‘हम’ने घडवलेले जम्मू दर्शन

विवेक मराठी    25-Jun-2022
Total Views |
@अधिवक्ता वृंदा कुळकर्णी । 98214 29677
  जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील शाळा, वसतिगृहे कशी चालतात? तिथे काय अडचणी येतात? त्यांच्यासाठी काय व कसे काम करू शकतो? पैशाच्या मदतीव्यतिरिक्त व्यक्तिश: करण्यासारखे काय असेल? हे सर्व समजून घेण्यासाठी कणच या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या ‘चलो जम्मू प्रकल्प दर्शन’चे अनुभवकथन.

 
ngo
जम्मू-काश्मीर - भारताचा एक असा भाग, ज्याविषयी प्रत्येकालाच खास आकर्षण असते. 2006 साली आम्ही काही मित्रमंडळ परिवाराने एकत्रितपणे ‘लेह-लदाख’ची सहल केली, तेव्हा 4-5 दिवस श्रीनगर व परिसरात होतो. पण ती होती निसर्ग आस्वादाची ट्रिप! त्यामुळे तिकडचे प्रश्न ऐकून, वाचून माहीत असले तरी ते प्रश्न समजून घेण्याची संधी ह्या ट्रिपमध्ये मिळाली नाही.
जम्मू-काश्मीर खोर्‍याचा भाग बघावा, तिथले प्रश्न समजून घेऊन काय मदत करता येईल ह्याचा विचार करावा असे मला सारखे वाटत होते. तो योग जुळून आला 2022च्या मार्चमध्ये. 1 मे ते 6 मे 22 - चलो जम्मू प्रकल्प दर्शनची हाक, डोंबिवलीतील ‘हम’ ह्या संस्थेने दिली. जम्मू-काश्मीर भागात विद्याभारती, सेवाभारती, राष्ट्र सेविका समितीद्वारे होणार्‍या राष्ट्रकार्यात स्वत:ला जोडून घेऊन, सीमावर्ती भागात चालणार्‍या शाळा, वसतिगृहे, महिला सक्षमीकरण उपक्रम ह्यांत सक्रिय सहभाग देणारी HUM (Hands United Mission).
 
 
सीमावर्ती भागातील शाळा, वसतिगृहे कशी चालतात? तिथे काय अडचणी येतात? आपण अधूनमधून तिथे जाऊन किंवा डोंबिवलीतून त्यांच्यासाठी काय व कसे काम करू शकतो? पैशाच्या मदतीव्यतिरिक्त व्यक्तिश: करण्यासारखे काय असेल? अशा सर्व शंका तिथल्या भेटीत जाणून घेता येतील व त्याचबरोबर स्वत:च्या क्षमतांचीही चाचपणी करता येईल, ह्याची खात्री वाटल्याने ‘चलो जम्मू प्रकल्प दर्शन’मध्ये सामील व्हायचे ठरविले.
1 मे ते 6 मे 2022 हा कालावधी तसा अल्पच होता. पण आपल्याला कधीही न भेडसावणार्‍या समस्यांची ओळख होण्यासाठी तो मोलाचा ठरला. एक पाऊलवाट दाखविता झाला.



ngo
संघपरिवारातील शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या विद्याभारती ह्या अखिल भारतीय संघटनेने जम्मू भागात भारतीय शिक्षा समिती ह्या संलग्न संस्थेच्या आधिपत्याखाली शाळांचे जाळे विणून तिथल्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली आहे, तर सेवा क्षेत्रात काम करणारी सेवाभारती अनेक छात्रावास चालवून त्या मुलामुलींच्या रहिवासाची उत्तम सोय करीत आहे. एकूणच तिथला समाज राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ही सगळी कामे सुरू आहेत. ह्यापैकी काही शाळांना भेटी, वसतिगृहावर विद्यार्थ्यांच्या सहवासाचा लाभ घेऊन त्यांची मनोभूमिका, अडचणी जाणून घ्याव्यात, तेथील जीवनपद्धतीचा परिचय करून घ्यावा हा ह्या प्रकल्प भेटींचा मुख्य उद्देश होता. पण त्याचबरोबर प्रकल्पांच्या वाटेनजीक असलेल्या आपल्या व पाकिस्तानच्या सीमांवर जाणे, तिथली परिस्थिती जाणून घेणे, त्या भागातील मंदिरे, परिसर, संस्कृती ह्यांचाही परिचय करून घेणे, तेथील मंदिरे ही भारतीय संस्कार टिकवून ठेवण्यासाठी कशी मोलाची कामगिरी बजावत आहेत हे समजून घेणे हादेखील दुहेरी उद्देश होताच.


