प्रणाम... योगेंद्र नाम मेरा...

विवेक मराठी    18-Jun-2022
Total Views |
 @वासुदेव कामत
 
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संस्कार भारतीचे संस्थापक बाबा योगेंद्रजी यांचे शुक्रवार, दि. 10 जून रोजी वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले. संस्कार भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री म्हणूनही ते कार्यरत होते. ज्येष्ठ चित्रकार व संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी लेखरूपात त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

yogendra
“प्रणाम... योगेंद्र नाम मेरा... चलो, एक आनंद की बात बताते हैं।” असा फोन यायचा आणि पलीकडून बाबा योगेंद्रजी त्यांचा नुकताच झालेला प्रवास, नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांशी झालेली गाठभेट आणि एखादा पाहिलेला विशेष कार्यक्रम, एखादी कलाकृती अशी सविस्तर माहिती द्यायचे. शेवटी मीच त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यावर “मुझे क्या हुआ है। मैं ठीक हूँ, परमपिता परमेश्वर की कृपा है।” असे म्हणत फोन ठेवून द्यायचे. गेल्या अनेक वर्षांत प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर बाबांनी एकाही घटनेची पुनरावृत्ती केली नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आनंदवार्ता ऐकायला मिळे.
 
 
आता मात्र ती ‘आनंद’ देणारी वाणी लुप्त झाली आहे. 10 जून 2022 निर्जला एकादशीच्या तिथीस बाबांनी या जगाचा निरोप घेतला. संपूर्ण कलाक्षेत्र आणि संस्कार भारती परिवार शोकमग्न झाला. 98 वर्षे वयोमानाप्रमाणे त्यांचे शरीर थकले होते, तरी प्रत्येक बैठकीत त्यांची सक्रिय उपस्थिती असे. प्रवास अखंडित चालू असायचा. येत्या दीड-दोन वर्षांत बाबांच्या शतकपूर्तीचा सोहळा साजरा करण्याची आम्हा सर्वांना उमेद होती. परंतु गेले काही दिवस त्यांच्या अत्यवस्थ तब्येतीपुढे कोणतेच उपचार प्रतिसाद देत नव्हते. ‘जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात’ हे विधिलिखित असले, तरी सर्वांशी जीव लावणारे बाबा कायम आपल्या सहवासात असावेत अशी आमची धारणा होती.
 
 
लखनौला वैकुंठ स्मशानात चिता जळत असताना मला ते जणू यज्ञकुंडच वाटत होते. त्या काष्ठांमध्ये जणू बाबांनी आपला देह समिधारूपाने ‘इदं न मम’ म्हणत समर्पित केला होता. तसे बाबांचे संपूर्ण जीवनच ‘समिधामय ही काया साधन...’ होते.

7 जानेवारी 1924 रोजी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच संघस्वयंसेवक असल्याने गोरखपूरला महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना बाबाजींचा नानाजी देशमुखांशी संपर्क आला. बाबाजींना चित्रकला या विषयात विशेष रुची आणि साधना होती. नानाजी देशमुख हे तरुण योगेंद्रजींना मार्गदर्शन करणारे, पुत्रवत प्रेम करणारे गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व होते. महाविद्यालयीन अभ्यासाकरिता योगेंद्रजींना रोज सकाळी उठवावयास येत. एकदा विद्यार्थी योगेंद्र खूप आजारी होते. जवळ रुग्णालय व्यवस्था, वाहन नसल्यामुळे बाबाजींनी योगेंद्रजींना खांद्यावर घेऊन पायी चालत दवाखान्यात नेले. या घटनेचा योगेंद्रजींच्या मनावर इतका खोल संस्कार झाला की, त्यांनी इंटर शिक्षण आणि संघ शिक्षा वर्ग पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ प्रचारक म्हणून निघण्याचे ठरवले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, प्रयाग, बरेली, बदायूँ आणि सीतापूर या जिल्ह्यांमध्ये ते संघप्रचारक राहिले.
 
