पंढरीच्या आषाढी वारीचेआव्हान व आवाहन

विवेक मराठी    25-Jun-2022   
Total Views |
@विद्याधर ताठे। 9881909775
श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचे मराठी मनाचे सांस्कृतिक वैभव आहे. कोविड प्रतिबंधामुळे दोन वर्षे खंडित झालेली पंढरीची वारीची परंपरा पुनश्च सुरू होत आहे, त्यामुळे सर्वत्र प्रचंड चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी 15 लाखांपेक्षा अधिक वारकर्‍यांची गर्दी होण्याचे अनुमान आहे. या प्रचंड गर्दीची स्वच्छता, सुरक्षा हे पोलीस व प्रशासन यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. कोविडचे संकट पूर्णपणे टळलेले नाही, हे लक्षात घेऊन आरोग्य व्यवस्थेला या वारीत विशेष प्राधान्य देण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार, संतसाहित्याचे उपासक-अभ्यासक विद्याधर ताठे यांचा विशेष लेख.

pandharpur
संपत्ती सोहळा ना आवडे मनाला।

लागला टकळा पंढरीचा॥

जाय जाय तू पंढरी।

होय होय वारकरी॥


संंतांनी सकल समाजाला असा पंढरीच्या वारीचा उपदेश करून परमार्थ सहजसुलभ केला आणि सकल समाजाला भक्तिबंधाच्या सूत्राने एकात्म करीत पारमार्थिक समतेची, समरसतेची गुढी उभारत महाराष्ट्रात सात्त्विक विठ्ठलभक्ती प्रसाराची भावजागृती केली. ‘पंढरीची वारी’ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे, तसेच ती महाराष्ट्राची खरी ओळख आहे. ही पंढरपूरची ‘यात्रा’ नाही, ‘जत्रा’ नाही, तर ‘वारी’ आहे. या वारीला शेकडो वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘पंढरीची वारी। आहे माझे घरी।’ अशी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र आदी प्रांतांतील अनेक घराण्यांमध्ये पंढरीच्या वारीची अनेक पिढ्यांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।’ अशी पंढरीची वारी ज्ञानदेवांच्या जीवीची आवडी आहे, तशीच ती लाखो वारकर्‍यांच्या जिव्हाळ्याची आवड आहे. ‘कोविड19’च्या साथीच्या रोगामुळे सार्‍या जगाचा व्यवहार 2 वर्षे ठप्प झाला होता. कोविडच्या प्रतिबंधामुळे सलग दोन वर्षे पंढरीची ‘आषाढी वारी’ बंद होती. इतिहासात वारी खंडित होण्याची ही पहिलीच वेळ होती. वारी बंदीमुळे सारा वारकरी समाज निराश व उद्विग्न झाला होता. ‘देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।’ अशा दुर्दम्य निष्ठाभावामुळे, आजच्या इतिहासात प्लेग, दुष्काळ अशी नाना संकटे आली तरी ‘वारी’ थांबली नव्हती, वारीमध्ये कधीही खंड पडला नव्हता. पण कोविडच्या अभूतपूर्व संकटकाळात ‘लॉकडाउन’मुळे सलग दोन वर्षे लाखो भाविक लेकरांना आपल्या लाडक्या विठूमाउलीपासून दूर राहावे लागले होते. ही देव-भक्ताची, माय-लेकराची ताटातूट वारकर्‍यांना मरणप्राय वेदना देणारी होती. कारण वारीची ओढ वारकर्‍यांना असते, तशीच ती देवाला - विठ्ठलालाही असते. सगुण भक्तीचे हे वैशिष्ट्य आहे. ‘आषाढी, कार्तिकी विसरू नका मज। सांगतसे गूज पांडुरंग॥’ असे विठूमाउलीच आपल्या लाडक्या वारकर्‍यांना, ‘मला निदान आषाढी, कार्तिकीला तरी भेटण्यास विसरू नका’ असे संत नामदेवांद्वारे गूज करते, अशी वारकरी श्रद्धा आहे. असा भक्तांना बोलवणारा, पालवणारा, भक्तांचा विरह होणारा आणि भक्तांसाठी तिष्ठणारा विठ्ठल, हा एकमेव देव आहे. म्हणून संत म्हणतात, ‘ऐसा विटेवरी देव कोठे?’ हे विठ्ठलाचे, विठ्ठलभक्तीचे व पंढरीच्या वारीचे विशेषत्व आहे.

