क्रीडा क्षेत्रासाठी धडपडणारा कुस्तीवीर सुधीर पुंडेकर

विवेक मराठी    24-Jun-2022
Total Views |
@संजीवनी शिंत्रे
जिरायती शेतीवर अवलंबून असलेला सुधीर पुंडेकर ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला आणि कुस्तीच्या स्पर्धा जिंकत पदवीधरही झाला. पण एखाद्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो, हे अनुभवल्यामुळे त्याने मुळीकवाडी या त्याच्याच गावात शिवसमर्थ क्रीडा-कुस्ती संकुल हे क्रीडाप्रशिक्षण देणारे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. प्रशिक्षण केंद्राबरोबरच आजारी क्रीडापटूंना त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुधीर पुंडेकर सक्रिय असतो.


sports
मागच्याच महिन्यात आयपीएल स्पर्धा झाल्या. या स्पर्धांच्या वेळी कसे वातावरण होते, हे आठवतेय का? कोणत्याही रहदारीच्या रस्त्यावरून जाताना टी.व्ही.च्या दुकानांसमोर, हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या जिममध्ये क्रिकेटप्रेमी लोकांचा घोळका, त्यांच्या चर्चा, वर्तमानपत्रातल्या भरभरून बातम्या, भरपूर जाहिराती यांनी भारलेले वातावरण होते. काही शौकीन प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन, स्वतःच्या खिशातला भरपूर पैसा खर्च करूनही प्रत्यक्ष सामने बघण्याची हौस भागवत होते. दोन वर्षे कोरोनामुळे पाळाव्या लागलेल्या बंधनांमुळे या वर्षीचा क्रिकेटज्वर अंमळ जास्तच होता. पण त्याच वेळी सुरू असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इतर खेळांकडे कोणाचे लक्षही नव्हते. भारतासारख्या ‘क्रिकेट एके क्रिकेट’च्या झापडबंद वातावरणात हे नवल नसले, तरी एक सजग नागरिक म्हणून आपण कधी ना कधी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण शिक्षण, उद्योग, आरोग्य, संरक्षण या क्षेत्रांइतकेच क्रीडा क्षेत्रही महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
 
याच झापडबंद वातावरणाशी संघर्ष करणार्‍या एखाद्या खेळाडूची कथा आणि व्यथा ऐकली की नागरिक म्हणून आपण कुठेतरी चुकतोय, हे जाणवल्याशिवाय राहत नाही.
 
 
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या गावच्या सुधीर पुंडेकर या कुस्तीपटू तरुणाची कथा ऐकली, तेव्हा ही जाणीव प्रकर्षाने झाली.
 
प्रशिक्षण देणारे केंद्र स्वतःच्या गावात सुरू केले

sports

बेल्ट रेसलिंग या कुस्तीप्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या सुधीर पुंडेकर या तरुणाने आपल्या क्रीडाकामगिरीतून देशसेवा करण्याचा ध्यास घेतला आहे. फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या छोट्या गावातल्या शेतकरी कुटुंबातल्या या तरुणाने कुस्तीबरोबरच इतर क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारे केंद्र स्वतःच्या गावात सुरू केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून चमकदार कामगिरीही केली आहे. पण केवळ ठरावीक खेळांचा उदोउदो करण्याच्या भारतीयांच्या मानसिकतेमुळे त्याच्या यशाची म्हणावी तशी दखल कोणी घेतलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. शासकीय मदतीतला फोलपणा लक्षात आल्यामुळे खाजगी क्षेत्रातल्या एखाद्या उद्योगाने त्याला दत्तक घेऊन त्याची आर्थिक बाजू सांभाळली, तर तो शांत चित्ताने भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल.

 
सुधीर पुंडेकर हा तरुण वयाच्या सोळाव्या वर्षापासून ‘बेल्ट रेसलिंग’ या कुस्तीच्या प्रकारात चमकदार कामगिरी करत आहे. आशियाई क्रीडास्पर्धा (2017), वर्ल्ड मार्शल आर्ट्स मास्टरशिप गेम्स (2019), यूडब्ल्यूएसकेएफ वर्ल्ड स्पोर्ट्स केम्पो (2019), यूडब्ल्यूडब्ल्यू वर्ल्ड पँक्रेशन चॅम्पियनशिप, बेल्ट रेसलिंग वर्ल्ड कप (2016) अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्याने विविध पदकेही मिळवली आहेत. पण बेल्ट रेसलिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करून अभिमानाने तिरंगा फडकवणार्‍या या तरुणाला अनेक व्यावहारिक आणि आर्थिक अडचणींना सातत्याने सामोरे जावे लागते.
 
