ठाकरेशाहीला धक्का देणारे बंड

विवेक मराठी    23-Jun-2022
Total Views |
@अभय पालवणकर 
छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी बंडखोरी केलीच, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आणि बाळासाहेबांच्या धाकामुळे पक्ष सावरला. मात्र त्या वेळचे बंड आणि आता एकनाथ शिंदे यांचे बंड यामध्ये खूप फरक आहे. या बंडामुळे शिवसेनेला सत्ता गमावावी लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री-पक्षप्रमुख यांच्या धोरणांविरोधात हे बंड आहे. त्यामुळे हे बंड नुसते सरकार पाडणारे नसून ठाकरे दरारा, धाक, उर्मट शैली, आदर संपवणारे ठरले आहे.

shivsena

1991मध्ये मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवल्यानंतर बाळासाहेबांशी वैर घेत छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पसरले. मुंबई अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली, शिवसैनिक रस्त्यावरून येऊन ‘गद्दारांना धडा शिकवणार’ अशा घोषणा देऊ लागले. दुसरा प्रसंग होता 2000 साली तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचे धाडस दाखवले. पण बाळासाहेबांना अटक होणार अशी बातमी वार्‍यासारखी पसरली. महाराष्ट्रात सर्वत्र बंद पुकारला गेला. शिवसैनिक रस्त्यावर आले. मुंबईतील वातावरण तर एकदम तंग झाले होते. तिसरी घटना आताची घटना, म्हणजे 2013 साली शिवसेनेचे ठाण्यातील खासदार आनंद परांजपे यांनी बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. लागलीच ठाण्यातील शिवसैनिकांनी आनंद परांजपे यांच्या घरावर दगडफेक केली. ठाणे बंद करण्यात आले. या सर्व घटनांची आज आठवण येण्याचे कारण म्हणजे ते बंड आणि काल एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड यामध्ये खूप मोठा फरक आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात, मुंबईत शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील, निदर्शने करतील असे वाटत होते. पण असे काहीच झाले नाही. यामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे या बंडामुळे ठाकरेशाहीचा दरारा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आला आहे असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही.
एखाद्या घराण्याची सत्ता काही काळापुरतीच मर्यादित राहते. नंतर त्या घराण्याच्या सत्तेचा, शाहीचा अस्त होऊ लागतो. हा इतिहास आपण वाचला आहे. संपूर्ण जगात अनेक शाही उदयास आल्या, नंतर काळाच्या ओघात नष्ट झाल्या - मग ती रशियातील झारशाही, भारतातील मोघलशाही, बहामनीशाही या सर्व शाही आज इतिहास झाल्या आहेत. कारण स्थापनकर्ता कर्तृत्ववान असतो. त्यानंतरच्या पिढ्या तेवढ्या कर्तृत्ववान असतातच असे नाही. आणि त्यातच बदलत्या काळाचे आव्हान यामुळे अनेक शाही अस्तास गेल्या.

