योग: कर्मसु कौशलम्

विवेक मराठी    20-Jun-2022
Total Views |
 @उज्ज्वला करंबेळकर । 9869609078
 
आज एकविसाव्या शतकाच्या एकवीस वर्षांनंतर महिला आकाशाला गवसणी घालत कर्तृत्वाची ध्वजा उंच फडकवू लागल्या. निसर्गाने सोपवलेली मातृत्वाची जबाबदारी आहेच.. काळाबरोबर वाढत्या शारीरिक, मानसिक व भावनिक गरजांना पुरे पडताना तिची दमछाक होऊ लागली आणि तिला शारीरिक, मानसिक शांतीची गरज वाटू लागली. सुस्वास्थ्य मिळवण्यासाठी तरुणी, युवती, वृद्ध महिला यांना योगाभ्यासाचा अनमोल ठेवा नक्कीच वरदान आहे. जागतिक योग दिनानिमित्त (21 जून) योग आणि महिलांचे आरोग्य याविषयीचे विवेचन करणारा लेख.

yoga
मनुष्यप्राणी सतत सुखी होण्यासाठी धडपडत असतो. जे आपल्याकडे नाही, ते मिळवण्यापाठी आयुष्यभर धावतो. सर्वांनाच जीवनात सुख, आनंद व आरोग्य हवे असते. मात्र सुखाची ठोक व्याख्या कोणालाच जमलेली नाही. कारण सुखाच्या कल्पना माणसागणिक बदलतात. मोठे घर, गाडी, मदतीला हाताखाली माणसे, अमाप पैसा अशी सगळी सुखे मिळूनही माणसे सुखी झालीयेत का? नक्कीच नाही.. कारण आनंद, सुख, समाधान हे मानसिक स्तरावर अनुभवता येते, पैशाने विकत घेता येत नाही.

शांत, समाधानी मन:स्थिती माणसाला शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते व अशा निरोगी शरीरांत सुदृढ मन वास करते. शरीर-मनाच्या या परस्पर संयोगातून, परस्परपूरकतेतून सुखी समाधानी जीवनाची अनुभूती घेता येते. यालाच योग म्हणतात. योग हा शब्द, संस्कृत धातू ‘युज’पासून बनला आहे. त्याचा अर्थ जोडणे, संयोग करणे. योगशास्त्र हे मूलत: आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीचे शास्त्र आहे. त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे समाधी किंवा कैवल्य.

हजारो वर्षांपूर्वी ॠषिमुनींना ‘को हम्’सारख्या पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना, ब्रह्मांड - चराचर सृष्टी - पंचमहाभूते यांचे आकलन करताना, निसर्गाच्या सान्निध्यात सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना या सर्वांमधील समान असलेले चैतन्याचे नाते उलगडले आणि अद्वैताच्या पायावर योगशास्त्राचा उगम, विकास झाला. म्हणूनच योगाचा मुख्य उद्देश आहे स्वत:बद्दलचा साक्षात्कार किंवा समाधी. आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होणे म्हणजेच योग. शरीर, मन व आत्मा यांच्या संयोगाने केला जातो तो योग.

 
हठप्रदीपिका, घेरंड संहिता, शिव संहिता, गोरक्ष संहिता, पातंजल योग दर्शन अशा ग्रंथांतून चतुरंग योग, सप्तांग योग, पंचपतल, षडांग योग, षट्क्रिया, षट्चक्र, अष्टांग योग यांचा पुरस्कार केला आहे.