अशी अनंत अगाध माहात्म्य असणारी ‘पंढरीची वारी’ यंदा, दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा पूर्ववत निष्ठेने-भक्तिभावाने भरणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंदाचे व प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. लाखो वारकरी, त्यांचे कुटुंबीय, गावकरी, रेल्वे, एस.टी. महामंडळ, पंढरपुरातील व्यापारी, मठपती, फडकरी, दिंडीवाले या सर्वांमध्येच चैतन्याचे, जोशाचे उत्साही उधाण आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर होणारी यंदाची वारी ही नेहमीपेक्षा दुप्पट होण्याची एकूण स्थिती दिसते. वारकरी यंदा एवढ्या मोठ्या संख्येने येतील की संख्यात्मकदृष्ट्या गर्दीचा उच्चांक होण्याचे अंदाज सर्वत्र सर्व जण वर्तवताहेत. या दुप्पट संख्येने येणार्‍या वारकर्‍यांमुळे पोलीस, प्रशासन, नगरपालिका मोठ्या चिंताग्रस्त मनाने दक्ष झालेल्या आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने आलेल्या वारकर्‍यांची आरोग्य व्यवस्था, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था कशी होईल हा पोलीस/प्रशासनापुढे प्रश्न आहे. ते एक आव्हानच आहे.

15 लाख वारकरी येण्याचा अंदाज

दोन वर्षांनी होणार्‍या वारीविषयी समस्त वारकरी वर्गात असलेला प्रचंड उत्साह पाहता, यंदाच्या वारीत 15 लाखांपेक्षा अधिक वारकर्‍यांची पंढरीत गर्दी होईल, असा प्रशासन व पोलीस यांचा अंदाज आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूर क्षेत्री येण्याचे प्रमुख चार स्रोत - प्रकार आहेत.


pandharpur
1) पालखी सोहळे - आषाढी वारीसाठी आळंदी, देहूप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध संतस्थानांहून अनेक पालखी सोहळे पंढरीस पायी वाटचाल करीत येतात. या पालखी सोहळ्यांची संख्या असंख्य आहे. पण प्रमुख 40-50 पालखी सोहळ्यांसमवेत हजारोंच्या संख्येने वारकरी टाळ-मृदंगाच्या साथीने नाचत, अभंग गात, संतनामाचा जयघोष करीत ऊन-वार्‍याची तमा न बाळगता पायी पंढरपुरास येतात. संतांच्या पालखी सोहळ्यांमध्ये ‘देहू’हून प्रस्थान होणारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि ‘आळंदी’हून निघणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे प्रमुख पालखी सोहळे मानले जातात. या दोन्ही पालख्यांसोबत दोन-तीन लाख वारकरी यंदा पायी पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शेगावहून येणार्‍या संत गजानन महाराज पालखी सोहळ्यासमवेतही खूप मोठ्या संख्येने वारकरी येतात. या सर्व पालख्यांसमवेतची वारकरी संख्या दर वर्षी वाढतच असते. त्यामुळे त्यांची नेमकी संख्या सांगताच येत नाही.

2) रेल्वेच्या विशेष गाड्या - मिरज, लातूर, मुंबई, दौंडहून नेहमी पंढरपूरला येणार्‍या रेल्वे गाड्यांशिवाय वारीनिमित्त खास वारी स्पेशल गाड्या सोडल्या जातात. रेल्वे प्रवास स्वस्त व सोईचा असल्याने रेल्वे गाड्यांनी पंढरपूरला वारीसाठी येणार्‍या वारकर्‍यांची संख्याही लाखाच्या घरात असते.

