दक्षिण सरस्वती ‘औवैयार’

विवेक मराठी    21-Jun-2022   
Total Views |
 औवैयार यांचा जन्म हलक्या कुळातील कन्येच्या रूपाने झाला होता व अत्यंत उपेक्षित समाजाच्या वस्तीत त्यांचे सर्व बालपण गेले. असे असतानाही आपल्या अंगभूत गुणांमुळे त्यांनी लोकप्रियतेचे गौरीशंकर गाठलेले आपल्याला दिसून येते. औवैयार या संत कवयित्रीने आजीवन ‘चरैवेति, चरैवेति’ हा मंत्र जपत सर्वत्र भ्रमण केले आणि सर्वसामान्य माणसाला भगवंताच्या प्राप्तीसाठी ईश्वरभक्तीचा बोध करून दिला.
 
sant
 
दक्षिणेतील साहित्यात ज्या संत कवयित्रीला ‘सरस्वती’ म्हणून संबोधण्यात आले आहे, ती म्हणजे संत औवैयार. या संत कवयित्रीचे मूळ नाव औवै एवढेच आहे, पण तिला आदराने ‘यार’ असा प्रत्यय लावण्यात आल्यामुळे तिचे नाव औवैयार. संत औवैयार यांच्या साहित्यिक रचना या सरस आणि सहज सोप्या असल्यामुळे आजही प्रत्येक तामिळ भाषक व्यक्तीच्या मुखात आणि हृदयातही विराजमान आहेत. तामिळ साहित्यात संत तिरुवल्लुवर यांचे स्थान सर्वोच्च आहे, पण औवैयार यांच्या वाट्याला जी लोकप्रियता आली आहे, ती आजपर्यंत कोणालाच लाभू शकलेली नाही. या संत कवयित्रीने आजीवन ‘चरैवेति, चरैवेति’ हा मंत्र जपत सर्वत्र भ्रमण केले आणि सर्वसामान्य माणसाला भगवंताच्या प्राप्तीसाठी ईश्वरभक्तीचा बोध करून दिला. औवैयार यांची आई अस्पृश्य समाजातील तरुणी होती व पिता सवर्ण समाजातील असल्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. औवैयार यांचा त्यांच्या मातेने जन्मत:च त्याग केला. या घटनेबाबत औवैयार भाष्य करताना म्हणतात - ‘हे प्रिय माते, रडू नकोस. तो शिवशंकर जिवंत आहे, तो नाही ना मेला! त्यानेच माझे असे नशीब लिहिले आहे. त्यामुळे सर्व संकटातून माझे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे!’ औवैयार यांचा ‘पाणर्’ या अस्पृश्य मानल्या जाणार्‍या जातीतील एका सहृदय माणसाने सांभाळ केला.
 
 
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील थोर नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी या कवयित्रीचे योगदान दर्शविणारे ‘औवैयार’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात राजगोपालाचारी म्हणतात, ‘औवै ही श्रम करून घाम गाळणार्‍या लाखो-करोडो जनतेच्या बुद्धिमत्तेची सांस्कृतिक प्रतिनिधी होय.’
 
 
त्यांचे हे कथन सर्वथैव योग्य आहे. समाजाकडे पाहण्याची एक विशेष दृष्टी औवैयार यांनी विकसित केली होती. आपला सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास औवैयार यांना पूर्णत: ज्ञात होता. त्यामुळे जेव्हा तत्कालीन सम्राटाने ‘कोणत्या जातीच्या मनुष्यास दरबारात मंत्रिपद दिले असता समाजाचे कल्याण होईल?’ असा प्रश्न विचारला असता औवैयार यांनी अत्यंत उचित असे उत्तर दिले आहे. औवैयार म्हणाल्या, “हे राजा, आपण ब्राह्मण समाजातील मनुष्यास मंत्री केल्यानेच योग्य मार्ग सापडेल असे समजू नकोस. क्षत्रिय समाजातील मनुष्यास मंत्री केल्यास तो युद्धावाचून अन्य विचार करेल याची हमी नाही. त्यामुळे आपल्या वंशातील व्यक्तीला मंत्री बनवू नकोस. वैश्य समाजातील व्यापारी वृत्तीच्या मनुष्यास मंत्री केलेस तर खजिना भरला जाईल, पण करांच्या ओझ्याखाली जनता दबून जाईल. यापेक्षा श्रमिक समाजातून आलेल्या व्यक्तीस मंत्री केल्यास तो आपल्या सर्व समाजबांधवांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यामुळे तुमच्या शासनाला एक प्रतिष्ठा प्राप्त होईल.”
 