ngo
1 मेच्या पहाटे निघून दुपारी जम्मूला पोहोचलो. लगेच जम्मू शहरापासून साधारण 25 कि.मी. अंतरावर असलेल्या सुचेतगड बॉर्डरला संध्याकाळच्या परेडसाठी गेलो. सुचेतगड! पाकिस्तानातील सियालकोटपासून केवळ 11 कि.मी.वर असलेल्या ह्या बॉर्डरवर एकेकाळी केवळ भारताला त्रास देण्यासाठी सतत बाँबचा, बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत असे. सैनिकांबरोबरच अनेक निरपराध नागरिकदेखील आपला जीव आणि / किंवा अवयव गमावीत असत. असा राक्षसी वर्षाव झेलणारी ही बॉर्डर आता 99% शांत झाली आहे. त्यासाठी आपले सैनिक त्यांच्या पराक्रमाची, कर्तव्याची शर्थ तर करतातच, पण त्यांना तेवढीच साथ असते तिथल्या राष्ट्रप्रेमी जनतेची, त्यांच्या मानसिक बळाची आणि रघुनाथजीवर असलेल्या भरवशाची, श्रद्धेची! ह्या सीमेवर असलेली रघुनाथजी व हनुमानजी ह्यांची मंदिरे किमान 300 वर्षांपेक्षा जुनी आहेत.
 
 
 
सुचेतगडला रविवारी नागरिकांसाठी खुली असलेल्या परेडचा मिळालेला आनंद अवर्णनीय होता. मुख्य म्हणजे परेड सुरू होण्यापूर्वी नागरिकांसह देशभक्तिपर गाणी एकत्रितपणे म्हणण्याचा व त्यावर नाचून आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार नक्कीच राष्ट्रभावना चेतविण्याचे काम करतो.
 
 
परेडच्या ठिकाणी आम्हाला जम्मूच्या आदिती प्रतिष्ठान ह्या छात्रावासातील मुली भेटल्या. प्रत्येक मुलीची कहाणी ज्वलंत राष्ट्रभक्तीचे उदाहरण आहे. त्यापैकी प्रत्येकीचे वडील, भाऊ, नाहीतर काका, मामा इ. एकतर पाकिस्तानच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले किंवा आई, मावशी, काकू, बहीण ह्यापैकी कुणी ना कुणी पाकिस्तान्यांकडून नागविल्या/नासविल्या गेलेल्या. मनस्वी दुःख देणारी स्थिती!



ngo
दुसर्‍या दिवशी आदितीला भेट दिली. ह्या मुलींना जपण्यासाठी, सांभाळण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या, राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत प्रचारिका पंकजादीदींची भेट डोळ्यात अंजन घालणारी ठरली. वयाच्या अगदी 4-5 महिन्यांपासून ‘आदिती’च्या मायेखाली वाढत असलेली प्रत्येक मुलगी आज स्वत:चे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. आपण विचारदेखील करू शकत नाही अशा दिव्यातून तिथली प्रत्येक मुलगी गेली आहे, पण त्याचा ‘इश्यू’ न करता देशहितार्थ स्वत:च्या पायावर उभे राहण्याची त्यांची धडपड फारच प्रेरणादायक आहे. दुसरी प्रकल्प भेट होती पोनीचेक ह्या गावातील दृष्टी हे मुलींचे वसतिगृह. जम्मू, लदाख, काश्मीरजवळच्या गाव-खेड्यातून आलेल्या, विपरीत परिस्थितीतील ह्या मुली स्वतंत्रपणे विचार करणार्‍या, शिस्तीच्या आणि व्यवहारचतुरदेखील आहेत हे बघून अचंबित व्हायला झाले. अर्थातच त्यांच्या सुयोग्य जडणघडणीसाठी सेवाभारतीकडून मिळत असलेले मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.
 
