सुपरफूड मायक्रोग्रीन्स

विवेक मराठी    25-Jun-2022
Total Views |
 @तनुजा महाजन ।
  
हल्ली सगळीकडे मायक्रोग्रीन्सबद्दल बरंच बोललं जातं. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्येही मायक्रोग्रीन्सना 'superfood' म्हणून महत्त्वाचं स्थान मिळत आहे. मायक्रोग्रीन्समधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स, पॉलिफेनॉल्स शरीराला सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच मायक्रोग्रीन्स आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनत आहेत.

'superfood
मायक्रोग्रीन्स बियांना अंकुर फुटून जेव्हा पहिल्या चार ते पाच पानांची वाढ होते, अशा इवल्याशा रोपांना मायक्रोग्रीन्स म्हणतात. निसर्गातील एक अद्भुत चमत्कार म्हणजे बीज/बिया. एका इवल्याशा बीजामध्ये महावृक्षाला जन्माला घालण्याची क्षमता असते. बियांद्वारे झाडांची पुढची पिढी तयार होत असते, त्यामुळेच झाडं आपल्या पूर्ण शक्तीनिशी बीजनिर्मिती करण्याचं काम करतात. पुढची पिढी जास्तीत जास्त सुदृढ व निकोप व्हावी, यासाठी झाडाने त्याची पूर्ण ऊर्जा एका इवल्याशा बीजामध्ये पणाला लावलेली असते.

बीजातून बाहेर आलेली इवलीशी वनस्पती निसर्गाच्या सगळ्या आव्हानांना पुरून उरायला हवी, म्हणून निसर्गाने बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची, ऊर्जेची साठवण केलेली असते. त्यामुळेच सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात लहान लहान पानांमध्ये मूळ झाडाच्या किंवा फळांच्या नऊ पट जास्त पोषणमूल्यं असतात असं म्हणतात. खरं तर मायक्रोग्रीन्स आपल्याला नवीन नाहीत, आपल्याकडे कित्येक वर्षांपासून चांगल्या आरोग्यासाठी गव्हांकुराचं सेवन केलं जातं. मायक्रोग्रीन्स तयार करण्याकरिता बर्‍याच भाज्या, पालेभाज्या, तृणधान्यं, तसंच कडधान्यं यांच्या बियांचा वापर करता येतो. खास मायक्रोग्रीन्स तयार करण्यासाठीच्या बिया बाजारात मिळतात. त्यात फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमॅटो, चिया सीड्स, ब्रोकोली, लाल/पांढरा मुळा, बीट, शेपू, पालक, हिरवा/लाल माठ, अल्फा-अल्फा, सब्जा, गाजर, ओट, पाकचोई, पार्सले, कांदा, स्वीटकॉर्न यांचा समावेश आहे; तर आपल्या रोजच्या वापरातल्या, आपल्या स्वयंपाकघरात असणार्‍या मेथी, जवस, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, मसूर, मटकी, हरभरा, बीन्स, बडीशेप, मोहरी, अळीव यासारख्या बिया वापरूनही उत्तम मायक्रोग्रीन्स तयार करता येतात.


'superfood

हल्ली मायक्रोग्रीन्सचं व्यावसायिक उत्पादनही घेतलं जातं. त्यासाठी मायक्रोग्रीन्स तयार करण्याचे खास ट्रे बाजारात मिळतात. परंतु आपल्या कुटुंबापुरते मायक्रोग्रीन्स आपण घरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार करू शकतो. फूड ग्रेड प्लास्टिकचे छोटे छोटे डबे, आइसक्रीमचे डबे, नारळाच्या करवंट्या इ.चा उत्तम वापर करता येतो. दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेली (solarized) माती, चिमूटभर हळद आणि कोकोपीट यांचं मिश्रण ट्रेमध्ये किंवा डब्यात पसरावं. ह्या डब्यांना तळाशी छिद्र करून घ्यावं, म्हणजे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते आणि बिया कुजत नाहीत. यावर बिया एकमेकांच्या अगदी जवळजवळ अशा पसराव्यात. बियांमध्ये फार अंतर ठेवू नये. वरून परत मिश्रणाचा एक हलकासा थर द्यावा. बिया रुजवल्यापासून दोन आठवड्यांत मायक्रोग्रीन्स खाण्यासाठी तयार होतात. तयार मायक्रोग्रीन्स कात्रीने कापून घ्यावेत. सँडविचेस, सूप्स, सलाड्स, चटण्या यामध्ये, पिझ्झावर टॉपिंग म्हणून यांचा छान वापर करता येतो. मायक्रोग्रीन्सचा आणखी एक फायदा असा की उग्र चवीच्या किंवा न आवडणार्‍या भाज्या आपण मायक्रोग्रीन्सच्या माध्यमातून आनंदाने सेवन करू शकतो. साधारण तीन-चार दिवसांच्या अंतराने एक, याप्रमाणे विविध मायक्रोग्रीन्स लावावेत, म्हणजे रोज खाण्यासाठी मिळत राहतात. सुरुवातीला मायक्रोग्रीन्स वाढवताना थोडं कठीण वाटू शकतं, पण सरावाने छान जमतात. अशा वेळी नव्याने सुरुवात करणार्‍यांनी सोप्या, सहज उगवून येणार्‍या बिया - उदा., चिया सीड्स, मेथी, मोहरी वापराव्यात. तर असे बहुगुणी मायक्रोग्रीन्स तयार करून तुम्हीही एका आरोग्यदायक रूटीनची सुरुवात करा!
@तनुजा महाजन

'superfood