आणि प्रभावीपणे राबविल्या. देहूच्या त्यांच्या भाषणात त्याची प्रचिती आली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वैशिष्ट्य आहे. याची माध्यमांमधून फारशी चर्चा होत नाही. हे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भारताच्या महान परंपरेचा अभिमान आहे. विशेषत: देशाच्या आध्यात्मिक वारशाबद्दल ते सजग आहेत. सरकार म्हणून काम करताना त्यांनी त्यासाठी शक्य ते सर्व काही केले आहे. अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिर उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून मंदिराचे स्वत: भूमिपूजन करणे आणि बांधकामाला चालना देणे हे काम त्यांनी केले. अशा अनेक कामांची माहितीही त्यांनी देहूच्या भाषणात दिली. ते म्हणाले की, “आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी आपली प्राचीन ओळख तसेच परंपरा जिवंत ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचा मार्ग होत असताना देशाचा विकास आणि वारसा या दोन्ही सोबत असतील याची सुनिश्चिती आम्ही करत आहोत.” पालखी यात्रेचे आधुनिकीकरण, चार धाम यात्रेसाठी बांधण्यात आलेले नवे महामार्ग, अयोध्येत भव्य राममंदिराची उभारणी, काशी विश्वनाथ धाम तीर्थक्षेत्राची पुनर्बांधणी आणि सोमनाथ येथे सुरू असलेले विकास कार्य यांची उदाहरणे दिली. प्रसाद योजनेअंतर्गत, तीर्थयात्रेची काही ठिकाणे विकसित करण्यात येत आहेत.


आपल्याला भारत देश परमवैभवाला न्यायचा आहे. त्यासाठी भारतात जबरदस्त आर्थिक विकास आणि अद्ययावत पायाभूत सुविधा हव्यात. त्या दृष्टीने मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महामार्ग, विमानतळ, बंदरे, रेल्वे सुविधा विकसित करण्याचे काम चालू आहे. पण हे करताना सामान्य माणूस मागे राहणार नाही, यासाठी अंत्योदयाच्या आधारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालू राहील, याची त्यांनी खबरदारी घेतली आहे. तसेच आर्थिक विकासाबरोबर देशाच्या महान आध्यात्मिक परंपरेचा वारसाही जपला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच ते देहू येथे आल्यानंतर पूर्णपणे पंढरपूरचे वारकरी बनून गेले होते. त्यांनी भक्तिभावाने शिळा मंदिराचे उद्घाटन करून दर्शन घेतले, विविध देवस्थानांना वंदन केले आणि उपस्थित वारकर्‍यांशी संवाद साधला. वारकर्‍यांनी सन्मानाने घातलेली पगडी त्यांनी अभिमानाने मिरविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कर्तृत्वामुळे जागतिक नेते झाले आहेत. इतके की त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करावी यासाठी त्यांना युक्रेनकडून विनंती करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी स्वाभिमानाने आणि ताठ मानेने चर्चा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत भक्तिपंथावर मात्र लीन झालेले पाहणे रंजक होते.
 
त्यांनी भाषणात स्पष्ट सांगितले की, “भारत ही जगातील सर्वात प्राचीन जिवंत संस्कृतींपैकी एक असल्याचे श्रेय संतपरंपरेला आणि ऋषींना जाते. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही तत्त्वे आमच्या महान संतपरंपरेपासून प्रेरित आहेत. संतांचा सत्संग मानवी जन्मातील दुर्मीळ विशेषाधिकार आहे, संतांची कृपा झाली तर साक्षात्कार होतो, आज देहूच्या या पवित्र तीर्थक्षेत्री आल्यावर मला हे जाणवत आहे.”
 
भारत ही संतांची भूमी असल्यामुळे भारत शाश्वत आहे. आपल्या देशाला आणि समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान आत्मा अवतरत आहे, असे सांगून त्यांनी संत कबीरदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताबाई यासारख्या संतांचे स्मरण केले.
 
देश पुढे जात असताना संत तुकारामांची दया, करुणा आणि सेवा त्यांच्या ’अभंगा’च्या रूपात आजही आपल्यासोबत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या ‘अभंगांनी’ पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग पावत नाही आणि शाश्वत काळाशी संबंधित असतो, तोच ’अभंग’ असेही त्यांनी नमूद केले.
 
