राजकीय चक्रीवादळात उद्ध्वस्त ठाकरे सरकार

विवेक मराठी    23-Jun-2022   
Total Views |
उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता तर गेली आहे हे स्पष्ट झाले आहेच, पण त्यापाठोपाठ पक्षही हातून जाण्याच्या अवस्थेत आहे. शरद पवारांना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय मुत्सद्दी म्हटले जाते. त्यांच्या डोळ्यादेखत, दिवसाढवळ्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेली. त्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जर एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असे सिद्ध झाले, तर विधानसभेत आदित्य ठाकरेंना व विधानपरिषदेत खुद्द उद्धव ठाकरेंना, राज्यसभेत संजय राऊत यांना नव्या शिवसेना प्रतोदांचे आदेश पाळावे लागतील.

shivsena

जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा हे सरकार आपला उरलेला कार्यकाळ सहज पूर्ण करील असे सर्वसाधारण मत तयार झाले होते. सत्ता ही चुंबकाप्रमाणे असते व ती वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र बांधून ठेवते, हा सिद्धान्त अनेक वेळा सांगितला जातो. परंतु हा सिद्धान्त अर्धसत्य आहे. सत्ता हा हितसंबंधांचा खेळ असला, तरी तो खेळायलाही काहीतरी वैचारिक अधिष्ठान असावे लागते, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. महाराष्ट्रातही तसेच झाले. राज्यसभा निवडणुकीने येणार्‍या वादळाची चुणूक दाखविली, त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीने त्या वादळाची तीव्रता वाढत आहे याची जाणीव करून दिली. परंतु त्यानंतर आलेल्या चक्रीवादळाने महाराष्ट्राचे राजकारण आरपार बदलून टाकले. हा लेख लिहीत असताना, उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता तर गेली आहे हे स्पष्ट झाले आहेच, पण त्यापाठोपाठ पक्षही हातून जाण्याच्या अवस्थेत आहे. शरद पवारांना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय मुत्सद्दी म्हटले जाते. त्यांच्या डोळ्यादेखत, दिवसाढवळ्या महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेली. त्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी अजून मुख्यमंत्रिपद सोडले नसले, तरी मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला सोडून लढण्याची हत्यारे टाकून दिली आहेत.
 
 
सावज टप्प्यात येईपर्यंत शिकार्‍याला शांतपणे बसून वाट बघावी लागते, असे सुधाकरराव नाईक सांगत. ते स्वत: शिकारी होते. सूड हा थंड करून खाल्ला तर चविष्ट लागणारा पदार्थ आहे, असेही म्हटले जाते. सोमवारी रात्रीपासून घडणारा हा घटनाक्रम या दोन्ही वाक्यांची प्रचिती देणारा आहे. या वादळाची बीजे अडीच वर्षांपूर्वीच ज्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले, त्यात दडलेली आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2019च्या भाजपा-शिवसेना युतीला जे यश मिळाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे सर्वांनी गृहीत धरले होते. भाजपाला शिवसेनेच्या जवळजवळ दुप्पट जागा मिळाल्या होत्या. ‘दिल्लीत नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र‘ या प्रचारात शिवसेनाही सहभागी झाली होती. परंतु आपल्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात भाजपाला सरकार बनविता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने राजकीय सौदेबाजी करायला सुरुवात केली, आपल्याला निम्मा काळ मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे, तरच सरकार बनवू असे डावपेच आखायला सुरूवात केली. हा सरळसरळ भाजपाचा व त्याहीपेक्षा मतदारांचा व ज्या हिंदुत्वाच्या विचारांच्या आधारावर शिवसेना वाढली, त्या विचारधारेशी केलेली प्रतारणा होती. एकदा महत्त्वाकांक्षा आंधळी झाली की प्याद्यांना वजीराचे महत्त्व येते, तशी संजय राऊत यांची अवस्था झाली. आपणच महाराष्ट्राच्या राजकारणाचे भाग्यविधाते आहोत अशा आविर्भावात त्यांची वक्तव्ये व देहबोली यांचे प्रदर्शन सुरू झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने शरद पवार यांना शिवसेनेच्या देव्हार्‍यात बसविण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला. शिवसैनिकांच्या मनात याची तीव्र प्रतिक्रिया उमटत होती. पण उद्धव ठाकरेंची स्थिती धृतराष्ट्राप्रमाणे झाली. हा सर्व प्रवास महाभारताच्या सर्वविनाशी युद्धाकडे घेऊन चालला आहे हे त्यांना कळत नव्हते, एवढे सत्तेने त्यांना आंधळे बनविले होते.
 