 
अर्थात, हा श्रमिक वर्गातील चहा विकणाराही असू शकतो आणि शासनव्यवस्थेला एक गरिमा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकतो, यासाठी ‘हातच्या कांकणाला आरसा कशाला?’ ही म्हण सार्थ म्हणावी लागेल. औवैयार यांच्या सल्ल्यातच आपल्याला त्यांचे द्रष्टेपण दिसून येते आणि संत हे समाजविन्मुख होते या फुसक्या आरोपातील हवा निघून जाते, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
सर्व संतांच्या आयुष्यात चमत्कारांच्या आख्यायिका आपल्याला दिसून येतात. येथेसुद्धा एक आख्यायिका नमूद करायची आहे, पण ती आख्यायिका चमत्कार नव्हे, तर औवैयार यांचे मूलभूत चिंतन मांडणारी आहे. त्यामुळे ती येथे देण्याचा मोह आवरत नाही.
शिवपुत्र कार्तिकेय यांना दक्षिणेत ‘मुरगन’ या नावाने संबोधले जाते. कार्तिकेय एकदा गुराखी मुलाच्या रूपाने जांभळाच्या झाडावर चढून जांभळे खात बसले होते. तेथे औवैयार आल्या व त्यांनाही जांभळे खाण्याची इच्छा झाली. औवैयार यांनी कार्तिकेयाकडे जांभळे मागितली. तेव्हा कार्तिकेय यांनी प्रश्न विचारला, “आजी, तुला गरम जांभूळ पाहिजे की थंड जांभूळ?”
 
 
ही चेष्टामस्करी औवैयार यांच्या लक्षात आली नाही व त्यांनी ‘गरम जांभूळ हवे!’ असे उत्तर दिले. तेव्हा कार्तिकेयाने झाडावरून काही जांभळे जमिनीवरील धुळीत फेकली. औवैयार ती जांभळे उचलून त्यावरील धूळ फुंकू लागल्या. तेव्हा कार्तिकेय हसत म्हणाले, “आजी, जांभूळ खूपच गरम लागतात का? नीट फुंकून खा बरे! उगीच जीभ भाजेल, बरे का!”
 
 
औवैयार हे ऐकून मनात वरमल्या व म्हणाल्या, “हे प्रभू, हा छोटा बालकसुद्धा माझी का बरे चेष्टा करतोय?”
 
त्यांच्या मनातील विचार जाणून कार्तिकेय यांनी आपले मूळ रूप धारण केले व कार्तिकेय म्हणाले, “आजी, रागावू नका. मला तुमच्याशी बोलायचे होते, म्हणून मी हे नाटक केले आहे. आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर मला चार प्रश्नांची उत्तरे द्या!”
कार्तिकेयाने विचारलेल्या चारही प्रश्नांची औवैयार यांनी समर्पक उत्तरे दिली आणि कार्तिकेय संतुष्ट झाले.
 
 
पहिला प्रश्न होता - काय असह्य आहे?
 
 
याचे उत्तर - घोर दारिद्य्र असह्य आहे. युवकांना गरिबी खूपच छळते. ज्यावर कोणताच उपचार उपलब्ध नाही असा रोगसुद्धा असह्य आहे. जिच्या मनात अजिबात प्रेम नाही अशा नारीबरोबर बंधनात सापडलेला नरसुद्धा खूपच दु:खी असतो. त्याचप्रमाणे आपल्या पोटापाण्यासाठी नारीवर अवलंबून राहणारा नर हा अत्यंत दु:खी मानला पाहिजे.
 
