भारतात आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणारे प्रा. डॉ. तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री

विवेक मराठी    28-Jun-2022
Total Views |
@डॉ. क.कृ. क्षीरसागर । 9422080865
डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळवला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. त्यामुळे अनेक वैज्ञानिक भारतात निर्माण झाले. विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.

scientist

परतंत्र भारतात आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणार्‍या जगदीशचंद्र बोस (1858-1937), आचार्य प्रफुल्लचंद्र राय (1861-1944), सर आशुतोष मुखर्जी (1864-1924) अशा दिग्गज वैज्ञानिकांच्या मालिकेत प्रा.डॉ. तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचाही समावेश होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायचे, तर ज्ञानार्जनाची आस, विज्ञान क्षेत्राला आणि अध्यापनाला वाहिलेले जीवन, नि:स्वार्थी वृत्ती, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची शून्यातून उभारणी करायचे कौशल्य, आध्यात्मिक मनोवृत्ती असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असे करता येईल. त्यांच्या जीवनाचा आलेख प्रेरणादायक आणि अचंबित करणारा ठरेल.

 
शेषाद्रींचा जन्म 3 फेब्रुवारी 1900 रोजी मद्रास प्रेसिडेन्सीमधील (तामिळनाडूमधील) चेरा राजघराण्याशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेल्या कुलिथताई या गावात झाला. तिरुवेंगाडस अय्यंगार आणि नामगिरी अम्मल यांचे ते सुपुत्र. त्यांचे वडील शाळेत अध्यापन करीत. घराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. बालपणातील सद्गुणांची त्यांची शिदोरी त्यामुळेच समृद्ध झाली. तर्कशुद्ध विचारसरणीची आणि शिस्तबद्ध जीवनाची जडणघडण बालपणातच झाली.

गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना श्रीरंगमला पाठविण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्लीच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रभक्तीने भारलेल्या संस्थापकांनी या महाविद्यालयाची स्थापना केली असल्याने शेषाद्रींवरही प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. नंतर त्यांनी बी.एस्सी. ऑनर्स पदवीसाठी तत्कालीन मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्ययन केले. त्या वेळी त्यांना विख्यात रसायनशास्त्रज्ञ प्रा. नारायण अय्यर आणि डॉ. बिमन बिहारी डे यांचे मार्गदर्शन लाभले आणि रसायनशास्त्राची गोडी निर्माण झाली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि सेंद्रिय रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय औषधी वनस्पती व विशेषत: अनंतमूळ व कोरफड यावर संशोधन केले.
 
घरचे दारिद्य्र असल्यामुळे मद्रासमधील खर्चीक वास्तव्य परवडणारे नव्हते. त्यामुळे पुढच्या संशोधनात मोठी अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय शोधताना त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्टुडंट्स होमने आश्रय दिला. तेथे राहिल्यामुळे साध्या राहणीचे व शिस्तपालनाचे संस्कार झाले. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचे संतुलन साधण्याचे धडे मिळाले. या वास्तव्यात त्यांना एम.एस्सी. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले.

 
पदव्युत्तर शिक्षण व संशोधन
 
1927मध्ये प्रा. शेषाद्री यांना ‘ओव्हरसीज टेक्निकल स्कॉलरशिप’ने गौरविण्यात आले. त्यामुळे त्यांना मँचेस्टर विद्यापीठामध्ये विख्यात सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाची संधी प्राप्त झाली. पुढे रॉबर्ट रॉबिन्सन यांना 1947 साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. शेषाद्रींच्या संशोधनाचा विषय होता मलेेरिया प्रतिबंधक औषधे शोधणे आणि ‘अँथोसायनिन’चे संयुग तयार करणे. रॉबिन्सन यांच्यामुळे अन्य प्रख्यात वैज्ञानिकांशी त्यांंना संपर्क साधता आला.

 
डॉ. शेषाद्रींच्या साठाव्या वाढदिवसाच्या वेळी रॉबिन्सन यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची, संशोधक वृत्तीची आणि कार्यक्षमतेची खूप प्रशंसा केली. त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यापन कौशल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार प्रकट केले. त्या काळात शेषाद्री यांनी युरोेपमधील अनेक संशोधन संस्थांमध्येही संशोधन केले. 1929मध्ये ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. फ्रिट्ज प्रेगेल यांच्याबरोबर ‘ऑरगॅनिक मायक्रोअ‍ॅनालिसिस’ तंत्रावरही मोलाचे संशोधन केले.
 