अष्टांग योगात महर्षी पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे सांगितली आहेत. ह्यांच्या आचरणाने, कमलदलांप्रमाणे सुंदर, सात्त्विक, प्रसन्न, तेजस्वी, उत्फुल्ल, चैतन्यदायक व्यक्तिमत्त्व उमलते, विकसित होते.
काही योगसाधक आध्यात्मिक उद्दिष्टाने निर्विकल्प समाधीच्या ध्येयाने योगसाधना करतात, तर सर्वसामान्य माणूस सुस्वास्थ्य, संतुलित व्यक्तिमत्त्व, रोगप्रतिकारकता, पुनर्वसन, कुशलता, मनोकायिक उन्नती ह्या उद्देशांनी योगाभ्यासाकडे वळते. दोघांचेही योगाभ्यासाचे उद्देश भिन्न असले, तरी त्याचे तंत्र व मार्ग एकच आहे.
हठप्रदीपिका या ग्रंथात म्हटलेय,
युवा वृद्धोती वृद्धोवा व्याधितो दुर्बलो पि वा ।
अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्वयोगेष्वतन्द्रित: ।
अर्थात - युवक, वृद्ध, अतिवृद्ध, दुर्बल, व्याधिपीडित कोणीही योगाभ्यास करू शकतात.
 
महिला आणि योगाभ्यास
 
आधुनिक महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. मागील शतकातील, स्त्रियांनी कशाला शिकायचे, नोकरी तर दूरच... चूल व मूल हेच तिचे कार्यक्षेत्र ही मानसिकता औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे 1960-1970च्या दशकापासून हळूहळू बदलत गेली. स्त्री शिकली, अर्थार्जन करू लागली आणि जागतिकीकरणानंतर (2000नंतर) तिच्यासमोरचे शिक्षण-नोकरी-व्यवसायाच्या संधीचे क्षितिज रुंद होत गेले. अनेकविध क्षेत्रांत महिला सहज आत्मविश्वासाने वावरू लागल्या. अनेकींनी लघुउद्योग सुरू केले, सहकाराच्या / बचत गटाच्या मदतीने व्यवसाय सुरू केले व अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.


yoga
आज एकविसाव्या शतकाच्या एकवीस वर्षांनंतर महिला आकाशाला गवसणी घालत कर्तृत्वाची ध्वजा उंच फडकवू लागल्या. जात्याच मेहनती, प्रामाणिक, स्वावलंबी, चिकाटीची व विश्वासार्हता असलेली महिला अधिक शिक्षित, ज्ञानी, स्वावलंबी, कर्तबगार झाली आणि आत्मविश्वासाने तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगाला सामोरी जात नवनवीन क्षेत्रांत आज ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.

परंतु हे सर्व करत असताना, तिला अनेकविध प्रकारच्या (कौटुंबिक, कार्यालयीन, शैक्षणिक, व्यवसायाच्या) ताणतणावांना सामोरे जावे लागते. तिचा रोजचा दिनक्रम अधिकच गतिमान झाला, पायांना चाके लावून, दिवसभर एकामागून एक कामांमध्ये ती गुरफटून गेली आहे. कुटुंबाच्या व समाजाच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या, तशाच तिच्या स्वत:च्याही स्वत:बद्दलच्या अपेक्षा वाढल्या. विजेच्या चपळाईने तिचे शरीर व मन काम करू लागले. निसर्गाने सोपवलेली मातृत्वाची जबाबदारी आहेच.. काळाबरोबर वाढत्या शारीरिक, मानसिक व भावनिक गरजांना पुरे पडताना तिची दमछाक होऊ लागली आणि तिला शारीरिक, मानसिक शांतीची गरज वाटू लागली.

सुस्वास्थ्य मिळवण्यासाठी तरुणी, युवती, वृद्ध महिला यांना योगाभ्यासाचा अनमोल ठेवा नक्कीच वरदान आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला योगाभ्यास स्त्रीची ही ओढाताण कमी करून तिचे जीवन उजळवून आनंदमय करू शकतो.