 
यातून आपल्याला औवैयार यांचे सामाजिक चिंतन दिसते. गरिबी आणि अनारोग्य या समस्यांबरोबर बेरोजगारी ही समस्याही आपल्याला वरील चिंतनातून जाणवते.
 
 
दुसरा प्रश्न होता - मधुर काय आहे?
 
याचे उत्तर - एकांतवास मधुर होय. भगवंताचे पूजन करणे मधुर होय. भक्तांची संगत त्याहीपेक्षा मधुर होय. त्यांच्या संगतीत रात्रंदिन राहणे हे सर्वांत मधुर होय.
 
तिसरा प्रश्न होता - सर्वांत महान कोण आहे?
 
त्याचे उत्तर - हे विश्व सर्वांत महान होय. त्यापेक्षा सृष्टिनिर्माता ब्रह्मदेव महान होय. पण ब्रह्मदेवाचा जन्म महाविष्णूच्या नाभिकमलातून झाला असल्यामुळे महाविष्णू त्यांच्यापेक्षा महान होय. पण महाविष्णू क्षीरसागरात शयन करतात, त्यामुळे क्षीरसागर महान होय. पण सागर प्राशन करण्याची क्षमता असलेले अगस्त्य ॠषी त्याच्यापेक्षा महान होय. अगस्त्यांचा जन्म घड्यातून झाला असल्यामुळे मग मातीचा घडा महान म्हटला पाहिजे. माती देणारी पृथ्वी ही त्यापेक्षा महान व पृथ्वी धारण करणारा शेष तिच्यापेक्षा महान होय. अशा नागांची मुद्रिका देवी पार्वती धारण करते, म्हणून ती यांच्यापेक्षा महान होय. त्या पार्वतीच्या हृदयात निवास करणारा शिवशंकर तिच्यापेक्षा महान होय आणि त्या भगवान शिवाला हृदयात धारण करणारा त्याचा भक्त हाच सर्वश्रेष्ठ होय.’
 
 
औवैयार यांचा शैव संप्रदाय होता व त्यांचे दैवत शिवशंकर होते. या प्रश्नाच्या उत्तरात भक्ताचा महिमाच औवैयार यांनी वर्णन केला आहे. पण हा महिमा वर्णन करताना त्यांनी अद्वितीय प्रतिभेचा आणि कल्पनाशक्तीचा उपयोग केला आहे, हे आपल्याला दिसून येते.
 
चौथा प्रश्न - काय दुर्लभ आहे?
 
त्याचे उत्तर - मनुष्यजन्म दुर्लभ आहे! अव्यंग म्हणजे कोणतेही व्यंग नसलेले मानवशरीर लाभणे हे त्यापेक्षा दुर्लभ आहे. अशा मानवाला भक्तीची आणि ज्ञानप्राप्तीची ओढ लागणे हे त्याहूनही दुर्लभ आहे. ही आवड असली तरी तपस्या आणि दान या वृत्तीचा त्यात अभाव दिसतो. पण जो कोणी खरेखुरे तपाचरण करतो आणि निरपेक्ष वृत्तीने दान करतो, त्याच्यासाठी जगात काहीच दुर्लभ नाही. स्वर्गाचे दरवाजे अशा मनुष्यासाठी सदैव उघडे असतात.
 
 
असा संवाद झाल्यानंतर औवैयार यांना वरदान देऊन कार्तिकेय अंतर्धान पावले. आपल्याला या संवादात औवैयार यांचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण व मूलभूत चिंतन उत्तम रितीने दिसून येते. ज्याला आपण चतुर्विध पुरुषार्थ असे संबोधतो, त्या गुणांचेही अत्यंत सुलभ विवेचन औवैयार यांनी केले आहे.
 