3) राज्य परिवहन (एस.टी) - पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्राच्या गावागावातून राज्य परिवहन मंडळाच्या - म्हणजे एस.टी.च्या विशेष गाड्या सोडल्या जातात. या वर्षी ठिकठिकाणाहून सुमारे 4000 बस गाड्यांची सोय केली असून, पंढरपूरच्या बाहेरच तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या स्टँडवरून या गाड्यांचे नियोजन व नियंत्रण होते. रेल्वेपेक्षाही एस.टी.ने येणार्‍या वारकर्‍यांची संख्या खूपच मोठी असते. या एकाच वारीद्वारे ‘एस.टी.’ला कोटीचा नफा होतो. वारी हे एस.टी.चे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे.

 
4) खाजगी वाहने - आज सर्वत्र छोट्या खाजगी मोटारींची, प्रवासी गाड्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की पंढरपूरच्या चारही दिशांनी अनेक छोटी वाहने, टॅक्टर-ट्रॉली घेऊन वारकरी मोठ्या संख्येने येतात. रेल्वेचे, एस.टी. गाड्यांचे व्यवस्थापन ठरलेले असते, पण छोट्या वाहनांचा बंदोबस्त व वाहतूक नियमन करणे फारच अवघड असते. त्यांचा पूर्वअंदाजही करता येत नाही.

 
अशा चार प्रकारांनी पंढरपुरात होणारी वारकर्‍यांची गर्दी हे पोलिसांपुढे व प्रशासनापुढे एक आव्हानच असते. पूर्वी वारीच्या काळात ‘36-ग’ नावाचे कलम लावून जिल्हाधिकारी सर्व व्यवस्थेचे अधिकार आपणाकडे घेत व व्यवस्था करीत होते. आता वारी काळात ‘आपत्ती निवारण कायदा’ लागू करून त्याखाली विशेष सक्षम अधिकारी (जिल्हाधिकारी दर्जाचा) नेमून त्याद्वारे सार्‍या व्यवस्थांचे सुसूत्रीकरण व समन्वय साधला जातो. आषाढी वारीची जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 
‘कोविड’चे सावट
दोन वर्षांनी भरणार्‍या वारीमुळे वाढणारी गर्दी हा प्रशासनाच्या द़ृष्टीने फार मोठा प्रश्न अशामुळे आहे की अजून ‘कोविड-19’ पूर्णपणे गेलेला नाही. महाराष्ट्रात आजसुद्धा तीन-साडेतीन हजार कोविड रुग्ण उपचार घेत आहेत व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या वारीवर कोविडचे सावट आहे. स्थानिक लोक, व्यापारी, वारकरी यांच्यामध्ये ‘कोविड’विषयी फारशी दक्षता दिसत नाही. ‘मुखपट्टी’ (मास्क) हा एक चांगला उपाय आहे. पण स्थानिक प्रशासन त्यांची अनिवार्यता लागू करू शकत नाही, असे दिसते.

या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी यांनी वारीपूर्वी महिनाभर आधीच काही दक्षता, सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने गांभीर्याने नियोजन केले पाहिजे.

1) दिंडीप्रमुखांनी आपल्या दिंडीतील वारकर्‍यांचे कोविड लसीकरण झाले का याची खात्री करून घ्यावी.

 
2) दिंडीप्रमुखांनीच वारकर्‍यांना मुखपट्टी स्वतःहोऊन वापरण्याविषयी प्रबोधन करावे.


3) पंढरपुरातील ज्या घरामध्ये वारकरी निवास करतात, त्यांची संख्या स्वच्छतागृह, वायुविजन यांचा विचार करून मर्यादित करावी.


4) शासकीय महापूजेला मंत्र्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची होणारी गर्दी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन टाळावी किंवा यंदा मुख्यमंत्री/मंत्री वारीत आले नाहीत तर पोलीस/प्रशासनावरील मोठा ताण कमी होईल. डॉ. जोशी यांना वारीचा दांडगा अनुभव आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी स्थानिक सल्लागार म्हणून प्रशासनाने त्यांचा उपयोग करावा.