shivsena
 
सेनेचा, पवारांचा फडणवीस द्वेष
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपाने दुसरा पर्याय ठेवला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे पवारांना आपले स्पर्धक वाटत होते. आजवरच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पवारांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव राहिला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे नव्या काळात महाराष्ट्राला लाभलेले पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी पवारांचा प्रभाव न मानता महाराष्ट्राचे राजकारण केले. त्यामुळे पवार फडणवीस यांना आपले राजकीय स्पर्धक मानत होते. फडणवीसांऐवजी आणखी कोणाही नेत्याला पाठिंबा देण्याची त्यांची तयारी होती. पण मुख्यमंत्री कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार भाजपा नेतृत्वाचा होता. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची सत्ता आपल्या हाती राखण्याकरिता भाजपा कोणतीही तडजोड करायला तयार होईल, हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचाही अंदाज चुकला व त्यातून सत्तेच्या स्वार्थापलीकडे अन्य कोणताही समान धागा नसताना हे तीन घटक पक्ष एकत्र आले व त्यातून महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार बनले. सत्तेच्या स्वार्थाचा धागा या तिन्ही पक्षांना एकत्र बांधून ठेवेल व या काळात भाजपाबरोबर अन्य पक्षांतून आलेले नेते भाजपामधून बाहेर पडतील या दोन गृहीतांवर महाविकास आघाडी विसंबून होती. ही दोन्ही गृहीते खोटी ठरली. सत्ता हातून गेल्यावरही निराश न होता देवेंद्र फडणवीस यांनी आपले राज्यभरातील झंझावाती दौरे सुरू ठेवले व पक्षातून कोणालाही बाहेर पडू दिले नाही. जेव्हा राज ठाकरे सक्रिय झाले व त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली, तेव्हा सेनेच्या समर्थकांत अस्वस्थता पसरायला सुरुवात झाली व त्याचा मोठा परिणाम या घडामोडींवर झाला.
 
 
वादळाची तीन प्रमुख कारणे
 
 
महाराष्ट्रात जे राजकीय चक्रीवादळ उठले, त्याची तीन प्रमुख कारणे आहेत. यातील पहिले कारण हे तिन्ही पक्षांची भिन्न तत्त्वज्ञाने व कार्यसंस्कृती यांत आहे. भाजपा व शिवसेना यांच्यात सैद्धान्तिक सारखेपणा असला, तरी त्यांची कार्यसंस्कृती वेगळी होती. परंतु गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक असलेल्या युतीमुळे या वेगळ्या कार्यसंस्कृतीची एकमेकांना सवय झाली होती. या दोन्ही कार्यसंस्कृती प्रामुख्याने कार्यकर्ताकेंद्री आहेत. याउलट राष्ट्रवादी व काँग्रेस यांची कार्यसंस्कृती सत्ताकेंद्री आहे. अशी कार्यसंस्कृती कार्यकर्ताकेंद्री संस्कृतीच्या पचनी पडत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात महाराष्ट्रातील सर्व भागातील व प्रामुख्याने ग्रामीण भागातील आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड करून उठले, याचे कारण त्यांची होणारी घुसमट. दुसरे कारण उद्धव ठाकरे यांना असलेला प्रशासकीय कामाचा शून्य आवाका. अशा प्रकारचे विसंवादी सरकार चालविण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात, जो बौद्धिक आवाका लागतो, शारीरिक क्षमता असावी लागते, राजकीय समज व संवेदनशीलता असावी लागते, त्याचा पूर्ण अभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचा तो दोष नव्हे, तर त्यांची ती मर्यादा आहे. या मर्यांदांचा विचार न करता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविणे व उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून ती स्वीकारणे या दोन घोडचुकांची ही भोगावी लागलेली किंमत आहे. याचे तिसरे कारण म्हणजे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवू, हा अंधविश्वास. संजय राऊत व सामना यांच्या माध्यमातून आपण अजेंडा सेटिंग करू व मोठी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांचा उपयोग करून आपल्याला हवी तशी वातावरणनिर्मिती करू, या त्यांच्या प्रयत्नात सर्व काही आलबेल आहे अशा निर्माण केलेल्या आभासाने महाविकास आघाडीची फसवणूक झाली, शिवसेना कार्यकर्त्यांची नाही.
 


shivsena
 
फडणवीसांचे नेतृत्व
 
 
परिस्थिती कितीही अनुकूल असली, तरी त्या परिस्थितीला दिशा देण्याकरिता तशाच क्षमतेचे नेतृत्व असावे लागते. या सर्व काळात देवेंद्र फडणवीसांनी आपले नेतृत्व ज्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, त्याच्या जवळपासही त्यांना स्पर्धा करणारे नेतृत्व नाही. त्याबाबतही त्यांनी शरद पवार यांना कुठल्या कुठे मागे टाकून दिले आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदात मिळविलेली कमाई एवढी आहे की ‘मी पुन्हा येईन‘, ‘पहाटेचा शपथविधी‘ यावरून झालेली हेटळणीपूर्ण चर्चा, शरद पवारांनी मारलेले जातिवाचक टोमणे या कशाचाही आपल्या कामावर परिणाम होऊ न देता त्यांनी महाराष्ट्राचा खेळ आपल्या हाती खेचून आणला आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जी अपमानजनक वागणूक दिली, त्याची फडणवीसांनी न बोलता परतफेड केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाला फसवण्याची कोणती किंमत मोजावी लागते, याचा त्यांनी उद्धव ठाकरेंना अनुभव दिला आहे. संजय राऊत यांच्यासारख्या, बोलका पोपट एवढीच किंमत असलेल्या पत्रकाराच्या मागे जाऊन आपले राजकीय अस्तित्व व भवितव्यच धोक्यात आणले आहे. राज्यसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यांत एक एक पत्ता टाकत फडणवीसांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा दाखविली. परंतु त्यांची जी अंतिम खेळी होती, त्याचा कुणालाही सुगावा लागू दिला नाही.
 
‘धर्मवीर‘मध्ये चाहूल
महाराष्ट्रातील या महानाट्याची चाहूल ‘धर्मवीर’ या चित्रपटातच लागली होती. शिवसेनेचा पाया भरण्यात धर्मवीर आनंद दिघे यांचे योगदान, त्यांचे व बाळासाहेब ठाकरे यांचे परस्पर संबंध, बाळासाहेबांनी आनंद दिघे यांना ठाणे जिल्ह्यात दिलेली स्वायत्तता व आनंद दिघेंचे एकनाथ शिंदेंवर असलेले प्रेम व विश्वास या सर्व कथेद्वारे एका तळागाळातून आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर प्रकाश टाकत असतानाच, उद्धव ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करून राज ठाकरे व नारायण राणे यांना दिलेले महत्त्व बोलके होते. म्हणूनच उद्धव ठाकरे पूर्ण चित्रपट न पाहता उठून गेले व त्यावर ‘त्यांना आनंद दिघेंचा मृत्यू सहन झाला नाही, म्हणून उठून गेले’ अशी सारवासारव करण्यात आली. या चित्रपटातून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचे अप्रत्यक्ष मूल्यमापनच केले होते.


shivsena

याचबरोबर मोदींवर सातत्याने टीका करणार्‍या पण उद्धव ठाकरे यांचे अनधिकृत मुखपत्र बनलेल्या एका मराठी दैनिकात दोन वेळा एकनाथ शिंदे यांच्या एका प्रकल्पाबाबत, त्यांचे नाव न घेता पर्यावरणाच्या नावाखाली दोन बातम्या लावण्यात आल्या. यावरूनच शिवसेनेत सुरू असलेल्या शीतयुद्धाची कल्पना येत होती.
 
 
भवितव्य
 
 
अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन होईल ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य काय? व एवढ्या अट्टाहासाने व विश्वासघात करून अडीच वर्षे मिळविलेल्या सत्तेचा त्यांना उपयोग काय झाला? हे प्रश्न आता विचारणेही निरर्थक आहे, एवढ्या गोष्टी आता त्यांच्या हाताबाहेर गेल्या आहेत. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असे सिद्ध झाले, तर विधानसभेत आदित्य ठाकरेंना व विधानपरिषदेत खुद्द उद्धव ठाकरेंना, राज्यसभेत संजय राऊत यांना नव्या शिवसेना प्रतोदांचे आदेश पाळावे लागतील. राष्ट्रवादीचे आमदार आपण तेव्हा शरद पवारांऐवजी अजित पवारांच्या मागे गेलो असतो तर बरे झाले असते असा शोक करीत असतील, काँग्रेस आमदारांना अनपेक्षित सत्तेची लॅाटरी लागली, ती गेल्याचे त्यांना दु:ख असेल. पवारांच्या हाती आता कोणतीच सूत्रे राहिलेली नाहीत, हे त्यांचे दु:ख असेल. या सर्व घटनाक्रमात महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकण्याच्या शक्यता दडलेल्या आहेत. जुन्या जातिद्वेषाचे राजकारण मागे टाकून हिंदुत्व व विकास यांच्या आधारे महाराष्ट्राची नव्याने जडणघडण होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
 

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.