 
गुप्तगंगेच्या काठी असलेली पुर-मंडल ही जोड गावे प्रामुख्याने ओळखली जातात ती तिथे असलेल्या पुरातन शिवमंदिरासाठी. हे मंदिर किती जुने आहे हे आजही ज्ञात नाही, पण साधारण अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी एका राजाला ह्याचा शोध लागला, असे सांगतात. गुप्तगंगा कोरडी आहे. तिच्या पात्रातून अनेक रस्ते जातात, इमारतीदेखील आहेत त्यात, पण मंदिराजवळच्या भागात मात्र जरा खोदले तरी पाणी लागते व थोड्या वेळाने जिरूनही जाते, हे आश्चर्यच! हे शिवमंदिर आपल्याला अनेक प्रकारे कोड्यात टाकते. मंदिरात पिंडीच्या जागी खळगा असून त्यात पाण्यात स्वयंभू दगडी नाग आहे. हा खळगा किती खोल आहे ह्याचा थांग लागलेला नाही आणि विशेष म्हणजे ह्यात कितीही पाणी घातले तरी त्यातील पाण्याची पातळी वाढत किंवा घटत नाही, हे अद्भुतच म्हणावे लागेल. अशा चमत्कारी गोष्टीवर विज्ञान व तर्क दोन्हीही काम करीत नाहीत हेच खरे! भरीस भर म्हणून ह्या मंदिर परिक्रमेत एकाच मोठ्या पिंडीत 11 छोट्या पिंडी, अशी 108 महादेव मंदिरे आहेत. कश्यप ऋषींनी निर्माण केलेली, वसविलेली भूमी म्हणजे कश्मीर! ह्यावरच्या अनेक कथा ऐकताना मती गुंग होते. पुर-मंडलला महिला सक्षमीकरणाचे कामदेखील जोरात सुरू झाले आहे. गरज आहे अर्थातच त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याची, आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे कृतीने सांगण्याची!
 
अजनावून म्हणजे काश्मिरी भाषेत -wake up call!

ही अक्षरे सार्थ ठरविणारी पाटी आहे अग्रोटा भागातील ‘जगती’ ह्या गावातील सेवाभारती संचालित ‘अथरूट’ महिला सक्षमीकरण केंद्राच्या सेवादालनाच्या प्रवेशदारावर. 30 वर्षांपूर्वी कश्मिरातून विस्थापित होऊन जम्मूत आलेल्या काश्मिरी पंडितांची ही वस्ती! 10 वर्षांपूर्वी छोटी पण पक्की घरे मिळाली आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे कामही वेग घेऊ लागले. कढाई, शिलाई, घरगुती वापराचे अनेक मसाले, साबणे, धूप इ. उत्पादने व त्यांची विक्री जरी त्यांना उभे राहण्याचे बळ पुरवीत असले, तरी तिथे चित्रफीत बघताना, प्रत्येकाशी बोलताना त्यांची आतून तुटले गेलेपणाची भावना आपल्याला खूपच अस्वस्थ करते. हलवून टाकते.
काश्मीरचे राजे हरिसिंग यांचा जम्मू येथील महाल बराचसा लष्कराच्या ताब्यात असला, तरी 1976 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी त्यातील काही भागात संग्रहालय व वाचनालय सुरू करून ‘अमर महाल’ असे त्याचे नामकरण केले. त्यामुळे चित्रकला, रंगकला, छायाचित्रे ह्यातून तिथली संस्कृती, कला ह्यांचा आस्वाद घेणे सहज झाले आहे. सुबत्ता, निसर्ग ह्याचबरोबर वास्तुकला, चित्रकला ह्या बाबतीतदेखील काश्मीर किती समृद्ध, संपन्न होते, ह्याचा प्रत्यय संग्रहालय बघताना ठायी ठायी येतो. सध्याची परिस्थिती बदलून सर्वांना त्यांचे गतवैभव प्राप्त व्हावे, अशी प्रार्थनाही मनात आपसूकच उमटते.


