साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते के.ओ. गिर्‍हे यांचे निधन

विवेक मराठी    18-Jun-2022
Total Views |
@दिवाकर कुलकर्णी
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के.ओ. गिर्‍हे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
 

girhe 
मित्रवर्य डॉ. ऋषिकेश कांबळे सरांचा फोन आला. त्यांनी के.ओ. गिर्‍हे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाल्याची बातमी दिली. मन सुन्न झाले.
 
एक तळमळीचा सच्चा कार्यकर्ता होते के.ओ. गिर्‍हे. यांचा परिचय झाला 1995 साली. भटके विमुक्त विकास परिषदेच्या एका अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी छावणीतील त्यांच्या घरी गेलो होतो. त्या निमित्ताने श्रीमती गिर्‍हेताईंचे ‘मरणकळा’ वाचनात आले. गोपाळ समाजातील पहिली 10वी उत्तीर्ण, पहिली डी.एड., पहिली शिक्षिका, तीही मराठवाड्यातील! मी ‘मरणकळा’ वाचून भारावून गेलो. ह्या दांपत्याला भेटलो. मग स्नेह, जिव्हाळा वाढतच गेला. ह्या दांपत्याला श्री संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार देण्याचे नक्की झाले. संभाजीनगरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 1000 आसनक्षमता असलेल्या सभागृहात मोठा समारंभ झाला. सभागृह खचाखच भरले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामुआण्णा दाते ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, मार्गदर्शक आदरणीय दादा इदाते, विजयराव कापरे यांच्याशी के.ओ. गिर्‍हे संपर्क करीत राहिले.
 
 
के.ओ. गिर्‍हे नंतर सतत भेटत राहिले. त्यांच्या सर्व परिवाराशीच स्नेह वाढत राहिला. आपण कितीही मोठे झालो, तरीही समाजाच्या सुखदु:खाशी आपली नाळ न तोडता सच्ची तळमळ असलेले कार्यकर्ते म्हणून के.ओ. गिर्‍हे माझ्यासह अनेकांच्या स्मृतीत आहेत, राहतील. कोविड-19 साथीच्या काळातही त्यांनी 4-5 वेळा फोन करून संभाजीनगर परिसरातील भटक्या समाजाच्या पालांवर शिधा किट्स पोहोचवता येतील का, अशी विचारणा केली. पाठपुरावाही केला. त्यांच्या सूचनेनुसार रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून धान्य किट्सही पोहोचविली गेली. त्यांना मी फोन करून हे वृत्त सांगितले, यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
 
 
भटक्यांचे भावविश्व हे नियतकालिक त्यांनी खूप कष्टाने चालविले. स्वतः विपुल लेखन केले. श्रीमती गिर्‍हे आणि त्यांच्या परिवारावर के.ओ. गिर्‍हे ह्यांच्या दुःखद आणि अचानक निधनाने मोठे दुःख कोसळले आहे. गिर्‍हे यांच्या आत्म्यास शांती लाभो व के.ओ. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच प्रार्थना!
- दिवाकर कुलकर्णी