 
सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या संकल्पनेची ऊर्जा अशाच महान परंपरांकडून मिळाली आहे. वारकर्‍यांच्या परंपरेत असलेली स्त्री-पुरुष समानता तसेच अंत्योदयाची धारणा ही प्रेरक शक्ती असल्याचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.
 
 
विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ... माणसामाणसांमध्ये भेदभाव करण्यास विरोध करण्याचा उपदेश करणार्‍या तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा पंतप्रधानांनी ठळक उल्लेख केला. मोदीजींना हा उल्लेख करण्याचा विशेष अधिकार आहे. त्यांनी गरिबांसाठी ज्या विविध योजना राबविल्या आहेत, त्यांच्या अंमलबजावणीत कोठेही जात, धर्म, पंथ यांच्या आधारे भेदभाव केला जात नाही. एका विशिष्ट समुदायाचे लोक काही केल्या भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाहीत, उलट जो उमेदवार भाजपाला पराभूत करू शकतो त्याला ठरवून मतदान करतात. पण तरीही मोदी यांनी आपल्या सरकारच्या योजनांचा लाभ करून देण्यात कसलाही भेद केलेला नाही. मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांच्या लाभार्थींचा अभ्यास केला, तर त्या समुदायाच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचे दिसेल. अर्थात मोदी यांच्या भाषणात काल असा अभिनिवेश नव्हता आणि कधीच नसतो. त्यांच्या दृष्टीने गरिबांची सेवा करणे आणि अंत्योदयाचा विचार अंमलात आणणे हेच सर्व काही आहे. त्यामध्ये जात, धर्म, पंथ यांच्या आधारे भेदभाव नाही. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ...


छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्यसंग्रामात जेव्हा वीर सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात हातातल्या बेड्या चिपळीसारख्या वाजवून तुकाराम महाराजांचे अभंग गात असत, असे मोदी यांनी सांगितले. नव्याने समाजात काही उन्मादी लोकांनी राजकीय कारणांसाठी राष्ट्रपुरुषांचीही जातीजातीत विभागणी करण्याचा आणि विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सावरकरांचा या पद्धतीने उल्लेख करून फुटीरतावाद्यांना कडक संदेश दिला.

मोदी सरकार असले की मोठ्या योजनांची अंमलबजावणी स्वाभाविक आहे. पालखी मार्गाचे कामही असेच आहे. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गांवर दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या पायाभरणीचा बहुमान आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात पूर्ण होणार असून संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होईल. यामध्ये 350 किलोमीटरहून अधिक लांबीचे महामार्ग बांधले जाणार आहेत. 11000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे टप्पे आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.

सर्व दिशांनी देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेत असताना मोदी यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पण ते कधीच हिंमत सोडत नाहीत. घटनेचे कलम 370 रद्द होईल किंवा अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराची उभारणी होईल, याबद्दल समाजात शंका होती. पण मोदी यांनी ही कामे करून दाखविली. प्रयत्न असतील तर सर्व काही साध्य होते, अशी त्यांची धारणा आहे. त्या बाबतीत त्यांनी तुकोबांच्या अभंगाचा आपल्या देहूतील भाषणात दाखला दिला. ते म्हणाले, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असाध्य कामे पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. प्रयत्नांच्या जोरावर त्यांना त्यात यशही मिळत आहे. या सर्वामागे त्यांचा तुकोबांसारख्या संतांनी निर्माण केलेल्या महान भारतीय आध्यात्मिक परंपरेवरील विश्वास कारणीभूत आहे. या अस्सल भारतीय विचारधनाने दिलेली अंत्योदयाची प्रेरणा आहे. ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती’ हे तुकोबांचे वचन मोदी यांच्या आचरणात पुरेपूर आहे. म्हणूनच त्यांना वारकर्‍यांचेही प्रेम मिळाले. देहूच्या कार्यक्रमात मंडप गर्दीने भरलेला होता आणि बाहेर मोठ्या स्क्रीनवरील त्यांचे भाषण पाहण्यास-ऐकण्यासही गर्दी झाली होती.