ngo
पुढची प्रकल्प भेट होती राजौरी ह्या पाकिस्तानच्या सीमेजवळील भागातील ढांगरी गावातील शाळा आणि दस्सल गावी असलेले मुलांचे वसतिगृह दक्ष. हे दोन्ही प्रकल्प एकमेकांपासून साधारण 15 ते 20 कि.मी.च्या अंतरावर आहेत. उंच डोंगरावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या दक्षमध्ये मुक्कामाला राहिल्याने तेथील मुलांशी छान गप्पागोष्टी करता आल्या. दिवसभरातील सर्व कामांचे नियोजन अतिशय उत्कृष्टरित्या करून मुलेच सर्व कामे काटेकोरपणे व कुशलतेने पार पाडतात. पहाटे 5ला प्रार्थनेने सुरू होणारा त्यांचा दिवस शाखा, मैदानी व बैठे खेळ, न्याहारी, शाळा, छात्रावासाची स्वच्छता धरून सर्व कामे, सायंप्रार्थना, अभ्यास, जेवण इ. करून रात्री 10 वाजता संपतो. आठवड्याचे नव्हे, तर महिन्याचे वेळापत्रक अत्यंत आखीवरेखीव व चौफेर असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक अशा सर्व अंगांनी मुलांची जडणघडण उत्तम प्रकारे होत आहे. आवर्जून नमूद करावीशी वाटते ती एक गोष्ट म्हणजे मुलांनी विविध खेळांमध्ये राज्यस्तरावर मिळविलेले प्रावीण्य! एका राज्यस्तरीय स्पर्धेत चमूला प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची मिळालेली भक्कम रोख रक्कम, ‘आपल्या छात्रावासाला’ मिळालेली विविध पदके, चषक, ट्रॉफी ठेवण्यासाठी कपाट घेण्याचा मुलांनी एकमताने घेतलेला निर्णय, त्यांची एकता व राष्ट्रभक्ती दर्शविणारे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. धन्य ती मुले व त्यांना घडविणारे मार्गदर्शक! अत्यंत प्रेमाने, आत्मीयतेने आदरातिथ्य करणारी ही मुले बघून डोळे व मन दोन्ही भरून आले. अर्थातच सर्व छात्रावासातील मुलामुलींना घडविण्यात जम्मूमध्ये तनामनाने झोकून देऊन काम करणार्‍या भारतीय शिक्षा समितीच्या व सेवाभारतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, हेच खरे!
जिल्हा राजौरीतील ढांगरीतील शाळा 2011 साली सुरू झाली. शिशुवर्ग ते 10 वीपर्यंत असलेल्या ह्या विनाअनुदानित शाळेत कोविड येईपर्यंत 400 पट होता. कोविडबरोबरच विचित्र सरकारी धोरणांचा फटका बसल्याने सध्या संख्या घटली असली, तरी शाळा सर्व दृष्टींनी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेला आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य व समर्पित शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर समाजानेदेखील हातभार लावणे गरजेचे आहे.
पुढे राजौरीहून पूंचकडे जाताना, पूंचपासून साधारण 13 कि.मी. अंतरावर असलेल्या बूढा अमरनाथचे गुफा मंदिर बघताना खूप सात्त्विक आनंद मिळाला. असे म्हणतात की बूढा अमरनाथचे दर्शन तुम्हाला अमरनाथचे दर्शन घेतल्याचे पुण्य देते. पूंचमधील कामात सक्रिय असलेल्या रविजी शर्मा ह्यांची भेट आनंददायक व त्यांनी उरीजवळील बॉर्डरला घडविलेली भेट अविस्मरणीय ठरली.
पूंच ते जम्मू ह्या परतीच्या प्रवासात संध्याकाळी जम्मूतील अंबफलच्या भारतीय विद्यामंदिरात गेलो. शाळेची वेळ संपल्याने विद्यार्थी नसले, तरी कॉलेजच्या परीक्षेसाठी आलेल्या दिशा छात्रावासातील काही मुली तिथे भेटल्या. 2018 साली गुढीपाडव्याच्या वेळी ह्या मुली आदानप्रदान उपक्रमाअंतर्गत डोंबिवली येथे आलेल्या असल्याने आम्हाला परस्परांना भेटून खूप आनंद झाला. सेवाभारतीचे क्षेत्रीय संघटन मंत्री आदरणीय दादाजींची तिथे झालेली भेट हा अपूर्व योग होता. “प्रकल्प देखके आपको क्या समझ में आया?” ह्या त्यांच्या प्रश्नाने सर्वांनाचा विचार करण्यास व बोलण्यास भाग पाडले. सर्व कार्याचे उद्दिष्ट दादाजींनी एका वाक्यात सांगितले - “सेवित से सेवक और सेवक से कार्यकर्ता, यही हमारा ध्येय है, लक्ष्य है!” नजरेसमोर लगेच उभा राहिला दक्ष वसतिगृहातला नीरज, जो तिथेच राहून शिकला, तिथेच सेवक झाला आणि आता कार्यकर्त्याच्या भूमिकेतून दक्षच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत आहे.
ह्या सर्व कार्यात कणचचा नावाप्रमाणेच असलेला सहभाग, जास्तीत जास्त लोकांना जोडून घेण्याची कळकळ किती योग्य आणि आवश्यक आहे, ह्याची प्रचिती ह्या प्रकल्पभेटीत आली. साहजिकच ‘सेवित’ गटात नसल्याचे आपले सद्भाग्य सेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून वापरू या ही इच्छा, आस प्रबळ झाली हे सांगायला नकोच.

चला तर मंडळी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपला सहभाग तनमनधनाने नोंदवू या! बलशाली भारत उभारणीच्या कामात, सक्षम व राष्ट्रभक्त नवीन पिढी घडविण्याच्या ह्या राष्ट्रकार्यात अग्रेसर होऊ या!