 
स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीने झालेली विदारक अवस्था तत्कालीन सर्वच लोकांनी अनुभवली, ऐकली किंवा भोगली होती. नानाजींनी योगेंद्रजींच्या चित्रकला क्षेत्रातील योग्यतेमुळे अशा जनजागृतीच्या चित्रांचे प्रदर्शन जागोजागी भरवावे, असे सुचवले. या प्रदर्शनांमध्ये बाबाजींनी स्वत: चित्रे रंगवलीच, त्याचबरोबर अन्य कलाकारांनाही या कार्यात जोडून घेतले. कलाकारांशी संपर्क आणि कलेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय भावना जागृती करण्याचे कार्य जणू संस्कार भारतीच्या स्थापनेपूर्वीच सुरू झाले होते. नानाजी देशमुख, भीमबेटका गुंफा चित्रांचा शोध लावणारे पुरातत्त्व अभ्यासक मा. विष्णू (हरिभाऊ) श्रीधर वाकणकर, मा. योगेंद्रजी आणि अन्य समविचारी महानुभाव यांनी 1981मध्ये ‘संस्कार भारती’ची स्थापना केली. मा. हरिभाऊ वाकणकर हे पहिले महामंत्री आणि मा. योगेंद्रजी संघटनमंत्री म्हणून दायित्व दिले गेले. तेव्हापासून आता आता अखेरपर्यंत बाबा योगेंद्रजी संस्कार भारतीच्या कार्याकरिता भारतभर भ्रमण करीत होते. त्यांचे कार्य हात सर्वांसाठी जीवन आदर्श होता. बैठकीत किंवा मंचावरून बोलताना त्यांचा एकच संदेश असायचा की, ‘कलाकार को ढूंढो। अपने कार्य में उन्हे जोड लो।’
 

yogendra
 
कोणतीही संस्था एक परिवार स्वरूप धारण करते, ते केवळ संस्थेच्या ध्येयाने किंवा कार्यपद्धतीने नव्हे, तर त्या संस्थेतील पितृतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे. संघाने देवदुर्लभ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक समाजामध्ये उभे केले. डॉक्टर हेडगेवारांनी संघस्थापनेपासून याची थोर परंपरा सुरू केली. आताच्या नव्या पिढीने डॉक्टर हेडगेवारांना पाहिले नसले, तरी तशीच तोलामोलाची माणसे आम्ही आजही पाहिली. ‘मैं नहीं, तू ही’ अशा प्रकारे नि:स्पृहपणे बाबाजींनी कलाकार, कार्यकर्ते जोडले. फारच कमी लोक जाणत असावेत की, बाबाजी स्वत: चित्रकार होते. वैयक्तिक कलासाधना बाजूला ठेवून देशातील कानाकोपर्‍यात दडलेल्या कलासाधकांपर्यंत ते पोहोचले.
 
 
एकदा ते मुंबईत आले असता म्हणाले की, “चलो, आप के यहाँ के प्रसिद्ध चित्रकार जॉन फर्नांडिस को मिलेंगे।” आम्ही जॉन सरांना पूर्वसूचना देऊन बाबांना त्यांच्या घरी नेले. फार आत्मीयतेने बाबांनी त्यांची चित्रे पाहिली. मी सरांना बाबांचा परिचय करून देणार, इतक्यात बाबाच म्हणाले. “प्रणाम... योगेंद्र मेरा नाम।” बस, इतकाच परिचय. जॉन सरांनी विनम्रपणे विचारले की, ’‘आप क्या करते है?”
 
 
नुसतेच स्मितहास्य करीत बाबा म्हणाले, “बस, कलाकार को ढूंढते हैं, शाबासी देते हैं।”
“हाँ, पर आप क्या करते है?”
 
 
“यही की कलाकार को ढूंढना और उसे शाबासी देना।”
 
“क्या आप भी चित्रकार हैं? आप का पेशा क्या है?” हा जॉन सरांनी विचारलेला तिसरा प्रश्न. यावरही बाबा परत तेच म्हणाले, “कलाकार को ढूंढना और उसे शाबासी देना।”
 
 
याउपर त्यांचा काही संवाद झाला नाही. आम्ही जे चित्रकार तिथे उपस्थित होतो, आमचाच परिचय प्रत्येकाच्या वैशिष्ट्यांसहित बाबांनी जॉन सरांना करून दिला व आपण या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करावे म्हणून आलो, असे सांगितले.
 
बाबांच्या संपर्कात जे कोणी आले, त्यांचा अनुभव हीच एक शिकवण ठरली. अशा अनेकांचे अनुभव एकत्र केेले तरी बाबांच्या जीवनपद्धतीचा चरित्रग्रंथ तयार होईल.
 