 
30-40 वर्षांपूर्वी वारीसाठी येणार्‍या प्रत्येक वारकर्‍याला पंढरीत प्रवेश देण्यापूर्वी कॉलरा प्रतिबंधक लस टोचली जात होती. ती पद्धत बंद झाली. या वारीत सर्वत्र प्रशासनाने कोविड प्रतिबंधक लस टोचण्याची व्यवस्था करावी; ज्यांनी अजून लस घेतली नाही, ते वारकरी लस घेतील. त्याचा तत्काळ परिणाम होणार नाही, पण 3-4 दिवसांनी तो वारकरी वारी संपवून त्याच्या गावी जाईल, तेव्हा त्याच्यात प्रतिकारक्षमता निर्माण झालेली असेल. त्यामुळे वारी संपवून गावी जाऊन आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. कोविडचा धोका कमी राहील. वारीतील प्रचंड गर्दीत ‘सोशल डिस्टन्स’ - सुरक्षित अंतर पाळणे शक्य नाही. पण मुखपट्टी व सॅनिटायझरचा वापर करून दक्षता घेता येऊ शकते. आनंदाची गोष्ट म्हणजे देहू संस्थानचे सरपंच नितीन मोरे, आळंदी ज्ञानेश्वर देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त देसाई आणि पालखी सोहळा प्रमुख ढगे-पाटील यांनी वारकर्‍यांना मुखपट्टी वापरून, स्वच्छता राखण्याचे व दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे.


pandharpur

स्वच्छतेचे आव्हान

पंढरपूरमध्ये एका वर्षात ‘चैत्र वारी’, ‘आषाढ वारी’, ‘कार्तिक वारी’, आणि ‘माघ वारी’ अशा चार वार्‍या होतात. यामध्ये ‘आषाढ वारी’ ही सर्वात मोठी असते. ही वारी नेमकी पावसाळ्यात येते. त्यामुळे ऐन वारीच्या दिवसांमध्ये पाऊस पडला, तर लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकर्‍यांची प्रचंड गैरसोय होते. दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न, बरोबर आणलेले शिळे अन्न खाऊन त्यांची प्रकृती बिघडते. अशा रुग्णांना ना हॉस्पिटलमध्ये गर्दीतून नेता येते, ना तेथे जागा मिळते. अशा वेळी अलीकडे मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सची सोय झाली आहे. तिचा वापर उपयुक्त ठरेल, असे डॉ. जोशी यांचे मत आहे. अशा मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सची सोय पुढेही प्रत्येक वेळी उपयुक्त ठरणारी आहे.

पंढरपूरची या काळातील स्वच्छता आणि एवढ्या 15 लाखांच्या संख्येने येणार्‍या वारकर्‍यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवणे हेसुद्धा नगरपालिका-आरोग्य विभाग यांच्यापुढचे आव्हान आहे. पंढरपूरची लोकसंख्या लाख/सव्वा लाख एवढीच आहे. त्यानुसार नगरपालिकेकडे आरोग्य-स्वच्छता विभागात सेवकवर्ग मर्यादित आहे. वारीच्या काळात आसपासच्या नगरपालिकांमधून स्वच्छता कामगार पुरवले जातात. पण पंढरपूरचा चारही दिशांनी वाढलेला विस्तार आणि लाखोंनी येणारे वारकरी यांची स्वच्छता राखणे खरोखरीच एक दिव्य कार्य असते. त्यात पावसामुळे सर्वत्र चिखल, साचलेले पाणी, यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिक बिकट होतो.



pandharpur
चंद्रभागा स्वच्छता
 
 
पंढरी क्षेत्रात विठ्ठल दर्शनाएवढेच चंद्रभागा नदी स्नानाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा आणि भजन-प्रवचन-कीर्तन याद्वारे होणारे नामस्मरण ही पंढरी वारीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत, हे लक्षात घेऊन लाखो वारकरी नदीला स्नानासाठी जातात. पण बर्‍याच वेळा तेथील पाणी अंघोळीसाठी आरोग्यप्रद नसते. अनेक वेळा वारीसाठी उजनी धरणातून जादा सोडलेले पाणी पंढरपूरच्या नदीपात्रात आलेलेच नसते. वारकरी भावविश्वात चंद्रभागा नदीचे व वाळवंटाचे जे अगाध माहात्म्य आहे, ते लक्षात घेऊन प्रशासनाने नदीच्या प्रवाहाची व वाळवंटाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