shivsena

आज काळ बदलला आहे. स्वतंत्र्यानंतर भारताने लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केला. घराणेशाही गेल्या आणि लोकशाही आली. लोकशाही शासन पद्धतीत देशात, राज्यात दर 5 वर्षांनी निवडणुका होऊ लागल्या. त्या निवडणुकांमध्ये देशातील सर्वसामान्य व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण केेलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येते. पण तरीही या देशात घराणेशाही उदयास आल्या. याचे प्रणेते ठरले ते गांधी घराणे. त्यांची घराणेशाही नेहमी चर्चेत राहिली आहे. आज राहुल गांधी व प्रियंका गांधी हे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. एकेकाळी गांधी घराण्याला आव्हान देण्याची कोणाची हिंमत होत नसे. आज सर्वत्र बंडाळी होत आहे. त्यातूनच पक्ष आज अस्तित्वहीन होत चालला आहे. त्यामुळे गांधी घराण्याला घरघर लागली आहे असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. गांधींबरोबर उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव यांचे यादव घराणे, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचे घराणे, पंजाबमधील बादल घराणे, महाराष्ट्रातील पवार घराणे, ठाकरे घराणे, आंध्र प्रदेशातील करुणानिधी यांचे घराणे.. आज ही घराणी काळाच्या ओघात व सूत्रे हाती असलेली घराण्याच्या तिसर्‍या पिढीतील कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने हे पक्ष अस्तित्वहीन होण्याच्या मार्गवर आहेत.
महाराष्ट्रात राजकारणात दोन घराण्यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे - पवार घराणे आणि ठाकरे घराणे! त्यात शरद पवार यांच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकारणामुळे त्याचे अस्तित्व साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले आहे. दुसरे घराणे म्हणजे ठाकरे घराणे. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण यामुळे शिवसेना मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या मेट्रो सिटीत लोकप्रिय झाली. निवडणुकीच्या राजकारणात शिवसेना आपले बस्तान बांधू लागली. रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशातील हिंदुत्वाचे वारे बघून बाळासाहेबांनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला. 1989 साली भाजपाशी युती केली आणि निवडणुकीच्या राजकारणातही भाजपासोबत शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळत गेले. बाळासाहेबांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे राज्यात शिवसेनेला व्यापक जनाधार मिळू लागला. बाळासाहेबांप्रति आपली निष्ठा, सर्वस्व वाहणारे हाडाचे शिवसैनिक तयार झाले. बाळासाहेबांनी शिवसेनेत आपला धाक निर्माण केला. एक व्यक्तिनिष्ठ पक्ष उभा केला. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणातही उमेदवारापेक्षा शिवसेना पक्ष म्हणूनच मतदान केले जात होते. त्यामुळे शिवसेनेतून फुटून जाण्याची कोणाची हिंमत नव्हती, गद्दारी, दगाबाजी करणे लांबच होते, कारण पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नव्हती. तरीही शिवसेनेत बंडाळी झाली नाही असे नाही. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी बंडखोरी केलीच, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आणि बाळासाहेबांच्या धाकामुळे पक्ष सावरला.


shivsena

बाळासाहेब गेले आणि सत्तेच्या लोभापायी पक्षाने हिंदुत्वाशी फारकत घेतली, निष्ठावंत कार्यकर्त्यांपासूनही फारकत घेतली. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते बिथरले. म्हणून त्या वेळचे बंड आणि आता एकनाथ शिंदे यांचे बंड यामध्ये खूप फरक आहे. या बंडामुळे शिवसेनेला सत्ता गमावावी लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री-पक्षप्रमुख यांच्या धोरणांविरोधात हे बंड आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली आहे. मात्र पूर्वीच्या बंडांपेक्षा हे बंड वेगळे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याला  राजकीय विरोध होता. तसेच आमदारांशी योग्य संवाद-संपर्क ठेवला जात नाही... त्यातून मतदारसंघात होणारी राजकीय अडचण या नाराजीवरून शिवसेनेचे अनेक आमदार एकत्र आले. आणि त्यांनी हा बंड केला आहे. हे बंड ठाकरेशाही संपवणारे ठरले आहे, कारण आजपर्यंत जो दरारा होता, त्या दरार्‍याचे दडपण विरोध करणार्‍या एकाही आमदारात दिसले नाही. कोणत्याही आमदाराच्या विरोधात तुरळक घोषणाबाजी वगळता फार झाली नाही. बंद पुकारला गेला नाही. शिवसेनेचा आवाज, दरारा क्षीण झाला हे यातून स्पष्ट झाले आहे. बंडोबांना थंडोबा करण्याचे अस्त्र किंवा संवाद साधणारी चांगली मंडळी आताच्या शिवसेनेत नाहीत. काय करावे, मार्ग कसा काढावा हे समजत नाही. राजीनामा द्यावा का? हा पेचप्रसंग मुख्यमंत्र्यांसमोर आहे. अविश्वास ठराव जिंकण्यासाठी लागणारा आत्मविश्वास नाही, संख्यात्मक बळही कसे जमवणार? कारण जर ते जमवण्याची ताकद असती, तर विधानपरिषदेत आणि राज्यसभेत पराभव पत्करावा लागला नसता. पुढे जाऊन जरी विधानसभा निवडणुका लागल्या, तरी सरकार म्हणून काहीच काम केलेले नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सत्तेसाठी पाणी सोडले. त्यामुळे जनतेसमोर काय घेऊन किंवा का म्हणून मते मागायची? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे बंड नुसते सरकार पाडणारे नसून ठाकरे दरारा, धाक, उर्मट शैली, आदर संपवणारे ठरले आहे. आता या पक्षात लोकशाही रुजेल अशी आशा करावी का?