 
 
1930 साली प्रा. शेषाद्री भारतात परतले. तो काळ प्रचंड धामधुमीचा होता. जुलमी ब्रिटिशांनी सर्वच क्षेत्रांत भारतीयांना धाकदडपशाहीने ठेवण्याचा आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा परिस्थितीत आपल्या पसंतीची संधी मिळविणे डॉ. शेषाद्रींना दुरापास्त झाले. तरीही अखेरीस त्यांना मद्रास विद्यापीठात संशोधनाची अधिछात्रवृत्ती मिळाली. नंतर कोइंबतूरच्या कृषी संशोधन संस्थेत मृदाशास्त्र विभागात मोठी संधी मिळाली. यानंतर मात्र त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहणार्‍या जबाबदार्‍यांना त्यांना सामोरे जावे लागले. आंध्र युनिव्हर्सिटीच्या नवीन सुरू होणार्‍या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुखपद त्यांना मिळाले. त्याची सर्वांगांनी उभारणी करणे हे फार मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. सुदैवाने त्यांना संस्थापक उपकुलगुरू सर सी.आर. रेड्डी आणि नंतरचे उपकुलगुुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मोलाची मदत केली. त्याच काळात दुसर्‍या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश राजवटीचे जुलूम वाढले.

 
डॉ. शेषाद्रींनी कष्टपूर्वक उभारलेल्या प्रयोगशाळांचा आणि शैक्षणिक सुविधांचा कब्जा ब्रिटिश लष्कराने घेतला. त्या ठिकाणी लष्करी इस्पितळाची उभारणी करण्यात आली. अशा परिस्थितीतच त्या विशाखापट्टणम शहरावर जपानी विमानांनी बाँब हल्ले केले. 482 किलोमीटर अंतरावरील गुुंटुर या ठिकाणी विद्यापीठाचे तातडीने स्थलांतर केले गेले. तात्पुरते मांडव उभे करून त्यात काम सुरू झाले. शिवाय दोन स्थानिक महाविद्यालयाच्या इमारतींचा आश्रय त्यासाठी घेण्यात आला. अर्थातच प्रयोगशाळेला लागणारी उपकरणे व रसायने यांचा आयात पुरवठा पूर्णत: थांबला.
 
 
या कठीण परिस्थितीमध्येसुद्धा डॉ. शेषाद्रींनी संशोधन कार्य चालू ठेवले, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व डॉक्टरेट पदव्या प्राप्त करून दिल्या. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.

युद्धसमाप्तीनंतर विद्यापीठाने आपले काम पूर्ववत उभे करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वी केला. 1949मध्ये डॉ. शेषाद्री दिल्लीच्या दिल्ली विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून नियुक्त झाले. काही काळानंतर त्यांच्याकडे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्षपद चालत आले, परंतु ते स्वीकारायला त्यांनी नकार दिला. कारण त्यांच्या आवडत्या संशोधन आणि अध्यापन कार्यात त्यामुळे व्यत्यय आला असता. डॉ. शेषाद्री यांच्या निष्ठापूर्वक काम करण्याच्या पद्धतीकडे आकर्षित होऊन अनेक संशोधक विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळविला. अखंडितपणे 24 तास मिळणार्‍या सुविधांचा लाभ त्यांना प्रा. शेषाद्रींमुळे घेता आला. कधीही सुट्टी न घेता ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. यामुळे पुढे 1962 साली यूजीसीने त्यांच्या विभागाला अतिप्रगत संशोधन केंद्र म्हणून अधिकृतपणे सन्मानित केले. त्याचे नामकरण झाले ‘द अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर द केमिस्ट्री ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स’ आणि शेषाद्री त्याचे पहिले संचालक झाले.
 
 
1965 साली ते निवृत्त झाले, परंतु त्यांची गुणवत्ता श्रेणी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) म्हणून सन्माननीय नियुक्ती झाली. शेवटच्या निवृत्तीनंतर त्यांनी आपला प्रचंड ग्रंथसंग्रह दिल्ली विद्यापीठाला देणगी म्हणून दिला.


 
डॉ. शेषाद्री हे ज्येष्ठ वैज्ञानिक होते, तसेच आध्यात्मिक वृत्तीचेही होते. त्यांच्या मते केवळ विज्ञान विकास हा एकांगी ठरेल. त्याला आध्यात्मिक विचारांची व शिक्षणाची जोड पाहिजेच. त्यांनी त्यासाठी दिल्ली विद्यापीठात वेदान्त समितीची स्थापना केली. त्यासाठी त्यांना रामकृष्ण मिशनचा सहयोग मिळाला. 1962 साली डॉ. शेषाद्रींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1966 साली प्रा. एन.व्ही. सुब्बाराव यांनी नोबेल पुरस्कारासाठी त्यांची शिफारस केली होती.
 
 
 
डॉ. शेषाद्री यांचे हे निष्ठावान वैज्ञानिकाचे व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही."Money and materials alone do not secure good research, they are only adjuncts and it is the human element behind them that matters' हे त्यांचे उद्गार अगदी अर्थपूर्ण आहेत.