‘सर्व तीर्थे आम्हा घडती एकी वेळा ।
 
चंद्रभागा डोळा देखलिया।’
असे संतांनी चंद्रभागेचे वर्णन केलेले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिक हा विठ्ठलभक्ती परंपरेचा आद्य प्रणेता आहे. त्यामुळेही वाळवंटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

निर्मल वारीची उपयुक्त योजना
देहू-आळंदीहून पंढरपूरकडे जाणार्‍या पायी पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकरी असतात. ही 250 कि.मी.ची पायी वाटचाल सुमारे 17-18 दिवसांची असते. या वाटचालीत, वाटेत अनेक गावांमध्ये पालखीचा मुक्काम होतो, ती गावे फार लहान असतात व अशा गावात एकाच दिवशी हजारो वारकरी मुक्कामास येतात. त्या वेळी त्या गावात चैतन्य-उत्साह ओसंडून वाहतो. पण तेथील ग्रामपंचायत, नगरपरिषद एवढ्या वारकर्‍यांची स्वच्छता राखू शकत नसते. अशा गावांची सफाई करण्यास, स्वच्छता ठेवण्यास सरकारने ‘निर्मल वारी’ हा स्वच्छता उपक्रम योजला असून त्यासाठी खास निधी दिला जातो. यंदा निर्मल वारी योजनेत स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांना 9 कोटी देण्यात येत आहेत. या निधीचा सुयोग्य उपयोग होण्याची गरज आहे. केवळ निधी मंजूर करून सरकारने धन्यता मानू नये. तो निधी वेळेत त्या त्या गावी पोहोचला का? त्याचा योग्य तो उपयोग होतो का? हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे. ‘निर्मल वारी’ हा उपक्रम स्वच्छता, आरोग्य या दृष्टींनी एक वरदानच आहे.

 
वारीसाठी येणारे सारे विठ्ठलभक्त भाविकच असतात असे नाही, या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेण्याच्या हेतूनेही काही असामाजिक घटकही येतात. म्हणूनच म्हणतात की वारी म्हणजे ‘हौशे, गवशे, नवशे’ अशा समाजातील विविध प्रवृत्तीच्या घटकांचा मेळा असतो. या सर्वांचा बंदोबस्त हा पोलिसांवरचा मोठा ताण असतो. त्यात व्हीआयपी, मंत्री आले की हा ताण अधिकच वाढतो. मग मंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे पोलीस सामान्य वारकर्‍यांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करतात. हे टाळण्यास मंत्र्यांनी वारी काळात विठ्ठल दर्शनासाठी येऊ नये. विठ्ठल महापूजा एरवीच्या काळात येऊन करावी व मुख्यमंत्री/मंत्र्यांनी पुण्य पदरी बांधावे, ते मंत्र्यांचे वारकर्‍यांवर उपकार ठरतील, असे एकादशीच्या पहाटे विठ्ठल दर्शन रांगेत-बारीत 6-7 तास प्रतीक्षेत उभ्या वारकर्‍यांचे कळकळीचे मत आहे.

पंढरीची वारी ही आषाढ शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा अशी 7 दिवसांची असते. त्यामध्ये दशमी, देवशयनी एकादशी आणि द्वादशी हे तीन दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. एकादशी हा वारीचा मुख्य दिवस. पौर्णिमेला गोपाळकाल्याने वारीची सांगता होते. गोपाळकाल्यानिमित्त पंढरीतून गोपाळपूरकडे जाणार्‍या दीड किलोमीटर रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि चेंगराचेंगरी ही पोलीस प्रशासनाची नेहमीचीच डोकेदुखी असते. गोपाळपूरपर्यंत रस्ता रुंदीकरण व्हावे व अत्यंत दक्ष बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत-सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाने या यंदाच्या अभूतपूर्व गर्दी होणार्‍या वारीत विशेष काळजी घ्यावी, असे सुचवावेसे वाटते.

चला, पंढरीसी जाऊ।

जीवीच्या जिवलगा पाहू॥

 
(लेखक साईलीला व एकता या मासिकांचे माजी संपादक आहेत.)

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.