जिथे जिथे भ्रमण केले, तिथल्या कलाकारांना, त्यांच्या संगीत, नृत्य, नाट्य अशा कोणत्याही कलासाधकाच्या घरात ते कुटुंबसदस्यासारखे मिसळून जात. वयोवृद्ध व्यक्तीपासून लहान बाळापर्यंत, घरातल्या गृहिणीपर्यंत त्यांची आपुलकीने ते चौकशी करीत. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. एकदा नाव विचारले की, ते कायमचे स्मरणात राही.
 
 
त्यांची इच्छा नसतानाही संस्कार भारती आणि संघ स्वयंसेवकांनी बाबा योगेंद्रजींचा 75वा जन्मदिन अमृतमहोत्सव साजरा करण्याचा घाट घातला. त्या वेळी एकाच अटीवर ते कबूल झाले. जिथे जिथे हा सत्कार कार्यक्रम होईल, तिथे तो सत्कार माझा नव्हे, तर तिथल्या कलातपस्वींचा केला जाईल आणि तो मी आशीर्वाद म्हणून ग्रहण करेन. देशभरात 78 ठिकाणी हा सोहळा पार पडला.
 
 
मुंबईतला कार्यक्रम पाहिल्याचे चांगले आठवते. मंचावर मध्यभागी एक खुर्ची होती. कलाकार साधकाचे मंचावर आगमन झाले की, खुर्चीवर बाबा आपल्या खांद्यावरील शाल पांघरत आणि त्यावर कलाकाराला सन्मानाने बसवून त्याचा सत्कार करीत. यापूर्वी असा कधीही न झालेला कार्यक्रम आम्ही पाहत होतो.
 
 
कलाक्षेत्रातही डाव्या-उजव्या विचारसरणीची मंडळी असायची. परंतु बाबांना कधी तो भेदभाव करताना पाहिले नाही. प्रत्येक कलाकाराचा सन्मान व्हावा, त्याला कधीही दुखवू नये ही त्यांची तळमळ असे.
 
 
कर्नाटकातील मैसूरच्या उअतअ आर्ट स्कूलचे संस्थापक व्ही.एम. सोलापूरकर सर हे आमचे जे.जे. स्कूलमधील प्राध्यापक होते हे कळल्यावर मैसूरला गेले असता बाबा त्यांना घरी जाऊन भेटून आले. परत एकदा तिथे बैठकीस गेले असता बाबा म्हणाले, “चलो, आपके सोलापूरकर सर के घर जाकर मिलके आयेंगे। इन दिनों उन का स्वास्थ्य ठीक नहीं रहता।” बाबांनी प्रेमाने आपल्या विद्यार्थ्याला घरी आणले, हा आनंद सरांच्या चेहर्‍यावर दिसत होता. भेटणे, भेट घडवून आणणे आणि आपल्याला म्हणून जर कुणी प्रेमाने ‘भेट’ दिलीच तर ती त्वरित दुसर्‍याला अर्पण करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता.
 
 
अनेक कार्यक्रमांत बाबांचा सत्कार होई. कुणी फार उंची शाल त्यांना पांघरत असत. अशा वेळी कार्यक्रमात किंवा नंतर कुणी कलाकार-कलासाधक जर भेटावयास आला, तर त्या कलाकाराला तीच शाल पांघरून बाबा त्याचा सन्मान करीत. पूर्वी एकदा आग्रा येथील संघकार्यालयात बाबांच्या खोलीत जाण्याचा योग आला होता. तिथे कपाटात-कपाटावर बाबांना मिळालेल्या अनेक स्मृतिचिन्हांची गर्दी दाटीवाटीने भरली होती, पण तिथे एखादीही शाल दिसली नाही. मनात विचार केला की, त्यांना मिळालेली शाल कधी त्यांना आपल्या खोलीत आणलीच नसणार, कारण ती लगेचच कुणाच्यातरी खांद्यावर आशीर्वाद म्हणून स्कंदातरित होत असे.
 
