निवडणूक राज्यसभेची, निकाल महाराष्ट्राचा

विवेक मराठी    21-Jun-2022   
Total Views |
आज राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानादेखील त्यांना राज्यसभेत आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यात आलेले अपयश हे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र अगदी तीन उमेदवार दिल्याची घोषणा केल्यापासून ते निकाल लागेपर्यंत अत्यंत बारकाईने नियोजन करत, कुठेही अतिआत्मविश्वास न दाखवता, वाट्टेल तशी विधाने न करता, शांतपणे ही निवडणूक जिंकून दाखवली. या विजयाचे शिल्पकार ठरले देवेंद्र फडणवीस.

bjp
“अकेला फडणवीस क्या करेगा..” अशा स्वरूपाचे खिल्लीवजा उद्गार राष्ट्रवादीच्या नेत्या, शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी एका जाहीर सभेत काढले होते. भाजपाच्या विरोधकांनी अर्थातच ते बर्‍यापैकी उचलूनसुद्धा धरले होते. ’अकेला फडणवीस क्या क्या कर सकता है’ याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिले आहे. भाजपाच्या 105 आमदारांना आम्ही घरी बसवले, अशा प्रकारच्या वल्गना महाविकास आघाडीचे अनेक मोठमोठे नेते करत होते. ज्यांना घरी बसवल्याचे म्हटले गेले, ते 105 आमदार आणि त्यांचा नेता काय काय करू शकतात, याचेही उत्तर या महाविकास आघाडीच्या तमाम नेत्यांना राज्यसभा निवडणुकीतून मिळाले असेल. ही निवडणूक जरी राज्यसभेची होती, तरी तिचा निकाल महाराष्ट्राने दिला आणि महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशाही या निवडणुकीने स्पष्ट केली.
 
आज राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानादेखील त्यांना राज्यसभेत आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यात आलेले अपयश हे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. याचबरोबर गेल्या दोन-तीन वर्षांच्या ट्रेंडला अनुसरून याही खेपेस या तीन पक्षांतील सर्वाधिक नाचक्की झालेला पक्ष हा शिवसेना आहे. ही नाचक्की केवळ निवडणुकीपुरती नाही, तर स्थायी स्वरूपाची करण्याचा विडाच शिवसेना नेत्यांनी उचललेला दिसतो. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेत्यांकडून झालेली विधाने पाहिली, तरी हे लक्षात येते. काय तर भाजपाने ईडीचा डाव खेळला, आता रडीचा डाव खेळला, मित्रपक्षांनी आणि अपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली, भाजपा जिंकला पण त्यांचा विजय मात्र झाला नाही, भाजपाने आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीसाठी वापरली वगैरे.. गल्ली क्रिकेटमध्ये किंवा बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक ठिकाणी नियम असतो आणि त्यानुसार ’फास्ट बॉल’ टाकण्यास मनाई असते. परंतु मैदानावरच्या मुख्य, ’मेनस्ट्रीम’ क्रिकेटमध्ये असले नियम चालत नाहीत. आता शिवसेनेचे दुर्दैव हे की त्यांच्या नेत्यांना इतकी वर्षे गल्लीतले बॉक्स क्रिकेट खेळायचीच सवय लागली असून त्यांचे हेच लोक आता मैदानावर क्रिकेट खेळायला आले आहेत. स्वाभाविकपणे दोन-चार चेंडूंत त्यांची विकेट पडते आणि मग सेना नेते तक्रारी करत बसतात की गोलंदाजाने फास्ट बॉल टाकला. मुळात समस्या ही नव्हे की गोलंदाजाने गतीने चेंडू टाकला. समस्या ही आहे की या मंडळींना क्रिकेट खेळता येत नाही..