स्त्री-जीवनाचे ढोबळमानाने चार कालखंड पाहू.
प्रथम कालखंड - शैशव-बाल्य 1 ते 13
द्वितीय कालखंड - किशोरी-यौवनावस्था-उत्तरयौवनावस्था 14 ते 45
तृतीय कालखंड - प्रौढावस्था-उत्तरप्रौढावस्था 46 ते 60
चतुर्थ कालखंड - वृद्धावस्था 61 ते 75

शिक्षण, नोकरी, करिअर यातील तणाव, मासिक पाळीशी निगडित समस्या, विवाहानंतरचे बदल, त्यातील तडजोडी, प्रसूतिपूर्व, प्रसूती व प्रसूतिपश्चात कालावधीतील संतुलन, स्तनपान, मुलांचे संगोपन, रजोनिवृत्ती आणि वृद्धावस्था अशा प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांची शारीरिक, मानसिक गरज वेगवेगळी असते.

किशोरी-युवती - या वयात सूर्यनमस्कार, पळणे, दोरीउड्या याबरोबरच वज्रासन, ताडासन, उष्ट्रासन, उत्कटासन, सेतुबंधासन, पश्चिमत्तानासन, त्रिकोणासन, वक्रासन, चक्रासन, योगमुद्रा, हलासन, सर्वांगासन, विपरीत कर्णी मुद्रा, पवनमुक्तासन, भ्रामरी प्राणायाम यांचा फायदा होतो.

शारीरिक वाढ निकोप होते, अंत:स्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते व पचन संस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था सक्षम होतात. रक्ताभिसरण वाढून उत्तम आरोग्य लाभते.

द्वितीय कालखंडातील 25 ते 45 ही वर्षे हा शारीरिक, मानसिक, स्तरावरील विविध बदलांचा असतो. (नोकरी, विवाह, मातृत्व.)
प्रसूतिपूर्व काळात वज्रासन, मार्जारासन, त्रिपाद मार्जारासन, मंडुकासन, पादांगुष्ठासन, हनुमंतासन, उत्तान भद्रासन, सुलभ उष्ट्रासन, पर्वतासन, सुलभ पार्श्वहस्तासन, उत्तान ताडासन, चक्रासन, अनुलोम-विलोम, जिव्हा बंध, सिंह मुद्रा, ब्रह्म मुद्रा, भ्रामरी रेचक, वामांगासन, तर प्रसूतिपश्चात वरील सर्वांबरोबर हस्तपादासन, पवनमुक्तासन अश्विनीमुद्रेसहित, अर्ध द्रोणासन, सुलभ अग्निसार व शुष्क गजकर्णी, पूर्व भुजंगासन, अर्ध शलभासन, शशांगासन, सुलभ मकरासन, वज्रासनस्थ योगमुद्रा, तडागी मुद्रा, उज्जायी प्राणायाम, सोहम् ध्यान यांच्या सरावाने सुलभ प्रसूतीला मदत होते आणि प्रसूतिपश्चात स्त्रीला पुन्हा पूर्वआरोग्य/स्थिती प्राप्त होते.

प्रौढावस्था-उत्तरप्रौढावस्था - या तृतीय कालखंडात प्राणायाम, श्वसनमार्ग शुद्धी, मार्जारासन, सुलभ पवनमुक्तासन, उत्तान ताडासन, उत्तान वक्रासन, सुलभ सेतुबंधासन, सुलभ वृश्चिकासन, सुलभ भद्रासन, अर्ध शलभासन, सुलभ चक्रासन, सुलभ अनंतासन, जिव्हा बंध, सिंह मुद्रा, ब्रह्म मुद्रा, तडागी मुद्रा, अनुलोम-विलोम, भ्रामरी रेचक प्राणायाम, चंद्राभ्यास यांच्या सरावाने मन शांत होते, चित्त स्थिर होते, सकारात्मकता वाढते व पर्यायाने रजोनिवृत्ती सहज व सुलभ होते.