 
वयपरत्वे बाबांचे एकट्याने भ्रमण करणे योग्य नाही, हे सर्वांनाच जाणवत होते. त्यामुळे त्यांचा नकार असतानाही कधी प्रचारक नंदकिशोरजी, कधी तरुण प्रचारक दीपक शर्माजी बाबांबरोबर राहू लागले. त्या वेळी बाबांबरोबरचे नाते सेवकाप्रमाणे नसून पितापुत्रासारखे किंवा आजोबा-नातवासारखे असायचे. दीपकजी बाबांबरोबर असताना एकदा दीपकजींना ‘चिकनगुनिया’ आजाराने ग्रासले. दीपकजींची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. त्या वेळी बाबांनी त्यांची नातवासारखी सेवा केली. रात्र रात्र त्याच्या उशाशी बसून परमेश्वराची प्रार्थना करीत.
 
 
1857च्या स्वातंत्र्यसमराच्या 150व्या वर्षपूर्तीचा देशभरातील कार्यक्रम ‘सरहद्द को स्वरांजली’, ‘पूर्वोत्तर कला महोत्सव’, ‘कुंभमेळा’ अशा एक ना अनेक कार्यक्रमांना बाबांची हजेरी असे. त्यांच्या उपस्थितीने कला कार्यकर्त्यांना हुरूप येई. व्यक्तीव्यक्तींना भेटणे, विचारपूस करणे, त्यांचे कार्यक्रम ठरवणे आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी त्यांच्या स्मरणात असत, तसेच त्यांच्या रोजनिशीत त्यांची नोंद असे.
 
 
आजारपणाने रुग्णालयात दाखल झालेला कालावधी सोडला, तर त्यांचा नित्यक्रम त्यांनी कधीही चुकवला नाही. रोज पहाटे ते चार वाजता उठत. आपले कपडे स्वत: धूत. स्नान आटोपून ते पत्र लिहायला बसत. कुणाची ख्यालीखुशाली, जन्मदिवस शुभेच्छा, कुणाला लाभलेला सत्कार किंवा पुरस्कार, कधी कुणा कार्यकर्त्याच्या घरी झालेली दुख:द घटना या विषयांची अनेक पत्रे ते स्वत: लिहून पाठवीत. जिथे जाऊ, तिथे संघशाखेवर एकात्मता स्तोत्र पठण, प्रार्थना त्यांनी चुकवली नाही.
 
 
कुणा कार्यकर्त्याच्या घरी उतरल्यावर तिथे जो कुणी इकडेतिकडे जाईल त्याचा ते परिचय करून घेत. महिलांचा त्यांनी कायम सन्मान केला. कुणाला ते ‘ताई’ म्हणत, तर कुणाला ‘देवीजी’ म्हणून संबोधत. कुणा महिलेला ‘बेटी’ म्हणून पुकारल्यावर, जन्म सार्थक झाल्याचा भाव तिच्या चेहर्‍यावर दिसे. त्या घरातील नोकरचाकर किंवा गाडीचा ड्रायव्हर या सगळ्यांशी ते अत्यंत आपुलकीने बोलत. आयुष्यभर बाबांनी माणसे जोडली. बाबांनी एखादा विषय घेऊन व्याख्यान दिले असे कधी ऐकले नाही. काही साहित्य लिखाण लेख लिहिलेले ऐकिवात नाही. संगीत, नृत्य विषयांत काही शास्त्रोक्त अभ्यास होता असेही नाही. पण तरीसुद्धा संपूर्ण कलाक्षेत्र त्यांना अत्यंत निकट होते. कला-साधना-कलाकार-कार्यकर्ता आणि कार्यक्रम यातच त्यांचा अविश्रांत वावर होता. खर्‍या अर्थाने ते कलातपस्वी होते.
 
 
पुराणकाळात ॠषिमुनी होते. त्यांची नावे आम्ही ऐकत आलो. हे केवळ कथेतच असतात असे कुणी म्हणेल. आम्ही बाबा योगेंद्रजींच्या रूपाने ॠषितुल्य व्यक्तिमत्त्व पाहिले, अनुभवले. त्यांचे सान्निध्य लाभले.
 
 
असे परमश्रद्धेय व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यकीर्तीने चिरंजीव असते हे जरी खरे असले, तरी देहरूपाने त्यांचे नसणे आम्हाला पोरकेपणा देऊन गेले, ही वेदना आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी आणि क्षती जाणवते आहे.
 
 
जलते जीवन के प्रकाश में
 
अपना जीवन तिमिर हटाएँ
 
उस दधिची की तप: ज्योतिसे
 
एक एक कर दीप जलाएं।
 
राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारती