कसाला उतरलेले सोने

विवेक मराठी    23-Jun-2022   
Total Views |
‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील जनतेला दिलेल्या अभिवचनाची, युतीतील घटक पक्ष शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे पूर्तता होऊ शकली नाही. सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी नावाची अभद्र युती केली. या युतीतल्या सर्वांनी आणि त्यांच्या अनुयायांनी देवेंद्र यांच्या, ‘मी पुन्हा येईन’ या उद्गाराची यथेच्छ टिंगलटवाळी केली. पण देवेंद्र यांनी या कोल्हेकुईकडे साफ दुर्लक्ष करत, नियतीने सोपवलेली विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आणि पक्षाने सोपवलेल्या अतिमहत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडण्यावर आपली शक्ती केंद्रित केली.
 
devendra fadanvis
 
अर्थात त्याआधीची त्यांची मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षेदेखील असंख्य आव्हानांनी भरलेली होती. कर्जाचा विळखा, ढेपाळलेले प्रशासन आणि आर्थिक गैरव्यवहार ही प्रामुख्याने तीन आव्हाने होती. या आव्हानांना सक्षम प्रशासकीय कौशल्याच्या व जनहिताच्या अनेक योजनांच्या मदतीने त्यांनी समर्थपणे तोंड दिले. आरक्षणाचा प्रश्न अतिशय संवेदनशीलतेने हाताळला. तरीही त्या 5 वर्षांत निरनिराळ्या विषयांचा बागुलबुवा उभा करत राज्यात असंतोषाचे वातावरण असल्याचे भासवण्याचा विरोधक प्रयत्न करत होते. तेही राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर देवेंद्रनी हाणून पाडले.
 
 
तर, गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात आपल्या कामातून विरोधी पक्षनेता कसा असावा, याचा एक नवा ‘बेंचमार्क’ देवेंद्र यांनी तयार केला. कोरोनासारख्या भीषण संकटकाळात जनतेला प्रत्यक्ष भेटून धीर देण्याचे काम मुख्यमंत्रिपदी असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित होते. पण फेसबुकसारख्या आभासी माध्यमातून जनतेला कोमट धीर देण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाही. तेव्हा देवेंद्र यांनी परिस्थितीच्या पाहणीसाठी महाराष्ट्र उभा-आडवा पिंजून काढला. जनतेला धीर दिला, रुग्णसेवेत गढलेल्या वैद्यकीय व्यवस्थेचे म्हणणे समजून घेतले. शक्य होईल ती सर्व मदत विरोधी पक्षनेता म्हणून केली. एवढेच नव्हे तर, स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सत्तेसाठी जनतेचा कौल त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या बाजूने असतानाही हिडीस राजकारणाने सत्तेपासून त्यांना दूर ठेवले. मात्र त्याचा शोक करण्यात, संबंधित लोकांना दूषणे देण्यात आपली शक्ती न दवडता त्यांनी कामावर लक्ष केंद्रित केले. या काळातही सत्ताधार्‍यांना ओशाळी असलेली लाचार प्रसारमाध्यमे त्यांच्यावर कुत्सित टीका करण्यात, शेरेबाजी करण्यात दंग होती. त्याची यत्किंचितही तमा न बाळगता ते पूर्वीच्याच एकाग्रतेने काम करत राहिले. विरोधी पक्षनेता जनमानसावर, राजकारणावर कशी पकड बसवू शकतो, कसा विश्वास संपादन करू शकतो याचे आपल्या कामातून उभे केलेले मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा हा कालखंड.
 
 
याच कालखंडात पक्षाने त्यांच्यावर अन्य दोन राज्यांतील निवडणुकांदरम्यान प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. गोव्यासारख्या राज्यात कठीण मानला गेलेला विजय पक्षाला मिळवून देणारे ते शिल्पकार ठरले.
 
 
पक्षाच्या आणि संघटनेच्या विचारधारेशी, हिंदुत्वाशी असलेल्या बांधिलकीचे दर्शन देवेंद्र फडणवीस आमदार होते तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक कृतीतून घडत आले आहे. मात्र त्यांच्यात असलेले पक्षाला बहुमताने जिंकून देण्याचे कसब 2014 साली सिद्ध झाले. 2019च्या निवडणुकीत केलेल्या निवडणूकपूर्व युतीमुळे जागा थोड्या कमी झाल्या, तरी जनमताचे पारडे भाजपाकडेच झुकलेले होते. प्रचारमोहिमेची त्यांनी केलेली विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध आखणी, प्रभावी वक्तृत्व, उत्तम संघटनात्मक कौशल्य, या सगळ्याला असलेली कायद्यातील सखोल ज्ञानाची जोड आणि राजकीय डावपेचातली वादातीत निपुणता अशी यशस्वी, लोकप्रिय आणि निष्ठावंत राजकारणी म्हणून सगळी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यात आहेत. याचा फायदा जसा अन्य दोन राज्यांतल्या निवडणुकांमध्ये झाला, तसा तो येथील राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेतल्या निवडणुकांमध्येही झाला. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानाही राज्यसभेतील चौथा उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत, तर भाजपाने आपले तिन्ही उमेदवार सहजी निवडून आणले. त्यासाठी केलेली नियोजनबद्ध आखणी आणि गेल्या अडीच वर्षांत स्वपक्षातल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवतानाच, अन्य पक्षीय आमदारांचा देवेंद्र यांनी मिळवलेला विश्वास ही त्यामागची लगेच जाणवण्याजोगी कारणे. त्यानंतर काही दिवसांनी असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आपण लढवू त्या सर्व जागा जिंकू, असे त्यांनी आधीच सांगितले आणि त्याप्रमाणे घडलेही.
 
 
वर उल्लेख केलेेल्या, गेल्या अडीच वर्षांतल्या निवडणुकांमधले यश हा चमत्कार नव्हता. तर देवेंद्र फडणवीस नावाचे राजकारणातले सोने पुन्हा एकदा कसाला उतरले होते.
 
 
नजिकच्या काही दिवसात कदाचित, ‘मी पुन्हा येईन’ हे त्यांचे उद्गार सत्यात उतरले असतील. मात्र ते सत्यात उतरण्याआधी नियतीने घेतलेल्या त्यांच्या कठोर सत्त्वपरीक्षेत ते चमकदार कामगिरी करत उत्तीर्ण झाले, असे त्यांच्या गेल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीवरून म्हणता येईल.