 
जिरायती शेतीवर अवलंबून असलेला सुधीर पुंडेकर ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला आणि कुस्तीच्या स्पर्धा जिंकत पदवीधरही झाला. पण एखाद्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागतो, हे अनुभवल्यामुळे त्याने मुळीकवाडी या त्याच्याच गावात ‘शिवसमर्थ क्रीडा-कुस्ती संकुल’ हे क्रीडाप्रशिक्षण देणारे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात कुस्तीबरोबरच ज्युदो, कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, कराटे, त्वायकोंडो, मार्शल आर्ट, योगासने या क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्याने स्वतःची एक एकर जमीनही वापरली आहे. या प्रशिक्षण केंद्रात जिम, अभ्यासिका, जलतरण तलाव, मैदान, दृक-श्राव्य विभाग अशा सुविधा देणे हे त्याचे स्वप्न आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार करणे हे त्याचे ध्येय आहे. सध्या या केंद्रात पंचवीस ते तीस मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
 

sports
 
प्रशिक्षण केंद्राबरोबरच आजारी क्रीडापटूंना त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुधीर पुंडेकर सक्रिय असतो. एखाद्या खेळाडूला मानसन्मान मिळतात, तेव्हा वाहवा करायला सगळे गोळा होतात; पण खेळत असताना त्याला काही अपघात झाला, आजारपण आले, तर त्याचा वाली कोणी नसतो, हे लक्षात आल्यानंतर सुधीरने अनेक धर्मादाय संस्थांच्या मदतीने अशा खेळाडूंना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. आतापर्यंत अशा 35 खेळाडूंना सुधीरने मदत केली आहे.
 
 
 
देशभक्ती करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आपल्या क्रीडानैपुण्यातून भारताचा तिरंगा फडकवणे ही सुधीरच्या द़ृष्टीने सर्वात उच्च दर्जाची देशभक्ती आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाने प्रगती करण्यासाठी तो त्याच्या बाजूने प्रयत्न करतोय. पण या धडपडीत त्याच्या व्यक्तिगत खेळाकडे त्याचे दुर्लक्ष होतेय. क्रीडा क्षेत्राकडे उदासीनतेने बघणारा भारतीय समाज आणि एकाच खेळाला झुकते माप देणारी माध्यमे यांची मानसिकता सुधीरला खूप अस्वस्थ करते. स्वाभिमान हाच कोणत्याही खेळाडूचा प्राण असतो, तरी आमच्या खेळाची दखल घ्या, पुरस्कारांची बातमी द्या असे स्वतःहोऊन सांगावे लागणे, वेगळ्या प्रकारच्या खेळांत आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवूनही त्याबाबत साधी शाबासकीही न मिळणे या गोष्टी खरेच विचार करण्यासारख्या आहेत. भारतातले खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये निवडले जातात, तेव्हा प्रवासखर्चाची जमवाजमव करणे, प्रशिक्षण आणि प्राथमिक गरजांची सोय करणे यात त्यांची बरीचशी शक्ती खर्च होते. इतर देशांचे खेळाडू स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरात व्यग्र असतात, तेव्हा भारतीय खेळाडू कसाबसा प्रवास करून तिथे दाखल होतात आणि ऐन वेळी स्पर्धेत सहभागी होऊनही शक्य तितकी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात, याचे सुधीरला खूप दुःख होते. एप्रिल 2022मध्ये किर्गिझिस्तानला झालेल्या बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सुधीरला कांस्यपदक मिळाले. या घटनेची बातमी कोणत्याही चॅनलवर दाखवण्यात आली नाही किंवा शासनाचीही कोणती मदत त्याला मिळाली नाही, याचे जीवतोड मेहनत करणार्‍या कोणत्याही खेळाडूला वाईट वाटणे साहजिक आहे. शासकीय मदतीची किंवा पुरस्काराची अपेक्षाच आता त्याने सोडून दिली आहे. आता सर्वसामान्य जनतेनेच पुढाकार घेऊन, एखाद्या उद्योगाने त्यांच्या सीएसआर फंडातून त्याला दत्तक घेऊन त्याच्या क्रीडानैपुण्याला प्रोत्साहन द्यावे, अशी त्याची अपेक्षा आहे. दर वेळी ऑलिम्पिकच्या पदकयादीत भारताचे नाव तळाशी पाहून हळहळण्यापेक्षा वेळीच सुधीरसारख्या खेळाडूंना मदत करणे हे आपले एक प्रकारे राष्ट्रकर्तव्यच आहे.