yoga
 
वृद्धावस्था - वृद्धावस्थेत शारीरिक हालचाल मंदावते, पाठीचा कणा-स्नायू-सांधे यातील लवचीकता कमी होते, विसराळूपणा वाढतो व चिडचिडेपणा येतो, स्मृतिभ्रंश, मोतीबिंदू, बहिरेपणा या व अशा विविध कारणांकरता वृद्ध स्त्रियांनी आपापल्या मनोकायिक क्षमतेनुसार सहजसाध्य योगाभ्यास करावा. जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीत बसून, झोपून ध्यान, प्राणायाम करावे. एकाच वेळी सगळा योगाभ्यास न करता दिवसातून दोन-तीन वेळा करावा. ॐकार जप, सोहम् ध्यान याबरोबरच शक्य असल्यास सुलभ पवनमुक्तासन अश्विनीमुद्रेसहित, सुलभ उत्तान अग्निसार आणि शुष्क गजकर्णी, सुलभ हस्तपादासन, उत्तान ताडासन, ऊर्ध्व कटी-अधोकटी क्रिया, दक्षिण कटी-वाम कटी क्रिया, सुलभ उत्तान कपालभाती, श्वसनमार्ग शुद्धिक्रिया, सुलभ तडागी मुद्रा, पूर्व चक्रासन, अनुलोम-विलोम, जिव्हा बंध, सिंह मुद्रा, ब्रह्म मुद्रा, चैतन्यासन ( शवासन ) यांचा सराव करावा.

स्त्रियांनी आनंदी, समाधानी आयुष्याकरता नियोजनपूर्वक, शिस्तबद्ध, निरंतर योगाभ्यास केला तर मानसिक ताणतणाव, भावनिक अस्थिरता, शारीरिक व्याधी, कौटुंबिक अस्वास्थ्य नक्कीच टाळता येईल.


yoga
योगाभ्यासाने उत्साह वाढतो, शरीर हलके होते, हालचालीत सफाई आणि कार्यात कुशलता येते, मनोधैर्य-आत्मविश्वास वाढतो, अंत:स्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते, भावनिक संतुलन होऊन प्रसन्न वाटते. प्राणायामामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
आरोग्यरक्षण व आरोग्यसंवर्धन याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते, ऑपरेशननंतर पुनर्वसनासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरतो. योगाने, प्राणायामाने मनाची शुद्धी होते, मनाला स्थिरता येते.

आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे, तर सामाजिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे आरोग्य. हे फक्त आणि फक्त योगमार्गानेच साध्य होते.

अष्टांग योगाच्या आचरणाने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. सदसद्विवेकबुद्धी जागृत होते, खरे-खोटे, चांगले-वाईट, न्याय-अन्याय, इष्ट-अनिष्ट यातील फरक समजतो. मनाचे सामर्थ्य वाढते.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, समत्वं(म्) योग उच्यते।

-यश-अपयश, सुख-दु:ख, लाभ-हानी ह्या परस्परविरोधी गोष्टी शांत, स्थिर मनाने स्वीकारता येतात. योग त्यांच्याकडे समत्व भावनेने पाहायला शिकवतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यावर मात करता येते. एक संतुलित, परिपूर्ण, चैतन्यदायक जीवन जगता येते.

तात्पर्य, आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या व सोशल मीडियाच्या या युगात स्त्रियांनीच आपले स्वत:चे आरोग्य जपले पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्री शिकली की कुटुंबाला साक्षर करते, त्याचप्रमाणे निरोगी-आरोग्यपूर्ण स्त्री घरादाराला, आसपासच्या वातावरणातील घटकांना निरोगी ठेवते.

योगशास्त्र आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, जो परंपरेने चालत आलेला आहे. स्वयंशिस्त, सामाजिक शिस्त, आसने-बंध-मुद्रा-प्राणायाम, धारणा-ध्यान ह्या सर्वांच्या एकत्रित आचरणाने आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव जीवन आनंदमय करतो.
लेखिका योगविद्या निकेतनमध्ये वरिष्ठ योगशिक्षिका आहेत.