 
औवैयार म्हणतात - ‘धर्म म्हणजे सर्व प्रकारच्या संकटांचे निवारण होय. पापमार्गाने जे कमविलेले नाही असे धन म्हणजे अर्थ होय. नरनारी यांनी केवळ शरीराने नव्हे तर मन-विचार व कर्माने एकत्र येणे म्हणजे काम होय. या तिन्ही गोष्टींचा मोह त्यागून केवळ परमात्म्याशी नाते जोडणे व त्याचेच ध्यान करणे म्हणजे मोक्ष होय,
 
 
औवैयार यांचा जन्म हलक्या कुळातील कन्येच्या रूपाने झाला होता व अत्यंत उपेक्षित समाजाच्या वस्तीत त्यांचे सर्व बालपण गेले. असे असतानाही आपल्या अंगभूत गुणांमुळे त्यांनी लोकप्रियतेचे गौरीशंकर गाठलेले आपल्याला दिसून येते. तगडूर म्हणजे धर्मपुरी येथील सरदार अतियमन् नेडुमान यांच्या दरबारातही औवैयार यांचे काही काळ वास्तव्य होते. नेडुमान आणि त्याचा शत्रू राजा टोंटैमान यांच्यात जेव्हा युद्धमान परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा नेडुमान याने औवैयार यांनाच शिष्टाईसाठी टोंटैमान यांच्या दरबारात पाठविले होते. आपल्या वाक्चातुर्याने शत्रुराजाचे मन जिंकून औवैयार यांनी या दोघांतील युद्ध टाळले होते.
 
 
उच्च-नीच भावनेच्या संदर्भात औवैयार यांचे मत असे होते - ‘जगात दोनच प्रकारचे वर्ण आहेत, एक म्हणजे उच्च वर्ण आणि दुसरा नीच वर्ण. जो आयुष्यभर रंजल्यागांजल्यांना मदत करतो तो मनुष्य उच्च वर्णाचा होय आणि जो जीव गेला तरी कोणालाही कोणतीच मदत करीत नाही, तो मनुष्य नीच वर्णाचा होय.’
 
 
‘जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
 
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥’
 
हाच उपदेश संत तुकारामांनीही केला आहे.
 
काडीमात्र लोभ नाही असे आपण नेहमीच बोलत असतो. ज्याला ‘तृणवत’ मानणे असेही संबोधले जाते. सर्व प्रकारच्या मोहांवर विजय मिळविण्याबाबत औवैयार असे सांगतात - ‘ज्याचा आत्मा उदार झाला आहे त्याच्यासाठी सुवर्ण तृणवत आहे. शूरवीर मृत्यूला तृणवत मानतो. ब्रह्मचर्यविवेक धारण केलेला नर हा नारीजगताला तृणवत मानतो. त्याचप्रमाणे संन्यासी हा सम्राटाला तृणवत मानतो.’
 
 
यात कोणत्याही गोष्टीला कमी लेखण्याचा भाव नसून ‘सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान।’ हाच संत तुकारामांनी वर्णिलेला आदर्श वैराग्यभाव महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
धर्माबाबत औवैयार यांनी अतिशय सुंदर उपदेश केला आहे, “सर्वांचे भले करा आणि कलुषित भावनेचा त्याग करा, अशीच सर्व धर्मांची शिकवण आहे. आज तुम्हाला जे काही लाभले आहे, ते सर्व तुमच्या पूर्वपुण्याचे फळ आहे. त्यामुळे कधीच पापाचरण करू नका. नेहमी चांगल्या कार्यात आणि सत्कार्यातच मग्न राहा!”
 
 
‘या दक्षिण सरस्वतीचे आपल्याला कोणतेही मंदिर आढळत नाही. पण आज साहित्यरूपाने ती प्रत्येक तामिळ भाषकाच्या हृदयात विराजमान आहे. या साहित्याचे पठण म्हणजेच या सरस्वतीचे खरे पूजन होय,’ असे राजगोपालाचारी लिहून गेले आहेत. आज आपल्याला तंजावर आणि कन्याकुमारी येथे संत औवैयार यांची मंदिरे आढळतात, पण साहित्यरूपाने त्या चिरंतन राहतील, हेच खरे!