 
अगदी पहिल्या दिवसापासून शिवसेनेने स्वतःच्या आकलनामुळे म्हणा किंवा सल्लागारांनी चुकीचे कान भरल्यामुळे म्हणा, अतिशय गंभीर अशा चुका केल्या. चुका केल्या त्या केल्या, त्याच्या आधारावर मोठमोठ्या वल्गनाही केल्या. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंब्याच्या बाबतीत जो काही घोळ शिवसेनेने घातला, त्यातून संभाजीराजे आणि त्यांचे समर्थक दुखावले गेले. निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरला सभा घेतली. निवडणूक तोंडावर आलेली असताना अतिशय चुकीच्या टायमिंगवर त्यांनी ही सभा घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा संघ-भाजपाच्या हिंदुत्वावर टीका वगैरे करत आम्ही आता कसे काँग्रेसच्या जवळ आलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आणखी एक वर्तुळ पूर्ण केले.
दुसरीकडे भाजपाने मात्र अगदी तीन उमेदवार दिल्याची घोषणा केल्यापासून ते निकाल लागेपर्यंत अत्यंत बारकाईने नियोजन करत, कुठेही अतिआत्मविश्वास न दाखवता, वाट्टेल तशी विधाने न करता, शांतपणे ही निवडणूक जिंकून दाखवली. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हे तर मधल्या काही दिवसांत कोविडमुळे आजारी होते, क्वारंटाइन होते. तरीही, हाती कमी वेळ असतानाही, फडणवीस यांनी ’करून दाखवले’. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. ते म्हणाले की, ‘’देवेंद्र फडणवीसांच्या लोकांना आपलेसे करून घेण्याच्या कौशल्यातून हा विजय साकार झाला आणि हा चमत्कार घडला.” ही लोकांना आपलेसे करून घेण्याची जी कला किंवा कौशल्य फडणवीसांकडे आहे ते कुणाकडे नाही, ज्यामुळे हा पराभव झाला, हे मात्र पवारांनी सांगितले नाही. फडणवीसांनी कोणत्या लोकांना आपलेसे करून घेतले ज्यामुळे भाजपाकडे बहुमत नसतानाही हा विजय साकार झाला, हेही शरद पवारांनी सांगितले नाही.
या लेखात आधी उल्लेखल्याप्रमाणे या निवडणुकीत नेहमीप्रमाणे सर्वाधिक नाचक्की झालेला पक्ष हा शिवसेना ठरला, त्याचप्रमाणे सर्वाधिक शंकांना वाव देणारा पक्ष हाही नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच ठरला. अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे धोरण पाहिल्यानंतर हे आपल्या लक्षात येते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार होता, म्हणून या वेळी शिवसेनेला दुसरा उमेदवार देण्याची संधी देऊन दिलेला शब्द पाळण्यात वगैरे आला. मग छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीचे प्रकरण पार पडले, ज्यात राष्ट्रवादीने सूचक मौन पाळले आणि चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला. तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे दोन आमदार - माजी मंत्री अर्थात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता यावे म्हणून कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात राष्ट्रवादीने किती गती दाखवली, किती गांभीर्याने प्रयत्न केले, हाही संशोधनाचा विषय. मते फुटू नयेत यासाठी आमदारांना फाइव्ह स्टार हॉटेलवर ठेवण्याची औपचारिकता पार पडली. दरम्यान तिकडे संजय राऊत शरद पवारांचे रोज नियमितपणे गुणगान गात होतेच. आणि प्रत्यक्षात काय झाले? तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवाराला बळ देणे, काँग्रेसला जवळ करणे अधिक पसंत केले. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षाचा एक अतिरिक्त राज्यसभा उमेदवारही निवडून आणू शकत नाहीत, अशी भावना तळागाळातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.
भाजपाला मिळालेली मते पाहिली, तर आपल्या लक्षात येते की ही मते केवळ अपक्षांची वा एक-दोन आमदार असलेल्या छोट्या पक्षांची नाहीत. त्यामुळेच महाविकास आघाडी नावाचा भ्रमाचा भोपळा आतून किती पोकळ आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होते. सर्वसाधारणपणे अपक्ष वगैरे मंडळी ही राज्यातल्या सत्तेच्या जवळ राहणे पसंत करत असतात. हा सर्वसाधारण ट्रेंड असतो. या वेळीही तोच ट्रेंड पाळला जाईल, असा अंदाज सर्व जण व्यक्त करत होते. भाजपाने तिसरा उमेदवार शिवसेनेला घाबरवण्यासाठी किंवा दबाव टाकण्यासाठी दिला असून अगदी अखेरच्या क्षणी धनंजय महाडिक माघार घेणार असल्याचेही म्हटले जात होते. प्रत्यक्षात काही भाजपा नेत्यांशी ऑफ द रेकॉर्ड चर्चा झाली असता त्यांनी आमचाच तिसरा उमेदवार जिंकणार हे अगदी स्पष्टपणे सांगितले. अगदी पहिल्या दिवसापासून. या सर्व घडामोडींतून अर्थ हाच निघतो की, आज महाविकास आघाडी आणि त्यांच्या तीन पक्षांसोबत राहून आपले राजकीय करिअर सेफ नाही, ही असंख्य आमदारांची भावना आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा हाच उद्याचा एकमेव पर्याय आहे, हीसुद्धा त्यांची भावना आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अनेक जण भाजपामध्ये सामील झाले होते. 2019मध्ये जेव्हा शिवसेनेने युती मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, तेव्हा अनेक राजकीय विश्लेषक म्हणायला लागले की जे जे तेव्हा भाजपामध्ये गेले, ते आता परत फुटून सत्ताधारी पक्षात जातील. प्रत्यक्षात एकही गेला नाही, आज या सरकारला अडीच वर्षे होऊनदेखील. याचे स्वच्छ-स्पष्ट कारण हेच की आपले राजकीय भवितव्य भाजपामध्येच सुरक्षित आहे आणि पुढच्या काळात भाजपा हाच पर्याय आहे, याचा अचूक अंदाज या मंडळींकडे आहे. ही राज्यसभा निवडणूक आणि त्यात भाजपा उमेदवारांना झालेले मतदान म्हणजे याच भावनेतून देण्यात आलेला स्पष्ट संदेश आहे.
 
त्यामुळे या सर्व गोष्टींचा अचूक अंदाज ठेवत, लरश्रर्लीश्ररींशव ीळीज्ञ घेत, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाची पकड सिद्ध केली. तीन-तीन पक्ष, त्यांचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अनेक मोठमोठे दिग्गज नेते या सर्वांना फडणवीस यांनी पुन्हा एकदा धूळ चारली. तुम्ही माझी जात काढा, वैयक्तिक टीकाटिप्पण्या करा, पत्नीबाबत- कुटुंबाबाबत खालच्या स्तरावर जाऊन टीका करा किंवा आणखी काही करा, मी या सगळ्याला भीक घालणार नाही, कारण माझे लक्ष्य आणि पल्ला या सार्‍याच्या खूप पुढचे आहे आणि म्हणूनच माझे आव्हान तुम्हाला पेलवणारे नाही, हा स्पष्ट संदेश फडणवीस यांनी या निवडणुकीतून दिला. हा संदेश जसा आता होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आहे, तसाच तो मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकीसाठीदेखील आहे. त्यामुळेच ‘पुढील किमान दहा-पंधरा वर्षे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस हेच नाव राहणार असल्याचे संकेत देणारी निवडणूक’ असे या राज्यसभा निवडणुकीचे वर्णन करता येईल.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.